Opinion

निस्सीम देशभक्त,प्रखर हिंदूधर्माभिमानी,पराक्रमी, निष्ठावान, संस्कृती रक्षक राणी गाइदन्ल्यू

(एकदा एका इंग्रजाने स्वामी विवेकानंदांना विचारले, “तुमच्या देशातील स्त्रिया पुरूषांशी हस्तांदोलन का करत नाहीत? “
स्वामीजी म्हणाले,”तुमच्या देशातील सामान्य माणूस तुमच्या राणीशी हस्तांदोलन करतो? “
” नाही ” त्यानं उत्तर दिलं
स्वामीजी म्हणाले, ” आमच्या देशात प्रत्येक स्त्री राणी असते. “)

पूर्वांचलातील निसर्गरम्य सौंदर्यानी नटलेल्या सात राज्यांपैकी मणिपूर राज्यात उहूसैन व मकरू या नद्यांमध्ये काला नागा पर्वतांची रांग आहे.या रांगांमध्ये रोंगमै नागा नावाची जनजाती राहाते.तेथील लंकोवा गावामध्ये २६ जानेवारी १९१५ ला गाइदन्ल्यूंचा जन्म झाला. गाइदन्ल्यूचा अर्थ चांगला मार्ग दाखवणारी.

‘ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ‘ या म्हणीप्रमाणे त्या लहानपणापासूनच स्वतंत्र विचाराच्या,दृढ इच्छाशक्ती असलेल्या,प्रतिभासंपन्न, चिंतनशील,तीक्ष्ण बुध्दीच्या होत्या.लहानपणापासूनच इंग्रजांचे अत्याचार,आपल्या संस्कृतीवर,धर्मावर होणारं ख्रिस्तींचं आक्रमण त्या पाहात होत्या.म्हणून आपल्या संस्कृतीचं रक्षण करणं,रूढी, परंपरा टिकवून ठेवणं,अंधश्रध्दा दूर करणं तसेच ब्रिटिशांना आपल्या देशातून हाकलवून लावणं हे ध्येय त्यांनी उराशी बाळगलं होतं. त्यांचा चुलत भाऊ हैपोऊ जादोनांग यानं ‘ हेरका ‘हे धार्मिक आंदोलन सुरू केलं होतं.हे आंदोलन हळू हळू स्वतंत्रता आंदोलनाकडे झुकलं.इंग्रजांनी हे आंदोलन मोडून काढण्यासाठी १९३१ मध्ये जादोनांगला कैद करून, त्याच्यावर खटला चालवून २९ आॅगस्ट १९३१ ला त्याला फाशी दिली. त्याच्या मृत्यूनंतर आंदोलनाची सूत्रं अवघ्या १६व्या वर्षी गाइदन्ल्यूकडे आली. लहान वयातच त्यांनी इंग्रजांविरूध्द लढा द्यायला सुरूवात केली. ‘ हम आजाद लोग है। गोरे हमपर राज नही कर सकते।’ अशी घोषणाच त्यांनी दिली.

स्थानिक लोकांना आंदोलनात ओढण्यासाठी त्यांनी, इंग्रजांना टॅक्स देऊ नका असं सांगितलं.इंग्रजांच्या जाचाला कंटाळलेल्या लोकांनी टॅक्स देणं बंद केलं.इंग्रजांनी लोकांवर कारवाई सुरू केली.गाइदन्ल्यू भूमीगत राहून इंग्रजांवर हल्ले करत राहिल्या.त्यांच्या या गनिमी काव्याच्या लढाईने इंग्रज जेरीस आले.त्यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या.पण त्या हाती लागल्या नाहीत.इंग्रजांनी त्यांना पकडून देणार्‍याला २०० रू नंतर ५००रू. चं बक्षिस जाहीर केलं तसेच त्यांची माहिती देणार्‍याचा कर १०वर्षं माफ केला जाईल अशीही लालूच दाखवली. पण त्याचाही उपयोग झाला नाही. त्यांच्या या लढ्याचा प्रभाव आसाम, मणिपूर, नागालॅंड या राज्यांवरही होता.

१६फेब्रुवारी १९३२ रोजी आसाम रायफल्सच्या सैनिकांबरोबर झालेली लढाई ‘ हैग्रम की लडाई ‘ म्हणून प्रसिध्द आहे. आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी पोलोमी इथं आऊट पोस्ट बनवायला सुरूवात केली. त्याचवेळी इंग्रजांनी मोठं सैन्य पाठवून त्यांच्यावर हल्ला केला. या अनपेक्षित हल्ल्यात त्या पकडल्या गेल्या. त्यांना कोहिमाला पाठवलं गेल. त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली.त्यांनी १४ वर्षं तुरूंगवास भोगला. या १४ वर्षांत त्यांना अनेकदा निरनिराळ्या तुरूंगात हलविण्यात आलं.

१९३७ मध्ये स्व. पं.नेहरूंना त्यांचा पराक्रम कळला. त्यांनी शिलाॅंगच्या तुरूंगात त्यांची भेट घेतली. ‘आपण तर नागांच्या राणी आहात’ असं म्हणून त्यांनी त्यांचा गौरव केला.गाइदन्ल्यूंची तुरूंगातून सुटका करावी ही नेहरूंची मागणी इंग्रजांनी धुडकावून लावली. त्यांना सोडलं तर त्या पुन्हा उठाव करतील ही भीती इंग्रजांना होती.

स्वातंत्र्यानंतर त्यांची तुरूंगातून सुटका झाली. त्या नंतरही त्या समाजहिताकरिता संघर्ष करीत राहिल्या. १९७२ मध्ये त्यांना ‘ताम्रपट स्वतंत्रता सेनानी ‘पुरस्कार देण्यात आला. १९८२ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण ‘ पुरस्काराने गौरवण्यात आलं.

वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक स्व. बाळासाहेब देशपांडे यांच्याशी त्यांचा १९७८ मध्ये संपर्क झाला.गाइदन्ल्यूंच्या इच्छेनुसार हिंदू नागा मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था बाळासाहेबांनी निरनिराळ्या गावातील कल्याण आश्रमाच्या शाळा आणि छात्रावासात केली.

१९८५ साली वनवासी कल्याण आश्रमाच्या भिलाई इथे झालेल्या पहिल्या महिला संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.आपल्या भाषणात त्या म्हणाल्या , “आपण आपल्या देशाचे, धर्माचे ,भारतीय संस्कृतीचे रक्षण केले पाहिजे. मी हिंदू आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.” अशा या निस्सीम देशभक्त,प्रखर हिंदूधर्माभिमानी,पराक्रमी, निष्ठावान, संस्कृती रक्षक गाइदन्ल्यूंना १७ फेब्रुवारी १९९३ रोजी देवाज्ञा झाली.

त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारत सरकारने एक टपाल तिकिट काढले. कल्याण आश्रमाने सुध्दा, त्यांचे देशासाठीचे योगदान लक्षात घेऊन त्यांचे चरित्र संपूर्ण देशभर प्रसारित केले. २०१४ ते २०१५ हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले. या वर्षीपासून अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमातर्फे २६ जानेवारी हा दिवस ‘नारी शक्ती दिवस ‘ म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

  • शोभा जोशी, जनजाती (वनवासी) कल्याण आश्रम पुणे महानगर, कार्यकर्ता
    (9422319962)
Back to top button