News

५० वर्षांपासून सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्या वनवासी पाड्यांचा होणार कायापालट; रा.स्व.संघाच्या पाठपुराव्याला मिळाले यश!

कल्याण, दि. १५ : बिर्ला महाविद्यालयाजवळील परिसरात असलेल्या वनवासी (कातकरी) वस्तीचा मागील ५० वर्षांपासून विकास झालेला नाही. कातकरी  समाजाची २४ कुटुंबे येथे  वास्तव्यास असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहत आहेत. दरम्यान, या वस्तीत मागील ३ वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघसेवा विभागाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामे सुरु झाली आहेत. सहा महिन्यांपूर्वी संघ कार्यकर्त्यांनी सदर वस्तीत शौचालय व्हावे म्हणून राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे पाठपुरावा केल्याने शौचालयाचे काम मार्गी लागले आहे.

केंद्रीव आयोगाला ज्या ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होतात, त्याठिकाणी आयोगाकडून प्रत्यक्ष पाहणी केली जाते. त्यानुसार या भागाची तक्रार रा.स्व.संघाकडून प्राप्त झाल्याने केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य अनंत नायक प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सदर पाड्यावर आले होते. दरम्यान, येथे घरकुल योजनेसह अन्य नागरी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश अनंत नायक यांनी केडीएमसी आणि म्हाडाला दिले आहेत.   

शहराच्या मध्यभागी असलेल्या या पाड्यात नागरी सोयी-सुविधा तसेच शौचालयाचीही सोय नाही. महापालिकेने त्याठिकाणी फिरते शौचालय दिले होते, त्याचीही दुरवस्था झाली आहे. या शौचालयाच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. तसेच या पाड्यावर नागरिकांचे पूनर्वसन करण्याची मागणीही संघाच्यावतीने वेळोवेळी करण्यात येत होती. ही जागा म्हाडाची असून, महापालिकेने घरकुल योजनेचा प्रस्ताव देऊन ती योजना लवकर राबवावी, असे नायक यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले आहे.

यावेळी म्हाडा आणि केडीएमसी प्रशासनाचे अधिकारी, रा स्व संघाचे जिल्हा संघचालक डॉ. विवेक  मोडक, कल्याण विभाग प्रचारक मंदार कुलकर्णी, जिल्हा सेवा प्रमुख संतोष हिंदळेकर, जिल्हा सह सेवा प्रमुख विशाल सरवदे,   चंद्रगुप्तनगर कल्याण पश्चिम कार्यवाह रोशनजी सुर्वे,  सेवा प्रमुख सुनिल श्रीवास्तव,  नगर प्रचार प्रमुख जितेंद्र देशपांडे, मनोहर नेवे,  योगेश बुडूक इ. मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button