HinduismOpinion

छत्रपति शिवरायांचा भगवा ध्वज

छत्रपती शिवाजी जयंती विशेष माहिती श्रृंखला – ३

हिंदुधर्माची ओळख म्हणजे भगवा ध्वज! रामायण- महाभारत काळापासून हा ध्वज हिंदुसमाजाला प्रेरणा देत आहे. इतिहासाने डोळे उघडले तेव्हाच पूर्ण विकसीत भारतीय संस्कृती त्याच्या दृष्टीला पडली.वेदांमध्ये ध्वजाचे अरुणकेतु असे वर्णन आहे.
अग्निसमान तेजस्वी म्हणून अग्निकेतु ,सूर्यासमान वैभवशाली म्हणून सूर्यकेतू असेही भगव्याध्वजाचे वर्णन आहे.

ग्रीकांवर विजय मिळवणारे चंद्रगुप्त मौर्य,शकांचा पराभव करणारा विक्रमादित्य, हूणांच्या क्रूर आक्रमणाला उध्वस्त करणारा स्कंदगुप्त आणि मुघल साम्राज्याला हादरे देणारे महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवराय. या सर्वांनी भगव्या ध्वजाच्या साक्षीनेच पराक्रम केले.

भगध्वज हा शौयाचे,तसेच त्यागाचेही प्रतिक आहे.हा झेंडा त्यागाची प्रेरणा देतो. सर्वसंगपरित्याग करुन ईश्वरप्राप्तीसाठी जाणारे साधक, संन्यासी भगवी वस्त्रे परिधान करतात.
तो देशासाठी बलिदानाची प्रेरणा देतो. घरदार विसरुन वारीला जाणारे वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन जातात. राजपुतांचा केसरिया ,मराठ्यांचा जरिपटका म्हणजेच भगवा ध्वज आहे. शीखांचाही ध्वज भगवाच आहे.त्यावर गुरुमुखीत “ओम” काढलेला असतो.

छत्रपती शिवरायांनी हाच भगवा ध्वज हाती घेऊन स्वराज्यस्थापना केली.महात्मा फुले यांनी छत्रपती शिवरायांवर प्रदीर्घ पोवाडा लिहीला त्यात ते लिहीतात –

मोठ्या युक्तीने सर केला
किल्ला तोरण्याचा l रोविला झेंडा हिंदुचा ।।

अर्थात छत्रपती शिवरायांनी युक्तीने तोरणा किल्ला जिंकून हिंदुचा (भगवा) झेंडा फडकवला.

शिवाजीमहाराजांच्या झेंड्याचे जे एकमेव प्रत्यक्षदर्शी वर्णन उपलब्ध आहे. ते महाराजांच्या आग्रा भेटीच्या वेळेचे आहे. मिर्झाराजा जयसिंगाचा आग्रा येथील आधिकारी परकालदास याने मिर्झाराजा जयसिंगाचा अंबर येथील दिवाण कल्याणदास याला लिहीलेल्या पत्रात हे वर्णन आहे.या पत्राची तारिख दि.29 मे,1666 अशी आहे. या पत्रात आलेले भगव्या झेंड्याचे वर्णन –

” सेवाजी कौ नारिंगीसी दरियाई का निसाण रेशमी सोनहरी छापा चालौ छे जी”

याचा मराठीत अर्थ “शिवाजीमहाराजांचे नारिंगीशा रेशमी कापडाचे निशाण ,सोनेरी छापलेले चालते”

The English Factories in inda नावाची भारतातील बखरींबद्दलच्या माहितीची पुस्तके तेरा खंडात आहे.त्यापैकी एका खंडात एका समकालीन इंग्रज चित्रकाराने शिवाजीमहाराजांच्या एका सागरी किल्ल्याचे चित्र आहे,त्यात किल्ल्यावर महाराजांचे भगवे निशाण दाखवलेले आहे.

भगवा ध्वज म्हणजे आपल्या राष्ट्राची अस्मिता. हिंदुधर्माची विजयपताका म्हणूनच हा ध्वज पाहिला की आम्हाला आमच्या पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण येते. देशाचा गौरवशाली इतिहास आठवतो. एका महान कवीने भगव्या ध्वजाचे फार सुंदर वर्णन केले आहे.

“रणी फडकती लाखो झेंडे l अरुणाचा अवतार महा
विजयश्रीला श्रीविष्णु परी l भगवा झेंडा एकचि हा ll”

  • रवींद्र गणेश सासमकर
Back to top button