Opinion

मूल्य म्हणून विचारांचं देणं सुद्धा कार्यसंस्कृतीत महत्वाचे

दुपारची वेळ होती. काही कामाच्या निमित्ताने मी मेल लिहीत होतो. कॉलेजमधील मित्राचा फोन होता. स्वतःची नविन कंपनी सुरु केली असल्याने त्यातील अनुभव सांगण्यासाठी त्याने मला फोन केला होता. अनेक वर्षानंतर खरं तर आम्ही गप्पा मारत होतो. का कुणास ठाऊक त्याला मी त्याच्या कामात मदत करू शकेल असा विश्वास वाटत होता. मलाही फारसे लक्षात येत नव्हते आपण नेमकी काय बोलावे ते. तो त्याच्या व्यवसायाचं नियोजन मला सांगत होता. आमची चर्चा व्यवसायातील हेतू, तत्व, कार्यपद्धती या अंगाने सुरु झाली.

त्याने अशा व्यवसायात पाऊल टाकले होते त्या ठिकाणी असलेली स्पर्धा म्हटली तर भरपूर अवघड होती. समोर सातत्याने आव्हान असणार होते. नोकरी सोडून तो व्यवसायात उतरलेला होता. त्याच्याबरोबर असलेली टीम याची खरं तर जुळवाजुळव चालू होती. बरोबरीचा असलेला वयोगट, व्यवसाय करू पाहणारी टीम या त्याच्या जमेच्या बाजू होत्या. वेगवगेळ्या क्षेत्रात आपला अनुभव असलेली आणि ठसा उमटलेली अशी माणसं त्याने एकत्र आणण्याचा उत्तम प्रयत्न केला होता. ती एकत्र ठेवण्याचे सूत्र तो शोधू पाहत होता. म्हणून आमच्या चर्चेला सुरुवात झाली होती.

व्यावसायिक शिक्षण याच्या जोरावर व्यावसायिक मूल्य सांभाळणारी माणसं मिळत जातात. प्रशिक्षण, मिळणारा उत्तम पगार याच्या जोरावर माणसे टिकतात. पण तेवढेच पुरेसे नसते. साहजिक स्पर्धात्मक वातावरणात काम करत असल्यामुळे टीमच्या बरोबरीने व्यक्तिगत व्यावसायिक महत्वकांक्षेला खतपाणी मिळालेले होते. त्यामुळे कंपनीपेक्षा व्यक्तिगत हिताचा विचार करण्याची प्रवृत्ती वाढलेली होती. त्यामुळे प्रत्येकजण अगदी वरपासून खालपर्यंत माझं योगदान नेमकी काय? त्याचा मला स्वतःला फायदा किती असाच विचार मांडत होता. हे चित्र वेगवेगळ्या संस्थात दिसणारे सर्वसाधारण चित्र आहे.

दरम्यान व्यक्तिगत स्पर्धा नको त्या दिशेने आकार घेत गेल्यामुळे कोअर टीमला आपापसातील अहंकाराचे प्रश्न अधिक सोडवण्यात लक्ष घालायला लागत होते. त्यामुळे कामातील अडचणी सोडवण्यापेक्षा ही मानसिक कसरतच मोठ्या प्रमाणात सतत करायला लागत होती. वेळोवेळी स्पर्धा म्हणून सहकाऱ्यांच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या यात मोठे बदल होत होते. एका बाजूला मार्केटमधील असणारी स्पर्धा त्यात आपण नेमकी कुठे आहोत आणि दुसऱ्या बाजूला ज्या समोर असलेलं दैनंदिन काम यात भरपूर तफावत पडत चाललेली होती. प्रत्येकजण स्वतःला मिळेल त्या दिशेने काम करू पाहत होता आणि हेच त्याच्या कंपनीसाठी मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते. त्यामुळे कामाला असलेली एक शिस्तसुद्धा हळूहळू धोक्यात येत चाललेली होती. आमच्या बोलण्याचं सार होतं ते. मंदिराच्या खांबाला वाळवी लागली तर नेमकी कधी कोसळेल ते सांगता येत नाही.

आपली सहकारी असलेली टीम आणि त्यातील माणसे यांच्या यशाच्या व्यक्तिगत कल्पना एका मर्यादित वर्तुळापर्यंत होत्या. माझा मित्र त्याला त्याची कंपनी एका उद्दिष्ट भोवती गुंफण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे आपल्या टीमच्या एकात्मनुभूतीच्या शोधात तो होता. साहजिक व्यवसायातील स्पर्धा मोठी आहे. या पार्श्वभूमीवर तो हे शोधू पाहत होता.

कुठल्याही उद्योजकाला व्यवसाय करायचा म्हटला तर एकाचवेळी व्यवसायातील अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते. बरं प्रामाणिकपणे व्यवसाय करायचा म्हटलं तर सतराशे साठ प्रश्नचिन्ह दत्त म्हणून हजर असतात. नोकरीतून बाहेर पडून व्यवसाय करणारा हा मित्र अनेक सरकारी आव्हानांना तोंड देत व्यवसाय करू पाहत होता. कामाला गती मिळावी, चांगली माणसं मिळावी, विश्वासू मिळावी या हेतूने सहकाऱ्यांच्या आधीपासून परिचित असलेला स्टाफ त्यांच्याबरोबर काम करत होता. गुणवत्ता असण्यापेक्षा परिचित असण्याचा गुणधर्म अधिक स्वीकारलेला होता. त्यामुळे गुणवत्तेपेक्षा अकार्यक्षमतेचा धनी असलेला स्टाफचा भरणा अधिक होत चाललेला होता. यात ज्यांच्यात खरंच गुणवत्ता आहे, क्षमता अधिक आहे अशी योग्य माणसे बाजूला पडताना दिसत होती. त्यांच्या हाताला योग्य असे सन्मानजनक काम मिळत नव्हते.

त्याच्या ऑफिसमध्ये मी भेटायला गेलो असताना त्याचा एक सहकारी अधिकारी भेटला. आमचं प्राथमिक बोलणं सुरु होण्याआधी त्यांना फोन आला. नुकतेच आमचं संभाषण सुरु होणार होते. त्यांच्याशी आधी भेटीची वेळही ठरलेली होती. मधेच तो फोन आल्यामुळे मला थोडा थांबायला लागलं. समोरच्या व्यक्तीशी ते व्यक्तिगत गप्पा मारत होते. समोरच्या व्यक्तीला आर्थिक नियोजन आणि स्वतःचे अनुभव सांगत होते. तो सहकारी अधिकारी वेळोवेळी तीच ती उदाहरणे देत त्याच्या नजरेतून असलेलं मांडू पाहत होता. समोरच्या व्यक्तीला म्हटलं तर तशी बोलायची संधी फारशी मिळत नाही हे लक्षात येत होते. ग्राहकहित यापेक्षा ते प्रौढी मिरवण्यात दंग झालेले होते. थोड्या वेळाने त्याच्या सहकारी अधिकाऱ्याशी माझं बोलणं झालं. परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी यातील एकच प्रवास काही पूर्ण झाला नाही.

मी बाहेर पडलो. नेमकी मित्राशी आपण काय बोलायचं ते विचार करत . प्रेरणा भाडोत्री मिळत नसतात. त्याला आदर्शवादाचा अपवाद असतो. स्वयंकेंद्रित, तुकड्यात, लालसेने व्यापलेली कार्यसंस्कृती ही धोकादायक असते. एक मार्केटिंगचे तत्वज्ञ एका कार्यशाळेत कमी दर्जाच्या टायरच्या मुळे अपघात होता होता कसे वाचले याची एक गोष्ट एका सांगत होते. त्यामुळे टायरच्या नुकसानी बद्दल नव्हे तर होऊ घातलेल्या जीवितहानीचा धोका लक्षात घेऊन ते दावा ठोकण्याचा विचार करत होते. एक दिवसानंतर लक्षात आले की त्या टायरसाठी काही आवश्यक कच्चा माल ते पुरवत होते. अधिक नफा व्हावा यासाठी ते कमी दर्जाचा माल ते देत होते. तत्व हरवलेले होते. त्याचमुळे मूल्य म्हणून विचारांचं देणं सुद्धा कार्यसंस्कृतीत याच अर्थाने महत्वाचे ठरते.

Back to top button