Opinion

“जेएनयु आणि डाव्यांचा वैचारिक अप्रमाणिकपणा”

द कश्मीर फाइल्स’ची लोकप्रियता दर्शवत आहे की चित्रपटाच्या कथनाने भारतीय लोकांना खूप आकर्षित केले आहे. चित्रपटाला राजकीय प्रचार म्हणून बदनाम करण्याचा काही जणांचा प्रयत्न असूनही, वाढती लोकप्रियता हा चित्रपट लोकांकडून स्वीकारला जात असल्याचे द्योतक आहे. चित्रपटाचे एक मोठे यश म्हणजे हा रूढार्थाने फक्त चित्रपटच नाही, तर काश्मिरी पंडितांवर झालेल्या अनन्वित अत्याचाराचे एक प्रामाणिक, धाडसी आणि नि:संकोच सत्याचे चित्रण आहे, जे तथाकथित मुख्य प्रवाहातून अनेक वर्षे दुर्लक्षित राहिले. प्रशासन, सुरक्षा व्यवस्था, प्रसारमाध्यमे आणि समाजव्यवस्था ह्याचे मानवी रूपक वापरून संस्थात्मक अक्षमता, उदासीनता आणि राजकीय संधिसाधूपणामुळे एका स्थानिक प्रश्नाचे रूपांतर कसे निर्गमनात नव्हे, तर नरसंहारात झाले ह्याचे वर्णन ह्या चित्रपटाच्या माध्यमातून झालेले दिसते. इस्लामी धर्मांधतेने प्रेरित आणि पाकिस्तानने प्रायोजित केलेला हा नरसंहार आजही कसा टिकून आहे, हे समजण्याचा प्रयत्नदेखील चित्रपटाच्या माध्यमातून झालेला दिसतो.
 
लोकांकडून चित्रपटाचे कौतुक झाले असले, तरी काश्मिरी हिंदूंना भेडसावणार्‍या कठोर वास्तवांना कमी लेखण्यासाठी कठोर परिश्रम घेतलेल्या मंडळींमध्ये मात्र निर्माण झालेली अस्वस्थता ओळखणे काही कठीण नाही. याच्या मुळाशी एक वैचारिक – बौद्धिक परिसंस्था आहे, जिने नेहमीच भारतीय राज्यावर टीका करण्याच्या प्रयत्नात काश्मीरमधील इस्लामी धर्मांध चळवळीला वैचारिकदृष्ट्या सहानुभूती दर्शवली आहे आणि परिणामी फुटीरतावादी चळवळीला पाठिंबा दिला आहे. त्या परिसंस्थेचे प्रतीक म्हणून चित्रपटात जेएनयूचा वापर होताना दिसतो. साहजिकच चित्रपटात मात्र जेएनयूला सूक्ष्मपणे एएनयू असे संबोधले आहे.

जेएनयू ही आज भारतातील सर्वोत्कृष्ट संस्थांपैकी एक आहे यात शंका नाही, जी संशोधन आणि बौद्धिक स्वातंत्र्याचे समर्थन करते. तथापि हेही तितकेच खरे आहे की या स्वातंत्र्याचा अनेकदा कट्टरपंथी डाव्या विचारसरणीच्या विचारवंतांकडून राष्ट्रविरोधी कल्पनांचा प्रसार करण्यासाठी वापर केला जातो. आणि ही परिस्थिती एकट्या भारतातच नाही, तर जगभरातील, शैक्षणिक संस्था या डाव्या विचारसरणीचा लक्षणीय प्रभाव दाखवतात जे त्यांना राजकीयदृष्ट्या सोईस्कर असलेल्या कल्पनेला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्राविरुद्ध लढ्याला समर्थन देतात आणि राष्ट्राविरुद्धच्या या लढाईत ते समाजातील फुटीचा वापर करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. काश्मिरी हिंदूंच्या निर्गमनाचा मुद्दा हे त्याचेच एक उदाहरण आहे. विद्यार्थ्यांमध्ये किती कसोशीने हा प्रोपोगंडा प्रबोधित केला जातो, हे जेएनयूमध्ये शिकत असताना मी बघितले आहे.

या कथेचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे काश्मीरमध्ये उद्भवलेल्या हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील धार्मिक तेढीचा फायदा घेणे. हे करत असताना बहुसंख्य हिंदू समाजाला खर्‍या समस्या असूच शकत नाहीत, हे सोईस्करपणे मांडले जाते. याउलट, हिंदू बहुसंख्य असल्याने, नियमानुसार दोष त्यांनाच दिला जातो. काश्मीरचा सांस्कृतिक इतिहास, भारतीय ठेवा आणि तिथे हिंदूंवर केले गेलेले धार्मिक अत्याचार हे जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले गेले. वर्षानुवर्षे काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचे सत्य विकृत कथन मांडून कमी केले गेले. प्रथम सांगितले गेले की काश्मिरी हिंदूंचे निर्गमन मुळात कधी झालेच नाही – प्रशासनाच्या मान्यतेने पंडित स्वत:होऊन निघून गेल्याचा अपप्रचार केला गेला. त्यानंतर सोईस्करपणे असे पसरवण्यात आले की पंडितांना अत्याचाराचा सामना करावा लागला, परंतु नरसंहार म्हणता येईल इतक्या प्रमाणात नाही. इतरांनी तर पंडितांनाच दोष देण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न केला. त्यांच्या मते काश्मिरी हिंदूंनी राज्यात ‘प्रभावशाली पदे’ बळकावल्यामुळे एक वर्गीय तेढ निर्माण झाली आणि म्हणून त्यांना सर्वसामान्य लोकांचा रोष ओढवून घ्यावा लागला. दहशतवादी संघटनांना मात्र स्वातंत्र्याचे ‘क्रांतिकारक’ म्हणून श्रेय देण्यात आले आणि त्यांना प्रवृत्त करणार्‍या धार्मिक आवेगाला जाणीवपूर्वक टाळण्यात आले.

  
आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे काश्मिरी हिंदूंच्या दुर्दशेच्या कथनाचे समर्थन करणार्‍या कोणत्याही विचाराला बदनाम करणे. पंडितांच्या वेदनेचे आणि कथनाचे समर्थन करणार्‍यांना धूर्तपणे ‘उजव्या पक्षाचे राजकीय सहानुभूतिदार’, ‘जातीयवादी’ म्हणून संबोधले गेले. असे करताना खोर्‍यातील हिंदू हेच खरे अल्पसंख्याक होते आणि त्यांचे हक्क पायदळी तुडवले गेले या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले जाते. मी जितकी वर्षे जेएनयूमध्ये होतो, तेव्हा तरी काश्मिरी हिंदूंच्या दुर्दशेवर डाव्या संघटनांनी किंवा प्राध्यापकांनी एखादा कार्यक्रम आयोजित केलेला कधीही पाहिला नाही. तसेच काश्मीरमध्ये त्यांच्या पुनर्वसनाच्या समर्थनार्थ कोणतेही मोर्चे निघालेले पाहिले नाहीत. ह्याउलट अफझल गुरूच्या समर्थनार्थ कार्यक्रम, आझादीचे समर्थन करताना विद्यार्थी संघटना आणि त्यांना प्रोत्साहन देणारे प्राध्यापक सहज दिसतात. एवढेच नाही, तर काश्मीर खोर्‍यात भारतीय लष्कराच्या अत्याचारासारखे मुद्दे उपस्थित करून विद्यापीठाच्या निवडणुकाही लढवल्या जातात. मात्र ह्यातल्या एकही संघटनेने काश्मिरी हिंदूंसाठी भूमिका मांडलेली माझ्या तरी ऐकण्यात नाही.


 त्यामुळे हिंसाचाराच्या किंवा समुदायांवरील अत्याचारांच्या चिंतेतून डाव्या संघटना हे करत नाहीत, यात शंका नाही. या विचारवंतांच्या एकत्रित प्रयत्नांमागे एक स्पष्ट राजकीय अजेंडा कार्यरत आहे. भारतीय राज्याला लक्ष्य करणे, राज्याबद्दल जनतेमध्ये पुरेसा असंतोष निर्माण करणे आणि ह्या विचारवंतांना अपेक्षित अशी पर्यायी राजकीय व्यवस्था मांडण्यास मदत करणे हे खरे राजकीय साध्य. हे राजकीय हित साध्य करायला देशविरोधी म्हणून जे जे काही वापरता येईल ते रास्त, अशी कूटभूमिका अवलंबताना दिसतात. द कश्मीर फाइल्सने हे चित्र स्पष्ट करण्याचा एक प्रयत्न नक्कीच केला आहे आणि म्हणूनच त्याबद्दल ह्या विचारवंतांना रोष वाटणेे स्वाभाविक आहे. हे विचारांचे युद्ध आहे आणि ह्यात डाव्यांच्या या बौद्धिक अप्रामाणिकपणाकडे लक्ष वेधणे आणि त्यांच्या एकतर्फी प्रचारामागील राजकीय प्रकल्प उघड करणे महत्त्वाचे आहे. काश्मीर फाइल्स काही प्रमाणात तरी हे करण्यात यशस्वी होतो, हे निश्चित.

  • प्रा. अक्षय रानडे

सौजन्य सा. विवेक

Back to top button