NewsRSS

रेल्वे अपघातग्रस्तांना संघ स्वयंसेवकांचा मदतीचा हात

नाशिक : – सेवा परमो धर्म: यानुसार संघ स्वयंसेवकांच्या दक्षतेने भगूर (जि. नाशिक) जवळील रेल्वे अपघातग्रस्तांना वेळेवर मोलाची मदत मिळाली. लहवित रेल्वे स्थानकाजवळील लोहशिंगवे या गावाजवळ रविवारी दुपारी पवन एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला. दुपारी साडेतीन वाजता अपघाताची बातमी समजली आणि सावरकर नगराचे सहकार्यवाह संदीप मुठाळ यांच्या मार्गदर्शनानुसार रा.स्व. संघाच्या राघोजी भांगरे शाखेचे स्वयंसेवक मदत कार्याला सुरुवात केली.


सुरुवातीला प्रवाशांना सुखरुप बाहेर काढणे, त्यांना थांबवणं हे काम काही स्वयंसेवकांनी सुरू केले. प्रशासनाने अपघातग्रस्त प्रवाशांना नाशिक रोड स्थानकावर आणण्यासाठी बसेसची व्यवस्था केली. अपघात स्थळापासून प्रवाशांना मुख्य मार्गापर्यंत आणण्यासाठी ग्रामस्थांसह स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. मिळेल त्या वाहनातून प्रवाशांना त्यांच्या सामानासहित मुख्य मार्गापर्यंत आणणे, त्यांचे मनोधैर्य राखणे आवश्यक होते. अपघाताने सगळे भयग्रस्त होते त्यांना मानसिक आधार देऊन सुरक्षित स्थळी नेण्यासाठी स्वयंसेवकांची फौज काम करीत होती. बघ्यांची गर्दी, मोठ्या आकाराच्या बसेस आणि अरुंद रस्त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं. काही स्वयंसेवकानी ट्रॅफिक सुरळीत करण्याची जबाबदारी रात्री उशिरापर्यंत पार पाडली. पोकलेन, ट्रॉलर क्रेनसाठी रस्ता मोकळा करून ट्रॅफिक सुरळीत करून दिली.


अपघातग्रस्त प्रवाशांना नाशिक रोड स्थानकावर आल्यावर भोजन, पाण्याची व्यवस्था हा मोठा प्रश्न होता. त्यावेळी नाशिक रोड येथील गुरुद्वारामधून खिचडी तयार करून मिळाली. गुरुद्वाराच्या काही कार्यकर्त्यांबरोबर खिचडी वाटप करण्यासाठी रांग लावून त्यांना भोजन वाटप मुक्तिधाम नगरच्या शाखेतील स्वयंसेवकांनी केलं. वीर तानाजी शाखेचे स्वयंसेवक त्यात सहभागी होते.


तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या विंनतीनुसार अपघातग्रस्त ठिकाणी दिवसभर दीड हजार कर्मचारी काम करत होते. त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी आणि जेवणाची व्यवस्था केली. नाशिक रोड गटातर्फे 300 फुड पॅकेट्स, भेळभत्ता याची व्यवस्था केली. कर्मचाऱ्यांना आहार कमी पडल्याचे लक्षात येताच स्वयंसेवकांनी खिचडी बनवून आणली. काम पूर्ण झाल्यावर गोदान एक्सप्रेस ही पहिली गाडी दुरुस्त केलेल्या मार्गावरून मार्गस्थ झाली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी निश्वास सोडला. अन्न आणि पाणी व्यवस्थेमुळे मोठा आधार त्या कर्मचाऱ्यांना झाला. या ठिकाणी रेल्वेचे अधिकारी अनिल लोहाटी, नवीन पाटील यांनी रा. स्व. संघाच्या सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कठीण प्रसंगी संघ कामाला आला अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Back to top button