Opinion

रा.स्व. संघ कुणाचाही द्वेष करायला शिकवत नाही !

दैनिक लोकसत्तातील डॉ. अभय बंग यांचा लेख वाचला. त्यांचे विचार अज्ञानातून किंवा जाणून बुजून पांघरलेल्या वेडातून उत्पन्न झाले आहेत. धर्मांध मुस्लिमांचे तुष्टीकरण व हिंदूंनी संघटित होताच कामा नये हे दोन विचार  त्यांच्या विचारांचा पाया आहेत. संघ कुणाचाही द्वेष करायला शिकवत नाही आणि करतही नाही हे जगभरच्या अथांग अशा हिंदू समाजाने प्रत्यक्ष अनुभवले आहे. म्हणूनच असंख्य लोक संघाशी जोडले गेले आहेत व जोडले जातही आहेत. हिंदूंमध्ये प्रत्येक ज्ञातीची एक किंवा अनेक संघटना आहेत. त्या कुणाच्याही डोळ्यात खुपत नाहीत. परंतु या सर्व ज्ञातींचा मिळून जो एक विशाल हिंदू समाज तयार होतो, त्याचे संघटन म्हणजे इतरांचा धर्मद्वेष, हे कसे काय बुवा? हे डॉ. अभय बंग सांगतील तर बरे होईल. हिंदूंनी आपल्या न्याय्य हक्कांसाठीही संघर्ष करता कामा नये, अशी डॉ. अभय बंग यांच्यासारख्यांची अपेक्षा असते. जे कुणी करतील ते जातीयवादी किंवा धर्मद्वेष पसरविणारे ! म्हणूनच श्रीराम जन्मभूमी आंदोलनाला डावे, लिबरल, कॉंग्रेसी, समाजवादी यांचा विरोध होता व अजूनही असतो. चूपचाप अन्याय अत्याचार सहन करणे हे काम हिंदूंचे आणि मजहबी उन्माद करणे हे काम अन्य कट्टरपंथीयांचे, अशी सरळ सरळ वाटणी डॉ. अभय बंग यांनी केलेली दिसतेय.

स्वातंत्र्य आंदोलनात संघाचा काहीही सहभाग नव्हता, हा असाच खोटा विमर्श आहे. (याचसाठी मी लिहिलेले “स्वातंत्र्यलढ्यात रा. स्व. संघाचा सहभाग” हे पुस्तक वाचावे) संघसंस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार हे जन्मजात देशभक्त होते. विद्यार्थी केशव –नील सिटी हायस्कूल—मध्ये शिकत असताना वंदे मातरम् गायला बंदी  होती. बाल केशवाने काही निश्चय केला व एक संकेत दिला. पर्यवेक्षकाने एकदा शाळेचे परीक्षण करण्यासाठी त्यांच्या वर्गात पाऊल टाकले रे टाकले की, सर्व जण  –वंदे मातरम्—ची गर्जना करून उठले. या देशभक्तीचे पारितोषिक म्हणून त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. १९१० या वर्षी ते क्रांतिकार्य व शिक्षण हे दोन्ही हेतू मनात ठेवून कोलकात्याला वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले. सहाजिकच ते सशस्त्र क्रांतिकारकांच्या –अनुशीलन समितीत— सामील झाले. कॉंग्रेसच्या मध्य प्रांताच्या प्रांतिक समितीवर डॉ. हेडगेवार निवडून आलेले सदस्य होते. १९२० या वर्षी असहकारितेच्या आंदोलनातही त्यांनी सक्रिय भाग घेतला व झालेली सश्रम कारावासाची शिक्षाही भोगली.  १९२२मध्ये त्यांची प्रांताच्या संयुक्त कार्यवाहपदावर नियुक्ती करण्यात आली. लाहोरच्या सॉंडर्स या इंग्रज अधिकार्‍याला कंठस्नान घातलेले श्री. राजगुरू भूमिगत स्थितीत नागपुरास आले असताना त्यांना हेडगेवार यांनीच लपवून ठेवले होते. महात्मा गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहातही (जंगल सत्याग्रहात) सक्रिय भाग घेतला व झालेली सश्रम कारावासाची शिक्षाही भोगली. त्यावेळी देशातील सर्व जण महात्माजींच्या नेतृत्वाखालीच कार्य करत होते. पुढे कॉंग्रेसनेच त्यांच्या सदस्यांना संघात जायला बंदी घातली.  

 द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजींनीही १९४२च्या भारत छोडो  आंदोलनात स्वयंसेवकांना व्यक्तिशः भाग घेण्याची सूट दिली होती. संघाच्या स्वयंसेवकांनी लाठ्या खाल्ल्या. बंदुकीच्या गोळ्या झेलल्या. तुरुंगात सुद्धा गेले होते. ५-८ ऑगस्ट १९४७ दरम्यान श्रीगुरुजींचा सिंधमधील कराची व हैदराबाद येथे प्रवास झाला. फक्त नऊ दहा दिवसात जो भाग पाकिस्तानात सामील होणार आहे अशा भागात दहा हजार हिंदूंनी संचलन काढणं आणि जाहीर सभा घेणं हे अति सहसाचं होतं. ५-८ ऑगस्ट १९४७ दरम्यान श्रीगुरुजींचा सिंधमधील कराची व हैदराबाद येथे प्रवास झाला. फक्त नऊ दहा दिवसात जो भाग पाकिस्तानात सामील होणार आहे अशा भागात दहा हजार हिंदूंनी संचलन काढणं आणि जाहीर सभा घेणं हे अति सहसाचं होतं.

 फाळणी ही स्वातंत्र्याच्या नाण्याची दुसरी बाजू आहे. आपल्या हिंदू व शीख बांधवांना सुखरूप परत आणण्यासाठी सामाजिक पातळीवर जे काही प्रयत्न झाले त्यात केवळ संघ होता. फाळणीच्या दरम्यान ५ ते १० लाख लोकांची कत्तल झाली, हे बघता संघाचे हे कार्य एकमेवाद्वितीयच म्हटले पाहिजे.यात काही शे स्वयंसेवकांनी बलिदान दिले आहे; पण आपल्या कार्याची टिमकी वाजविली नाही. 

 थोडक्यात मजहबी, जिहादी आतंकवाद्यांचा प्रतिकार करणे म्हणजेच धर्मद्वेष पसरवणे अशी डॉ. अभय बंग यांची समजूत असेल तर योग्य काय व अयोग्य काय हे लोकांनाच ठरवू देत.

डॉ. गिरीश आफळे, पुणे

Back to top button