Opinion

आंबेडकरांना अभिप्रेत असलेली अध्यात्मिक भावना सर्वांना सामावून घेणारी आहे

वाचन, चिंतन आणि लेखन हे खरं तर बाबासाहेबांचे आयुष्य. त्याच्या आधाराने समाजाच्या भावनांना आणि विचारांना जबरदस्त धक्का देत आपल्या आंदोलनातून एका अर्थाने वर्षानुवर्षे मंथन करायला त्यांनी हिंदू समाजाला भाग पाडले. खरं तर आंबेडकरांनी न्यायावर आणि समतेवर आधारलेल्या धर्माची, तत्वज्ञानाची आणि संस्कृतीची दीक्षा दिली. पण आजचा संमिश्र आचार पाहता अजूनही आपला मार्ग नीट सापडला आहे की नाही असा प्रश्न पडावा.

घटना समितीमध्ये डॉ. आंबेडकर ह्यांनी अखंड हिंदुस्थान आणि जातीय ऐक्याची गर्जना केल्यानंतर हिंदू समाजाने त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. तरीसुद्धा आंबेडकर दुर्लक्षित राहिले. आंबेडकरांच्या एकूण लढाऊ आणि बंडखोर वृत्तीमुळे बहुसंख्य समाजाने गैरसमज अधिक करून घेतला. पण एखाद्या विषयाचे खोलवर संशोधन करण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या एकूण बोलण्याला आणि कृतीला आकार देणारी ठरली. म्हणूनच आंबेडकरांच्या राजकारणाला नैतिक विचारांचे फार मोठे अधिष्ठान आहे हे हे विसरून चालता येणार नाही. आताच्या आंबेडकरवादी आणि संधीसाधूपणे आंबेडकरी चळवळीला जवळ करणाऱ्या राजकारणाची तुलना त्याच्याशी होऊ शकत नाही.

आंबेडकरांच्या मनात कधीही सूड केंव्हा द्वेष नव्हता. ते कधीही समाजात ढोंग घेवून वावरले नाही. स्वतःला समाजाच्या द्वेषाला आणि निंदेला बळी पडावे लागले म्हणून आपल्या वाणीने आणि शब्दांनी देशाच्या अखंडतेला त्यांनी कधीही धक्का लागू दिला नाही. दगडाला एकदा शेंदूर लावला म्हणजे तो खरवडून काढणे अत्यंत कठीण असं आंबेडकर म्हणायचे. आंबेडकरांनी आपली सद्सदविवेकबुद्धीने हिंदू समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न केले प्रसंगी लढा दिला तो याचसाठी की ज्ञानाच्या आणि संस्कृतीच्या पातळीवर दुर्लक्षित समाजाचा आत्मिक विकास व्हावा नुसता भौतिक नाही. ते काही जातीयवादी होते म्हणून काही त्यांनी संघर्ष केला नाही. स्वातंत्र्यानंतर आंबेडकरांनी लोकशाही आणि घटना सोडून कुठलेही राजकरण किंवा आंदोलन केले नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठल्या एका समाजाचे नसून संपूर्ण राष्ट्राचे आहेत. तरीसुद्धा अनेकदा आंबेडकर आपापल्या सोयीने हवे असतात. हे त्यातील अधिक वास्तव आहे. सामाजिक समतेपेक्षा आरक्षणाच्या विरोधाची धार अधिक त्याला असते. आपल्या विरोधाच्या समर्थनार्थ आंबेडकर वाचून, रंग एकत्र आणले म्हणजे समाज एकत्र आणला असा त्याचा अर्थ नक्की होत नाही. आंबडेकरांचे मोठेपण अमूल्य आहे. ते काही वारसा हक्काने, पद किंवा कुठल्याही पैशांनी पदरात नक्की पडलेले नाही. विपरीत परिस्थितीच्या विरोधात उभे राहून मिळवलेले हे मोठेपण आहे. आपल्या ध्येयापासून कुठेही विचलित न होताआपल्या अभ्यासाने, बुद्धीने आणि समाजाचे भलं करण्याची अग्निपरीक्षा आंबेडकरांना वारंवार द्यावी लागली.

बऱ्याची, वाईटाची, सुखाची, दुःखाची, वादळाची, मानाची आणि अपमानाची पर्वा न करता आंबेडकर झगडले ते उद्धारासाठी. आंबेडकरांच्या समर्थकांचे ऐक्य, सामर्थ्य आणि कडवेपणा हे निखाऱ्यावर भाजून निघाल्यानंतर वाट्याला आलेला वारसा आहे. आजचे अग्निदिव्य आहे कुठल्या ना कुठल्या निमित्ताने समाजात अशांतता निर्माण होत असेल तर तिला थांबवण्याचे. प्रेमाने, आदराने समाज जोडला जाऊ शकतो ह्यात कुठलीही शंका असण्याचे कारण नाही. समाजाचे स्थितीचे आणि समस्यांचे सिंहावलोकन करत भविष्याचा वेध घेत आणि खोलवर आत्मपरीक्षण करत आंबेडकरांनी आपला मार्ग दाखवून दिला आहे. भावनेपेक्षा वास्तवाच्या वाटेवर आंबेडकर समजून घेणे अधिक आवश्यक आहे.

१६ डिसेंबर १९४६ भाषणात घटनेचा मसुदा तयार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलताना म्हणाले, मला हे मान्य आहे की आज आम्ही राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या विभागलेले आहोत. आम्ही कुठल्या न कुठल्या समूहासाठी एकमेंकाविरुद्ध लढणारे योद्धे आहोत. अशाच एक समूहाचे नेतृत्व मी सुद्धा करतो आहेत तरीही येणाऱ्या काळात आणि परिस्थितीत भारताला एकसंध राहण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्थिती वेगवेगळी असून इतक्या साऱ्या जातीजातीत विभागले असून संविधान सभेत १३ डिसेंबर १९४७ च्या आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी एक राष्ट्र म्हणून स्वप्न पाहिले. कुठलाही अभिनिवेश न बाळगता “मी” बाजूला ठेवून आंबेडकरांनी संपूर्ण समाजाची चिंता वाहिली आहे. हे आंबेडकरांचे मोठेपण आहे.

आंबेडकर म्हणजे अनैतिक गोष्टी विरुद्ध असलेले बंड. देहांतील कणाकणातून अशा गोष्टीविरुद्ध बंड घडविणारे समाजमन. अन्यायाविरुद्ध लढताना नीतीची धारणा करणाऱ्या समाजाची आखणी करणारे आंबेडकर. आंबेडकर म्हणजे आदर्शाचा आणि कृतीचा समन्वय असा देशभक्तीचा पाया. आंबेडकरांना अध्यात्मिक चिंतनाची आणि लेखनाची मुळापासून इच्छा होती. आज समतेच्या वाटेवर ह्याची नितांत आवश्यकता आहे. आज चळवळीला खऱ्या अर्थाने गरज कशाची असेल ती अध्यात्मिक अधिष्ठानाची. देश, काळ आणि परिस्थितीचा नीट विचार करून समाज अधिक नीट, निकोप, एकसंध, ह्यासाठी सामंजस्याची भूमिका मांडणे आवश्यक आहे. समाज जीवनाचा अनुभव प्रतिशोध योग्य नाही. विरोधाची भूमिका घेऊन मैदानात एकवेळ उभे राहणे सोपे वाटते पण व्यापक देशहिताची भूमिका घेऊन सम्यक वातावरण निर्माण करणे हे तितकेच कठीण आहे.

शरीराचा, बुद्धीचा आणि आत्म्याचा जास्तीत जास्त विकास कसा होईल ह्या चिंतेने ते धर्मांतराच्या वाटेने गेले. माणसाच्या सुख समाधानाची चळवळ ह्याचबरोबरीने, त्याचा आत्मिक उत्कर्ष होण्याची गरज आहे म्हणून धर्म आवश्यक आहे. बाबासाहेबांनी धर्म स्वीकारला तो श्रद्धेवर, विचारावर आणि तात्विक बैठकीवर आधारित. धर्मांतराचा त्यांनी ऐहिक आणि अध्यात्मिक असा दोन्ही दृष्टीनी विचार केलेला दिसून येतो. मुक्तीचा आणि आत्मोद्धाराचा मार्ग त्यांनी घालून दिला. हे सगळे करत असताना भारताच्या अखंडत्वावर त्यांची गाढ श्रद्धा होती. बौद्ध धर्माची दीक्षा घेताना ते म्हणाले, “माझ्या या बौद्ध धर्म स्वीकाराने भारतीय संस्कृती आणि इतिहासाच्या परंपरेला धक्का न लागेल अशी काळजी मी घेतलेली आहे.” सर्वस्वी भारतीयांचा आणि जगाचा उद्धार करणारा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला.

आज व्यवहारात हाच आचार योग्य प्रकारे, निरुपणाच्या स्वरुपात पुन्हा पुन्हा समाजासमोर ठेवणे आवश्यक आहे. बौद्धधर्माची, तत्वज्ञानाची आणि संस्कृतीची दीक्षा अजूनही समाजत खोलवर नीटशी रुजलेली दिसून येत नाही. बुद्धाच्या वाटेवरून चालताना संपूर्ण समाज कवेत घेण्याचे प्रयत्न अनेक बाजूंनी होणे अपेक्षित आहे. आंबेडकरांना अभिप्रेत असलेली अध्यात्मिक भावना सर्वांना सामावून घेणारी आहे. तिचा जागर आणि स्वीकार निर्विकार मनाने केला तर व्यक्ती व समाज सत्यापर्यंत जाऊन पोहचेल ह्यात शंका नाही.

आजही सामाजिक परिवर्तनाच्या अनुभवाच्या आधारावर काही चांगले प्रयत्न होत असतील तर ते नाकारण्याचे काही कारण नाही. देश आणि समाजाची एकता राखण्यासाठी हे सर्व प्रयत्न आवश्यक आहेत. आज अपेक्षा वाढत्या असतील पण प्रयत्न आणि मार्ग योग्य असतील त्यात शंका असण्याचे काही कारण नाही. हे सर्व प्रयत्न अधिक व्यापक होण्याची आजची काळाची गरज आहे. समाजाच्या संपूर्णतेचा ज्यांनी अनुभव घेतला आहे ते ह्याविषयी शंका व्यक्त करणार नाहीत.

भविष्याचा वेध घेणारा विचार करणे तसे सोपे नाही आणि जेव्हा आपल्या प्रत्येक कृतीचा आणि विचाराचा काही एक परिणाम संपूर्ण समाजावर आणि राष्ट्रावर होणारा असतो, तेव्हा तर ते एक द्वंद्वंच असते. मग महाडची घटना असो, काळाराम मंदिराचा प्रवेश असो की येवल्यात केलेली धर्मांतराची घोषणा असो. विपरीत परिस्थितीत असलेल्या अंध:काराशी लढून आंबेडकरांनी सर्वाना आत्मावलोकन करायला भाग पाडले. कुणी ह्याला समतेचा जागर म्हणाले, कुणी आत्मसन्मानाचा जागरही म्हणू शकेल. स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असताना, म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पुरेसा कालावधी गेल्यानंतरही समाज मनात अजूनही द्वंद चालू आहे, हे वास्तव आज नाकारता येत नाही.

विकासाचे बदलत चाललेले चक्र अनेक नवीन संधी सर्वांसाठी निर्माण करत आहे. तशी मानवी मूल्यांविषयीची चर्चा अधिक वेगाने होऊ पाहते आहे, विकासाच्या वाटेवर विचार करणारे आंबेडकर, दारिद्र्याची थोरवी गाणा-यांच्या विरोधात होते. दारिद्र्य अनेकदा गुन्हेगारी आणि अनैतिक आचरणास उत्तेजन देत रहाते. एका बाजूला प्रवृत्ती आहे, दुसऱ्या बाजूला संघर्ष आहे. अज्ञान, दारिद्र्य, भ्रष्टाचाराच्या विरोधात तितकीच सक्षम विकासाची यात्रा उभी करण्याची गरज आहे. ज्या ज्या ठिकाणी समाज मनात द्वंद आहे त्या त्या ठिकाणी माणसाची प्रतिष्ठा जपण्याची गरज आहे. कागदावरचे बुद्धिवादी प्रयत्न खेड्यातील लोकापर्यंत अजूनही किती पोहचले ही एक मोठीच शंका आहे.

सामाजिक आंदोलनाची अस्थिरता आपल्याला बरचसं काही सांगू पहात आहे. ह्या जमिनीवर कुणीही भुकेले झोपू नये, कुणाचं सुद्धा रक्त सांडू नये, हाताची भरलेली ओंजळ हळूहळू आपण रिकामी करत करत जातो. ती रीतेपणाने आपल्याकडे पहात असते. त्याचं स्मरण मनात कल्लोळ निर्माण करणारं. कणाकणात संवेदना जागृत करणारं. घंटेचा आवाज निनादतो. शरीरातल्या आणि मनातल्या अणुरेणूत जागृतावस्था निर्माण करतो. अनुनाद निर्माण करत जातो. हे तीर्थक्षेत्र आपलं आपल्यालाच शोधावं लागतं. दृष्टीला आभाळपण देणारे मन. आयुष्य विणलेले असते. त्याचं जगण्याचं वस्र आपण तयार करत असतो. त्या वस्राचा रंग, व्यापकता, मऊपणा, आधार, संवेदना, दृष्टी मला पुन्हा नव्याने अनेक चित्रमालिका याचं दर्शन घडवत जाते. एखादी गोष्ट समजण्याची ही सुरुवात असते. घंटेचा नाद घरा घरात घुमू दे. धार कल्याणाची असू दे. पाण्याचे नातं मातीशी अधिक आहे. त्यात चांगुलपणाचा संस्कार अधिकधिक प्रगल्भ होऊ दे. वस्राला स्पर्श सांभाळण्याचा असू दे.

Back to top button