Opinion

सहस्‍त्र गीत गायक तयार करणा-या जीवनाचा जन्‍मदिन!!

“कहाँ थे साधन कहाँ थी सुविधा, संकट में भी सदा बढे।
संकल्पित मन, कर्म , तपस्या से ही साधक शिखर चढ़े।”

संघशाखेत नित्‍य म्‍हटलं जाणारं गीत. ही गीते ज्‍यांच्‍या जगण्‍यातुन साकार झाली अशी असंख्‍य जीवने संघगंगेत अनुभवायाला मिळतात. आज सकाळी नित्‍यक्रमाने डायरीचे पान उघडले, आज २२ एप्रिल २०२२. लगेच श्री रामभाऊ बोंडाळेंची मूर्ती समोर उभी झाली.

आज रामभाऊंनी ९८ व्या वर्षात पदार्पण केले. शिक्षण पूर्ण केल्यावर संपूर्ण जीवन संघ प्रचारक. ते उत्तम गीत गायक आणि कवी आहेत. गीतांना चाली लावण्‍यात त्‍यांचा विशेष हातखंडा. त्याहीपेक्षा विशेष म्हणजे ते गीत गायक तयार करत. संघ शिक्षा वर्गात रोज होणा-या बौद्धिका पूर्वी गीत होत असे. रामभाऊंच्‍या प्रयत्‍नातुन गीत गायकांची मोठी फळी तयार झाली आहे.

नवनवीन स्वयंसेवकाने गीत म्हणावे हा रामभाऊंचा आग्रह असे. एवढे गीत गायक कुठून आणणार? ही अधिका-यांची स्‍वाभाविक चिंता. रामभाऊ अशांचा शोध घेत त्यांना संथा देत त्यांचेकडून तयारी करून घेत व म्हणावयास सिद्ध करत.

सुरुवातीस संघ शिक्षा वर्ग ३० दिवस नंतर २५ दिवस व सध्या २० दिवसांचा असतो. सुरुवातीला प्रथम व द्वितीय वर्ष एकत्र होत. रामभाऊ साधारणपणे पन्नास वर्षे संघ शिक्षा वर्गात राहिले. एक हजार पेक्षा जास्त गीत गायक रामभाऊंनी तयार केले असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही.

संघकार्यासाठी विदर्भाच्‍या सर्व जिल्‍हयांमध्‍ये त्‍यांनी वर्षानुवर्षे प्रवास केला. हजारो घरांशी त्‍यांचा आजही जिव्‍हाळयाचा संपर्क आहे. संघमय जीवन असलेले रामभाऊ म्‍हणुनच प्रेरणादायी आहेत.

९८व्‍या जन्‍मदिनानिमित्‍य रामभाऊंना शुभकामना आणि नमस्‍कार.
जीवेत शरदः शतम्।

प्रा. रविंद्र भुसारी
महाल, नागपूर.

Back to top button