NewsRSS

सुरेशराव केतकर संघमय जगले – डॉ. मोहन भागवत

संघयोगी पुस्तकाचे प्रकाशन; दोन दिवसीय प्रांतीक बैठकीला सुरवात

पुणे ता. २३ – रा.स्व.संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकर संघमय जीवन जगले. त्यांची संघ तपश्चर्या मोठी होती, कार्यकर्ता घडविण्यासाठी संघयोगी हे सुरेशराव केतकर – आठवणी व लेखांचे पुस्तक खूप उपयुक्त ठरेल अशी आशा रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे आयोजित दोन दिवसीय प्रांतीक बैठकीला पुण्यानजीक फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळेत आज (शनिवार, २३ एप्रिल) सुरवात झाली. बैठकीच्या शुभारंभीच्या सत्रात संघयोगी पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. सुरेशराव केतकर यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी संघ होता. त्यांची प्रत्येक कृती संघ विचारांनी प्रेरित व विवेकी होती. संघमय जीवन कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुरेशराव केतकर हे होते असेही डॉ. भागवत पुढे म्हणाले.

स्नेहल प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तक प्रकाशन प्रसंगी व्यासपीठावर पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नानासाहेब जाधव, सुरेशराव केतकर यांचे पुतणे शिरीष केतकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव हे उपस्थित होते. यावेळी संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

या प्रांतीक वार्षिक बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत.

पुस्तक प्रकाशनानंतर डॉ. प्रवीण दबडघाव यांनी पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील संघकार्य, सेवाकार्य विशेषत: कोरोना काळातील मदतकार्याचा आढावा व बैठकीतील विषयांची मांडणी केली.

बैठकीच्या सुरवातीला मागील दोन वर्षांच्या कालावधीतील विशेषतः कोरोना काळात कर्तव्य बजावताना प्राण गमावलेले लष्करी जवान, प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स, परिचारिका, पोलिस अधिकारी तसेच सामाजिक, सांस्कृतिक, कला क्षेत्रातील मान्यवर नागरिक व संघ कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

दोन दिवसीय बैठकीत प्रामुख्याने रा.स्व.संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित विविध कार्यक्रम, केंद्रीय प्रतिनिधी सभेमध्ये सांगोपांग विचार केल्याप्रमाणे शाखा विस्तार, कार्यकर्ता गुणवत्तावाढ, कुटुंबप्रबोधन, पर्यावरण, समरसता, समाजात चांगल्या कामासाठी सज्जनशक्तीची जोडणी, संघकामातून परिवर्तन, समाजात सकारात्मक विमर्षाची मांडणी आणि समाजातील रोजगारांच्या संख्येतील वाढीच्या दृष्टीने कार्यक्रम व उपक्रमांवर विस्ताराने चर्चा व नियोजन करण्यात आले.

संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील पुणे महानगरासह सात जिल्हे, तालुका स्तरापर्यंतच्या प्रमुख सुमारे दोन हजारांहून अधिक कार्यकर्ते या बैठकीत सहभागी झाले आहेत.
..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button