Opinion

कोकणातील कातळचित्रे म्हणजेच पेट्रोग्लीफ्स्

आपल्या कोकण किनारपट्टीला विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. या किनार्‍यावर सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत. या पर्वत रांगा लक्षावधी वर्षांपुर्वी भूखंडांचे स्थलांतरण, भुकंप व ज्वालामुखीच्या उद्रेगातुन तयार झालेल्या आहेत. या सह्याद्री पर्वतांच्या माथ्यावर ज्वालामुखातील लाव्हा रसाचे थरावर थर पसरुन लँटराईट या प्रकारच्या जांभ्या दगडाचे सपाट पठार तयार झालेले आहे. लँटराईटने बनलेल्या या सपाट कातळी भागालाच कोकणात सडा असे म्हटले जाते. ज्या गावाच्या शेजारी हे पठार असेल ते त्या गावाच्या नावाने ओळखले जाते. जसे जामसंडे सडा, दाभोळे सडा, कुणकेश्वर सडा इत्यादी. या भागातील पठारांची नावे अशीच पडलेली पहायला मिळतात. या परीसरात घरांच्या बांधकामांसाठी देखील याच जांभ्या कातळातील चिरे कातुन काढुन वापरले जातात. हा कातळ तासुन काढायला अतिशय कठीण व कष्टदायी असतो. हा लँटराईटचा जांभा दगड काही ठिकाणी अत्यंत कडक जांभळट, काळ्या रंगाचा असलेला आढळतो. वरच्या थराचा हा भाग अत्यंत कठीण थरांचा बनलेला असतो आणि अशा प्रकारच्या कठीण भागावरील सपाटीलाच अनेकदा कोरुन तासुन तयार केलेली कातळ शिल्पे आढळतात. यांना पुरातत्वीय भाषेत ‘पेट्रोग्लीफ्स्’ असे म्हणतात. या प्रकारची कातळशिल्पे आता रत्नागिरी राजापुर पासुन पार गोव्या पर्यंतच्या सर्वच दक्षिण कोकणात सापडु लागली आहेत.

१९९० साली डाँक्टर दाऊद दळवी यांनी रत्नागिरी येथील निवळे फाट्यावरील कातळ शिल्पे उजेडात आणली. हि कातळ शिल्पे भौमितिक आणि अमुर्त रचनांसाठी प्रसिध्द आहेत. लांबुन पहाताना एकाद्या इलेक्ट्रीक सर्किट सारखी ही रचना दिसते. कोकणात अशी काही कातळ शिल्पे असल्याचा हा पहीलाच उल्लेख आढळतो. श्री. प्र. के. घाणेकर यांनीही कोकण पर्यटन या पुस्तकात कातळ शिल्पांचा उल्लेख केलेला आढळतो. १९९६,९७ साली पालशेत भागात आँर्कलाँजीचे काम सुरु असताना त्याच्या आसपासच्या भागातील कातळ शिल्पे या टिमच्या पहाण्यात आली. त्यावेळी या रत्नागिरी राजापुर परीसरातील कातळ शिल्पाचा सर्व्हे करण्यात आला होता. या टिममधे उपस्थित असणार्‍या श्री. श्रीकांत प्रधान यांनी रीतसर काम सुरु केले. त्यांनी त्याचे फोटोग्राँफ्स, उत्कृष्ठ रेखाचित्रे तयार केली. स्थानिक लोक संस्कृतीचा या शिल्पांशी काही संबंध आहे का, याचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या कातळशिल्पावर त्यांनी शोध निबंधही सादर केले आहेत.

त्यानंतर २००० साली श्री. रविन्द्र लाड यांनी बारसु, देवी हसोळ, सोलगाव, गावडेवाडी या भागातील कातळ शिल्पे शोधुन काढली. बारसु या गावातील कातळ शिल्प तर इतके मोठे आहे की त्याचे फोटो काढण्यासाठी ड्रोन कँमेराच पाहीजे. जमिनीवरुन त्याचे निट फोटो काढताच येणार नाहीत, इतके ते शिल्प मोठे आहे. यात एक मोठी विशाल मानवाकृती असुन तिने दोन हातांनी दोन वाघ रोखुन धरले आहेत. असे विलक्षण दृष्य या शिल्पात पहावयास मिळते. या प्रकारचे चित्रण जगातील अनेक प्राचीन संस्कृतीं मधे आढळली आहेत. सिंधु संस्कृतीतील एका मुद्रेवर देखील असेच चित्र पहायला मिळते. त्यामुळे या कातळ शिल्पांचा प्रवास सिंधु संस्कृती पासुन सुरु झालाय का? असा एक प्रश्न श्री. लाड यांनी उपस्थित केला आहे.

 त्या नंतरच्या काळात मालवण येथील जनसंपर्क अधिकारी श्री. सतिश लळीत यांनी हिवाळे, कुडोपी येथील कातळ शिल्पे उजेडात आणली. हिवाळे   येथील कातळ शिल्पांना स्थानिक लोक पाडवांची चित्रे या नावाने ओळखत असत. कुडोपी गावाजवळ बावल्यांचे टेंब, या नावाने ओळखल्या जाणार्‍या पठारावर सुमारे साठहुन अधिक कातळ शिल्पे असल्याची नोंद त्यांनी केली आहे. या शिल्पांचे महत्व ओळखुन त्यांनी यावर आपला शोध निबंध ‘राँक आर्ट सोसायटी आँफ इंडीया’च्या २०१२ साली झालेल्या १७व्या राष्ट्रीय काँग्रेसमधे सादर केला होता. त्यामुळे हा विषय जागतीक पातळीवर गेला. ‘ही कातळ शिल्पे अतिशय भव्य व प्रेक्षणिय आहेत. वैविध्य, रचना, कलाकारी, सौदर्य, प्रमाणबध्दता या दृष्टीने ही कातळ शिल्पे अतुलनीय आहेत. हे स्थळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून त्याचे नीट जतन होणे आवश्यक आहे. या कातळ शिल्पांचा दर्जा पहाता त्या काळात या परीसरात वास्तव्य करणारा मानवी समुह अतिशय प्रगल्ब असला पाहीजे.’ असा अभिप्राय प्रसिध्द पुरातत्वज्ञ डाँ. सुंदरा अडिगा यांनी या परीषदेत व्यक्त केला होता.

 आता अनेक क्षेत्रातील मंडळी या कातळ शिल्पांचा शोध घेत आहेत. नव नविन कातळ शिल्पे त्यामुळे उजेडात येत आहेत. यात नविन सुशिक्षित संशोधक मंडळी तर आहेतच पण त्याच बरोबर काही हौशी मंडळीही शोध घेत आहेत. सर्वांचा नामोल्लेख करणे जरी येथे शक्य नसले तरी त्यांच्या कामामुळे कातळ शिल्पांचा हा विस्तिर्ण पट अधीकच विस्तारीत होत आहे. या क्षेत्रात उल्लेखनीय काम श्री. सुधीर रिसबूड व त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे. रत्नागिरी राजापुर भागातील अनेक कातळ शिल्पे शोधुन काढण्याची मोहीमच त्यांनी उघडली आहे. या शिल्पांचे दस्तऐवजीकरण करताना त्यांचे जतन संवर्धन करण्याची त्यांची भुमिका आहे. कातळ शिल्पे ज्या जागेत कोरलेली आहेत त्या जमिनीचे मालक व शासन यांच्या मधे एक दुवा म्हणुन काम करणे, जनजागृती करणे, नियोजनबध्द विकासाचा आराखडा तयार करणे या हेतुने त्यांची निसर्गयात्री ही संस्था काम करीत आहे.

२०१० साली डाँ. दाऊद दळवी व श्री. रविन्द्र लाड यांच्या सोबत स्वतः मी रत्नागिरी व राजापुर भागात कातळ शिल्पांच्या शोधात हिंडलो होतो. त्यावेळी निवळी फाटा, बारसु, गावडेवाडी, राजापुर, चिंद्रवली या ठिकणांच्या कातळ शिल्पांची पहाणी आम्ही केली होती. त्या नंतर देवगड तालुक्यातील कातळ शिल्पांचा शोध घेण्याचे प्रयत्न मी माझ्या मित्रां मदतीने सुरु केले. २०१२ साली दाभोळच्या सड्यावर मला कातळ शिल्प सापडले आणि त्या नंतर देवगडच्या इतिहास संशोधक मंडळाच्या माध्यमातुन गेल्या दिड-दोन वर्षात पंधरा ते वीस कातळ शिल्पे सापडली आहेत.

रत्नागिरी पासुन गोव्यापर्यंतच्या परीसरातील ही कातळ शिल्पे कधी खणली? कोणी खणली? का खणली? व कशासाठी खणली? हा कुतुहलाचा विषय आहे. अनेक ठिकाणी ही कातळ शिल्पे स्थानिक लोकांनी पांडवांशी जोडली आहेत. पांडवांचो सारीपाट, लिवलेला काप, महापुरुष अशा वेगवेगळ्या नावांनी ही कातळ शिल्पे ओळखली जातात. खरे तर ही कातळ शिल्पे नसुन रेखा चित्रे आहेत. ही कातळ चित्रे मानवाला शिल्प घडविता येण्यापुर्वीची प्राथमिक पायरी असली पाहीजे. त्यामुळे ही कातळ चित्रे काही हजार वर्षांपुर्वीची असु शकतात. यांना कातळ शिल्प म्हणण्या पेक्षा कातळ चित्रे म्हणणे अधिक योग्य आहे. ही उठावाची चित्रे आहेत. चित्रकलेकडुन शिल्पकलेकडे प्रवास करताना मधल्या काळात कधि तरी मानवाने या कातळ चित्रांच्या निर्मितीस सुरवात केलेली असाली पाहीजे.

देवी हसोळ येथील मांड या नावाने ओळखले जाणारे चित्र आता अनेक ठिकाणी आढळुन आले आहे. एका विस्तिर्ण कातळावर खोदुन कोरुन काढलेले हे कातळ चित्र आहे. एक आयाताकृती पट लांब पट्टे कोरुन बाकीच्या कातळापासुन वेगळा केलेला आहे. याला सरळ पट्यांची बाँर्डर कोरलेली आहे. त्याच्या आत वळणे घेत जसा नाग चालतो तश्या प्रकारचे खोल पट्टे कोरले आहेत. आतील भागामध्ये चौरस, गोल, आयाताकृती अशा विविध आकृत्या कोरलेल्या आहेत. या प्रकारच्या कातळ चित्रात विविध प्रकारच्या आकृत्या असतात. नुकतेच काही महीन्यांपुर्वी वानिवडे या गावात सापडलेले कातळ चित्र हे देखील याच प्रकारचे आहे. असेच एक कातळ चित्र आम्हाला आरे गावातील सड्यावर सापडले. साळशी येथील दुर्ग संवर्धनाचे काम करणार्‍या संतोष गावकर या तरुण उत्साही कार्यकर्त्याला याच प्रकारचे कातळ चित्र सापडले. सोई साठी या प्रकारच्या कातळ चित्रांना आपण मांड असे म्हणुया. या प्रकारातील कातळ चित्रांना नागमोडी वळणाची नक्षी आढळते. पण साळशी येथील मांड या प्रकारातील कातळ चित्राला ही नागमोडी नक्षी नसुन काटकोनात वळवलेली आढळते. श्री प्रधान सरांशी चर्चा करता अशा प्रकारचे बदल या चित्रांमधे आढळतात , असे त्यांचे म्हणणे आहे.

आरे येथील मांड या प्रकारच्या कातळ चित्रा पासुन अगदी थोड्या अंतरावर व्हाळी नजिक एक आकृती कोरलेली आढळली. ही एक मानवाची आकृती आहे. अत्यंत पुसट अशा रेषांनी ही आकृती रेखाटलेली आहे. त्यामुळे पटकन ती लक्षातच येत नाही. याची दोन्ही पावले बाजुला वळवलेल्या स्थितीत आढळतात. अशाच अनेक मानवाकृती रत्नागिरी पासुन कुडाळ पर्यंतच्या अनेक गावातील कातळ सड्यांवर कोरलेल्या आढळल्या आहेत आणि बाजुला वळवलेली पावले हे वैशिष्ट्य या प्रकारच्या बर्‍याच कातळ चित्रांमधे आढळते. अनेक ठिकाणी या मानवाकृतीं विषयी काही स्थानिक आख्यायीका सांगितल्या जातात. कुठे त्यांना महापुरुष, राखणदार असे संबोधले जाते. काही ठिकाणी अशा पाच सहा मानवाकृती आढळल्या आहेत. त्यांना त्या भागातील लोक पाच पांडव म्हणुन ओळखतात. अशा ठिकाणी काही विशिष्ट विधी, पुजा अर्चा, भागवणी करण्याचे म्हणजेच वार्षिक बळी देण्याचे प्रकारही केले जात असत, असे चौकशी करता आढळले आहे. यातील काही आकृत्या या उंच लांब अजानबाहु असलेल्या जैन साधुंप्रमाणे भासतात. पण ठोस पुराव्या अभावी असा काही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.

नाग, ससा, खेकडा, सांबर, कोल्हा, चित्ता, हत्ती, रानडुक्कर, अनेक प्रकारचे मासे व पक्षी या सारखी अनेक चित्रे यात आढळतात. प्रामुख्याने यात पाळीव प्राणी आढळत नाहीत. फक्त जंगलात शिकार केले जाणारे प्राणी या कातळ चित्रांमधे आढळतात. त्यामुळे ही चित्रे शिकार करुन त्यावर आपला निर्वाह करणार्‍या मानव समुहाने कोरली आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होतो. दाभोळचे कातळ शिल्पात मानवी आकृतीचा फक्त कमरे खालचा भाग कोरलेला आढळतो. प्रामुख्याने हे स्त्रिचे चित्रण असावे असे वाटते. तिच्या कमरेवर मेखला प्रमाणे शिल्पांकण आढळते. तिच्या पायातही तोड्या सारखे कोरीव काम आढळते. आजवर झालेल्या सर्व उत्खननात नवाश्मयुगा पासुन सिंधु संस्कृती पर्यंतच्या काळातील मातीच्या मातृ देवता खुप मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. त्यांची पुजाअर्चा होत असल्याचेही संशोधनातुन आढळले आहे. प्रसिध्द संशोधक रा. ची. ढेरे यांनी लज्जागौरी विषयी खुप माहीती आपल्या पुस्तकात दिली आहे. कोकणात मध्ययुगीन कालखंडात तांत्रिक शाक्त संप्रदायाचे मोठे प्रबल्य होते . त्यामुळे दाभोळ येथिल हे कातळ शिल्प मातृदेवता असावी का ? येथे तांत्रिक साधना होत असावी का? असेही प्रश्न उपस्थित होतात.

अनेक ठिकाणी अनाकलनिय भौमितिक रेखाटणे आढळतात. बारसु येथिल कातळ शिल्प एका बाजुने सिंधु संस्कृतीतील विख्यात वाघ रोखुन धरणार्‍या चित्रासारखे दिसते तर उलट बाजुने पहाता ते एखाद्या गलबता सारखे दिसते. काहींच्या मते ती आकृती पंख पसरुन उडणार्‍या गरुडा सारखी दिसते. आसे वेगवेगळे तर्क पुढे येतात. ठोस वैज्ञानिक पुरावे सापडत नसल्याने साम्य अनुमानांवर आधारीतच आभ्यास करणे भाग पडते. अशावेळी काहीजण या चित्रांमधे चुना  किंवा खडु टाकुन रंगवुन फोटो काढतात. पण हे अत्यंत चुकीचे आहे. कारण यामुळे त्या चित्राला तर हानी पोहोचतेच पण त्याच बरोबर आपण ते चित्र रंगवुन आपल्याला त्याचे जे आकलन झाले आहे, तेच कायम होऊन बसते. तसेच त्या मुळ रेखाटनाचे निरीक्षण करुन नविन तर्क करण्याला वावच उरत नाही. आज या सर्व कातळ चित्रांचे  फोटोग्राफ्स, अचूक रेखाटणे, नकाशे तयार करुन एकत्र करण्याची गरज आहे. बरे हे एकट्या दुकट्याचे किंवा एखाद्या संस्थेचेही काम नाही. सर्वांनी एकत्र येऊन, एकमेकांना माहीतीचे आदान प्रदान करीत, चर्चा करीतच हे काम करावे लागेल.

ही कातळ चित्रे कोणत्या काळातील आहेत हा प्रश्न तांत्रिक दृष्या फारच अवघड आहे नवाश्म युगापासुन अगदी आधुनिक काळापर्यंतच्या रचना यात असु शकतात. फार मोठ्या काळात कोरल्या गेलेल्या या अनंत रचना आहेत. त्या सर्व एकत्रित करुन, त्यांची साम्य स्थळे लक्षात घेऊन त्यांचा अभ्यास करावा लागेल आणि तरच काही ठोस संशोधन हाताशी लागु शकेल. आज ही कातळ चित्रे कोकणातील पर्यटनासाठी मोठे आकर्षण ठरणार आहे . भावी काळात परदेशी पर्यटक खेचुन आणण्याची क्षमता या कातळ चित्रांमधे आहे. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टीने त्याचे संशोधन, संवर्धन करुन त्यांचे योग्य रीतीने प्रेझेंटेशन करावे लागेल. या बाजुंवर आज ठोस उपाय योजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. या कातळ शिल्पांमधे अनेक कोडी आहेत ती भविष्यातील संशोधनातुन सुटतील अशी आशा वाटते.

रणजित रमेश हिर्लेकर (लेखक भारताच्या प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्वज्ञान- अर्थात ‘भारतविद्या’ अथवा ‘प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)

Back to top button