NewsRashtra Sevika Samiti

पूर्ण स्वराज्यासाठी सकारात्मक मानसिकता हवी – राष्ट्र सेविका समिति प्रमुख संचालिका वं. शांताक्का

ठाणे दि. २ मे : ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अजूनही टिकून असलेली गुलामी मानसिकता दूर करण्याची गरज आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले परंतु खऱ्या अर्थाने पूर्ण स्वराज्य निर्माण करण्याकरीता तितक्याच मोठ्या सकारात्मक मानसिकतेची आवश्यकता आहे’, असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितिच्या प्रमुख संचालिका वं. शांताक्का यांनी आज येथे केले.


ठाणे येथील राजमाता जिजाबाई ट्रस्ट या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ गेले दोन दिवस ठाणे येथे पार पडला. आजच्या समारोपाच्या आशीर्वचनपर भाषणात बोलताना त्या म्हणाल्या की, ‘राजमाता जिजाऊंनी मातृशक्तीचेच जागरण केले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने हिंदवी स्वराज्याचा पाया घातला गेला. मातृशक्तीचे कार्य हे इमारतीच्या पायात असलेल्या दगडांप्रमाणे असते. लोकांना केवळ त्या इमारतीचा कळस दिसत असतो. आजच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात या मातृशक्तीचे व्यापक प्रमाणावर जागरण झाले तर एका वैभवशाली आणि सगळ्या विश्वाच्या गुरुस्थानी असलेला भारत निर्माण करता येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.’


आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पितांबरी उद्योगसमुहाचे रविंद्र प्रभुदेसाई उपस्थित होते. ते आपल्या भाषणात म्हणाले की, ‘आपल्याला आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्यासाठी एक संघस्वयंसेवक म्हणून संधी मिळाली. जिजामाता ट्रस्टचे कार्य म्हणजे एका रामसेतूसारखेच म्हणावे लागेल.’ अनेक सेविकांच्या सहकार्यातून सेवाकार्याचा हा सेतू उभा राहिल्याचे प्रभुदेसाईंनी आपल्या भाषणात सांगितले.


सदर कार्यक्रमाला प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या समितिच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका सुलभाताई देशपांडे यांनी आपल्या भाषणात असे सांगितले की, कोणत्याही संस्थेचे किंवा संघटनेचे विचार हेच त्याचे अधिष्ठान असते. आपला हा देश देवनिर्मित आहे. आणि आपल्याला प्राप्त झालेले राष्ट्रीय विचार हे ऋषीनिर्मित आहेत. समितिला वं. लक्ष्मीबाई केळकर मावशी यांच्यासारखे ओजस्वी व्यक्तीमत्व लाभले म्हणून आज राष्ट्रव्यापी संघटन उभे राहू शकले. त्याच विचारांच्या संचितातून जिजामाता ट्रस्टसारख्या संस्थाही निर्माण झाल्या. ज्यातून अनेकांना स्वावलंबन आणि स्वयंरोजगाराचा लाभ झाल्याचे त्या म्हणाल्या.


कार्यवाहिका संहिता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांमध्ये डॉ. विद्या देवधर, भटु सावंत , क्रांती सावंत, पूजा जोशी, ओंकार जोशी, वर्षाताई जोशी, बालकलाकार शिवा पंडित, पृथ्वीराज सरनाईक, यांचा शांताक्का यांच्या हस्ते सत्कार केला गेला. जिजामाता ट्रस्टच्या कार्याची माहिती देणाऱ्या स्मरणिकेचे आणि ध्वनिचित्रफित यांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.


याआधी शनिवार दि. 30 एप्रिल रोजी राष्ट्र सेविका समितिच्या प्रमुख संचालिका शांताक्का आणि अखिल भारतीय सहकार्यवाहिका चित्राताई जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेशवंदना करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. राष्ट्र सेविका समितिच्या अखिल भारतीय सरकार्यवाहिका चित्राताई जोशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या की, जिजाबाईंच्या मातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तीनही गुणांचे स्फुरण घेऊन राजमाता जिजाबाई ट्रस्टची स्थापना झाली. या त्रिवेणी संगमामुळेच संस्था सक्षम होते. संस्थेची पन्नास वर्षाची वाटचाल ही पैशाच्या आधारावर नसून कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून झाली आहे. समाजाला एखाद्या संस्थेविषयी निश्चिंतपणा वाटतो म्हणजेच त्यात या संस्थेचे यश आहे. पुढे त्या असेही म्हणाल्या, समर्पित कार्यकर्ता हा अशाच संस्थेतून तयार होतो. राष्ट्राला केंद्रबिंदू मानून राष्ट्राच्या बांधणीसाठी कार्य केले पाहिजे. तरच अशा संस्था दीर्घकाळ यशस्वी कार्य करू शकतात.


याचवेळी मी जिजा बोलते हा आरती मुनिश्वर यांचा एकपात्री कार्यक्रम, गौरी नाडकर्णी यांनी गणेशवंदना, आदिती पेठे व सहकारी यांचे नृत्य, सृष्टी सांगवीकर यांचे भरतनाट्यम् आणि पथनाट्य सादर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी 1 मे रोजी सकाळी सत्यनारायणाची पूजा आणि शोभायात्रेने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. शोभायात्रेत लेझिम गट, वारकरी पेशातील गट, दंड गट आदिंनी छान प्रात्यक्षिके करून दाखवली. दुपारच्या सत्रात 11 ते 1 या दरम्यान वृंदा टिळक यांनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती घेतल्या. यात अभिनय क्षेत्रातील गिरीजा ओक गोडबोले , पत्रकार योगिता साळवी, आणि वैद्य सुचेता सावंत यांचा सहभाग होता.


राष्ट्र सेविका समितिच्या प्रेरणेने 1970 साली ठाण्यात स्थापन झालेल्या राजमाता जिजाबाई ट्रस्ट संस्थेने समाजाभिमुख कार्याचा प्रसार केलेला आहे. विशेषतः महिलांसाठी उपयुक्त ठरणारे अनेक कार्यक्रम हे या संस्थेचे फार मोठे वैशिष्टय़ ठरते. श्रीमती शालिनी जोशी महिला वसतीगृहात चालणाऱ्या 38 विद्यार्थीनींची अतिशय माफक दरात निवासी व्यवस्था केली जाते. महिलांना उद्योग व्यवसायाची प्रेरणा मिळावी म्हणून जिजाई सहउद्योग केंद्र सुरु झाले आणि पंधरापेक्षा जास्त वस्तूंचे मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यात अतिशय अल्प दरामध्ये वितरण केले जाते. ज्यामुळे महिला बचत गटांनासुध्दा रोजगार उपलब्ध झाला आहे. जवळपास पंधरा हजाराहून जास्त पुस्तकं आणि पाचशेहून अधिक सभासद संख्या असलेले शिवाय पूर्णपणे महिलांनी चालवलेले येथील शारदा वाचनालय या ट्रस्टच्या कार्याचा वेगळा पैलू ठरतो. वं. लक्ष्मीबाई केळकर सभागृह, देवी अष्टभूजा मंदिर यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे उत्सव, स्पर्धा, व्याख्याने आयोजित केले जात असतात.वनवासी क्षेत्रात आरोग्य शिबीर, शिक्षणासाठी आर्थिक मदत , संस्कार वर्ग, आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात मोठ्या प्रमाणावर मदत गोळा करण्याचे कामही जिजाबाई ट्रस्टतर्फे केले जाते. संस्थेचा वाढता कार्यभार हाच शेकडो महिलांचा आधार ठरला आहे.

Back to top button