OpinionReligion

काशी विश्वनाथ प्रकटले!

वास्तविक परकीय आक्रमकांच्या काळात तलवारीच्या टोकावर धर्मांतरे करत, लोकांच्या श्रद्धा सर्वाधिक जेथे जोडल्या गेल्या आहेत ती मंदिरे उद्ध्वस्त करत आक्रमकांनी हजारो मंदिरांच्या मशिदी बनविल्या. आता त्या प्रत्येक विषयात संघर्ष करत अशांतता माजविण्याइतका हिंदू समाज असहिष्णू नाही. मात्र देशातील कोट्यवधी हिंदूंची श्रद्धा असलेल्या व अस्मितेचे प्रतीक असलेल्या अयोध्या, काशी आणि मथुरा येथील मंदिरे चर्चेतून, संवादातून हिंदूंना परत करावीत अशी सर्वांची इच्छा होती. मात्र ज्ञानवापीच्या निमित्ताने सत्य बाहेर पडूनही मुस्लीम धुरीणांची डोकी तिरपीच चाललेली दिसत आहेत. त्यांनी सामंजस्य दाखविले पाहिजे. संघटित हिंदू शक्तीपुढे त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे.

ज्ञानवापी मशिदीत चाललेल्या सर्वेक्षणात वजूखान्यातील पाणी काढण्यास सुरुवात झाली. जसे जसे पाणी कमी होत गेले, तसे तसे पाण्याच्या तळाशी गोल कठड्यात शिवलिंग दिसू लागले. शिवलिंग नजरेस पडताच तेथे उपस्थित हिंदूंनी ‘हर हर महादेव’ असा जयजयकार केला. झाले! वर्षानुवर्षाची प्रतीक्षा संपली. बाबा काशी विश्वनाथ प्रकट झाले. कोट्यवधी हिंदूंची श्रद्धा असलेल्या काशी विश्वनाथाचा उद्दाम आक्रमकांनी केलेला अपमान संपण्याची वेळ आली. सगळ्या देशात ही वार्ता पसरली. आता या विषयाचा अंतिम निर्णय न्यायालयात होणार आहे. मात्र साधारणत: काशी विश्वनाथाचे कोडे उलगडणार असे संकेतच सगळ्या घटनांमधून मिळत आहेत.


वास्तविक अयोध्येच्या आंदोलनात एक घोषणा सगळीकडे वारंंवार दिली जात होती – ‘अयोध्या तो झांकी है, काशी, मथुरा बाकी है।’ अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिर उभे करण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने गतिमान झाला. प्रश्न सुटला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील रामजन्मभूमीवर भूमिपूजनही झाले. मात्र हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रम पत्रिकेत वरील घोषणेप्रमाणे काशी येथील विश्वनाथ मंदिराचा आणि मथुरा येथील मंदिराचा प्रश्न सोडविण्याचा कार्यक्रम सध्यातरी नव्हता. मात्र अनपेक्षितरित्या काशी विश्वेश्वराचे सत्य बाहेर आले. जणू काशी विश्वनाथाचीच इच्छा असावी, अशा घटना घडत गेल्या. पाच महिलांनी वाराणसीच्या सत्र न्यायालयात एक याचिका दाखल केली ती ज्ञानवापी मशीद परिसरात असलेल्या शृंगारगौरी मंदिरात पूजा करण्याची परवानगी द्यावी यासाठी. मात्र या मागणीवर निर्णय देण्याआधी न्यायालयाने या मशिदीत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. सर्वेक्षणासाठी तीन जण नियुक्तही केले. 14 मे रोजी सकाळीच हे सर्वेक्षण सुरू झाले. पहिल्या दिवशी सर्वेक्षणानंतर आणखी एक याचिकाकर्ता सोहनलाल आर्य म्हणाले की “मी याचिकेत हिंदूंच्या प्रतीकाबाबत जो दावा केला होता, त्यापेक्षा जास्त प्रतीकचिन्हे सर्वेक्षणात पाहायला मिळाली आहेत. स्वस्तिकचे चिन्ह, कमळाचे फूल, हिंदू देवदेवतांच्या खंडित झालेल्या मूर्ती आढळून आल्या आहेत.” मग हे सर्वेक्षण चालू असताना ती देशाला आंदोलित करणारी बातमी आली – तेथील वजूखान्यात शिवलिंग सापडले. हे शिवलिंगही तब्बल 12 फूट 8 इंचाचे! सर्वांच्या मनात एकच विचार आला, ‘काशी विश्वनाथ प्रकटले’! इतिहासातील एक अन्याय दूर होणाची वेळ काशी विश्वनाथ प्रकटल्याने जवळ आली.

भारतावर आक्रमण करत येथील सर्वसामान्य जनतेच्या अस्मितेवर आणि श्रद्धांवर आघात करत जनतेचे मनोधैर्य संपवीत त्यांना धर्मांतर करण्यासाठी जबरदस्ती करणार्‍या आक्रमकांनी सर्व महत्त्वाच्या हिंदू देवस्थानांना भ्रष्ट करण्याचे कारस्थानच जणू केले होते. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरचे भव्य मंदिर जसे बाबराने पाडले, तसे काशी येथील विश्वनाथ मंदिर औरंगजेबाने 1669मध्ये फोडले आणि तेथे मशीद बनविली. ते भव्य मंदिर राजा विक्रमादित्याने बांधलेले होते. काही दिवसांनंतर तेथे बाजूला विश्वनाथाचे दुसरे मंदिर बांधले गेले. मंदिरात विश्वनाथाची प्रतिरूप मूर्ती प्रतिष्ठापना करून बसविली गेली. औरंगजेबाने काशी विश्वनाथाचे मंदिर तोडून मशीद बनविली हा इतिहास आहे. त्यामुळे त्यासाठी वेगळ्या पुराव्याची गरज नाही.

मशिदीत जसे अनेक हिंदू मंदिरांचे अवशेष, प्रतीके, चिन्हे दिसतात, तशी ठसठशीत दिसणारी आणखी एक गोष्ट आहे. कुठेही शिवमंदिरात गाभार्‍याबाहेर नंदी असतोच. या नंदीचे तोंड नेहमीच शिवलिंगाच्या दिशेने असते. नंदी महादेवाकडे पाहत बसलेला असतो. काशी येथे मात्र विश्वनाथ मंदिर परिसरात जो नंदी आहे, त्याचे तोंड शिवलिंगाच्या दिशेने नाही, तर ज्ञानवापी मशिदीच्या दिशेने तिकडे तोंड करून आहे. आता जे शिवलिंग सापडले आहे, त्या शिवलिंगाकडेच या नंदीचे तोेंड आहे. जणू नंदीची वर्षानुवर्षाची प्रतीक्षा आता संपली आहे. काशी विश्वनाथाचे दर्शन होण्याची वेळ आता आली आहे.

ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षणात शिवलिंग सापडले, ते वजूखान्यात सापडले. वजू म्हणजे मशिदीत नमाज अदा करण्यापूर्वी हात, पाय, तोंड धुण्याची जागा. मुद्दाम हिंदू देवतांचा अपमान करण्यासाठी हे शिवलिंग तेथे ठेवून वर्षानुवर्षे हे उद्दाम लोक तेथे तोंड, हात, पाय धुऊन देवतेची विटंबना करत होते. अतिशय संताप आणणारी ही बाब आहे. सर्व पंथ प्रेम करायला शिकवतात, इतरांच्या देवतांचा आदर करायला शिकतात असली वाक्ये अतिशय खोटारडी, झूट असल्याचे दर्शविणारी ही गोष्ट आहे.

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडले ही बातमी बाहेर आल्यानंतरही मुस्लीम राजकारणी, नेते यांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्याही अशाच संताप आणणार्‍या आहेत. त्यात चिथावणीखोर इशारेही आहेत. एमआयएमचे नेते असादुद्दीन ओवैसी यांनी “ते शिवलिंग कसले? तो तर कारंजा आहे. मी वीस वर्षांचा असताना अयोध्येत एक मशीद आमच्याकडून घेतली, आता दुसरी मशीद मी घेऊ देणार नाही.” वास्तविक या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर झाल्यानंतर त्यावर न्यायालय अंतिम निकाल देईल, त्यानंतरचा हा विषय आहे. जर ओवैसी यांच्या मते शिवलिंग नसून तो कारंजा आहे, तर त्याला पाणी कोठून येत होते? कारंजाला असते तशी छिद्रे आहेत काय? असे प्रश्न उपस्थित होतात. याचा पुसटसाही उल्लेख कोठे आलेला नाही. ‘एक मशीद दिली, आता आणखी मशीद देऊ देणार नाही’ ही कसली भाषा? हा काय उपकार केल्यासारखे आंदण देण्याचा व्यवहार आहे की काय? एका मोठ्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येचा विषय पूर्ण झाला, तोही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर!
अस्सी बार हुए थे हमले, ईटें कितनी बार गिरी

जन्मभूमी की रक्षा करने बलिदानों की होड लगी
 
 
असे अयोध्येचे वर्णन आहे. ओवैसी दुसरी मशीद देणार नाही असे म्हणत न्यायालय, संविधान, लोकशाही सर्व झुगारून मुस्लीम समाजाला चिथावणी देत आहेत. आता असल्या धमक्या चालणार नाहीत.

काँग्रेसचा असाच एक नेता तौकिर रझा याने तर अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. तो म्हणतो की, “आता मुसलमान कोणत्याच कोर्टाला शरण जाणार नाहीत. म्हणे की ज्ञानवापी मंदिर तोडून झालेली नव्हे, तर मुस्लीम झालेल्या लोकांनी आपले प्रार्थनास्थळ मशिदीत बदलले. अशा मशिदींना कोणी हात लावू नये.” मंदिरांच्या रक्षणासाठी मुस्लीम आक्रमकांशी लढताना बलिदान देणार्‍यांचा अवमान करत केलेली ही उद्दाम भाषा सहन करता कामा नये. तौकिर रझा न्यायालयांचाही अवमान करत म्हणतात की “न्यायालयांचे निकाल कसे लागतात, ते बाबरी मशीद प्रकरणात आम्हाला दिसले आहे. बाबरी प्रकरणात आम्ही संयम ठेवला. आता आम्ही संयम ठेवणार नाही. सरकारने जबरदस्ती केली तर सरकारला विरोधाचा सामना करावा लागेल.” थेट पत्रकार परिषदेत सरकारला धमकी देण्यापर्यंत आणि न्यायालये नाकारण्यापर्यंत या महाशयांची मजल गेली आहे. महबूबा मुफ्ती यांनी विनाकारण भडक विधान करताना “आमच्या मशिदीतच बरा यांचा भगवान सापडतो” असे म्हटले आहे. म्हणजे हिंदूंची मंदिरे पाडून हे मशिदी बनवणार आणि बिंग उघडे पडल्यावर आमच्या मशिदीतच कसा भगवान सापडतो असे म्हणणार !
 
हिंदूविरोधाची, अन्य पंथाच्या द्वेषाची दुकाने काढून बसलेली ही मंडळी असलीच भाषा वापरणार. हा देश राज्यघटना, न्यायालये यांना सर्वोपरी मानून चालतो. असल्या पोकळ धमक्यांना आता हा देश भीक घालणार नाही. ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणाचा अहवाल वाराणसी न्यायालयात दाखल झाला आहे. मात्र आता याची सुनावणी आणि निर्णय सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. तेथे जो काही निर्णय होईल, तो सर्वांनी मान्य केला पाहिजे.
 
वास्तविक परकीय आक्रमकांच्या काळात तलवारीच्या टोकावर धर्मांतरे करत, लोकांच्या श्रद्धा सर्वाधिक जेथे जोडल्या गेल्या आहेत, ती मंदिरे उद्ध्वस्त करत आक्रमकांनी हजारो मंदिरांच्या मशिदी बनविल्या. आता त्या प्रत्येक विषयात संघर्ष करत अशांतता माजविण्याइतका हिंदू समाज असहिष्णू नाही. मात्र देशातील कोट्यवधी हिंदूंची श्रद्धा असलेल्या व अस्मितेचे प्रतीक असलेल्या अयोध्या, काशी आणि मथुरा येथील मंदिरे चर्चेतून, संवादातून हिंदूंना परत करावीत अशी सर्वांची इच्छा होती. मात्र ज्ञानवापीच्या निमित्ताने सत्य बाहेर पडूनही मुस्लीम धुरीणांची डोकी तिरपीच चाललेली दिसत आहेत. त्यांनी सामंजस्य दाखविले पाहिजे. संघटित हिंदू शक्तीपुढे त्यांना सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे.

संघटित हिंदू समाज हेच देशापुढील सर्व समस्यांचे उत्तर आहे असे वाक्य लहानपणापासून ऐकत होतो. हे वाक्य उत्साह देणारे व संघटित होण्याची आवश्यकता ठसविण्यापुरते मर्यादित आहे, असे वाटायचे. मात्र अयोध्येच्या श्रीरामजन्मभूमी मंदिर आंदोलनापासून देशभरात संघटित हिंदू समाजाच्या शक्तीचा आविष्कार दिसतो आहे. हा आविष्कार राजकीय तर आहेच, तसाच त्याबाहेरही अनेक क्षेत्रांत दिसतो आहे. राजकारणात तथाकथित सेक्युलर पक्षांचे अगदी काँग्रेसचे नेते हिंदुत्वाच्या व्याख्या करण्यापासून ते जानवे घालून फिरण्यापर्यंत पोहोचले आहेत. स्वप्नवत वाटणार्‍या गोष्टी सहजपणे घडत आहेत. 370 कलम रद्द होणे, अयोध्येत भव्य राममंदिराचे भूमिपूजन होऊन मंदिर उभारणी सुरू होणे, तीन तलाकवर बंदी अशा अनेक गोष्टी संघटित हिंदू शक्तीचा आविष्कार दर्शवीत आहेत. संघटित हिंदू शक्ती कोणाचे नुकसान करण्यासाठी पुढे होत नसते. ती जगताच्या कल्याणाकरिता पुढे येत असते. त्यामुळे कदचित भविष्यात संघटित हिंदू शक्ती मानवतेच्या, जगताच्या कल्याणाचा विचार म्हणून पुढे येईल आणि अधिक मोठे बदल घडवेल, असे म्हटले तर त्यात अतिशयोक्ती ठरणार नाही.
 
ज्ञानवापी मशिदीचा विषय ज्या शांतपणे सर्वोच्च न्यायालयात सर्व पुराव्यानिशी गेला आहे, तेथे तो योग्यरित्या सोडविला जाईल. मथुरेचा विषय चालना मिळून तो सामोपचाराने चर्चेतून सुटला पाहिजे.

एका उद्दाम कार्यक्रमाचा इतिहास कालौघात पुराव्यासह समोर येतो आहे. आज काळाचे संदर्भ बदलले आहेत. जे समोर आले ते मान्य करून सामोपचाराने विचार करण्याची वेळ आहे. संघटित हिंदू शक्ती सहिष्णू असल्याने ती सर्वांना कवेत घेऊन विकासाच्या मार्गावर विश्वासाने जाणे पसंत करते. श्रद्धेचे विषय हे एकमेकांच्या आदराचे, चर्चेतून आणि संघर्षाविना सोडविण्याचे विषय आहेत. इतरांच्या प्रार्थनापद्धतीचा द्वेष करणे सोडून आदर करण्याचा विचार एकेश्वरवादी पंथांच्या धुरीणांनी केला पाहिजे आणि तसा संदेश शेवटच्या स्तरापर्यंत दिला पाहिजे, हा ज्ञानवापी प्रकरणाचा संदेश आहे.

लेखक : दिलीप धारूरकर

साभार : साप्ताहिक विवेक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button