Opinion

डिजिटल फूट प्रिंट

डिजिटल माध्यमातून आपण अनेक ठसे कळतनकळत उमटवत जातो. त्याला एक अनाकलनीय वेग प्राप्त झाला आहे. समाजमाध्यमातील पोस्ट पाहिल्या की अनेकदा त्याचा उथळपणा जाणवत जातो. अशी चूक आपल्या हातातून सुद्धा कधी कधी घडत जाते. समाजजीवनातील अनेक घटना, प्रसंग, घडामोडी या टिपण्याचे सामर्थ्य यामुळे मिळाले आहे. त्याचा विस्तार आणि खोली सुद्धा प्रचंड वाढली आहे. वेगवगेळ्या वयोगटातील सर्वजण आपापल्या पद्धतीने व्यक्त होत जातात. माध्यमांचे आणि तंत्रज्ञानाने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहे. आधुनिक मार्केटिंग क्षेत्रात त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे.

हे सगळं करत असताना अनेक अनावश्यक गोष्टी आपण उगाच करत असतो. एखाद्या गोष्टीचे जसे चांगले परिणाम असतात तसे त्याचे काही वाईट परिणाम सुद्धा असतात. एकूणच समाजमाध्यमात व्यक्त होताना खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे वारंवार आपली अध्ययन, मनन, चिंतन आणि मांडणी याची दिशा तपासण्याची आवश्यकता भासत जाते. समाजमाध्यमातील उथळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीप्रमाणे जनमानस घडू पाहते आहे. हे नुकसानकारक आहे.

कदाचित व्यक्तिगत बंधने सैल झाली असतील. पण ती इतकी सैल व्हायला नको की माणसांपेक्षा ही माध्यमे अधिक मोठी वाटायला लागतील. विचारांची देवाणघेवाण, माहितीचा प्रसार, मानवी मूल्यांभोवती आपण हे सारं गुंफू पहातो आहोत. सारे जग एका मुठीत असल्यासारखा माध्यमांचा वेग वाढतो आहे. त्यामुळे माणसांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम मोठा आहे. मनुष्य स्वभावाचे म्हणून अनेक पैलू आणि त्याच्या अनेक बाजू या निमित्ताने समोर येत जाताहेत.

माध्यमांचा परिणाम म्हणून येणारा काळ आपल्या आता असलेलं जग पाहण्यापेक्षा बाहेरचे जग पाहण्यात व्यस्त झालेली लहान मुलं मुली, पालक, तरुण पिढी आणि वयोवृद्ध या वेगळ्याच चक्रात अडकले आहेत. वडिलधारं असणं आणि त्यातून त्या संस्काराला खीळ बसणं हे शिक्षकांच्या, पालकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बाबतीत असणारा अनुभव विचार करायला लावणारा आहे. माध्यमांचा म्हणून एक तात्कालिकपणा आहे. शाळा, मंदिरे, पुस्तक, सण उत्सव, परंपरा यातून जपले जाणारे कुटुंबाचे, व्यक्तीचे, समाजाचे आणि सृष्टीचे एक चक्र आहे तेही जपायला हवे.

माणसांच्या सहवासापेक्षा माध्यमांच्या आणि तंत्रज्ञानाच्या सान्निध्यात आजची पीढ़ी आणि आपण सगळेच वाढत आहोत. भाषेच्या, साहित्याच्या प्रभावापेक्षा साधनांचा गवगवा जास्त आहे. आपल्या हातांच्या दहा बोटांना एक वेगळेच वळण लागले आहे. हातांची बोटाची वळणे यंत्रवत होत जात असताना माणसांची डिजिटल मने तयार होत जाते की काय अशी शंका मनात कधी कधी येत जाते. भाषा म्हणून असेल, संस्कृत साहित्य म्हणून असेल ते जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारे आहे. मूळ संस्कृत साहित्यातील अनेक गोष्टी मानवी आयुष्याभोवती पूर्णत्वाचा विचार करणारे आहे. पण त्याच्याशी मैत्री, संवाद आणि अनुभूती अजूनही समाजाच्या सर्व घटकापर्यंत नीट पोहचली नाही.

वेद, उपनिषद संस्कृत साहित्य असल्यामुळे त्याचा अर्थ, अन्वायार्थ लावण्यासाठी कष्ट पडत असल्यामुळे त्याचा फारसा प्रचार फारसा झालेला नसेल. त्यात डावे उजवे करत त्यातील अनेक चांगल्या गोष्टींवर आपण विनाकारण अन्याय करतो आहोत. जशी चरित्र, कविता, लेख, नाट्य हे सगळेच पदर मानवी आयुष्य उलगडणारे आहेत. तसे संस्कृत साहित्यात मानवी जीवनाला उपयोगी अशा अनेक गोष्टी सूत्ररूपात मांडल्या आहेत.

स्क्रोल करता करता साहित्याचे संक्षिप्त स्वरूप आपण कसे करत गेलो आणि काही वेळा आपण त्याचे ट्रोल मध्ये कसे रूपांतर करत गेलो हे कुणाच्या फारसे लक्षात आले नाही. पळणारी माध्यमे आपल्याबरोबर माणसांची मने पळवण्यात एका अर्थाने यशस्वी झाली आणि त्यातून अनाकलनीय वेग प्राप्त झाला. सावध व्हायला हवे. हल्ली आपण रोजच माध्यमातून विंडो शॉपिंग करायला बाहेर पडतो आहोत. अनेकदा अनावश्यक असलेलं मानस म्हणून प्लास्टिक, कचरा, तात्कालिक स्वरूपांच्या गोष्टी गोळा करतो आहोत.

काल परवा एका परिचित व्यक्तीच्या निधनामुळे समाजमाध्यमात प्रतिक्रिया, श्रद्धांजली उमटत होती. भावपूर्ण श्रद्धांजली एका पाठीमागे एक मेसेज येत होते. ते आपलं अस्तित्व दाखवून देत होते. हयात असताना त्यांच्याकडे फारसे कुणाचे लक्ष नव्हते. माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रसार म्हणून अनेकांपर्यंत ते पोहचत होते. शेवटी तेही त्याच दिवसापुरते असणार होते. त्यातील अनेक भावना कोरड्या आणि उपचार स्वरूपातील असणाऱ्या होत्या. त्यांच्या अंत्यसंस्काराआधी बातमीची तयारी मात्र मोठ्या जोमाने होत होती. माध्यमांचा वेग हा त्या बातमीच्या डिजिटल फूट प्रिंट तयार करू पाहत होते.

पुढचा दिवस पुन्हा उगवणार त्यातील नेमकी किती शिल्लक राहणार याची फारशी कल्पना नाही. आपण आपल्याभोवती हे चक्रव्यूह तयार केलेलं आहे. आपल्या चित्तात संसार आहे अशी उपनिषदात मांडणी आहे. आपल्या चित्ताचा संसार या डिजिटल फूट प्रिंटच्या गोंधळात जपायला हवा. कधीतरी ऐकलं होतं पावलांना पाऊल असण्याची जाणीव केंव्हा होते ते जेंव्हा जमिनीला नीट स्पर्श करतात. हाताच्या दहा बोटांचा मनाच्या जडघडणीशी मोठा संबंध आहे त्याचाही योग्य अन्वयार्थ आपण समजून घ्यायला हवा.

Back to top button