News

आत्मनिर्भर भारतासाठी टाटांचे चिलखत

टाटा समूहाची संरक्षण शाखा असलेल्या टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टिम्सने (Tata Advance Systems) भारतीय लष्कराला युद्धक्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या क्विक रिअ‍ॅक्शन फायटिंग व्हेईकल्सची एक खेप पुरवली आहे. या अंतर्गत कंपनीने एकूण १० वाहनं लष्कराला सोपवली आहेत. टाटा मोटर्स कंपनीने या वाहनांच्या ताफ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कंपनी भारतीय लष्कराला वेगवेगळ्या प्रकारची वाहनं पुरवते.

​क्विक रिअ‍ॅक्शन फायटिंग व्हेईकल म्हणजे काय?
क्विक रिअ‍ॅक्शन फायटिंग व्हेईकल्स ही पूर्णपणे बुलेटप्रूफ वाहनं असतात, जी युद्धप्रसंगी सैन्याची एक तुकडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी उपयोगी पडतील. या वाहनांवर शत्रूने केलेला कोणत्याही प्रकारचा गोळीबार आतमध्ये बसलेल्या जवानाला इजा पोहोचवू शकणार नाही. इतकंच नव्हे तर लँड माईन्सपासून देखील जवानांचा बचाव केला जाईल. तसेच शत्रूंनी या वाहनांवर ग्रेनेड हल्ला केला तरी ही आतमधले लोक सुरक्षित राहतील.

​टाटा आणि DRDO कडून वाहनांची बांधणी,
लडाख सीमेवर लष्कराच्या हालचाली वाढवण्यासाठी आणि सैनिकांना आवश्यकता असेल तेव्हा मदत पुरवण्यासाठी ही वाहनं लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. ही वाहनं संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि टाटा समूह (Tata Group) यांनी संयुक्तपणे विकसित केली आहेत.

सध्या लढाऊ वाहनांसाठी भारतीय लष्कर हे मोठ्या प्रमाणात रशिया आणि अमेरिकेवर अवलंबून आहेत. मात्र हे अवलंबित्व केंद्र सरकारला कमी करायचं आहे. भारतीय लष्कराची मेड इन इंडिया वाहनांची गरज भागवण्यासाठी देशातील अनेक कंपन्या पुढे येत आहेत. सध्या टाटा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा, भारत फोर्ज, कल्याणी आणि लार्सन अँड टुब्रोसारख्या कंपन्या भारतीय लष्करासाठी वेगवेगळ्या प्रकारची वाहनं बनवत आहेत.

Back to top button