CultureHinduismReligion

सनातन संस्कृतीतील स्त्रीचे देवत्व : विनायकी

गणेशोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. गणेशोत्सवावेळी सार्वजनिक मंडळांमध्ये आपल्याला विविध रूपांतील गणेशाचे दर्शन घडते. अष्ट विनायक, वरद विनायक अशी त्याची विविध रूपे आपल्याला ज्ञात आहेत. मात्र श्रीगणेशाची मूर्ती स्त्री रूपांत असू शकेल, अशी कल्पना तुम्ही आजवर केली आहे का?
तर या स्त्री रुपातल्या काही मूर्ती देशाच्या विविध भागात आढळून येतात. विनायकी, गणेशिनी, पिलियारिनी अशा वेगवेगळ्या नावांनी या मूर्ती ओळखल्या जातात. महाराष्ट्र – तामिळनाडूच्या वेगवेगळ्या भागात या ‘विनायकी’च्या मूर्ती आढळल्या आहेत.

पण या खरंच गणपतीच्या मूर्ती आहेत का? त्यांचा इतिहास काय आहे?

विनायकी ( vinayki) हे नाव कुठून आलं?

या मूर्ती वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जात असल्या तरी विनायकी हे त्यांच्यासाठी वापरलं जाणारं सर्वसाधारण नाव आहे. त्यांचं मस्तक हे हत्तीचं आणि शरीर हे स्त्रीचं आहे. ‘गॉडेस विनायकी- फिमेल गणेशा’ या पुस्तकात पी. के. अग्रवाल यांनी म्हटलं आहे की, विनायकी या नावाचा उल्लेख हिंदू धर्मातील 64 योगिनींमध्येही आढळतो.

विनायकी अवताराची कथा…

अंधकासुर नावाचा एक राक्षस होता. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानामुळे जमिनीवर पडणार्‍या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एकेक असुर निर्माण होईल, अशी शक्ती त्याला प्राप्त झाली होती. अंधकासुर पार्वती देवीचे रुप पाहून अक्षरशः मोहीत झाला आणि थेट पार्वती देवीशी विवाह करण्याचा संकल्प त्याने केला. मात्र, अंधकासुराचा संकल्प पार्वती देवीने महादेवांना सांगितला. महादेव शिवशंकरांनी त्रिशूळाच्या एका प्रहाराने अंधकाचा वध केला. पण, अंधकाचं रक्त जमिनीवर पडताच अनेक अंधकासुर निर्माण झाले.

गणेशाने केला विनायकी अवतार धारण…

ब्रह्मदेवाने दिलेले वरदान महादेवांना समजताच त्यासमोर मग मोठा पेच निर्माण झाला. कारण निर्माण झालेल्या अंधकासुराचा वध केल्यानंतर त्याच्या रक्तातून पुन्हा अंधकासुर तयार होत होते. रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडायला नको. तेव्हाच अंधकासुराचा कायमचा बंदोबस्त करता येईल, हा उपाय पार्वती देवीने हेरला. पार्वती देवीने ब्रह्मा, विष्णू, इंद्र अशा सर्व देवतांचे बोलावून त्या देवतांमधील स्त्री शक्तीचे आवाहन केले. इंद्राची शक्ती इंद्राणी, ब्रह्मदेवतेची शक्ती ब्राह्मणी, विष्णूची शक्ती वैष्णवी अशा विविध शक्ती धावून आल्या. गणेशाची शक्ती प्रकटली. तीच ‘विनायकी’ किंवा ‘गणेशीनी’. या शक्तींनी मिळून अंधकाचे रक्त जमिनीवर पडण्यापूर्वीच ग्रहण केले. अशा प्रकारे शेवटी अंधकासुर वध झाला.

विनायकीच्या पाऊलखुणा…

मध्य प्रदेशातील जबलपूर येथे भेडाघाट भागात १० व्या शतकातील चौसष्ट योगिनी मंदिर आहे. या मंदिरात ४१ व्या योगिनीच्या रुपात विनायकी आढळते. या मंदिरात विनायकीला ‘अंगिनी’ म्हणून ओळखले जाते. तर, मंदसौर भागात असलेल्या ‘हिंगलाजगढ’ किल्ल्यात विनायकी आणखी एका वेगळ्या रुपात दिसते. इथे ती ‘ललिता’ रुपात आहे. विनायकीचे सर्वात जुने शिल्प राजस्थानच्या ‘रैढ’ भागात आढळून आले असून, हे शिल्प पहिल्या शतकातील असावे, असे मानले जाते. तसेच मदुराईच्या मीनाक्षी मंदिरात विनायकीचे व्याघ्रपाद रूप पाहण्यास मिळते. व्याघ्रपादचा अर्थ असा की, या रुपाला मानवी पाय नसून, वाघाचे पाय आहेत.

महाराष्ट्रातील गणेशाची स्त्री दर्शने…

महाराष्ट्रात संस्कृतीच्या अनेकविध, ज्ञात-अज्ञात स्वरूपात असलेल्या शिल्प शृंखला आढळतात. प्राचीन काळापासूनच आपल्या लोकपरंपरेतून श्री गणेशाच्या अतिसुंदर, विविध रूपांचे शिल्प, भित्तिचित्रं अस्तित्वात आहेत. मात्र पुण्याजवळील पुरंदर तालुक्यातल्या भुलेश्वर-येवतेश्वर मंदिर पाहताना, खजिना सापडल्याप्रमाणे श्री गणेशाची स्त्री रूपातील दुर्मीळ, प्राचीन शिल्पांचा समूह जणू आढळून येतात. हे मंदिर प्राचीन शिल्प संस्कृतीचा उत्तम दर्शनीय नमुना असून कुंभ कमळ, कीर्तिमुख, मकर, पाने-फुले ते रामायण, महाभारत अशा विविध देव-देवतांच्या सुरस अशा युद्धकथा कोरीव शिल्प स्वरूपात आढळतात. त्याचबरोबर तत्कालीन वन्यजीवन पर्यावरण निसर्गाची देखणी रूपंही या शिल्प समूहात बघण्यास मिळतात. अशाच या देखण्या शिल्प संस्कृतीत दुर्मीळ अशा तीन सप्तमातृकांच्या समूहात स्त्रीरूपी गणेशाचे दुर्मीळ दर्शन होतं. प्राचीन वाङ्मयात व स्कंदपुराणाच्या काशीखंडात चौसष्ट योगिनींच्या यादीत या गणेशाचा ‘विनायकी’चा उल्लेख आढळतो.

औरंगाबाद येथील वेरुळच्या कैलास लेण्यात व सातारा येथील शिवलिंग समूहातील पाटेश्वरच्या डोंगरातही या प्रकारची शिल्पं आढळतात. देवी सहस्र्नामात विनायकी, लंबोदरी, गणेश्वरी अशा वेगवेगळ्या विशेषणांनी संबोधलं आहे. गुप्तकाळात प्रथम सप्तमातृका शिल्पाचा उगम झाला. मध्ययुगात शक्तिपूजक संप्रदायात विनायकी पूजनाचे महत्त्व वाढलं.
विनायकी शिल्प गजमुख, चतुर्भुज आणि गणपतीप्रमाणे आयुधं धारण केलेली आढळतात. भुलेश्वर येथील वैनायकी शिल्प पद्मासनात बसलेली असून सालंकृत आहेत. खाली मूषक हे वाहन आहे. येथे वेरूळच्या लेण्याप्रमाणे पूर्ण शिल्पपट्टीका नसून तीन सप्तमातृकांच्या शिल्पपट्टीत वैनायकीची शिल्पं आहेत. सध्या भुलेश्वर मंदिरातील शिल्पं भग्न अवस्थेतही आपलं सौंदर्य टिकवून असल्यामुळे हे मंदिर केवळ भक्त-भाविकांचं ठिकाण नव्हे तर मंदिर अभ्यासक पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनलं आहे. पुरातत्त्व खात्याने हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं आहे.

पुराणातही स्त्रीला नेहमीच अव्वल स्थान…

या सर्व ऐतिहासिक बाबींवरुन आपल्या ध्यानात येते की हिंदू संस्कृतीत स्त्रियांना नेहमीच अव्वल स्थान देण्यात आले आहे. गणेशाच्या विनायकी या स्त्री रुपावरून त्याचे महत्त्व स्पष्ट होते. दुर्गाप्रसाद, सीताराम, उमाशंकर या काही नावांवरुनही स्त्रीला भारतीय समाजात नेहमीच आद्य स्थान देऊन देवत्व कसे बहाल केले आहे, याची प्रचिती येते. तेव्हा पुरोगामी म्हणवणाऱ्या परकीयांनी आम्ही कसे स्त्रियांना अधिकार बहाल केले, हे म्हणवताना आधी स्वतःच्या इतिहासात डोकावून पाहावे.

1788 साली राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक झालेल्या या अमेरिकेने 1920 साली म्हणजे तब्बल 132 वर्षांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार बहाल केला. तेव्हा भारतात 1700 – 1800 च्या काळात अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई या महिला राज्यकर्त्यांनी शौर्याचा काळ गाजवला होता. त्यामुळे पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी आधी या सर्व बाबींचा तपशीलात अभ्यास करावा आणि मगच आपली मते मांडावी. अशाप्रकारे पुरातन काळातील गणेशाच्या या स्त्री रुपाच्या उदाहरणावरून भारतीय संस्कृतीचे माहात्म्य किती अवर्णनीय आहे, हे स्पष्ट होते.

Back to top button