National SecurityNews

…या बेटांना देणार परमवीरचक्र विजेत्यांचे नाव !

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना सरकारकडून या भारतमातेच्या वीर पुत्राचा सन्मान करण्यात आला आहे.

अंदमान-निकोबार (Andaman And Nicobar Islands) या केंद्रशासित प्रदेशातील २१ निर्मनुष्य बेटांना ‘परमवीर चक्र’प्राप्त शूर सैनिकांची नावे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. २१ बेटांपैकी १६ उत्तर आणि मध्य अंदमान जिल्ह्यात आहेत, तर पाच बेटे दक्षिण अंदमानमध्ये आहेत. या सर्व बेटांना ‘परमवीर चक्र’ (Param Vir Chakra) प्राप्त शूर सैनिकांची नावे देण्यात आली आहेत.

केंद्र सरकारने संरक्षण आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने अंदमान आणि निकोबारच्या २१ बेटांची नावे शूर सैनिकांवरुन ठेवली आहेत. याबाबत बोलताना खासदार कुलदीप राय शर्मा म्हणाले की, “आपल्या शूर सैनिकांचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने अंदमान निकोबारच्या २१ बेटांची निवड केल्यामुळे आनंद झालाय. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शूर सैनिकांच्या पराक्रमाचं पुस्तकही प्रकाशित करण्यात यावे. अशी माझी केंद्र सरकारला विनंती आहे. जेणेकरुन चिमुकल्यांना आपल्या मातृभूमीसाठी सैनिकांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मदत होईल.”

परमवीर चक्र पुरस्कार

परमवीर चक्र देशातील सर्वोच्च लष्करी बहुमान मानला जाणारा पुरस्कार आहे. युद्धातील शौर्य आणि बलिदानासाठी हा सन्मान दिला जातो. हा सन्मान मरणोत्तरदेखील दिला जातो. देशाचा सर्वोच्च सन्मान असलेल्या भारतरत्नानंतर हा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. शत्रूचा सामना करताना अतुलनीय शौर्य आणि असामान्य शौर्य दाखविल्याबद्दल हे पदक दिले जाते. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय प्रजासत्ताकची स्थापना झाली तेव्हा या पुरस्काराची स्थापना करण्यात आली.आतापर्यंत एकूण २१ परमवीर चक्र पुरस्कार देण्यात आले आहेत व यातील चौदा पुरस्कार हे मरणोत्तर देण्यात आले आहेत. तसेच यातील २० परमवीर चक्र पुरस्कार हे भारतीय लष्करातील जवानांना मिळाले आहेत व एक पुरस्कार भारतीय हवाई दलातील जवानाला मिळाला आहे.

आतापर्यंत परमवीर पुरस्कार मिळवलेले २१ जवान (21 param vir chakra winners) पुढीलप्रमाणे आहेत:-

१) मेजर सोमनाथ शर्मा: पहिला परमवीर चक्र पुरस्कार हा मेजर सोमनाथ शर्मा यांना मिळाला. ३१ ऑक्टोबर १९४७ रोजी बगदाम येथील पाकिस्तानी सैन्याने केलेला हल्ला परतवून लावताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले होते.

२) नाईक जदुनाथ सिंह: ६ फेब्रुवारी १९४८ रोजी नाईक जदुनाथ सिंह यांनी अत्यंत कमी सैन्यबळासोबत ताईनधर येथे शत्रूचा मोठा हल्ला अत्यंत साहसाने लष्करी डावपेचांचा वापर करून परतवून लावला व या हल्ल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले.

३) सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे: १९४७ च्या युद्धात गमावलेले झंगर हे गाव परत मिळवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. राणे हे ७२ तास न झोपता शत्रूचा सामना करीत भारतीय सेनेला मार्ग मोकळा करून देत राहिले व यामुळे भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला नामोहरम करून विजय संपादन केला.

४) नायक करम सिंह: १९४८ च्या भारत-पाक युध्दादरम्यान १३ ऑक्टोबर १९४८ रोजी चुंकी टिथवाल येथील पाक सैन्याचा हल्ला परतवून लावताना दाखवलेल्या अभूतपूर्व शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले.

५) मेजर पीरू सिंह: १८ जुलै १९४८ रोजी पीरू सिंह यांनी तिथवाल येथील शत्रु सैन्यावर अत्यंत साहसी वृत्तीने हल्ला करून ते ठिकाण काबीज केले व या दरम्यान त्यांना वीरमरण प्राप्त झाले.

६) कॅप्टन गुरबचन सिंह: भारतीय सैन्य दलातील आफ्रिकेतील कांगो याठिकाणी पाठवलेल्या जवानांपैकी कॅप्टन गुरबचन सिंग हे एक होते. गुरबचन सिंग व त्यांचे सहकारी अशा एकूण १९ जवानांनी शत्रूशी अत्यंत साहसी वृत्तीने लढा दिला व यातच गुरबचन सिंग यांना लागलेल्या शत्रूच्या दोन गोळ्यांमुळे त्यांना वीरगती प्राप्त झाली.

७) मेजर धनसिंह थापा: १९६२ मधील भारत चीन युध्दादरम्यान सिरीजैप येथे दाखविलेल्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.

८) सूबेदार जोगिंदर सिंह: १९६२ मधील भारत चीन युध्दादरम्यान अत्यंत शौर्याने चिनी सैन्याचा प्रतिकार केला व या दरम्यानच ते शहिद झाले.

९) मेजर शैतान सिंह: मेजर शैतान सिंह यांनी १९६२ च्या भारत-चीन युद्धात दरम्यान चुशुल येथे चिनी सैन्याचा अत्यंत नेटाने प्रतिकार केला व यातच त्यांना वीरगती प्राप्त झाली.

१०) अब्दुल हमीद मसऊदी: कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल मसऊदी यांनी १९६५ च्या भारत-पाक हल्ल्यामध्ये उल्लेखनीय शौर्याचे प्रदर्शन करीत पाकिस्तानी सैन्याला धूळ चारली व या दरम्यानच त्यांच्या जीपवर गोळा पडून ते घायाळ झाले व त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते शहिद झाले.

११) लेफ्टनंट कर्नल ए. बी. तारापोर: १६ सप्टेंबर १९६५ रोजी भारत-पाक युध्दादरम्यान अद्वितीय साहसाचे प्रदर्शन करीत लेफ्टनंट कर्नल तारापोर यांना वीरमरण प्राप्त झाले.

१२) लान्स नाईक अल्बर्ट एक्का: लान्स नायक अल्बर्ट एक्का या भारतीय लष्कर मधील जवानाला १९७१ च्या भारत-पाक युध्दादरम्यान हीली येथील युद्धामध्ये पाकिस्तानी शत्रूशी सामना करताना वीरमरण प्राप्त झाले.

१३) फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंह: फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंह यांना १४ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या हवाई हल्ला परतवून लावताना वीरमरण आले.

१४) लेफ्टनंट अरुण खेतरपाल: लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांना १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान वयाच्या एकविसाव्या वर्षी वीरमरण प्राप्त झाले.

१५) मेजर होशियार सिंह: मेजर होशियार सिंग यांना १९७१ च्या भारत-पाक युद्धात दरम्यान जर्पाल या ठिकाणी दाखविलेल्या अभूतपूर्व शौर्यासाठी १९७२ मध्ये परमवीर चक्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

१६) नायब सुभेदार बन्ना सिंह: १९८७ मध्ये पाक सैन्याने सियाचीन येथे भारतीय हद्दीमध्ये उभारलेली कायदे चौकी ताब्यात घेण्यास नायब सुभेदार बाना सिंग यांनी धाडसी वृत्तीने दाखविलेल्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र या सन्मानाने गौरविण्यात आले.

१७) मेजर रामस्वामी परमेश्वरन: १९८७ मध्ये श्रीलंकामध्ये २५ नोव्हेंबर रोजी झालेला आतंकवादी हल्ला हाणून पाडताना मेजर रामस्वामी परमेश्वरन यांना वीरमरण आले.

१८) लेफ्टनंट मनोज कुमार पांडे: १९९९च्या कारगिल युद्ध मध्ये खालूबार मोर्चा यशस्वी करताना लेफ्टनंट मनोज कुमार पांडे यांनी असाधारण शौर्याचे प्रदर्शन करीत स्वतःच्या प्राणांची आहुती दिली होती.

१९) ग्रेनेडिअर योगेंद्रसिंह यादव: ४ जुलै १९९९रोजी कारगिल युद्धादरम्यान टायगर हिलवरील बंकर्स ताब्यात घेताना ग्रेनेडियर योगेंद्रसिंग यादव यांनी शत्रूसमोर असाधारण साहस आणि शौर्याचे प्रदर्शन केले.

२०) सुभेदार संजय कुमार: १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान पॉईंट फ्लॅट टॉप काबीज करताना संजय कुमार यांनी पाकिस्तानी शत्रूचा अत्यंत साहसाने प्रतिकार केला व विजय भारताकडे खेचून आणला. यासाठी त्यांना परमवीर चक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

२१) कॅप्टन विक्रम बत्रा: १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान दाखवलेल्या अभूतपूर्व शौर्यासाठी कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘आयएनएएन ३७०’ समूहातील २१ निर्मनुष्य बेटांना आता परमवीर चक्र प्राप्त सैनिकांची नावे देण्यात आली आहेत.

भारतमातेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे.

भारत माता की जय ..

https://marathivishwakosh.org/tag/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87/

Back to top button