NewsRSSकोकण प्रान्त

डोंबिवलीतील प्रसिद्धिपरान्मुख स्वयंसेवक श्री गजानन माने यांना पद्मश्री पुरस्कार

प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्मपुरस्कार जाहीर झाले. या पुरस्कारांमध्ये एक नाव श्री गजानन माने (gajanan mane) यांचे आहे. गजानन राव माने हे डोंबिवलीतील छत्रपती व्यवसायी शाखेचे स्वयंसेवक आहेत.

डोंबिवली(dombivli) आणि कल्याण(kalyan) यामध्ये असलेल्या कचोरे या गावात असलेल्या कुष्ठरोग वसाहती मध्ये जाऊन त्यांची सेवा करणे त्याचप्रमाणे त्या सर्व बांधवांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना स्वाभिमानाने जगण्यासाठी रोजगार निर्मिती करणे असे काम श्री गजानन राव माने सुमारे तीस वर्षे अव्याहतपणे करत आहेत. कुष्ठरोग हा एक मानवी जीवनाला प्राप्त झालेला एक शाप आहे आणि त्या मध्ये समाजाचा अशा दुर्दैवी व्यक्तींच्या बरोबरचा व्यवहार हा आणखीच वेदनादायक आहे. एखादी व्यक्ती जेव्हा कुष्ठरोग झालेल्या दुर्दैवी जीवांची सेवा करणे हेच आपले जीवनकार्य समजून झोकून देते तेव्हा ती व्यक्ती निश्चितच पुरस्कार योग्य असते किंबहुना अशा व्यक्तीला मिळालेला पुरस्कार त्या पुरस्काराची उंची वाढवतो .

संत तुकाराम (sant tukaram) महाराजांच्या ओवीत म्हंटले आहे,जे का रंजले ,गांजले ,त्यासी म्हणे जो आपुले , तोचि साधू ओळखावा , देव तेथेचि जाणावा ! दुर्दैवाने साधू कोण आणि सैतान कोण हे ओळखणारी दृष्टी राज्यकर्ते आणि समाज या दोघांच्यात नव्हती ! म्हणून स्वातंत्र्यानंतर बहुतांश वेळा साधू अपमानित होत राहिले आणि सैतान गौरवांकीत ! पण जेव्हा गजानन माने यांच्यासारख्याचा गौरव होतो तेव्हा आम्ही चूक दुरुस्त करायला लागलो आहोत याची सुखद जाणीव होते !

‘गजानन माने ‘ नावाचा साधू डोंबिवली येथे निवासी असतो.नाविक सेनेतील नोकरी संपल्यावर लोक पुढे आर्थिक लाभासाठी नोकरी , व्यवसाय शोधतात यांनी सेवेचा मार्ग स्वीकारला.त्यासाठी त्यांनी कुष्ठरोगी समाज आपला मानला ! उपचारापासून ते पुनर्वसना पर्यंत सर्व प्रकारची सेवा ते देतात आणि यातून एक सेवेचा प्रकल्प उभा राहतो ! अर्थात यामागे त्यांना प्रेरणा मिळते ती त्यांच्या रोजच्या संघस्थानावरील प्रार्थनेच्या संस्कारातून !

साऱ्या डोंबिवलीला गजानन काका किंवा माने काका म्हणून परिचित असलेले हे व्यक्तिमत्व ! छत्रपती व्यवसायी शाखेचे नियमित स्वयंसेवक ! डोंबिवलीत रस्त्यात भीक मागणारे कुष्ठरोगी हे भीक न मागता त्यांच्या वसाहतीत स्वाभिमानाने जगत आहेत ते माने काका यांच्या प्रयत्नातून ! मेणबत्त्या , पणत्या अशा छोट्या उद्योगातून त्यांना स्वाभिमानाने काकांनी उभे केले . त्यांच्याच प्रयत्नातून महाराष्ट्रातील पाहिले कुष्ठरोगी हॉस्पिटल डोंबिवली येथे उभे राहिले आहे .

पत्री पुलाजवळ असणारी कुष्ठरोगी बंधूंच्या हनुमान नगर ही वस्ती त्यांनी आपले कार्यक्षेत्र निवडले . भीक मागून मिळणारा पैसा आणि स्वकष्टातून मिळणारा पैसा यात असणारे स्वाभिमानाचे अंतर श्री गजानन काकानी जेव्हा या पीडित बंधूंना समजावून सांगितले तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या आत्मसन्मानाची ओळख झाली .शाळा ,दवाखाना याची व्यव्यस्था वस्तीत करून त्यातून रोजगार निर्मिती हा प्रयोग करताना शिक्षण,आरोग्य,रोजगार या त्रिसूत्रीत हे सेवाकार्य बांधले !

प्रकल्पाला भेट देणाऱ्यांना कुठलीही आर्थिक मदत मागितली जात नाही आणि दिली तर स्वीकारली जात नाही हे या प्रकल्पाचे गुण वैशिट्य होय ! जी काही मदत घेतली जाते ती वस्तुरूपात !

या सगळ्या प्रकल्पाची एक समिती तयार झाली आहे आणि त्यात सगळे प्रामुख्याने तेथिलच लोक आहेत स्वतः गजाननराव माने काका हे बाजूला राहून फक्त सल्लागाराची भूमिका बजावतात ! स्वतःभोवतीच नव्हे तर हळू हळू खानदानी प्रकल्प उभे राहिलेले आम्ही बघतो . पण स्वतः उभे करून त्यात अलिप्त होणे हे तपस्वी माणसाची स्थितप्रज्ञता माने काकांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच ओळख निर्माण करतात !

केवळ हेच नाही तरुणांना नौदलात भरती होण्यासाठी प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्याचे महत्वपूर्ण कार्य काका करतात ! आणि हे काम करताना कुठलाही अभिनिवेश किंवा सामाजिक कामाचा गवगवा करत नाहीत .

स्वयंसेवक(RSS) आज उभ्या राहणाऱ्या फॅशनेबल सामाजिक उद्योगासारखा प्रकल्प वाढवत नाही तर प्रसिद्धी पासून दूर राहत अनामिक बनून काम करत राहतो त्यामुळेच अनेक वेळा त्याची किंवा त्या कार्याची दखल घ्यावी असे कुणाला वाटत नाही ! नव्या सरकारच्या बदलत्या दृष्टिकोनातून अनेक असे सामाजिक कार्यकर्ते प्रकाशात येत आहेत ! श्री गजानन माने हे त्यापैकीच एक !

एरव्ही संघावर टीका करण्याची कुठलीही संधी न सोडणारे राजकारणी आणि माध्यम कर्मी हे श्री गजानन माने यांच्या सारख्या असंख्य स्वयंसेवकांची आता तरी दखल घेतील ? अर्थात त्यांच्यासारखे स्वयंसेवक पुरस्कारासाठी काम करत नसतात , दखल घ्यावी म्हणून प्रसिद्धी चा हव्यास धरत नसतात !

संघ(RSS) ही जीवन समृद्ध करणारी प्रेरणा आहे ! सेवा है यज्ञ कुंड , समिधा सम हम जले ! हा संघस्थानावरील संस्कार आहे . श्री गजानन माने यांच्यासारखे स्वयंसेवक त्या संस्काराचे मूर्त रूप आहेत !

तिरस्कारातून पुरस्काराचा हा प्रवास एक दिवसाचा किंवा एक वर्षाचा नाही तर ९७ वर्षांचा आहे आणि त्यातील श्री गजानन माने हे एक ध्येयवेडे प्रवासी आहेत .

त्यांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा !

लेखक :- रवींद्र मुळे (नगर) .

Back to top button