CultureNewsSpecial Day

मेरा रंग दे बसंती चोला
माई मेरा रंग दे बसंती चोला…

२३ मार्च… भगतसिंग राजगुरू सुखदेव बलिदान दिन आणि पाकिस्तान डे…

भारताला स्वतंत्र(Indian independence) होऊन ७५ वर्षे झाली, हिंदुस्तान स्वतंत्र व्हावा म्हणून अगणित वीरांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली, ब्रिटिशांनी केलेले अनन्वित अत्याचार सोसले. शालेय अभ्यासक्रमात सर्व विद्यार्थ्यांना हा इतिहास शिकवला जातो, आज असा एक ही भारतीय शोधून सापडणार नाही ज्याला भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव हे क्रांतिकारक माहित नसतील. २३ मार्च १९३१ रोजी ब्रिटिश सरकारने भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिली. पण ब्रिटिश सरकारने भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव (bhagat singh rajguru sukhdev) यांना फाशी का दिली? या घटने मागचे विविध पैलू आज आपण समजून घेणार आहोत.

भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी का दिली हे समजून घेण्याआधी, या तिन्ही क्रांतिकारकांची पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी.

भगत सिंह यांच्या घराण्यात स्वातंत्र्यलढ्याचा वारसा होता. भगत सिंह यांचे आजोबा अर्जुन सिंह व त्यांची तीन मुलं किशन सिंह, अजित सिंह, स्वर्ण सिंह हे स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. किशन सिंह व विद्यावती देवी यांच्या पोटी भगतसिंह यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी पंजाबच्या लायलपूर जिल्ह्यात बंगा इथे झाला. दुर्दैवाने आज हे बंगा गाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मध्ये आहे.

सावरकरांचा प्रसिद्ध ग्रंथ ‘दि इंडियन वॉर ऑफ इंडिपेन्डेन्स – १८५७’ भगत सिंहांना तोंडपाठ होता. कानपूरला आल्यावर ‘बलवंत सिंह’ या नावाने त्यांनी अनेक लेख लिहिले. जालियनवाला बाग हत्याकांडाचा गंभीर परिणाम भगत सिंह यांचावर झाला.

राजगुरू यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू असे आहे. राजगुरू यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील २४ ऑगस्ट १९०८ रोजी राजगुरूनगर इथे झाला. वयाच्या १५ व्या वर्षी राजगुरू यांनी घर सोडले व बनारसला वझे शास्त्री यांच्याकडे संस्कृत शिकण्यास सुरुवात केली. आपण पंडित व्हावं अशी राजगुरू यांची मनीषा होती. पुढे संस्कृत शिक्षण संपल्यानंतर ते तर्कतीर्थ झाले. अभ्यासासोबत व्यायामाची त्यांना भरपुर आवड होती. राजगुरू हे उत्तम मराठी कविता करीत. इंग्रजी, कन्नड, उर्दू, हिंदी, मल्याळी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. सुरुवाती पासून राजगुरू यांचा कल हा अध्यात्माकडे होता. राजकारणात सक्रिय सहभाग घेतल्यानंतर त्यांचा संबंध चंद्रशेखर आझाद(chandra shekhar azad) , भगतसिंग, सुखदेव, इत्यादी क्रांतिकारींशी आला व तिथूनच त्यांच्या क्रांतिकार्याला सुरुवात झाली.

४ फेब्रुवारी १९२२ रोजी असहकार चळवळी दरम्यान उत्तर प्रदेश मधील चोरी-चौरा इथे चळवळीला हिंसक वळण लागलं व यात जो हिंसाचार झाला त्यात २२ पोलीस आणि ३ नागरिक दगावले. असहकार चळवळी दरम्यान हिंसा झाल्याने महात्मा गांधी यांनी असहकार आंदोलन मागे घेतले. गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतल्यामुळे भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल(ramprasad bismil) हे तरुण संतप्त झाले व सशस्त्र क्रांतीकडे वळले. या नंतर भगत सिंह हे चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये सामील झाले.

PUNJAB KESARI

३० ऑक्टोबर १९२८ रोजी सायमन कमिशनच्या विरोधात लाहोरमध्ये रॅली काढण्यात आली, यामध्ये पंजाब पोलिस अधीक्षक जेम्स ए. स्कॉट यांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये लाला लजपत राय गंभीर जखमी झाले व १७ नोव्हेंबर १९२८ रोजी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांनी लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला घेण्याची अर्थात जेम्स ए. स्कॉटच्या खुनाची योजना आखण्याची शपथ घेतली. १७ डिसेंबर १९२८ रोजी हे तिघेही योजनेनुसार लाहोरमधील पोलिस मुख्यालयाबाहेर पोहोचले. स्कॉटच्या जागी सहाय्यक पोलिस अधीक्षक जॉन पी सॉंडर्स बाहेर आले. हेच स्कॉट आहेत असे समजून भगत सिंह आणि राजगुरुंनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. भगत सिंह आणि राजगुरू या दोघांनीही साँडर्स यांची हत्या केली, त्यावेळी शिपाई चानन सिंग भगत सिंह यांना पकडण्याच्या अगदी जवळ आले होते, पण त्यावेळी तिथे हजर असलेल्या चंद्रशेखर आझाद यांनी त्यांनाही ठार केले.

भगत सिंह यांना लाहोर सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली असली तरी तिथून ४०० किमी अंतरावर असलेल्या दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये त्यांना अटक झाली. दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये ‘ट्रेड डिस्प्युट बिल’ आणि ‘पब्लिक सेफ्टी बिल’ यावर इथे चर्चा सुरु होती. ‘ट्रेड डिस्प्युट बिल’ अंतर्गत कामगारांच्या संपावर बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर ‘पब्लिक सेफ्टी बिल’च्या माध्यमातून ब्रिटिश सरकारकडून संशयितांना कोणत्याही खटल्याशिवाय कोठडीत ठेवण्यात येऊ शकत होते. भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त ८ एप्रिल १९२९ रोजी १२ वाजण्याच्या सुमारास सभागृहाच्या रिकाम्या जागेत २ बॉम्बस्फोट केले. दिल्ली विधानसभेत बॉम्बस्फोटानंतर फेकल्या गेलेल्या कागदांमध्ये असे लिहिले होते की, ‘बधिरांना ऐकण्यासाठी मोठ्या धमक्यांची गरज असते.’

Bhagat Singh and Batukeshwar Dutt threw bombs at the Central Legislative Assembly

१२ जून १९२९ रोजी भगतसिंग यांना विधानसभा बॉम्बस्फोटासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. भगतसिंग यांनी विधानसभेत ज्या बंदुकीसह शरणागती पत्करली तीच बंदूक साँडर्सच्या हत्येसाठी वापरली गेली होती. या प्रकरणी भगत सिंह यांना लाहोरमधील मियांवली तुरुंगात हलवण्यात आले होते. सध्या या कारागृहाला कोट लखपत जेल म्हणून ओळखले जाते. लाहोर तुरुंगात पोहोचताच भगतसिंग यांनी स्वत:ला राजकीय कैदी समजून वर्तमानपत्र आणि पुस्तके देण्याची मागणी सुरू केली. ही मागणी मान्य न झाल्यामुळे १५ जून ते ५ ऑक्टोबर १९२९, भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तुरुंगात ११२ दिवसांचे उपोषण केले.

सॉंडर्स खून खटल्याचा खटला १० जुलै रोजी सुरू झाला आणि भगत, राजगुरू आणि सुखदेव यांच्यासह १४ जणांना प्रमुख आरोपी म्हणून नाव देण्यात आले. ७ ऑक्टोबर १९२९ रोजी भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तुरुंगाची मागील भिंत तोडून त्याच मार्गाने एक ट्रक तुरुंगात आणण्यात आला आणि अत्यंत अपमानास्पद पद्धतीने ते मृतदेह एखाद्या सामनाप्रमाणे टाकण्यात आले. अंत्यसंस्कार रावीच्या काठावर करायचे होते, पण रावीत पाणी कमी असल्याने सतलजच्या काठावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली. यामुळे इंग्रजांनी अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सोडून पळ काढला.

ब्रिटिश सरकार भगत सिंह यांच्या फाशीवर ठाम का होते?…

भगत सिंह यांच्या विरोधात प्रचंड नाराजी सिविल सर्विसेस ऑफिसर्स मध्ये होती. पंजाब प्रांताच्या गवर्नरने भगत सिंहांना माफी दिल्यास राजीनामा देण्याची धमकी दिली होती. कारण भगत सिंहांना फाशी सॉंडर्सच्या हत्येच्या खटल्यात झाली होती. युरोपियन आय.सी.एस केडर फाशीचे समर्थक होते. जर फाशी रद्द झाली असती तर युरोपियन आय.सी.एस केडर नाराज झाली असती आणि राज्यकारभाराच्या दृष्टीने ब्रिटिशांना युरोपियन आय.सी.एस केडर ची नाराजी परवडणारी नव्हती. ब्रिटिशांना ही भीती ही होती कि जर फाशी रद्द झाली तर भविष्यात कोणताही इंग्रज युवक ब्रिटिश वसाहतीतील नोकरी साठी तयार होणार नाहीत. या सर्व कारणास्तव भगत सिंहांना माफी मिळणे कठीण गोष्ट होती. भगत सिंहांना माफी मिळाली असती तर काही अटी नक्कीच लादल्या गेल्या असत्या. कारण सरकार माफी देताना अशा अटीवरच माफी देत असे. भगत सिंह यांचे एकंदर क्रांतिकारी विचार पाहता आणि स्वाभिमानी स्वभाव पाहता भगत सिंह यांनी या अटीचे पालन केले असते असे आपण ठामपणे म्हणून शकत नाही आणि अटी न पाळणाऱ्या भगत सिंह यांना माफी मिळणे देखील अशक्य होते.

भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली त्यामुळेच भारतात २३ मार्च हा “बलिदान दिन” म्हणून साजरा केला जातो.

पण तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का कि २३ मार्च रोजी अजून एक महत्वाची घटना घडली होती. बलिदान दिनानंतर ९ वर्षांनी, २३ मार्च १९४० रोजी, त्याच रावी नदीच्या त्याच लाहोर शहरात मुस्लिम लीगने अखंड हिंदुस्तानची संकल्पना नाकारून; “पाकिस्तान” या शब्दाचा उल्लेख न करता मुस्लिमांसाठी स्वतंत्र भूमी मागण्याचा ठराव मंजूर केला होता. शेवटी १४ ऑगस्ट १९४७ रोजी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हा देश अस्तित्वात आला. २३ मार्च १९४० च्या लाहोर ठरावाच्या स्मरणार्थ पाकिस्तानात दरवर्षी राष्ट्रीय सणाच्या स्वरूपात “पाकिस्तान डे” साजरा केला जातो.

पाकिस्तान डे च्या दिवशी पाकिस्तानात इस्लामाबाद मध्ये पाकिस्तानी लष्कराचे संचलन होते, ज्याला परदेशी पाहुणे उपस्थित असतात, पण सध्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हा देश आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि याच आर्थिक संकटामुळे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानला पाकिस्तान डे हा प्रतीकात्मक रूपात साजरा करावा लागत आहे. आता प्रतीकात्मक रूपात पाकिस्तान डे साजरा करणार म्हणजे नेमका काय करणार? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या वर्षी पाकिस्तान डे निमित्त पाकिस्तानी लष्कर हे प्रेसिडेंट हाऊसच्या लॉन मध्ये संचलन करणार आहे आणि या कार्यक्रमाला कोणताही परदेशी पाहुणा आमंत्रित केलेला नाही.

जेव्हा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान अस्तित्वात आला त्यावेळी त्यांच्याकडे कराची हेच एकमेव समृद्ध शहर होते. अशी मान्यता आहे की कराची हे एकमेव मोठे शहर असल्याने फाळणीच्या वेळी कायदे आजम मुहम्मद अली जिन्ना यांनी लाहोर शहराचा समावेश हा इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मध्ये करण्यात यावा असा लाडिक आग्रह धरला. भारताच्या नेतृत्वाने कायदे आजमचा हा लडिवाळ हट्ट लगेच पुरवला अशी आजही वदंता आहे.

आज भारताचे दुर्दैव हे आहे की भगत सिंह यांचा जन्म ज्या बंगा गावात झाला ते लायलपूर आणि जिथे त्यांना फाशी दिली गेली ते लाहोर ही दोन्ही ठिकाणं आज इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये आहेत. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी मुस्लिम लीगने वेगळ्या पाकिस्तानची चळवळ सुरु केली होती. मात्र सुरुवाती पासूनच काँग्रेसने मुस्लिम लीगच्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान चळवळीला विरोध केला होता. हा विरोध लक्षात घेऊन मुहम्मद अली जिन्ना( Muhammad Ali Jinnah) व त्यांच्या शिष्ट मंडळाने हा विषय १९४६ साली संयुक्त राष्ट्रात नेला, काँग्रेसने संयुक्त राष्ट्रातही या गोष्टीचा विरोध केला. अशावेळी सौदी अरब देशाचे राजपुत्र फैसल बिन अब्दुल अझीझ (Faisal bin Abdulaziz Al Saud) यांनी या पाकिस्तान चळवळीच्या वादात मध्यस्थी केली व पाकिस्तान चळवळीला संयुक्त राष्ट्रात अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला.

पुढे १९६५ व १९७१ च्या भारत-पाक युद्धात देखील सौदी अरबचे राजपुत्र फैसल बिन अब्दुल अझीझ यांनी पाकिस्तानची बाजू घेतली व या युद्धात सर्वोतपरी मदत केली. त्यांच्या या उपकाराची परतफेड करण्यासाठी सौदी अरबचे राजपुत्र फैसल बिन अब्दुल अझीझ यांच्या सन्मानार्थ इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष झुल्फिकार अली भुत्तो यांनी लायलपूर या जिल्ह्याचे नामांतर फैसलाबाद असे केले. सौदी अरेबिया कडून पाकिस्तानसाठी स्वस्तात किंवा जवळपास फुकटात क्रूड ऑइल मिळवणे हा देखील जुल्फिकार अली भुट्टोचा सुप्त हेतू होता.

ज्या भगत सिंह यांनी अखंड भारताच्या स्वातंत्र्यकरीता बलिदान दिले त्यांच्या जन्मस्थानाचे नामांतर करून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने त्यांचा अपमान केला. तसेच फाळणीच्या वेळी दुर्दैवाने पुण्यभूमी लाहोर ही आपल्या हातून निसटली. पण अजून ही आमचा हा विश्वास आहे की एक ना एक दिवस जे लाहोर आज आपल्याकडे नाही त्या लाहोरवर( lahore) आपला तिरंगा फडकलेला असेल.

भारतमातेच्या या वीर सुपुत्रांना बलिदान दिनानिमित्त कोटी कोटी वंदन..!!

https://www.facebook.com/VSKKokan/?ref=nf&hc_ref=ARSYUyqhDw-4OCrZF_xroSt9M0oA0xikxDjb8fEZamBWSfXsqdN36VX0b07WSRNaApA

Back to top button