News

चंद्रपुरातील “सागवान काष्ठ” वाढवणार राममंदिराची शोभा..

मर्यादापुरुषोत्तम श्री राम संबंध भारताचा आत्मा आहे. राम आणि कृष्ण भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आणि भारतीय जनतेचे मानबिंदू आहेत. प्रत्येकाच्या अंतःकरणात रामाचे नाव कोरलेले आहे.

आराध्य भगवान श्रीराम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर मंदिर निर्माणाचे कार्य वेगाने सुरू आहे. एक हजार वर्षे या मंदिराची वास्तू उभी राहावी, यासाठी वास्तूतज्ज्ञांच्या मदतीने इमारत उभारण्यात येत आहे. यासाठी मंदिराच्या महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, मुख्य मंदिर वास्तूतील इतर दरवाजांसाठी सर्वोत्तम सागवान लाकडाची गरज होती. मंदिर ट्रस्टने चंद्रपूरच्या सागवानाच्या नमुन्याची चाचणी घेतल्यावर हे काष्ठ सर्वोत्तम असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंदिर निर्माण समितीने मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या डेपोतून सागवान काष्ठ पुरवण्याची विनंती केली होती.सागवानाचे हे काष्ठ अयोध्येला रवाना होणार आहे. त्यापूर्वी त्याची विधिवत पूजा करून शोभायात्रा काढण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशहा डेपोतून श्रीराम मंदिरासाठी मिळणाऱ्या लाकडावर अभियंते आणि कलावंत नक्षीकाम करणार आहेत.

चंद्रपूर (Chandrapur) :-

चंद्रपूर (Chandrapur) जिल्हा हा देशातील घनदाट वने असलेला आणि खनिज संपत्तीने समृद्ध जिल्हा आहे. देशातील सर्वात जास्त वाघ याच जिल्ह्यात आहेत. रामायणकालीन सुप्रसिद्ध दंडकारण्यात वसलेल्या या जिल्ह्याला अगदी रामायण काळापासूनचा इतिहास आहे. त्यामुळेच नैसर्गिक साधनसंपत्तीसोबतच अतिशय समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरांचा वारसाही चंद्रपूरला लाभला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सापडणारे सागवान देशात सर्वोत्तम समजले जाते. दंडकारण्याचा भाग असलेल्या चंद्रपूरमधील सागवन काष्ठ अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या निर्माण कार्यासाठी वापरले जाणार आहे. हा ऐतिहासिक काष्ठ पूजन शोभायात्रा सोहळा ‘याची देही.. याची डोळा’ बघण्याकरीता रामभक्त हजारोंच्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते.

श्रीराम जय राम जय जय राम.. च्या गजरात भगव्या दिंड्या पताका व गुढी हातात घेऊन परंपरागत मंगल वेषात महिला, पुरुष, अबाल, वृद्ध असे सारेच या शोभायात्रेच्या सर्वात पुढे होते. महिलांनी देखील मंगल कलश डोक्यावर घेवून या काष्ठ पूजन शोभायात्रेची शोभा आणखीनच वाढविली. ह्रदयीराम, वचनीराम, स्मरणीराम घ्यावा, याच भावनेने जणू रामभक्त श्रीराम भक्तीत तल्लीन झाल्याचे चित्र यावेळी सर्वांच्या डोळ्यात भरले. त्यामुळे बल्लारपूर व चंद्रपूर नगरी ‘राममय’ झाली होती.

चंद्रपुरातील सागवानाचं वैशिष्ट काय?

  • सागवान लाकडावर पाऊस, ऊन, वारा, कीड यांचा प्रभाव होत नाही.
  • पाण्याच्या प्रादुर्भावामुळे ते फुगले तरी पुन्हा पूर्वस्थितीत येते.
  • सागवानात टेक्टॉनीन हा ऑइल कन्टेन्ट खूप जास्त आहे, त्यामुळे याला कीड लागत नाही आणि लाकडात खूप चमक असते.
  • राममंदिरासाठी निवडण्यात आलेली सागाची झाडं किमान ८० वर्षांची आहेत. त्यामुळे लाकडात ग्रेन्सची संख्या जास्त आहे, यामुळे लाकडाला विशिष्ट प्रकारचा ब्राऊन रंग येतो आणि हे लाकूड नक्षीकाम केल्यावर खूप सुंदर दिसतं.
  • हे सर्व लाकूड नॅचरल फॉरेस्टमधील असल्याने याला कीड लागत नाही आणि हे लाकूड खूप चिवट असत.

रामभक्तांच्या स्वप्नपूर्तीचा क्षण :-

अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या भव्य मंदिराला अनेक द्वार असणार आहेत. १००० वर्ष हे मंदिर जसेच्या तसे रहावे म्हणून लोखंड व सिमेंटचा वापर न करता. परंपरागत (लॉकिंग सिस्टिम) पद्धतीने मंदिर निर्माण कार्य सुरू आहे.या मंदिरातील विविध दारं आणि खांबांमध्ये वापरलं जाणारं लाकूड ही तेवढीच मजबूत असायला हवीत. म्हणून चंद्रपुरातील सर्वोत्कृष्ट लाकूड निवडलं गेलं आहे.श्रीरामचंद्रांचे पिता महाराज दशरथ यांच्या मातोश्री इंदूमती या विदर्भाच्या. त्यामुळे आजीच्या भूमीतून नातवाच्या मंदिर निर्माणासाठी सागवन काष्ठ जात असल्याचा हा ऐतिहासिक क्षण आहे.संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नाही तर देशातील रामभक्तांच्या स्वप्नपूर्तीचा क्षण आहे,

तब्बल २१०० कलावंत..

या शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आले, एकूण ४३ प्रकारच्या लोककला, रणवाद्य, योग मल्लखांब, दिंडी, लेझीम, आदिवासी कलाप्रकार, ढोलपथके, ध्वजपथके यांचे सादरीकरण या शोभायात्रेत करण्यात येणार आहे. यात कोकणातील दशावतार पासून गणगौर, तारपा, असे सर्वदूरचे कलाप्रकार असतील. स्थानिक १००० तर महाराष्ट्रभरातून ११००, असे एकूण २१०० कलाकार हे सादरीकरण करणार आहेत.

प्रत्येक चौकाचौकांत विविध कलांचे सादरीकरण करण्यात आले. शोभायात्रेत पूजन केलेल्या काष्ठांवर घराघरांतून पुष्पवृष्टी करण्यात आली. शोभायात्रा मार्ग रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गुढ्या तोरणे उभारण्यात आली होती. या शोभायात्रेत दिल्लीतील कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक संचलनात पारितोषिक प्राप्त महाराष्ट्राचा “नारीशक्ती – साडॆतीन शक्तिपीठे हा चित्ररथ आणि उत्तर प्रदेशचा प्रजासत्ताक दिन संचलनातील चित्ररथही सहभागी झाला होता.

एक कोटी श्रीराम नाम जप..

या काष्ठपूजन सोहळ्याच्या निमित्ताने चंद्रपुरातील घरोघरी दहा हजार श्रीराम जपाच्या वह्या वाटल्या असून एक कोटी श्रीराम नाम जपाचा संकल्प करण्यात आला आहे. काष्ठ पूजनात सहभागी होईन श्रीराम जन्मभूमी मंदिर उभारणीत खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केले आहे

बल्लारपूर व चंद्रपूर अशा दोन टप्प्यात ही काष्ठ पूजन शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान सर्वप्रथम सायंकाळी ५ वाजता प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या काष्ठपूजन व शोभायात्रा समितीचे चंद्रपूरचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बल्लारशाह येथील वनविकास महामंडळाच्या लाकूड डेपोमध्ये पुरातन राम व लक्ष्मण काष्ठ जोडीचे वेदमंत्रोच्चारात आचार्य गिरीराज महाराज,ना.सुधीर मुनगंटीवार तसेच याप्रसंगी उत्तरप्रदेशचे मंत्री योगेंद्र उपाध्याय,रामायण मालिकेतील भगवान रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल, सीतेची भूमिका साकारणाऱ्या दिपीका चिखलिया, लक्ष्मणची भूमिका साकारणारे सुनील लाहेरी यांनीही पूजन केले.

तिरुपती मंदिराने पाठवला प्रसाद :-

राम कार्यात आपला देखील खारीचा वाटा असावा असे प्रत्येकालाच वाटते म्हणूनच तिरुपती येथील बालाजी मंदिराने १५ हजार मंदिरांचे प्रसाद लाडू भाविकांसाठी पाठविले आहेत. तिरुपती देवस्थानाला आपण सागवन काष्ठ अयोध्येच्या राम मंदिर निर्माणासाठी पाठवत असल्याचे कळविले होते. त्यानंतर त्यांनी सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रसाद पाठवित असल्याचे सांगितले, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

‘राम हा भारताचा धार्मिक व राजकीय मानबिंदू आहे त्याचप्रमाणे हिंदू समाजाला एकत्र बांधून ठेवण्याची ताकद असलेले सूत्र आहे’ हे वास्तव सर्व मुस्लीम आक्रमक जाणून होते. ‘भारतीय समाजाचा हा मानबिंदू नष्ट केल्याशिवाय आपले राजकीय वर्चस्व खऱ्या अर्थाने प्रस्थापित होणार नाही’ ह्या मानसिकतेतून बाबर ते औरंगजेबापर्यंतच्या मुघल राज्यकर्त्यांनी रामजन्मभूमी नष्ट करण्याचे प्रयत्न वारंवार केले. त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय समाजाने सतत कडवा संघर्ष केला.

अयोध्या व रामजन्मभूमी नव्या मंदिराच्या लोकार्पणानंतर पुन्हा एकदा सकल हिंदू समाजाला तसेच संपूर्ण विश्वाला प्रेरणा देणारं उर्जास्थान ठरेल यात शंका नाही.

आमचं श्रद्धास्थान ..

अयोध्येतील राममंदिर सकल हिंदू समाजाच्या आस्थेचं , अभिमानाचं, श्रद्धेचं तसेच हुंकाराचं प्रतीक आहे! असंख्य अत्याचारांनंतर, स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे, भारतमाता जागी होते आहे. आता ती केवळ जागीच झाली नसून ती उभी होते आहे आणि या विश्वाला आमचं भविष्य हे विजयाचं असेल, हेच ती दाखवून देत आहे. राष्ट्रीय चैतन्याची मुहूर्तमेढ पुन्हा रोवली जात आहे. आता मनी आस फक्त प्रभू श्रीरामांच्या दर्शनाची..

Back to top button