ChristianityNational SecurityNews

मणिपुर -म्यानमार- मिझोराम- ड्रग उत्पादन आणि बर्मीज सुपारी तस्करीचा मणिपूर अशांततेशी संबंध…

(०३-मणिपुरच्या अशांततेवरील लेखमालेतील तिसरा लेख )

मागील दोन लेखात आपण अनुक्रमे मणिपूरच्या (manipur) मैतेई आणि कुकी (कुकी- चिन- झो) समुदायांची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक पार्श्वभूमी काय आहे याचा आढावा घेतला. या लेखात आपण “म्यानमार- थायलंड-लाओस” या “गोल्डन ट्रँगल” मार्गे मणिपूर- मिझोराम (mizoram) या दोन राज्यातून येऊन अख्ख्या भारतात होणारी ड्रग्ज तस्करी; म्यानमारहुन भारतात होणारी सुपारी तस्करी आणि त्यातून निर्माण होणारा आणि विविध अतिरेकी संघटनांच्या हातात खेळणारा अफाट पैसा याचा मणिपूरच्या सध्याच्या अशांततेशी काय संबंध आहे याचा धावता आढावा घेऊ.

ड्रग व्यापाराचा “गोल्डन ट्रँगल”

मणिपूर मधील अफू लागवड आणि त्याचा “म्यानमार- थायलंड-लाओस” (Burma, , Laos, and Thailand) या ड्रग व्यापाराच्या “गोल्डन ट्रँगल”( Golden Triangle) सोबत म्यानमारच्या चिन, शान स्टेटमधल्या ‘ड्रग लॅब्स” च्या माध्यमातून येणारा संबंध…

म्यानमार-थायलंड-लाओस या भागाला ड्रग व्यापाराचा “गोल्डन ट्रँगल” म्हणतात. थायलंडचा (कु)प्रसिद्ध पर्यटन उद्योग आणि तिथे सेक्स आणि ड्रग टुरिझम साठी येणारे जगभरातील लाखो श्रीमंत पर्यटक यांची ड्रगची सर्व मागणी हा गोल्डन ट्रँगल पुरवतो. म्यानमार एकेकाळी यात आघाडीचा उत्पादक होता पण आँग सान सु की यांचं सरकार उलथवून म्यानमारी सैन्याने आपल्या हातात सत्ता घेतल्यावर गैर बौद्ध काचीन, शान, कारेन, चिन समुदायांवर म्यानमारी सैन्याने आपली जरब बसवायची सुरुवात केली. सतत युद्धरत असलेले हे पहाडी ख्रिश्चन ट्रायबल अफू- गांजा लागवड करून आपापल्या अतिरेकी संघटना चालवतात. याचा म्यानमारच्या सैन्याला मोठा त्रास होतो. सैनिकी शासन असल्याने मानवाधिकार वगैरे बाबींशी सैन्य सरकारला काहीही सोयरसुतक नाही. त्यामुळे बर्मीज सैन्याने पहाडी भागातल्या “ख्रिश्चन अफू व्यापाराकडे” आपली दृष्टी वळवली. इथली अफू- गांजा लागवड उध्वस्त करायला घेतल्यावर या ड्रग उत्पादक समूहांनी आपली नजर मणिपूरच्या डोंगराळ भागाकडे वळवली.

म्यानमार- मणिपूर सीमा आणि अफू- गांजा लागवड…

म्यानमार- मणिपूर यांच्यात ३९८ किमी लांबीची घनदाट जंगलांनी आणि उंच पहाडांनी भरलेली आंतरराष्ट्रीय सीमा आहे. बर्मीज सैन्याच्या उग्र अवतारामुळे पळालेले अफू व्यापारी मणिपूरच्या कुकी- नागा बेल्टमध्ये आले आणि इथे प्रचंड प्रमाणात असलेल्या संरक्षित वनांचा “रिझर्व्ह फॉरेस्ट” चा नायनाट करत तिथे अफू- गांजाची लागवड सुरु झाली. म्यानमारमधील तुटलेली ड्रग उत्पादनाची साखळी मणिपूरी पहाडी भागाच्या मदतीने परत एकदा स्थिरस्थावर झाली आणि इथे निर्माण झालेला अफू- गांजा म्यानमारच्या “शान स्टेट” मधल्या ड्रग लॅब्ज मध्ये प्रोसेसिंग होऊन त्याचं ‘हाय व्हॅल्यू फिनिश प्रॉडक्ट‘ बनून ते गोल्डन ट्रँगल मध्ये प्रवेश करू लागलं. मणिपूरच्या तांगखुल नागा आणि कुकी बेल्ट मध्ये तयार होणार काही कच्चा माल आणि “शान स्टेटमध्ये” तयार झालेला बराच पक्का माल आसाम मार्गे उर्वरित भारतात येतो. मणिपूरचे माजी पोलीस महासंचालक पी दौङेल यांनी हतबल होऊन मणिपूर हा ‘ड्रग गोल्डन ट्रँगल” चं पीडित राज्य आहे असा नुकताच उल्लेख केला होता तो याचमुळे!

मणिपूरच्या ड्रग लागवडीचा विस्तार…

१९९० च्या आसपास मणिपूरच्या उखरूल जिल्ह्यात आणि सेनापती जिल्ह्याच्या सदर हिल्सच्या सैकुल मध्ये अफू लागवड होत होती. तिचा व्याप बघता बघता वाढत गेला. सध्या वार्षिक ७९.७८% दराने अफू लागवड आणि उत्पादन वाढत असल्याचा मणिपूर सरकारचा अंदाज आहे. आता चंडेल, चुराचांदपूर, सेनापती जिल्ह्यात कौबुरु हिल्स, सदर हिल्स, तामेन्गलॉन्ग जिल्ह्याचा मोठा भाग अफू उत्पादनात आघाडीवर आहेत.

उखरूल आणि चंडेल जिल्ह्याच्या पलीकडे म्यानमारचा सागाईंग डिव्हिजन आहे आणि चुराचांदपूरच्या पलीकडे चिन स्टेट आहे, हा अखंड भाग आता अफू बेल्ट म्हणून उदयाला आलेला आहे. मागील लेखात आपण बघितलं ते याच “चिन स्टेटचा” मुख्यमंत्री सलाई लिआन लुआई, त्याच्या आँग सान सु की च्या पार्टीचे २४ आमदार अन्य १०,००० नागरिकांसह बर्मीज सैन्याच्या कारवाईला घाबरून २०२१ मध्ये शरणार्थी म्हणून मिझोराम मध्ये आले होते.
आसाम रायफल्सच्या म्हणण्याप्रमाणे २०२२ ला मिझोराम मध्ये ३५५ कोटी रुपयांचं ड्रग पकडलं होतं तोच आकडा वाढून २०२३ च्या पहिल्या ६ महिन्यात ६०३ कोटी झाला आहे.

अफू लागवडीत कुकींचा वाटा…

मणिपूरच्या पहाडी जातींपैकी कुकींचा अफू लागवडीत सगळ्यात मोठा वाटा आहे. २०१७-१८ मध्ये कुकी- चिन भागात २००१ एकर अफू लागवड झाली होती आणि तेव्हा मणिपूरच्या नागा भागात २२९ एकर अफू लागवड होती. ती वाढत जाऊन २०२०-२१ ला कुकी-चिन भागात ३८७१ एकर झाली आणि नागा भागात त्याच काळात ७६३ पर्यंत पोचली. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या सरकारने राखीव जंगले आणि सरकारी जंगले तोडून तिथे लावलेल्या अफू विरोधात मोठी कारवाई घेतल्यानंतर आता २०२२-२३ ला कुकी चिन भागात ८०४ एकर अफू लागवड शिल्लक आहे पण नागा भागात वाढून ३५० एकर पर्यंत पोचली आहे. गेल्या काही वर्षात मणिपूर सरकारच्या कारवाईत ५००० एकर्सच्या जवळपास अफू लागवड उध्वस्त करण्यात आली, वरील आकड्यात दिसणारी घट हि त्याचाच परिणाम आहे पण एकूण घट तेव्हढी नं दिसण्यामागे कारण, उद्धवस्त लागवड जागा बदलून नव्या भागात तयार होणं हे असू शकतं.

मणिपूरमध्ये अफू पासून उच्च प्रतीचे अन्य पदार्थ तयार करणाऱ्या १० फॅक्टरीज २०१९ पासून आजपर्यंत शोधून उध्वस्त करण्यात आल्या आणि त्यातून आत्तापर्यंत २५०० कोटींच्या आसपास हेरॉईन जब्त करण्यात आलं आहे. हे हेरॉईन मणिपूरहून उत्तर प्रदेश, बिहार आणि अगदी महाराष्ट्रापर्यंत पोचतं.

म्यानमारी सुपारीची भारतात होणारी तस्करी…

२४ जून २०२३ ला (मागच्या महिन्यात ) एन्फोर्समेंट डिरेक्टरेट- ईडी ने नागपूर (महाराष्ट्र) मधून असीम बावला नावाच्या एका व्यक्तीला अटक केली, याच्यावर म्यानमारची सुपारी भारतात आयात करून कस्टम्स ड्युटी चुकवल्याचा आरोप आहे. बावला आणि नागपूरचे अन्य अनेक व्यापारी, आसामच्या व्यापारी, वाहतूक कंपन्या, आसाम मधील गोडाऊनचे मालक अशी एक मोठी साखळी यात गुंतलेली आहे. नागपूर हुन आसामला मोठ्या प्रमाणात पैसे पाठवल्याचा तपास करताना सीबीआय, आयकर विभाग आणि डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स यांना सुरुवातीला या करोडोंची उलाढाल असलेल्या व्यापाराचा सुगावा लागला आणि मग यात तपास सुरु झाल्यावर एजन्सीज असीम बावला पर्यंत पोचल्या.

म्यानमारची सुपारी अत्यंत कमी दरात मिळते आणि ती प्रत्यक्ष जागेवर भारतीय सुपारीच्या १० तें २५% किंमतीत मिळते त्यामुळे ती इतक्या लांबून आणूनही स्वस्त पडते. आयात सुपारीवर विविध कर आकारून तिची किंमत भारतीय सुपारीच्या स्तरावर पोचते म्हणून ती चोरट्या मार्गाने अनधिकृतपणे मणिपूर- मिझोराम मार्गे आसामला येऊन तिथून सर्व भारतात पोचते.

अशा प्रकारची सुपारी आणताना या रॅकेट मधील व्यापारी खोटी बिले तयार करून ती सुपारी आसामची सुपारी म्हणून कागदपत्रे तयार करून तिची वाहतूक करतात. यातून भारत सरकारला दरवर्षी शेकडो कोटींच्या कर उत्पन्नाचं नुकसान झेलावं लागतं.

एका अंदाजानुसार भारतात जागोजागी मिळणारा निम्म्या पेक्षा जास्त गुटखा आणि पान मसाला हा म्यानमारची सुपारी वापरतो, याचा सटीक अंदाज लागू शकत नाही कारण हि सुपारी तस्करीच्या मार्गाने आणताना खोटी बिले आणि कागदपत्रे तयार केली जातात.

सुपारी-ड्रग स्मगलिंग मुळे झालेला आसाम- मिझोराम पोलीस संघर्ष!

२८ जुलै २०२१ ला आसामच्या हैलाकांदी आणि मिझोरामच्या कोलासीब जिल्ह्यांच्या सीमेवर आसाम पोलीस आणि मिझोराम पोलीस यांच्यात राज्याच्या सीमेवरून वाद झाला. आसाम पोलिसांनी आसामच्या जमिनीवर केलेली अतिक्रमणे हटवण्याची सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून मिझोराम पोलिसांनी आणि स्थानीय सशस्त्र तरुणांनी आसाम पोलिसांवर अत्याधुनिक शस्त्रांनी भीषण गोळीबार केला यात आसामचे ५ पोलीस ठार झाले आणि दोन डझन पोलीस जखमी झाले.

या घटनेच्या मागे आसाम पोलिसांची मिझोराम मार्गे होणाऱ्या सुपारी आणि ड्रग्ज तस्करीवर केली जाणारी कारवाई हे मुख्य कारण होतं. मिझोराम मार्गे येणारी म्यानमारची सुपारी आसामच्या सुपारीच्या दरावर वाईट परिणाम करते यामुळे आसाम सरकारने मिझोराम मार्गे होणारी तस्करी मोठ्या कारवाया करून बंद केली. ही तस्करी मिझोराम पोलीस, सरकारी अधिकारी आणि म्यानमारी “चिन” अतिरेकी गट यांच्या संगनमताने होते. यामुळे तस्करीविरुद्ध आसाम पोलिसांनी केलेल्या कारवाईला मिझोराम पोलिसांनी स्वतः उत्तर दिलं असं म्हणायला मोठा वाव आहे.

म्यानमारचे ख्रिश्चन अतिरेकी गट आणि ड्रग व्यापार आणि ड्रग कार्टेलचा मणिपूर सरकारवरील राग..

आपण या लेखमालेतील दुसऱ्या लेखात बघितलं त्याप्रमाणे म्यानमारच्या १७ प्रमुख ख्रिश्चन अतिरेकी संघटनांची एकत्रित सशस्त्र केडर्स संख्या १ लाख २५ हजाराच्या जवळपास आहे. “म्यानमार- थायलंड-लाओस” या ड्रग व्यापाराच्या “गोल्डन ट्रँगल” मध्ये म्यानमारचं “शान स्टेट” अफू प्रोसेसिंग हब म्हणून प्रसिद्ध आहे.आणि म्यानमारच्या चिन स्टेट आणि सागाईंग डिव्हिजन मणिपूरच्या हिल्स बेल्टला भौगोलिक दृष्ट्या जोडलेला असल्याने हा संपूर्ण भाग नव्या राजकीय स्थितीत नव्याने निर्माण झालेला अफू- गांजा उत्पादन बेल्ट म्हणून उदयाला आलेला आहे. या सर्व गटांचे सव्वा लाख सैनिक पोसायचे, त्यांना अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज ठेवायचं आणि त्यांची कुटुंब पोसायची यासाठी त्यांना लागणारा अफाट पैसा अफू लागवड आणि ड्रग प्रोसेसिंग मधून निर्माण होतो.

साहजिकच मणिपूरच्या एन बिरेन सिंग सरकारने याविरूद्ध आघाडी उघडल्यावर मणिपूर सरकारला अद्दल घडविण्यासाठी हे अब्जाधीश अतिरेकी गट एका संधीच्या शोधात होते, मैतेई हिंदूंना शेड्युल्ड ट्राईबच्या यादीत समाविष्ट करण्या संबंधी मणिपूर उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यावर त्यांना हवं असलेलं निमित्त मिळालं आणि त्यांनी आपला डाव साधला. हे निमित्त मिळालं नसतं तर अन्य काही कारण शोधून हा हिंसाचार घडवला गेला असता.

२०२१ ला आसाम पोलीस- मिझोराम पोलिस संघर्षानंतर ट्विटरवर #ShameOnAssam या हॅशटॅगसह ७६,१०० ट्विट करण्यात आली त्यापैकी ४३,३०० ट्विट्स म्हणजे एकूण ट्विटच्या ५६.८९% ट्विट्स एकट्या उत्तर अमेरिकेतून करण्यात आली, त्याचा काळात #ShameOnHimantaBiswa हा हॅशटॅग सुद्धा चालवला गेला त्याला मिळालेला प्रतिसाद सुद्धा अमेरिकेतून “निर्माण” झाला. कुकी-चिन-झो हे बॅप्टिस्ट- प्रेसबिटेरियन ख्रिश्चन आहेत आणि यांच्या सगळ्या कारवाया अमेरिकेतून चालतात.

मणिपूर हिंसाचार सुरु झाल्यानंतर “कुकी सॉलिडॅरिटी फोरम” सदृश काहीतरी संघटनेच्या नावाने जंगील लिम (कोरियन पासपोर्ट), थालका लुकाझ जेकब (पोलिश पासपोर्ट) आणि अँजेल मिशास (ऑस्ट्रेलियन पासपोर्ट) या तीन व्यक्ती काही अमेरिकन मणिपुरींना सोबत घेऊन १२ मे आणि १४ मे २०२३ ला भारतात येऊन मणिपूरमध्ये दाखल झाल्या. केंद्रीय एजन्सीनी त्यांची दाखल घेऊन योग्य कारवाई केली. यांची मणिपूर भेट चर्च प्रायोजित होती आणि इथली परिस्थिती लवकर पूर्वपदावर येऊन नये आणि बिघडलेल्या स्थितीचा आंतरराष्ट्रीय पटलावर भारत विरोधी प्रचारासाठी जास्तीत जास्त फायदा उठवून घ्यावा यासाठी त्यांनी काय केलं हे आपल्याला युरोपियन पार्लमेंट मध्ये पारित झालेल्या “मणिपूर रिझोल्युशन” वरून लक्षात येऊ शकतं.

यापुढील लेखात आपण मणिपूर धुमसत ठेवणाऱ्या अन्य अदृश्य शक्तींचा आढावा घेण्याचा प्रयत्न करू.

लेखक :- विनय जोशी

(ICRR Assam & North East)

https://www.icrr.in/Encyc/2023/7/17/Meitei-Kuki-Violence-Church-militant-groups-Manipur-violence-drug-opium-trade-aspects.html

Back to top button