National SecurityNaxalismNews

माओवाद्यांचा रडीचा डाव…आदिवासी जवानांचे PLGA (पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) ने केले अपहरण…

maovadi- peoples liberation guerrilla army

विजापूर जिल्ह्यात तैनात बस्तर फायटरचा जवान शंकर कुडियम याचे अपहरण केल्याचे माओवाद्यांच्या माड डिव्हिजन कमिटीच्या सेक्रेटरी अनिता यांनी प्रेस नोटच्या माध्यमातून जाहीर केले आहे. यामध्ये 29 सप्टेंबर 2023 रोजी माओवाद्यांच्या (maovadi) जंगल भागातील हिंसक कारवाया साठी असलेला गट म्हणजे PLGA (people’s liberation guerrilla army) ने शंकर कुड़ियम हा जवान त्याच्या मित्रासोबत उसपरी घाटावर फिरण्यासाठी गेला असता त्याचे अपहरण केले.

देशात कोरोनाच्या महामारी दरम्यानच्या कालावधीत मोठया प्रमाणात अनेक नक्षलवाद्यांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले होते.आज देशात केंद्र सरकार व विविध राज्यातील सरकारे यांच्या मार्फत नक्षलग्रस्त भागात रोजगारनिर्मिती व मोठ्या प्रमाणात होत असलेली विकास कामे तसेच पोलीसांनी केलेल्या माओवादी चळवळी विरुद्ध कडक कारवाई मुळे व नक्षलवाद्यांच्यासाठी प्रभावीपणे राबविण्यात येणाऱ्या आत्मसमर्पण योजने मुळे देशातील सर्व भागात माओवादी चळवळ प्रभावहीन होत असून माओवाद्यांचा खरा चेहरा गरीब आदिवासी समाजाच्या लक्षात आल्यामुळे आदिवासी तरुणांनी या चळवळीकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे.

मागच्या महिन्यात छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या अनेक घातपातातील मास्टर माईंड असलेला अत्यंत जहाल नक्षलवादी,प्रतिबंधित कम्युनिस्ट माओवादी (CPI-Maoist) पक्षाचा केंद्रीय समितीचा सदस्य, नक्षलवाद्यांच्या पश्चिम घाट समितीचा कमांडर विजय उर्फ संजय दीपक रावला त्यांच्या पत्नी सोबत अटक करण्यात मोठं यश मिळालं आहे.विजय उर्फ संजय दीपक रावच्या अटकेसाठी महाराष्ट्र सरकारसह विविध राज्यातील सरकारने त्याच्यावर दोन कोटींच्या वर बक्षिसे जाहीर केलेली होती.

यासर्व गोष्टीचा धसका घेऊन माओवाद्यांनी आपली नक्षलग्रस्त भागात अजूनही ताकत असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणजे बस्तर फायटर्स फोर्सचे जवान शंकर कुडि़यम यांचे केलेले अपहरण होय.बस्तर फायटर्स फोर्सची निर्मिती विशेषतः नक्षलविरोधी कारवायांसाठी करण्यात आली असून या दलातील जवानांना सामान्य प्रशिक्षणा व्यतिरिक्त तेलंगणाच्या ग्रेहाऊंड कमांडोसारखे उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येते.

ज्याप्रमाणे गडचिरोली जिल्हा पोलिस अंतर्गत नक्षलग्रस्त भागातील माओवाद्यांच्या विरोधात C-60 हे दल स्थानिक तरुणांच्या भारती मार्फत उभे करून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळी नाहीशा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.त्याचप्रमाणे छत्तीसगड राज्यात माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव असलेल्या नक्षलग्रस्त बस्तरमध्ये नक्षलविरोधी कारवाया करण्यासाठी विशेष दल म्हणून बस्तर फायटर्स फोर्स स्थापना करण्यात आली आहे. या विशेष दलाच्या भरती प्रक्रियेत आलेल्या अर्जांची संख्याच नक्षलवाद्यांना त्यांच्याच भाषेत धडा शिकविण्यासाठी तरुणांमध्ये प्रचंड उत्साह असलेला पुरावा आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या भारती मध्ये बस्तर फायटर्स फोर्सच्या कॉन्स्टेबल पदासाठी ५३ हजारांहून अधिक अर्ज आले होते.

बस्तर फायटर्स फोर्सच्या कॉन्स्टेबल पदाच्या भरतीला स्थगिती आदिवासी तरुणांचा मोठ्या संख्येने असलेला सहभाग पाहून छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या पश्चिम बस्तर विभाग समितीने प्रेस नोटच्या माध्यमातून या भरतीला विरोध दर्शविला होता.या विरोधाचे कारण त्यांची त्या भागातील मागच्या काही कालावधीत झालेली पिछेहाट दिसत आहे.

बस्तर विभागातील सातही जिल्ह्यांमध्ये 300-300 स्थानिक तरुणांची भरती करण्यात आली असून बस्तर विभागाच्या सर्व जिल्ह्याच्या भागातून तरुणांच्या भरतीमुळे नक्षल विरोधी अभियानासाठी पोलिसांना आता स्थानिक बळ मिळत आहे.याचे मुख्य कारण म्हणजे या भागातील स्थानिक तरुणांना बस्तरचे जल, जंगल आणि जमीनीची इत्यंभूत माहिती असल्यामुळे नक्षलवाद्यांमध्ये घबराट पसरली आहे.त्याचीच परिणती म्हणून बस्तर फायटर्स फोर्सच्या जवानांचे अपहरण करून धाक निर्माण करण्याचा प्रयत्न माओवाद्यांचा असल्याचे दिसून येते.

नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जात असलेल्या परिसरात होत असलेली विकास कामे,त्या भागातील सुरक्षितता आणि शांतता यासाठी जिल्ह्यातील स्थानिक तरुण-तरुणींना मोठ्या प्रमाणात शासकीय नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले जात असून स्थानिक युवक अनेक प्रकारच्या शासकीय नोकऱ्या मध्ये रुजू होऊन आपल्या भागाच्या विकासासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या अहिंसक संविधानिक मार्गाने आपले कर्तव्य बजावत आहेत. या भागात पोलिस व नक्षलवाद्यांच्या वेगवेगळ्या चकमकीत जखमी झालेल्या माओवाद्यांना वेळीच उपचार देऊन स्थानिक लोकांनी व जवानांनी माणुसकी दाखवली आहे.

माओवाद्यांनी आता तरी हा देशविरोधी व हिंसक मार्ग सोडून आपल्या ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्यासाठी देशाच्या विकासाचा मार्ग एकमेव म्हणजे संविधानिक अहिंसक मार्ग असून तोच मार्ग त्यांनी अंगिकारून आज देश जगात विकसित देश म्हणून पुढे येत आहे. विकसित भारत देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी प्रयत्न करावेत याची दखल भावी पिढी घेईल अन्यथा चुकीच्या पद्धतीने विदेशी शक्तीच्या इशाऱ्यावर काम करून गरीब आदिवासी लोकांचे बळी घेऊन विकासकामात अडथळा होण्याचा प्रयत्न केला तर…एकतर मिलिंद तेलतुंबडे (milind teltumbde) यांच्या सारखे मारले जाल किंवा संजय राव सारखे तरुंगात खितपत पडाल.

लेखक – अशोक तिडके (विवेक विचार मंच)

(tidkeashok2023@gmail.com)

Back to top button