ECONOMYInternationalNewsScience and TechnologyWorld

अनंत अंतराळातून दिसणार अक्षय भारताची ताकद..

khwada renewable energy park Kutch Gujrat located along the Indo- pak border

भगवान सूर्यनारायणाच्या आशीर्वादाने भारत जगाला दाखवणार आपली सौर पॉवर..

ॐ ध्येय सदा सवित्र मण्डल मध्यवर्ति।
नारायण सरसिजसन सन्निविष्टः।
केयुरवान मकरकुंडलवान किरीटी।
हारी हिरण्मय वपु:धृत शंखचक्रः।।

भक्तवत्सल सूर्यनारायणाच्या स्तुतीचा श्लोक सुरवातीस बघून आपणास नक्कीच आश्चर्य वाटले असणार, कारण देखील तसेच आहे. भारत-इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सीमेला लागूनच एक मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. हा एक असा भव्य प्रकल्प असेल,ज्याच्या यशाचे, गौरवाचे,कीर्तीचे संपूर्ण जग कौतुक करणार आहे. तीन वर्षांनंतर या अक्षय ऊर्जा प्रकल्पाची चमक,ख्याती आपल्याला संपूर्ण विश्वात पाहायला मिळणार आहे.

“खावडा अक्षय ऊर्जा उद्यान”..

कच्छचे रण भारताच्या गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील उत्तर तसेच पूर्वेस पसरलेला खारट दलदलीचा विराण प्रदेश आहे. याचा विस्तार २३,२०० चौरस किमी इतका प्रचंड आहे. कच्छचे रण हे भारतातील एकमेव पांढरे म्हणजेच मिठाचे वाळवंट आहे आणि जगातील सर्वात मोठ्या मिठाच्या वाळवंटांपैकी एक आहे.गुजरात राज्यातील भारताच्या पश्चिम भागात स्थित असलेले, हे कच्छचे रण हे दोन मुख्य भागांमध्ये विभागले गेले आहे जे ग्रेट रण आणि लिटल रण म्हणून ओळखले जाते.

प्रामुख्याने मिठाच्या दलदलीचे असलेले क्षेत्र भारत आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान सीमेच्या दरम्यानचे क्षेत्र विभाजित करते. पण आता हे दलदलीचे वाळवंट जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा प्रकल्पाचे साक्षीदार होणार आहे. येथे सौर ऊर्जा नव्हे तर पवन ऊर्जा प्रकल्प देखील उभारले जाणार आहेत. ते अंतराळातून दिसू शकतील इतके भव्य असणार आहे.शेजारील गावाच्या नावावरून ‘खावडा अक्षय ऊर्जा उद्यान’ असे या प्रकल्पाचे नामकरण करण्यात आले आहे.

सौर ऊर्जा आणि भारताचा दृढसंकल्प..

नुकत्याच दुबईत पार पडलेल्या COP- २८ (Conference of the Parties) मध्ये भारताने आपल्या अक्षय ऊर्जा संकल्पाचा पुनरुच्चार केला आहे. भारत आपले कार्बन उत्सर्जन २०७० पर्यत शून्यावर आणणार आहे. भारताने अक्षय ऊर्जेसाठी फार आधीपासूनच, काळाची पाऊले ओळखुन २०१५ साली फ्रान्सच्या सहकार्याने “International Solar Alliance” स्थापन केली आहे.इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये आजघडीला जवळपास १०३ सदस्य राष्ट्रे आहेत. यावरूनच आपल्याला भारताची सौर ऊर्जेप्रती असलेली कटिबद्धता,दृढसंकल्प दिसून येते.

‘खावडा अक्षय ऊर्जा प्रकल्पाचे’ काम युद्धपातळीवर सुरू…

भारत आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सीमेवर हा प्रकल्प तयार होत असलेल्या ठिकाणी सध्या सुमारे ५०० इंजिनियर्स कार्यरत आहेत. जवळपास ४ हजार कामगार अविश्रांत मेहनत करत आहेत.जवळपास ५००० सोलर पॅनल लावण्यात येणार आहेत. एपीच्या एका वृत्तानुसार, तुमची नजर जिथपर्यंत जाणार, तिथपर्यंत तुम्हाला हे पॅनल दिसतील. तसेच काही कामगार विंड टर्बाइनचा पाया तयार करण्यात व्यस्त आहेत. हा प्रकल्प ७२६ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला आहे,म्हणजेच आकाराने सिंगापूरच्या बरोबरीचा आहे. याची किंमत अंदाजे २.२६ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास २० हजार कोटी रुपये एवढी प्रचंड आहे.

खावडा अक्षय ऊर्जा प्रकल्पासाठी प्रकल्पासाठी कच्छचे रण निवडले गेले, कारण १२ महिने असलेला सूर्यप्रकाश आणि शहरी भागापासून कच्छचे रण खूप दूर आहे. सर्वात जवळील शहर कच्छच्या रणापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर आहे.कुठलीही उपजाऊ जमीन प्रकल्पासाठी पाहिजे असल्यास त्यास खूप मर्यादा आहेत. म्हणून कच्छचे रण हे या भव्य प्रकल्पासाठी उत्तम क्षेत्र आहे.

सुमारे २ कोटी घरे सौर ऊर्जेने उजळणार..

जेव्हा हे अक्षय ऊर्जा पार्क पूर्णपणे तयार होईल, तेव्हा ते दरवर्षी सुमारे ३० गिगावॅट वीज निर्माण करेल. म्हणजेच सुमारे २ कोटी भारतीयांची घरे सौर ऊर्जेने उजळणार असा संशोधकांचा अंदाज आहे. भारताने आपल्या ‘ग्रीन एनर्जी मिशन’ अंतर्गत देशात २०३० पर्यंत ५०० GW पर्यावरण पूरक, नवीकरणीय ऊर्जा क्षमता विकसित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हा संपूर्ण प्रकल्प ‘अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड’ द्वारे निर्मित केला जात आहे.

आत्मनिर्भर भारत..

१० वर्षांपूर्वी असे भव्य-दिव्य प्रकल्प आपल्याला स्वप्नवत वाटत होते.आपला विश्वास बसणार नाही पण जवळपास ८५ छोटे- मोठे सोलर पार्क नजीकच्या काळात भारतात तयार होत आहेत. अभिमानाची बाब म्हणजे या सोलर पार्कचे संपूर्ण तंत्रज्ञान देखील स्वदेशी आहे.

आपण जाणताच भारताला आपल्या ऊर्जेच्या गरजेसाठी मोठ्याप्रमाणात इतर देशांवर अवलंबून राहावे लागते.मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपल्याला खर्च करावे लागते. आज भारत जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा उपभोक्ता आहे. खनिज तेलाचा तिसरा सर्वात मोठा उपभोक्ता, तिसरा सर्वात मोठा LPG उपभोक्ता, चौथा सर्वात मोठा LNG आयातदार, चौथा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण करणारा देश आणि जगातली सर्वात मोठी चौथी वाहतुकीच्या साधनांची बाजारपेठ बनला आहे.म्हणूनच भारताने आत्मनिर्भर होणे ही आपल्या भविष्याची गरज आहे.

भगवान सूर्यनारायण समस्त मानवजातीला पुरून उरेल इतकी ऊर्जा (solar energy )दररोज देतात पण (नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे ) आमचीच झोळी फाटकी होती.परंतु राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेले सरकार आल्यानंतर परिस्थितीत आमूलाग्र बदल झालेला आपण पाहतोय.भारत देशाच्या विद्युत ऊर्जेच्या गरजा खूप जास्त आहेत; नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा वापर करून अतिरिक्त क्षमता निर्माण करण्यावर विद्यमान सरकारचा भर कौतुकास्पद आहे.

ऊर्जाक्षेत्रात काम करणाऱ्या Institute for Energy Economics and Financial Analysis (IEEFA) तसेच Centre for Research on Energy and Clean Air (CREA) संस्थांनी प्रसारित केलेल्या अहवालानुसार, सौरशक्तीद्वारे वीजनिर्मिती करून भारताने यंदाच्या आर्थिक वर्षात इंधनावरील खर्चात सुमारे ५० हजार कोटी रुपयांची, तसेच २८ कोटी टन कोळशाची बचत केली आहे.

आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे यात शंका नाहीं. परंतु आपला प्रचंड पैसा परकीय इंधन आयातीवर खर्च होतो.आम्ही जीवाश्म इंधन मोठ्या प्रमाणात आयात करतो, ज्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो. कारण, ते आपले चलन कमकुवत करते आणि प्रदूषणाचा एक प्रमुख स्रोत आहे. पेट्रोल असो की कोळसा आणि आता युरेनियम. सौदी,इराक, इराण,रशिया, कॅनडा,ऑस्ट्रेलिया … आदींचे “नखरे” आपल्याला भोगावे लागतात. यावर उपाय एकच आत्मनिर्भर भारत…

ग्रीन हायड्रोजन, बायोगॅस, इथेनॉल,मिथेन,जलविद्युत, पवनऊर्जा आणि सौरऊर्जा या उर्जेच्या अक्षय स्रोतांना महत्त्व देण्याच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था उभारण्यास, रुपया मजबूत करण्यास ,प्रदूषण कमी करण्यास आणि परिणामी हे सनातन राष्ट्र परम वैभवावर नेण्यास मदत होईल यात तिळमात्र शंका नाही.

शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की,

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

Back to top button