CultureOpinionRSSSpecial Day

द्रष्टे बाळासाहेब..

आज दिनांक ११ डिसेंबर ला संघाचे तृतीय सरसंघचालक श्रध्देय बाळासाहेब देवरस यांची जयंती. त्या निमित्ताने हा लेख –

बाळासाहेब देवरस (balasaheb deoras) हे संघाचे तिसरे सरसंघचालक. संघावरील तीनही बंदीचा अनुभव घेतलेले आणि त्यातील दोन बंदींना (प्रतिबंधांना) परिवार प्रमुख म्हणून सामोरे गेलेले एक मात्र सरसंघचालक. 81 वर्षाच्या आयुष्यात पहिली अकरा वर्ष सोडली तर 70 वर्षे सतत संघ कार्यात मग्न असलेले जीवन. हा 70 वर्षांचा प्रवास म्हणजे ‘संघ बढता जा रहा है…’ चा प्रत्यक्ष अनुभव.

6 जून 1973 ला बाळासाहेबांवर पूजनीय गुरुजींच्या पत्राद्वारे सरसंघचालक पदाचं दायित्व सोपवण्यात आलं. प्रकृतीच्या अनेक तक्रारी असूनही दिनांक 11 मार्च 1994 पर्यंत बाळासाहेबांनी ते पूर्ण ताकदीनिशी आणि सक्रियतेने पार पाडलं. हा 21 वर्षांचा सरसंघचालक पदाचा कालखंड देशासाठी अत्यंत उलथा-पालथीचा होता. 1975 ची आणीबाणी, संघावर घातलेली बंदी, त्यानंतर आलेलं जनता पक्षाचं राज्य, पुढे इंदिराजींचे पुनरागमन, त्यांची हत्या, पंजाबातील अशांत परिस्थिती, जनता दलाचे राज्य, आरक्षण विरोधाचा उद्रेक, राम जन्मभूमी आंदोलन, रथयात्रा, बाबरी ढाच्या चे पतन, संघावर बंदी न्यायालयाद्वारे संघावरील बंदी अवैधानिक घोषित.. अशी अनेक स्थित्यंतरं या काळात घडली. मात्र या सर्व परिस्थितीत सरसंघचालक म्हणून बाळासाहेबांची भूमिका आणि मार्गदर्शन अत्यंत सुस्पष्ट असं होतं. भविष्यात काय होऊ शकतं याचं व्यवस्थित चित्र त्यांनी उभारलं.

अर्थात याबाबतीतही बाळासाहेबांची वैचारिक स्पष्टता होती. सरसंघचालक हे असे एकट्याने काहीच ठरवत नाहीत. मात्र कार्यकर्त्यांच्या सामूहिक विचारांचं प्रतिनिधित्व म्हणजे सरसंघचालकांचं प्रतिपादन असतं. या संदर्भात सुधीर जोगळेकर यांनी आणीबाणीच्या काळातील येरवडा तुरुंगातील एक प्रसंग सांगितला आहे. 1975 साली बाळासाहेबांच्या वयाला 60 वर्ष पूर्ण झाली. संघ बंदीमुळे बाळासाहेब येरवडा कारागृहात होते. तेथेच स्वयंसेवकांनी एक छोटेखानी समारंभ आयोजित केला. पुण्याचे माजी महापौर आणि पुढे पुलोद सरकारात मंत्री झालेल्या समाजवादी पक्षाच्या भाई वैद्य यांचे भाषण या निमित्ताने झाले. “बाळासाहेबांनी आता संघाला वेगळी दिशा द्यावी” असा उल्लेख त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात केला.

हा संदर्भ घेऊन बाळासाहेब म्हणाले, “कोणत्याही संघटनेला एक व्यक्ती कधीही वेगळी दिशा देऊ शकत नाही. तो एक सामूहिक प्रयत्न असतो. जर एखादी व्यक्ती असा बदल करण्याचा आग्रह धरू लागली तर हुकूमशाही निर्माण होईल. संघाला हे अभिप्रेत नाही.”

पण याचबरोबर परिवार प्रमुख म्हणून अनेक ठिकाणी सल्ला देणं आणि मार्गदर्शन करणं आवश्यक होतं. बाळासाहेबांनी ते आवर्जून केलं.

ज्या परिस्थितीत बाळासाहेब सरसंघचालक झाले तो काळ हा देशासाठी अत्यंत अस्थिरतेचा होता. आधल्याच वर्षी, अर्थात 1972 साली, देशानं भयंकर दुष्काळाचा सामना केलेला होता. आर्थिक आघाडीवर चित्र चांगलं नव्हतं. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली होती. आणि त्याचबरोबर सर्वच पातळीवर भ्रष्टाचार ही फोफावला होता. समाजात प्रचंड असंतोष होता. अशा परिस्थितीत आपल्या वर्तुळाच्या बाहेर निघून संघाला सर्वसामान्य समाजाबरोबर ‘कनेक्ट’ निर्माण करणं आवश्यक होतं. बाळासाहेबांनी ते केलं. समाजाबरोबर जोडलं जाण्यासाठी ‘सेवा’ हा आयाम महत्त्वाचा आहे हे ओळखून त्या काळात संघाने सेवा प्रकल्पांवरती जोर दिला.

संघाच्या प्रारंभापासून, डॉक्टर हेडगेवारजींनी संघाच्या कामात सेवा कार्याचा समावेश केला होता. रामटेकच्या यात्रेत स्वयंसेवक म्हणून काम करण्यापासून ते पुढे फाळणीच्या काळात बंगालमध्ये वास्तुहारा समितीच्या माध्यमातून संघ जनसामान्यांच्या मदतीसाठी नेहमीच धावून गेला होता. ही कामं म्हणजे वेळप्रसंगी, अडीअडचणीला समाजाच्या मदतीसाठी धावून जाणं अशा प्रकारची होती. परंतु बाळासाहेबांनी या सेवा कार्याला एक स्थायी स्वरूप दिले. 8 एप्रिल 1979 ला दिल्लीत स्वयंसेवकांच्या भल्या मोठ्या एकत्रीकरणात बोलताना त्यांनी समाजातील उपेक्षित व्यक्तींसाठी प्रकल्प उभारायचे आवाहन केले. संघात या संबंधी विचार होतच होता. त्यानुसार 2 ऑक्टोबर 1979 ला ‘सेवा भारती’ या संस्थेची सुरुवात झाली.

1948 च्या संघबंदीनंतर संघातही बरीच वैचारिक उलथा पालथ झालेली होती. काही स्वयंसेवकांनी संघापासून वेगळे होऊन परंतु संघ प्रेरणेने सामाजिक प्रकल्प सुरू केले होते. यात म्हैसाळ प्रकल्पाचे मधुकरराव देवल, ज्ञानप्रबोधिनीची उभारणी करणारे आप्पा पेंडसे, लाखणी गावी शैक्षणिक संस्था काढलेले बापू लाखनीकर… अशा काहीशा दूर गेलेल्या स्वयंसेवकांना बाळासाहेबांनी जवळ केले. त्यांच्या प्रकल्पांना भेटी दिल्या. त्या प्रकल्पांना इतर संघ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या पाहिजेत याची चिंता केली. या प्रकल्पांना त्यांनी प्रोत्साहन दिले. कारण संघ कार्यकर्ता करत असलेले कोणतेही चांगले काम हे संघकार्यच आहे अशी बाळासाहेबांची स्पष्ट भूमिका होती.

1973-74 च्या काळात महाराष्ट्रातील वैचारिक जगात समाजवादी मंडळींचे प्राबल्य होते. ही मंडळी पूजनीय गुरुजींच्या नवाकाळ मधील एका मुलाखतीतील काही वाक्यांना घेऊन, ‘गुरुजी (म्हणजे अर्थातच संघ) हे चातुर्वर्ण्याचे पुरस्कर्ते आहेत. आणि संघाला जातीव्यवस्था मान्य आहे’. असा उद्घोष प्रत्येक मंचावरून करत होती. वस्तूतः हे पूर्णपणे चुकीचे आहे, असत्य आहे हे संघात गेलेला कोणीही सांगू शकला असता. अगदी पहिल्या दिवसापासून संघात जातीव्यवस्थेला थारा नाही हेच सत्य आहे.

या पार्श्वभूमीवर सरसंघचालक झाल्याच्या दुसऱ्याच वर्षी, 1974 ला, वसंत व्याख्यानमालेत भाषण करण्याचे निमंत्रण बाळासाहेबांना मिळाले. ‘सामाजिक समता व हिंदू संघटन’ हा विषय होता. बाळासाहेबांनी हे निमंत्रण स्वीकारले. त्यांनी त्यांचे भाषण तयार केले. त्यासंबंधी इतर संघ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आणि बुधवार 8 मे 1974 ला त्यांचे ते ऐतिहासिक भाषण झाले.

या भाषणात बाळासाहेबांनी अत्यंत स्पष्टपणे आणि नि:संदिग्ध पणे काही गोष्टी मांडल्या. जातीव्यवस्थेसंबंधी त्यांनी म्हटलं, “समाज धारणेसाठी जातीव्यवस्था किंवा वर्णव्यवस्था म्हणतात ती आज अस्तित्वातच नाही. आज जे काही आहे ती अव्यवस्था आहे. ती विकृती आहे. समाज धारणेशी तिचा काहीही संबंध राहिलेला नाही. अस्पृश्यता ही चूक आहे. It must go lock, stock and barrel ! ती सर्वतोपरी गेली पाहिजे. ती संपूर्णपणे नाहिंशी झाली पाहिजे.”

“वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था यामुळे आपल्याला जो सामाजिक विषमतेचा अनुभव येतो तो दुःखद आहे. ही विषमता गेली पाहिजे असा भाव आपणा सगळ्यांच्या मनात असला पाहिजे. या विषमतेमुळे समाजात विघटना आली आहे. दुर्बलता आली आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे.”

अनेक लेखांनी, बौद्धिकांनी जे झालं नसतं ते या एका भाषणानं झालं. संघाची स्पष्ट भूमिका लोकांसमोर आली. अनेकांची संघविरोधाची तोंड बंद झाली. ‘लॉक, स्टॉक एंड बॅरल’ या वाक्यप्रयोगाचा इतका सुंदर उपयोग याआधी कधीच बघितला नव्हता, असं एका वर्तमानपत्राने लिहिलं होतं.

बाळासाहेब द्रष्टे होते. त्यांना भविष्य दिसायचं, वाचता यायचं. 1977 मध्ये इंदिराजींना पराभूत करून जनता पक्ष सत्तेवर आला होता. आणिबाणीच्या काळात काँग्रेस सरकारच्या सांगण्यावरून प्रशासनाने कार्यकर्त्यांचा भयंकर छळ केला होता. त्यामुळे सत्तेवर आलेले जनता पक्षाचे अनेक नेते इंदिराजींचा, काँग्रेसचा बदला घेण्याची भाषा बोलू लागले. मात्र आपल्या प्रत्येक भाषणात बाळासाहेब सांगत होते, ‘क्षमा करा आणि विसरा’. जनता पक्षाच्या नेत्यांनी हे मनावर घेतलं नाही. त्यांनी इंदिराजींना अटक करण्याचा प्रयत्न केला. जन सहानुभूती इंदिराजींकडे वळली. आणि इंदिराजींचा पुनरागमनाचा मार्ग प्रशस्त झाला.

बाळासाहेबांची राजकीय जाण ही सूक्ष्म आणि जबरदस्त होती. सांगलीचे वसंतराव गोरे हे स्वयंसेवक येरवड्याला बाळासाहेबांच्या बरोबर बंदीवान होते. सन 1975 च्या अखेरीला बाळासाहेबांनी त्यांना सांगितले, “हे पहा, मी कोणी त्रिकालज्ञ भविष्य वेत्ता नाही. पण 75 साल आता संपल्यातच जमा आहे. 76 साली काही होईल असं वाटत नाही. पण 77 साली सहा महिन्यांवर आणिबाणी रेटणं सरकारला जमणार नाही असा माझा अंदाज आहे. (‘बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व’ – डॉक्टर श्रीरंग गोडबोले यांच्या लेखातून) आणि अगदी तसंच झालं..!

राम जन्मभूमी आंदोलनाचे प्रारंभिक दिवस होते. रथयात्रेची तयारी चाललेली होती. त्यातील एका महत्त्वाच्या बैठकीत बाळासाहेब म्हणाले, “लक्षात घ्या, हा साधा, सोपा, सरळ मुद्दा नाहीये. श्रीराम मंदिरासाठी फार मोठ्या प्रमाणावर लोकांचे जनजागरण करावे लागेल. आणि त्यात सातत्य ठेवावे लागेल. तसं झालं तर पुढच्या पंचवीस – तीस वर्षात हा मुद्दा सुटू शकेल. अर्थात श्री राम मंदिर उभारता येऊ शकेल. ही तयारी असेल तर हे आंदोलन पुढे न्या.”

हिंदुत्वाबाबत रोखठोक..

हिंदूंचे संघटन बांधणे हे संघाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे हे फार सरळ सोप्या भाषेत ते सांगत असत. हिंदूंचे बहुसंख्य असणे हीच लोकशाहीची गॅरंटी आहे हे ते आवर्जून सांगत. 1980 मध्ये जनता पक्षात, समाजवादी पक्षाच्या काही नेत्यांनी दुहेरी सदस्यत्वाचा वाद निर्माण केला. या मंडळींना जनता पक्षातील जनसंघाचे वर्चस्व खुपत होते. त्यामुळे ‘राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संस्थांचे दुहेरी सदस्यत्व घेणे योग्य नाही’ अशी भूमिका त्यांनी मांडली. या सर्व घडामोडीत हिंदुत्वाच्या विचारांवर ठाम राहायचे असे आग्रही प्रतिपादन बाळासाहेबांनी केले.

भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर अटलजींनी ‘हिंदू’ ऐवजी ‘भारतीय’ शब्द वापरला तर जास्त चांगले राहील असे म्हटले. यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना बाळासाहेब म्हणाले होते, “मुसलमान व ख्रिश्चनांच्या बाबतीत बोलावयाचे झाले तर ‘हिंदू’ शब्द ऐवजी ‘भारतीय’ शब्द वापरल्याने त्यांना फरक वाटणार नाही. ज्या काळात भारत व भारतीयता हे शब्द प्रचलित होते, तेव्हा मुसलमानांनी वेगळेपणाच्या व फाळणीच्या घोषणा दिल्याच होत्या ना? दुबळेपणानेच जर आपण हा शब्द बदलला तर ते केवळ तुष्टीकरण ठरेल. अशा तुष्टिकरणाने त्यांची आक्रमक प्रवृत्ती अधिकच तीव्र होईल. आणि त्यांच्या फुटीरतावादी दृष्टिकोनात अधिकच कठोरता निर्माण होईल.”

सरसंघचालक होण्याच्या आधी आणि नंतरही ‘स्पष्टता’ हे बाळासाहेबांचं वैशिष्ट्य होतं. कुठेही किंतु -परंतु नाही. वैचारिक गोंधळ तर नाहीच नाही. विचारात आणि आचारात पूर्ण स्पष्टता. बाळासाहेबांनी देश काल परिस्थितीच्या अनुसार शाश्वत मूल्यांबाबत कुठलीही तडजोड न करता संघाला दिशादर्शन केले. त्यामुळे संघ काल सुसंगत तर राहिलाच पण आणिबाणी सारख्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून तावून – सुलाखून, शक्तिशाली होऊन बाहेर आला.

आज हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाचे सुखद परिणाम केंद्र आणि काही राज्यात दिसत आहेत. त्याची सुरुवात बाळासाहेबांनी केली आहे. 1984 च्या निवडणुकीत त्यांनी हिंदू व्होटची कल्पना मांडली. 4 ऑक्टोबर 1984 ला विजया दशमीच्या निमित्ताने दिलेल्या भाषणात बाळासाहेब म्हणाले होते, “सार्वत्रिक निवडणुका जवळ येत आहेत. या निवडणुकीत हिंदूंनी आपले पंथ, भाषा, जाती विषयक अभिमानाने प्रेरित न होता, राष्ट्रीय हिताच्या आधारे मतदान केले पाहिजे. हिंदू माणसाचे मत हिंदू विरोधी व्यक्तीला कदापि मिळता कामा नये.”

बाळासाहेबांनी हा विचार मांडला तेव्हा अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्याची वेगवेगळ्या राजकीय पक्षात स्पर्धा चाललेली होती. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला हिंदू मतांकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नाही. मग त्यासाठी जानवी घालणं, मंदिरामध्ये दर्शनाला जाणं अपरिहार्य ठरतं. बाळासाहेब मात्र सुमारे 40 वर्षांपूर्वी हे आजचं चित्र पाहू शकत होते!!

बाळासाहेबांच्या काळात संघ प्रेरित अनेक संस्थांची सुरुवात झाली. राष्ट्रीय विचारांनी जीवनाची सर्व क्षेत्र व्यापून टाकणं, भारून टाकणं हे त्यांना अपेक्षित होतं. संघाच्या अंतर्गत संघटनेतही त्यांनी काही नवीन प्रथा सुरू केल्या. विजयादशमीचे भाषण लिहून काढणे, आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करून त्या भाषणाचा अंतिम मसुदा तयार करणे ही प्रथा त्यांनीच सुरू केली. नावाच्या अगोदर ‘परमपूजनीय’ ही उपाधी लावण्याचे त्यांनी बंद केले. “ही उपाधी सरसंघचालक या पदाला आहे मला नाही. व्यक्तीच्या नावा मागे माननीय म्हणणे पुरेसे आहे” असे त्यांनी आवर्जून सांगितले. बाळासाहेब सरसंघचालक झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात डॉक्टर हेडगेवार आणि गुरुजींबरोबर त्यांचाही फोटो कार्यक्रमात ठेवला जात असे. ही प्रथा त्यांनी बंद केली. संघाच्या कार्यक्रमात डॉक्टर आणि श्री गुरुजी यांचीच छायाचित्रे ठेवावीत हे त्यांनी स्पष्ट केले.

डॉक्टरांचा आणि श्री गुरुजींचा दाह संस्कार रेशीमबागेत झाला होता. मात्र बाळासाहेबांनी ‘रेशीमबाग ही सरसंघचालकांची दहन भूमी नाही. माझा अंत्यसंस्कार सर्वसामान्य स्मशानभूमीत व्हावा’, असे लिहून ठेवले. प्रकृतीच्या कारणामुळे जेव्हा प्रवास करणं अशक्य झालं तेव्हा ते सरसंघचालक पदावरून निवृत्त झाले, आणि प्राध्यापक रज्जू भैयांची नियुक्ती सरसंघचालक पदावर केली.

अगदी उद्गमापासून बाळासाहेबांनी संघाचा प्रवास बघितलेला होता. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांना संघ वाढवता आला. शक्तिशाली आणि प्रभावशाली बनवता आला. वर्तमान परिस्थितीचे आकलन करून भविष्यात डोकवता येणं हे बाळासाहेबांचं वैशिष्ट्य होतं. त्यामुळे परिस्थितीनुसार योग्य निर्णय होत राहिले, आणि संघाचा प्रभाव वाढत राहिला.

लेखक – प्रशांत पोळ

Back to top button