मर्यादापुरुषोत्तम,भक्तवत्सल श्रीरामाची इतकी घृणा का..कशासाठी..

“घृणा” तीदेखील जगत्पालक,प्रभू श्रीरामाची शीर्षक वाचून आपले मन निश्चितच द्रवले,हेलावले असणार यात तिळमात्र शंका नाही.. पण घटना देखील तशीच घडली आहे.
कल्याण पूर्वेकडील विजयनगर परिसरातील सेंट थॉमस शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले पोस्टर तेथील एका शिक्षिकेने फाडले. या पोस्टकार्डवर जय श्रीराम, जय शिवराय असा मजकूर लिहिलेला होता. सदर पोस्टर जाणीवपूर्वक फाडल्याचा आरोप करत या शिक्षिकेवर कारवाई करण्याची हिंदुत्वप्रेमी संघटनांनी केली. याच दरम्यान हिंदुत्वप्रेमी कार्यकत्यांनी शाळेत हनुमान चालीसा पठण करत जय शिवराय, जय श्रीराम असा जोरदार उद्घोष केला.कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्या हिंदुत्वप्रेमी कार्यकर्त्यांची समजूत काढली.
हिंदुत्वप्रेमी संघटनांच्या शिष्टमंडळाने शाळा प्रशासनाशी चर्चा करत घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. तसेच संबंधित शिक्षकेने जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.हिंदुत्वप्रेमी कार्यकर्त्यांच्या तडाख्याने बिथरलेल्या शाळा प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केलीच तर संबंधित शिक्षकेनेही जाहीर माफी मागितल्यानंतर प्रकरण शांत झाले.इतकेच नव्हे तर शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावायला देखील शाळा प्रशासनाने मान्य केले आहे. यापुढे असा प्रकार आमच्या शाळेत घडणार नाही याची शाश्वती देखील शाळेने दिली आहे.

कालपर्यंतचा दबलेला सकल हिंदू आज आपल्या धर्मासाठी आवाज उठवतो. त्यामुळेच या अशा घटना उघडकीस येत आहेत.आता हिंदुवर धर्मातरणाची सक्ती करू शकत नाही, यांचा अंदाज विघातक शक्तीना आला आहे. मग जबरदस्तीने धर्मांतर करण्याऐवजी हिंदुच्या पुढच्या पिढीमध्येच धर्मातराचे बीज पेरायला हवे, या तयारीत या विघातक शक्ती आहे. संबंध देशात अश्या अमानुष, निर्दयी घटना समोर येत आहे..काही उदाहरणे पुढीलप्रमाणे..
मध्यप्रदेश:-प्रभू श्रीराम (shri ram) या देशाच्या आस्थेचा आत्मा आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात घराघरात त्यांचे नामस्मरण केले जाते. साहजिकच लहान मुलांच्या तोंडीही प्रभू श्रीरामचंद्रांचे नाव आपसूक येते. मध्यप्रदेशाच्या सागर जिल्ह्यातील सेंट जोसेफ स्कूल येथे अशीच घटना घडली. मोकळ्या वेळेत विद्यार्थी ‘जय श्रीराम’ चा नारा देत होते, त्यानंतर शाळेने यातील ३० विद्यार्थ्यांना दोषी ठरवत विद्यार्थ्यांवर कारवाई केली. ‘जय श्रीराम’ चा नारा दिला म्हणून विद्यार्थ्यांना दोषी ठरवले गेले.
दिल्ली:-दिल्लीतील किडवई नगर येथील सेंट थॉमस स्कूलमध्येही दोन विद्यार्थी मधल्या सुट्टीमध्ये जेवत असताना ‘जय श्रीराम’ म्हणाले. यामुळे शिक्षकाने त्यांना बेदम मारहाण केली होती. त्यामुळे हिंदू सण- श्रध्दा याविरोधात पध्दतशीरपणे वातावरण तयार केले जात आहे की काय, असा संशय यावा, अशा घटना घडत आहेत.
राजस्थान:-राजस्थानच्या भिलवाडा येथील सेंट एल्सेम स्कूलमध्ये किशन माली या विद्यार्थ्याला मारहाण केली गेली, शिक्षा दिली. कारण, काय तर श्रावण महिन्यात पूजापाठ केल्यानंतर तो शाळेत कपाळावर गंधाष्टक लावून येत असे. त्यांच्या पालकांवर दबाव आणला की, आताच्या आता मुलाचा शाळेतील दाखला काढून घ्या.

कर्नाटक:-कर्नाटकच्या क्लैरेंस हायस्कूलमध्ये तर विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी त्यांच्या पालकांना एका करारावर सही करावी लागे. यामध्ये त्यांचे पाल्यांना हिम्स (ख्रिश्चन धार्मिक गीत) आणि स्क्रीप्चर (बायबलचे पाठ) हे शिकणे सक्तीचे आहे आणि पालकांची त्याला संमती आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील होली फॅमिली कॉन्व्हेंट स्कूल येथे रक्षाबंधनाच्या निमित्त मुले हातात राखी, रक्षासूत्र बांधून आली असता, शाळेत त्यांच्या हातातल्या राख्या कापून टाकण्यात आल्या. हिंदू धर्माची जाहिरात इथे करायची नाही, असेही म्हटले गेले.
महाराष्ट्र :- ठाण्याजवळील दिवा येथील सिम्बॉयसिस कॉन्हेंट स्कूलमधली घटना बरीच क्लेशदायक. इथे कपाळाला टिकली लावलेल्या विद्यार्थिनींना एका बाजूला उभे केले जायचे. त्यानंतर त्यांना कपाळाला टिकली लावली म्हणून शिक्षा केली जायची. कुणाला ६० ते ७० उठाबशा काढणे, कुणाला गुडघ्यावर अर्धा तास चालणे, तर कुणाला मैदानामध्ये पाच ते सहा वेळा फेन्या मारणे. स्थानिक आगरी-कोळी संघटनांनी आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने या संतापजनक प्रकरणाबाबत शाळेला माफी मागायला लावली आणि हा प्रकार बंद झाला.
लहान बालके मातीच्या गोळ्यासारखे असतात. जो आकार देऊ तसे ते बनतात. त्यामुळे बालकांना शाळेत असतानाच त्याच्या जन्मजात हिंदू धर्मापासून तोडायला हवे, हा एकमेव उद्देश घेऊन काही लोक शिक्षण क्षेत्रातही उतरले आहेत. पालकांनी सावध राहण्याची गरज आहे. आपला स्वधर्म मुलांना शिकवा नाही, तर कुणीतरी अथम मुलांना आपल्या धर्मापासून तोडायला टपलेला आहेच. शिक्षणात पूर्वी खिस्ती धर्मातराचे क्रूसेड तर सक्रीय होतेच, पण आता जिहादी मानसिकताही दिसून येत आहे.
