ChristianityNews

गोवा मुक्ती दिन.. भाग १

goa liberation day..

( गोवा मुक्तीचा इतिहास सांगणारी १० भागांची विशेष मालिका.. )

“माझ्या गोव्याच्या भूमीत । आंब्या फणसांची रास
फुली फळांचे पाझर । फळीं फुलांचे सुवास ।।

माझ्या गोव्याच्या भूमीत । चांफा पानावीण फुले
भोळा भाबडा शालीन । भाव शब्दावीण बोले

माझ्या गोव्याच्या भूमीत । गड्या, साळीचा रे भात
वाढी आईच्या मायेने । सोनकेवड्याचा हात

माझ्या गोव्याच्या भूमीत ।सागरात खेळे चांदी
आतिथ्याची अगत्याची । साऱ्या षड्रसांची नांदी

माझ्या गोव्याच्या भूमीत । खड्गा जडावाची मूठ
वीर शृंगाराच्या भाळी । साजे वैराग्याची तीट

माझ्या गोव्याच्या भूमीत । तृणीं सुमनांचे गेंद
सिद्ध कुणब्यांच्या तोंडी । शुद्ध सौंदर्याचे वेद

माझ्या गोव्याच्या भूमीत । सुखाहूनी गोड व्यथा
रामायणाहून थोर । मूक उर्मिलेची कथा

माझ्या गोव्याच्या भूमीत । सारा माझा जीव जडे
पुरा माझ्या कवनांचा । गंध तेथे उलगडे”

सिद्धहस्त कवी बा. भ. बोरकर यांच्या या वरील कवितेत गोव्याचे वैभव,ऐश्वर्य आपल्याला दिसून येते.

goa sunburn festival

गोवा (goa) म्हणजे फक्त बीचेस, पंच तारांकित रिसॉर्टस, दारू, विदेशी पर्यटक एवढीच गोव्याची जनमान्यता आपल्याला माहित आहे. गोवा म्हणजे मोठमोठे चर्चेस, गोवा म्हणजे ख्रिश्चन संस्कृती अशी आपली सर्वसाधारण समजूत असते…

शाळेत नाही म्हणायला गोव्यात पोर्तुगिजांची सत्ता होती वगैरे असे आपण वाचलेले असते, पण ते तितपतच. आपला इतिहास आपल्याला कोणी शिकवलाच नाही. आपण पण कधी गोव्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही.. चला तर मग या “गोवा मुक्ती दिनाच्या” निमित्ताने निसर्गदत्त देणगी लाभलेला, शांत (सुशेगाऽऽऽत), वैविध्यपूर्ण देवळातून अखंड भजनात रममाण झालेल्या आणि आपल्या अस्तित्वासाठी, स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या.. गोव्याबद्दल आपण जाणून घेऊया…

ऐतिहासिक काळात गोव्याला अपरान्त, गोमंतक, गोवापुरी, गोपकपट्टण, गोवाराष्ट्र अशी नावे दिलेली आढळतात. तर अरबी व्यापारी या प्रदेशाला ‘सिंदाबुर’ या नावाने ओळखत असत. यापैकी अपरान्त हे नाव सर्व कोकणाला दिलेले आहे. तर ‘गोमंतक’ म्हणजे ‘गायींची विपुलता असलेला प्रदेश’ असा अर्थ आहे.

dudhsagar waterfall goa

जरासंधाबरोबरच्या लढायांमधून जरा उसंत घ्यावी म्हणून कृष्ण आणि बलराम गोव्यात आले होते, अशी कथा प्रचलित आहे. आपल्या मुलांच्या विरहाने दु:खी होऊन देवकीमाता त्यांच्या मागोमाग गोव्यात आली, आणि तिला पान्हा फुटला. तोच दूधसागर धबधबा अशी कथा गोव्यात सांगितली जाते. या आई मुलांची भेट झाली तिथे माशेलला आजही “देवकी-कृष्णाचं” मंदिर प्रसिद्ध आहे. ‘सिंदाबुर’ हे नाव ‘चंद्रपूर’ या कदंबांच्या राजधानीवरून आले असावे. आज ही प्राचीन राजधानी ‘चांदोर’ किंवा ‘चांदर’ म्हणून ओळखली जाते.

महाभारताच्या ‘भीष्मपर्वा’त (अध्याय ९) आणि ‘स्कंदपुराणा’त (सह्याद्री खंड) ‘गोमंत’, तर ‘सूतसंहिते’त ‘गोवापुरी’ या नावाने गोव्याचा उल्लेख आढळतो. परशुरामाने सोडलेला गौ (बाण) गोव्यापर्यंत पोहोचला. त्या बाणाचा जेथे अंत झाला, तो प्रदेश म्हणजे गौमान्त-गोमन्त-गोमंतक अशीही एक व्युत्पत्ती सांगितली जाते.

गोव्यात एकछत्री असं कोणाचं राज्य बहुदा नव्हतं. जशी उत्तर,दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात साम्राज्यं उदयाला आली, तसा त्यांचा गोव्यात हळूहळू शिरकाव झाला. इ. स. १०४२ पासून शष्ठदेव कदंबाने चालुक्यांचा मांडलिक म्हणून गोव्याचा कारभार पहायला सुरुवात केली. हा खर्‍या अर्थाने गोव्याच्या वैभवाचा काळ होता. हे तेच कदंब राजे, ज्यानी “श्रीसप्तकोटीश्वरलब्ध वीरवर” हे बिरूद अभिमानाने मिरविले आणि आपल्या नाण्यांवरही “श्री सप्तकोटीश्वरलब्ध वरप्रसाद” असे लिहून श्री सप्तकोटीश्वराबरोबर आपले नाव इतिहासात अजरामर केले.

Coins of Kadamba Dynasty

कदंबानंतर, शिलाहार ,यादव ,विजयनगरच्या साम्राज्यांनी गोव्यावर राज्य केले. त्यातून गोव्याची भरभराट होत गेली. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

… आणि पोर्तुगीजांची दृष्ट लागली!

इ.स. १४९८ मध्ये गोव्यावर दूरगामी परिणाम करणारी घटना कालिकतला घडली होती, वास्को द गामाने भारताच्या भूमीवर पाऊल ठेवले होते. संपूर्ण भारत जिंकून घेण्याची स्वप्नं बघायला पोर्तुगीजांचा पहिला गव्हर्नर अफोन्सो डी अल्बुकर्क याने सुरुवात केली होती इ. स. १५०३ च्या ६ एप्रिलला पोर्तुगालच्या राजाने, अल्फान्सो दे आल्बुकर्क याला ४ गलबतांचा ताफा देउन भारताकडे पाठवले.

गोव्यावर राज्य करणार्‍या आदिलशहाचा मृत्यु झाला व त्याचा मुलगा ईस्माईल गादीवर बसला. तेव्हा गोव्यात त्याचे केवळ २०० सैनिक होते. ही संधी साधुन आल्बुकर्क ने गोव्यावर स्वारी केली व तिसवाडी सर केली. पोर्तुगीजांनी गोवा जिंकण्यापुर्वी, गोव्यावर हिंदुंचे स्वामित्व होते. इस १३५२-१३६६ व १४७२-१५१० या काळात तेवढी मुसलमानी सत्ता होती. मुसलमानी सत्ता नको म्हणुन तिमोजाने (विजयनगरच्या सरदाराने ) व गोमंतकीय हिंदु लढवय्यांनी आल्बुकर्कला मुक्तपणे साह्य केले.पण झाले भलतेच.

portuguese flag

गोवा बेट जिंकल्यावर आल्बुकर्कने दवंडी पिटुन प्रजेस धार्मिक स्वातंत्र्य जाहीर केले. सती प्रथा बंद केली. पण हा त्याचा मतलबीपणा होता. त्याला पोर्तुगीज सत्ता गोव्यात स्थापायची होती. त्यासाठी पोर्तुगीज संस्कृती येथे रुजणे महत्वाचे होते. याच उद्देशाने त्याने पोर्तुगीज पुरुषांस ठार झालेल्या मुसलमानांच्या विधवांशी विवाह करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांना घोडा, घर, गुरे, जमीन दिली. गोवा बेटाचे ख्रिस्तीकरण करण्याच्या मार्गात आणि ख्रिस्ती प्रजेचा विकासच्या मार्गात स्थानिक लोकांची अडगळ आल्बुकर्कला वाटली. आणि प्रसंगी त्यांना गोव्याबाहेर हाकलण्याची तयारीही होती.

आता सत्ता स्थापन झाली म्हणजे बाटवाबाटवी ,लुटालुट व त्यासाठी जनतेचा अमानुष छळ वगैरे सगळं राजरोस सुरू झालं. १ एप्रिल १५१२ ला पोर्तुगालचा राजा दों मानुएल याला लिहिलेल्या पत्रात आल्बुकर्क म्हणतो की, “काही ब्राह्मणांनी व नाईकबारींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.. !!!! हे काही सुखासुखी झालं नसेल….

गोमंतकात पहिले चर्च भाणस्तारच्या किल्ल्यात बांधले गेले. त्याला नाव दिले सेंट कॅथरिन चर्च कारण ज्या दिवशी गोवा जिंकला तो दिवस सेंट कॅथरिनचा होता.

क्रमशः-

Back to top button