CultureNewsSpecial Day

दि.२६ डिसेंबर – वीर बाल दिवस..

Veer Bal Diwas is observed to pay honour and tribute to the sacrifices made by Sahibzada Zorawar Singh and Sahibzada Fateh Singh.

मागील वर्षीपासून २६ डिसेंबर हा वीर बाल दिवस (veer bal diwas) म्हणून साजरा करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. सर्व शाळांना सुट्टी आहे… त्यामुळे मुलांसाठी यानिमित्त काही कार्यक्रम असणे शक्यच नाही!! एरवी अगदी सोमवार मंगळवार च्या शुभेच्छा पाठवणारे असतात…. आज या दिवसासाठी एकही पोस्ट नाही!!… दुःख वाटले!!

मला एकाने विचारले की असे काय आहे या दिवशी? ख्रिसमस च्या दुसराच दिवस का निवडला? मोदी सरकारचा काय अजेंडा आहे हा आता?….. आणि त्याचा हा प्रश्न ऐकून माझे मन सुन्न झाले!!…. खरंच किती अनभिज्ञ आहे आपला समाज? सेक्युलरवादाचे झापड आपल्या सर्वांवर कसे बेमालूम चढविले गेले आहे की आपल्याला आपल्या इतिहासाचे ज्ञानच नसावे!!…. आणि आपल्या इतिहासातील आदर्श पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न केल्यास हा आम्हाला काही अजेंडा वाटतो!!…..

खरंच काय आहे या दिवसाचे “वीर बाल दिवस” म्हणून महत्व? जाणून घ्यायचे आहे? आणि हो…. हा फक्त बाल मंडळींसाठीच नव्हे तर माझ्या/ तूमच्यासाठी सुद्धा आदर्शवत प्रसंग आहे!! या बलिदानाचे कथन ऐकले किंवा वाचले तरी अंगावर काटा येतो आणि नकळतपणे कृतज्ञतेने हात जोडले जातात….

गुरूंगोविंदसिंहजी यांचे दोन लहान पुत्र…. फतेहसिंग आणि जोरावरसिंग… वय वर्ष मात्र ६ आणि ८…. नबाब वजीरखान त्यांना सांगतात इस्लाम धर्म स्वीकारा अन्यथा मरणाला तयार रहा…. फतेहसिंह तेव्हढ्याच बाणेदार पणे विचारतात की इस्लाम धर्म स्वीकारला तर मरण येणार नाही का?… आणि मरण येणारच असेल तर आपल्याच धर्मात राहून धर्मासाठी बलिदान करत मरण पत्करू…. काय धीरोदात्त बाणेदारपणा आणि धर्मनिष्ठा या फक्त ६ / ८ वर्षांच्या मुलांमध्ये होती…..!! आणि या सहा वर्षाच्या गुरुपुत्रांना भिंतीत चिणून मारण्यात आले….. त्यावेळचा प्रसंग तर अवर्णनीय…. फतेहसिंह च्या मानेपर्यंत विटा बांधून झाल्या त्यावेळी जोरावरसिंह रडायला लागले…. कारण काय तर तू माझ्यापेक्षा लहान आणि या जगात नंतर आलास आणि माझ्या आधीच चाललास म्हणून…… ६/ ८ वर्षाच्या मुलांची धैर्य आणि बलिदानाची ही उंची!!!!….. ही घटना दि २६ डिसेंबर ची.

मुलांसाठी आदर्श याहून काही वेगळा असू शकतो का??…. स्वतःलाच प्रश्न विचारा आणि स्वतःलाच उत्तर द्या….. आणि हा आदर्श बालांपुढे ठेवला की आमची सेक्युलरवादाची झापडं आड यायला लागतात आणि आम्हाला यात अजेंडा दिसायला लागतो….

मंडळी खरं म्हणजे केवळ २६ डिसेंबर चे हे बलिदानच नव्हे तर दि. २१ ते २७ डिसेंबर या कालावधीत गुरूंच्या सर्व परिवाराने धर्मासाठी बलिदान केले आहे.

शीख पंथ हा हिंदूंचे सुरक्षा कवच म्हणून मानला जातो. गुरू तेगबहादूर यांनी काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या धर्मबदलाच्या सक्तीविरुद्ध बादशाहकडे विरोध केला आणि त्यासाठी अत्यंत क्रूरपणे आणि पाशवी पणे केलेल्या अत्याचारांचा सामना करत बलिदान केले, त्यांचे मस्तक उडविले गेले…. दिल्लीत तिथेच आज शिशगंज गुरुद्वारा आहे…. हिंदुधर्म रक्षणाची ही परंपरा सर्वच गुरूंनी पाळली. गुरूंनी रामजन्मभूमी मुक्तीसाठीही प्रयत्न केले होते.

त्याच तेगबहादूर यांचे पराक्रमी पुत्र दशमगुरु गुरू गोविंदसिंहजी यांनी धर्मरक्षणासाठी पूर्ण समाजाला एकत्र केले. पंजाब मध्ये घरटी किमान एक जण शीख होणे हा प्रघातच झाला होता. समाजाचे लढाऊपण धर्मरक्षणासाठी जागविणारे श्रेष्ठ गुरु गोविंदसिंहजी यांच्या सर्व परिवाराने २१ ते २७ डिसेंबर या कालावधीत अतुलनीय बलिदान दिले…. म्हणूनच हा सप्ताह शौर्य सप्ताह म्हणून पाळला जातो….. पण फारच सेक्युलर झालेले आपण हे अतुलनीय बलिदान विसरलो आहोत… आणि आपला नसलेला ख्रिसमस उत्साहाने साजरा करत आहोत

फतेहसिंग आणि जोरावरसिंग यांचे अतुलनीय बलिदान झाले त्याच्या दुसऱ्याच दिवशी माता गुजरीजी यांनीही आपले प्राण त्यागले….
अन्य पुत्र अजितसिंह आणि जुझारसिंह यांचे ही याच काळात बलिदान झाले. गुरुजींना बादशहाने खोटी आश्वासने देऊन त्यांना किल्ल्यातून बाहेर यायला लावले आणि त्यांच्यावर भ्याडपणे हल्ला केला….. त्यातच त्यांचेही बलिदान झाले….

देश, धर्म, समाज यांच्यासाठी गुरूंच्या सर्व परिवाराने बलिदान दिले…. त्यांच्या या बलिदानामुळेच आजही आपला धर्म आणि देश आणि आपण अजूनही टिकून आहोत…. दुर्दैव की हा जाज्वल्य, पराक्रमी आणि स्फूर्तिदायी इतिहास आम्हाला माहितीच नाही……

सकल जगतमे खालसा पंथ गाजे….
जगे धर्म हिंदू सकल भंड भाजे….

गुरूंनी आणि सर्व परिवाराने याचसाठी बलिदान दिले!!!

आणखीन एक दुर्दैव म्हणजे ज्या इस्लाम विरोधात हिंदुधर्म आणि राष्ट्र रक्षणासाठी लढा दिला त्याच इस्लामी मानसिकतेशी आणि त्यांची मदत घेत खलिस्तानची फुटीरतावादी चळवळ याच गुरूंचा वारसा सांगणाऱ्या भरकटलेल्या काही जणांनी चालवली, साऱ्या देशाला वेठीला धरले. मोठ्या प्रमाणात रक्तपात केला…. नुकत्याच झालेल्या शेतकरी आंदोलनात या फुटीरतावादाची पिल्लं उघडपणे सामील झाली होती…. त्यावेळच्या २६ जानेवारीला दिल्लीत घातलेला धुमाकूळ तर आपण सर्वांनी दूरदर्शन वर पहिलाच असेल…. आजही पंजाब मध्ये आणि अमेरिका/ कॅनडा मधून यांचे फुत्कार सुरू आहेतच, आणि त्यांच्या सोबत इस्लामी फुटीरतावादीही आहेतच!! दुर्दैवाने गुरूंच्या परिवाराचा बळी घेणाऱ्या इस्लामी तत्वांशीच आज हे खलिस्तानवादी हातमिळवणी करत आहेत….!!

मंडळी….. प्रामाणिक पणे सांगा की हे किती जणांना माहिती होते? आपण आपले स्वाभाविक कर्तव्य आणि कृतज्ञता म्हणून या वीरांची स्मृती जपायला हवी ना?….. आपल्या मुलांपुढे या वीरांचा आदर्श ठेवायला हवा ना?

हिंदू धर्म आणि राष्ट्र रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या गुरूंच्या सर्व परिवारास मनाचा मुजरा !!!

आज…. २६ डिसेंबर रोजी वीर बाल दिवस म्हणून पळूयात आणि बाल आणि तरुण पिढीच नव्हे तर आपणही या बाल वीरांच्या बलिदानाच्या इतिहासाचा अभ्यास करूयात, त्या वीरांना मानवंदना देऊयात…. आणि त्यांची धर्म आणि राष्ट्र निष्ठा स्वतः मध्ये रुजविण्याचा प्रयत्न करूयात…

वाहे गुरू का खालसा। वाहे गुरू की फतेह।

लेखक :- जे.अरविंद

Back to top button