HinduismNews

सौगंध राम की खायी थी , हमने मंदिर वही बनाया है.. भाग ८

ayodhya ram mandir inauguration ramlala pran pratishtha part 8

(रामजन्मभूमीची संघर्षगाथा उलगडणारी १८ भागांची रोमांचकारी मालिका)

‘श्री सीतापाक’ मशिद..

त्यात पाच गोष्टी विशेष होत्या. मशिदीचे नाव सीतापाक असे ठेवले जावे. प्रदक्षिणेचा मार्ग आहे तसाच ठेवावा, मुख्य घुमटाच्या दरवाज्याला लाकूड लावले जावे, मिनार बांधू नयेत, जे काही असतील ते पाडले जावेत आणि हिंदूंना भजन-पाठ करण्यास अनुमती द्यावी. नाइलाजाने का होईना हा सल्ला बाबराने ऐकला आणि हिंदूंशी तडजोड केली. या तडजोडीत बाबराने सर्व अटी मान्य केल्या. अर्धवट बांधलेले मिनार पाडून टाकण्यात आले, दारावर महाजनी आणि फारशी लिपीत ‘श्री सीतापाक’ असे नाव कोरले, हिंदूंना नित्य पूजा पाठ करण्यास आणि मुसलमानांना फक्त शुक्रवारी नमाज पढण्याची परवानगी देण्यात आली. मशिदीच्या दारावर दोन काळे कसोटीच्या दगडाचे खांब लावले. दरवाज्यात लाकूड बसवले.

राणी जयराजकुमारी आणि सर्व हिंदू साधू-संन्याशांचे आखाडे स्वस्थ बसून राहिले नाहीत. बाबराचा मृत्यू २६ डिसेंबर १५३० ला झाला आणि त्याचा मुलगा हुमायून गादीवर आला. बाबराच्या काळात हिंदू राजांनी आणि साधू- बैरागी यांनी ४ हल्ले केले त्यापैकी प्रमुख हल्ले कोणते ते आपण पाहिले. हिंदुस्थानचा बादशाह हुमायूनच्या काळातही संन्यासी स्वामी महेश्वरानंद आणि राणी जयराजकुमारी यांनी अयोध्येच्या परिसरातील हिंदूंना एकत्रित करून सतत १० हल्ले केले.

अयोध्येच्या जवळ १० मैलांच्या परिसरात असलेल्या सराय सिरसिंडा आणि राजेपूर या खेड्यातील सामान्य जनतेत उत्साह आला होता. ते एकत्र आले तेव्हा त्यांची संख्या १०००० झाली होती. त्यांनी रामजन्मभूमी मुक्त करण्यासाठी हल्ला केला. मोगल बादशहाच्या सैन्याच्या छावण्या तोडल्या, तंबू, मंडप उडवून दिले. तथाकथित मशिदीचा समोरचा दरवाजाही तोडून टाकला. अनेकजण मारले गेले.

४-५ दिवसांनंतर जेव्हा बादशाहकडून नवी कुमक आली, तेव्हा त्या हल्ल्यावर शाही फौजेला नियंत्रण करता आले. हे सामान्य लोकांचे आंदोलन होते. त्यामागे राजे-महाराजे नव्हते. त्या प्रदेशातल्या सामान्य लोकांनी प्रतिज्ञा केली की जो पर्यन्त रामजन्मभूमी विधर्मी लोकांच्या हातून आपण मुक्त करू शकत नाही, तो पर्यन्त आम्ही डोक्यावर पगडी घालणार नाही की, पायात जोडेही घालणार नाही. म्हणूनच आजदेखील या भागातले लोक डोक्यावर पगडी घालत नाहीत. पूर्वजांच्या परंपरेचा येथील लोक गर्वाने निर्वाह करत आले आहेत. २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराचा मार्ग प्रशस्त केला तेव्हाच त्यांनी डोक्यावर पगडी बांधली..

हुमायून..

महाराणी जयराज कुमारीला अशीच एक शुभ संधी प्राप्त झाली. बादशाह हुमायूनला शेरशाहने इ. सन १५४० मध्ये पदच्युत केले. तो काबूल-कंदाहार इ. ठिकाणी रानोमाळ फिरत होता. त्यावेळी त्याचा मुलगा अकबर बाल्यावस्थेत होता. संधी साधून त्या वेळी स्वामी महेश्वरानंद आणि राणी जयराजकुमारीने आपल्या दहाव्या आक्रमणात मोगल सैन्याचा धुव्वा उडवला. राणीने रामजन्मभूमीवर ताबा मिळवलाच. हा ताबा दोन-तीन वर्षे टिकला.

हुमायून अधिकारपदी आल्यावर मोगल फौजेने रामजन्मभूमीवर पुनः हल्ला केला. भयानक युद्ध झाले. स्वामी महेश्वरानंद यांनी २४,००० चे सैन्य घेऊन राणीला मदत केली. या युद्धात स्वामी महेश्वरानंद व राणी जयराजकुमारी या दोघांनाही वीरगती मिळाली. राणीने आणि स्वामींनी रामजन्मभूमीसाठी केलेला संघर्ष पुढे चालू ठेवण्याचे दायित्व स्वामी बलरामाचार्य यांनी आपल्या समर्थ हातांनी स्वीकारले.

अकबर..

अकबर बादशहाच्या कार्यकाळात हिंदूंनी कितीतरी हल्ले केले. मोजायचे झालेच तर ते २०-२१ हल्ले तरी असतील. त्यापैकी स्वामी बलरामाचार्य यांचा संघर्ष जोरदार होता. स्वामी बलरामाचार्य कोईंबतुरचे राहणारे. ते रामानुजाचार्य यांच्या संप्रदायातले होते. फैजाबाद जिल्ह्यात, गावा-गावांत फिरून त्यांनी हिंदूंना संघटित केले आणि अकबराच्या काळात वीस आक्रमणे केली. शाही सेनेला या ध्येयवेड्या वीरपुत्रांचे हल्ले सहन झाले नाहीत. रामजन्मभूमीवर कधी त्यांचे तर कधी मोगलांचे प्रभुत्व राही. हा लपंडाव बरीच वर्षे चालू राहिला.

हिंदूंनी तथाकथित बाबरी मशिदीच्या आत एक चबुतरा बनवला. तेव्हा अकबराने आपल्या वडिलांची कूटनीती अमलात आणली. त्याने राजा बिरबल आणि तोडरमल यांना मध्यस्थ केले. आपल्या प्रजेचे मन दुखावू नये म्हणून ‘हिंद’चा बादशाह जलालुद्दीन अकबर याने राजा बिरबल आणि तोडरमल यांच्या सल्ल्यावरून बाबरी मशिदीच्या पुढे चबुतरा बनवून त्यावर छोटेसे राममंदिर उभारण्यास परवानगी दिली आणि कोणाही व्यक्तीने त्यांच्या पूजा-पाठात कोणत्याही प्रकारे प्रतिबंध करू नये असा हुकूमही दिला.

स्वामी बलरामाचार्य आणि सामान्यतः सर्वच हिंदूंच्या साहस आणि शौर्याने प्रभावित होऊन अकबराने तडजोड केली. वस्तुतः अकबराने हिंदूंना ही सवलत दिली, ती बक्षीस म्हणून नव्हे. त्याच्यापुढे दुसरा पर्यायच राहिला नव्हता. जेव्हा जेव्हा संधी सापडेल तेव्हा तेव्हा हिंदू रामजन्मभूमीच्या उद्धारार्थ तुटून पडत.

ही तडजोड जहांगीर आणि शाहजहान या मोगल बादशहांच्या काळापर्यंत चालू राहिली. स्वामी बलरामाचार्य यांनी राणीला रामजन्मभूमीच्या उद्धाराचे जे आश्वासन दिले होते आणि ज्यासाठी त्यांनी विडा उचलला होता ते अंशतः पूर्ण झाले होते. स्वामींना आत्मसंतोष लाभला. सतत युद्ध करत राहण्यामुळे स्वामींचे प्रकृतिस्वास्थ्य बिघडले. प्रयागच्या कुंभ पर्वाच्या वेळी त्रिवेणी संगमाच्या पवित्र तटावर, आपल्या शरीराचा त्याग करून ते परमतत्त्वात विलीन झाले.

क्रमशः

Back to top button