HinduismNewsRSS

संघाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समाजहिताच्या दृष्टीने पंचपरिवर्तनावर होणार चर्चा…

नागपूर, १३ मार्च

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (rashtriya swayamsevak sangh) गेल्या ९९ वर्षांपासून सामाजिक संघटना म्हणून काम करत आहे. पुढील वर्षी २०२५ मध्ये विजयादशमीला संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत शताब्दी वर्षाच्या निमित्ताने कृती आराखड्याबाबत विचारमंथन होणार आहे. १५, १६ आणि १७ मार्च – तीन दिवस चालणाऱ्या अशा बैठकीत संघाच्या, विशेषत: संघाच्या शाखांच्या कार्याचा आढावा घेतला जाईल.

शताब्दी वर्षासाठी संघाने आपल्या कार्याचा विस्तार करण्यासाठी १ लाख शाखांचे उद्दिष्ट ठरवले आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख श्री सुनीलजी आंबेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी व्यासपीठावर पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ.जयंतीभाई भाडेसीया देखील उपस्थित होते. यावेळी संघाचे अखिल भारतीय सह-प्रचार प्रमुखद्वय – श्री नरेंद्र कुमारजी आणि श्री आलोक कुमारजी देखील उपस्थित होते.

२०१८ नंतर सुमारे ६ वर्षांनंतर नागपुरात ही प्रतिनिधी सभा होत आहे, हे विशेष. या बैठकीत संपूर्ण देशातून १५२९ प्रतिनिधींची उपस्थिती अपेक्षित आहे. या बैठकीत ३२ संघप्रणित संघटना आणि काही समूहांचा सहभाग असणार आहे. ज्यामध्ये राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका आदरणीय शांताक्काजी, विश्व हिंदू परिषदेचे श्री आलोक कुमारजी आदी उपस्थित राहणार आहेत. प्रतिनिधी सभेत सामील झालेल्या सर्व संस्था देशभरात सुरू असलेली आपापली कामे आणि त्या भागातील विविध समस्या आणि त्या सोडविण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती देतात, यावर सांगोपांग चर्चा प्रतिनिधिसभेत होते, असे सुनीलजी आंबेकर यांनी सांगितले.

२२ जानेवारीला अयोध्येत श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेने संपूर्ण देशात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही ऐतिहासिक घटना भारतीय दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. यासंदर्भातील प्रस्ताव प्रतिनिधी सभेत मांडला जाणार आहे.

प्रतिनिधी सभेच्या बैठकीत संघाच्या माननीय सरकार्यवाहजींच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून आदरणीय सरसंघचालकांच्या देशव्यापी प्रवासाची योजनाही ठरविण्यात येणार आहे. याशिवाय समाजहिताच्या दृष्टीने बदल घडवून आणण्यासाठी व्यापक विचार या बैठकीत केला जाईल. पंच परिवर्तनांतर्गत सामाजिक समरसता, कौटुंबिक प्रबोधन, पर्यावरण, ‘स्व’ आधारित व्यवस्थेचा आग्रह तसेच नागरी कर्तव्य यांचा समावेश असणार आहे. हे वर्ष अहिल्याबाई होळकर यांची जन्मत्रिशताब्दी आहे. याबाबत संघातर्फे निवेदन देण्यात येणार आहे. ही जन्मत्रिशताब्दी मे २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत साजरी केली जाणार आहे. तसेच या प्रतिनिधीसभेत नव्या अभ्यासक्रमासह आयोजित करण्यात येणाऱ्या संघ शिक्षा वर्गावर देखील चर्चा होणार आहे.

Back to top button