HinduismNewsSpecial Day

समाजाला भक्तिमार्ग दाखवणारे संत संताजी जगनाडे महाराज..

sant jagnade maharaj

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संत संताजी जगनाडे महाराजांनी केले.

संत श्री संताजी जगनाडे महाराजांचा (sant jagnade maharaj) जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील चाकण या गावी इ.स. ८ डिसेंबर १६२४ रोजी आई माथाबाई आणि वडील विठोबा या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे आजोळ मावळ तालुक्यातील सुदुंबरे हे होते. त्यांचे आई वडील हे दोघेही विठ्ठलभक्त होते. त्यामुळे संताजींवर बालपणापासूनच धर्म शास्त्राचे संस्कार झाले होते. लहानपणापासूनच त्यांना कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय होती. त्यामुळे नंतर ते संत तुकाराम महाराजांच्या १४ टाळकऱ्यापैकी एक झाले. संताजी अत्यंत तल्लख बुध्दिमतेचे होते त्यांची निरीक्षणशक्ती अतिशय सूक्ष्म होती.

संताजी महाराजांच्या बालपणीची एक आख्यायिका सांगितली जाते. ते रोज आपल्या आईसोबत गावातील चक्रेश्वर मंदिरात जात असत. त्या मंदिरात अनेकजण आश्रयाला राहत. एके दिवशी एक भुकेने व्याकूळ माणूस त्यांना दिसला. संताजीनी नैवेद्याच ताट त्या भुकेल्या माणसाला दिलं. तो तृप्त झाला. परंतु नैवेद्यासाठी आणलेलं ताट संताजीनी कुणालातरी दिल्याने आई रागावली. त्यावर संताजी म्हणाले कि, ज्याला अन्नाची जास्त गरज आहे त्याला पहिल्यांदा ते दिलं पाहिजे. लहान असतानाच त्यांना जनमानसातील ईश्वराची ओळख झाली होती.

गुरु संत तुकाराम महाराज..

कीर्तनाच्या आणि अभंगाच्या माध्यमातून समाजाला शिकवण देण्याचे,प्रबोधन करण्याचे कार्य संत नेहमीच करत आले आहेत. १७ व्या संत तुकाराम महाराजांची (sant tukaram maharaj) थोर समाजसुधारक आणि अन्यायाविरुद्ध लढणारे लोकनेते म्हणून ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. एके दिवशी संत तुकाराम महाराजांचे संताजींच्या गावात असणाऱ्या चक्रेश्वर मंदिरात कीर्तन होते. ह्या कीर्तनाला गावातली तसेच बाजूच्या गावाहून बरेच लोक आले होते. संताजीही कीर्तन ऐकण्यास गेले होते. संत तुकाराम महाराजांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्या विषयावर पूर्ण कीर्तन केले. त्या किर्तनामुळे संताजींच्या मनावर मोठा प्रभाव पडला आणि त्यांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला. संताजीनी तुकाराम महाराजांची भेट घेतली. तेव्हा तुकाराम महाराजांनी संसार करत असताना परमार्थहि साधता येतो हे समजावून सांगितला.

“ज्याने गुरु नाही केला, त्याचा जन्म वाया गेला” आपण अजूनपर्यंत गुरु केला नाही. गुरु शिवाय मार्ग मिळत नाही, गुरुशिवाय तरणोपाय नाही म्हणून त्यांनी संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानले. तेव्हापासून संत जगनाडे महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात टाळ वाजवीत होते. संत तुकाराम महाराजांचे १४ टाळकरी होते त्यापैकी एक म्हणजे संत संताजी महाराज. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली.

संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे लिखाण गंगाधर मवाळ आणि संताजी जगनाडे तेली हे करीत होते. संत तुकाराम महाराजांनी आपल्या शिष्यास म्हणजे संताजी आणि गंगाधर मावळ यांना भगवान शिवाचे दर्शन करून दिले,अशी आख्यायिका सांगितली जाते.

अभंगाच्या गाथांचे पुनर्लेखन..

तुकाराम महाराजांनी रचलेल्या अभंगाची गाथा रामेश्वर भट्टानी इंद्रायणीत बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ती अभंगाची गाथा पुनर्लिखित केली.

तुकाराम महाराजांचे वंशज गोपाळबाबा मोरे यांनी म्हंटले आहे,

“संताजी तेली बहु प्रेमळ | अभंग लिहित वसे जवळ |

धन्य त्याचे सबळ | सांग सर्वकाळ तुक्याचा | “

संताजींच्या अथक परिश्रमामुळेच तुकारामांची अभंगाची गाथा जिवंत राहू शकली, असे म्हंटले आहे.

साहित्य..

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संत संताजी जगनाडे महाराजांनी केले. संताजी महाराजांनी ‘तेलसिंधु, ‘शंकरदीपिका’, ‘योगाची वाट’, ‘निर्गुणाचा नावाचे ग्रंथ लिहिले. त्यांनी सिंधु या ग्रंथातून तेलाच्या व्यवसायाची माहिती दिलेली आहे. तेलाच्या व्यवसायातील अनेक रूपके, उपमा, अलंकार व चित्रण त्यांच्या अभंगातून झळकत..

“आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा | नंदी जोडीयेला मन पवनाचा ||

भक्ती हो भावाची लाट टाकीयीली। शांती शिळा ठेविली विवेकावरी।”

मार्गशीष वद्य त्रयोदशी इ.स. १६८८ साली संताजी महाराजांनी देह ठेवला. जगद्गुरू संत तुकारामांनी संताजींना शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन दिले होते. परंतु संत तुकाराम महाराज जगनाडे महाराजांच्या आधीच वैकुंठाला गेले होते. ज्यावेळी संताजींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते त्यांचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले.जेव्हा तुकारामांनी ३ मुठी माती संताजींच्या डोक्यावर टाकली तेव्हा संताजींचे डोके आत गेले.

“चारिता गोधन, माझे गुंतले वचन ||

आम्हा झाले येणे एका तेलीया कारणे।

तीन मुष्ठी मृतिका देख, तेव्हा लोपविले मुख ||

आलो म्हणजे तुका, संतु न्यावया विष्णु लोका।।”

एका ज्ञानसाधकाच्या, प्रबोधनकाराच्या, तत्त्ववेत्त्याच्या ऐहिक आयुष्याला जरी मर्यादा असली तरी, त्यांच कार्य अमर्याद, असीम, अभंग आणि अखंडच असतं. समाजाचा भक्तिमार्ग प्रशस्त करणाऱ्या संत जगनाडे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन…

Back to top button