HinduismRSS

परमवैभवी देशासाठी रा. स्व. संघाचा सुदैवी जन्म(लेखमाला – विश्वगुरु भारत – भाग 10)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, अनुशीलन समितीसारखी क्रांतिकारी संघटना, ३० अन्य लहान मोठ्या संस्था-संघटना, गांधीजींची सत्याग्रह चळवळ आणि  एका वर्षाचा कठोर कारावास असा सार्वजनिक जीवनातला भरभक्कम अनुभव घेतल्यानंतर त्या अनुभवाच्या आधारे डॉक्टर हेडगेवारांनी ऐतिहासिक, बलशाली आणि स्वयंपूर्ण अशा हिंदू संघटनेला साकार रुप देण्याचा निर्णय घेतला. २७ सप्टेंबर १९२५ रोजी विजयादशमीच्या दिवशी त्यांनी आपल्या काही अंतःस्थ मित्रांना घरी बोलावले. या बैठकीतच परकीय शासकांना हाकलून देण्यासाठी पूर्णपणे स्वदेशी संघटनेची स्थापना झाली असल्याचे त्यांनी जाहीर केले. आपण आज संघ स्थापन करीत आहोत, ते म्हणाले. आज निःस्वार्थी सेवा देणाऱ्या जगातल्या सर्वांत मोठ्या स्वयंसेवी राष्ट्रवादी शक्तीमध्ये जिचा विस्तार झाला आहे, अशा संघटनेची ही पहिलीच बैठक/शाखा होती असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

रा. स्व. संघाची निर्मिती – निर्विवादपणे सुसंघटित हिंदू संघटनासगळ्यांची मते ऐकून घेतल्यानंतर, आपल्या तोलून-मापून वापरलेल्या मोजक्या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचा हेतू विषद करताना डॉ. हेडगेवार म्हणाले की, आपण सर्वांनी शारिरीक तंदुरुस्ती, पारंपरिक एकल युद्ध कला (मार्शल आर्ट), उत्तम प्रशासन, मनुष्यबळ व्यवस्थापन अशा अनेक विषयांत प्रशिक्षण घेऊन इतरांनाही असे प्रशिक्षण देण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. डॉक्टरांचे ते छोटेसे भाषण अर्थगर्भ होते. इतरांना प्रशिक्षण देण्याआधी आपण स्वतः प्रशिक्षित व्हायला हवे, असा त्याचा अर्थ होता. डॉक्टरांनी नाव, घटना, ध्वज, कार्यालय, निधी व हिशेब व्यवस्थापन, पदे  अशा कोणत्याही बाबतीत कोणत्याही संस्था वा संघटनेचे अनुसरण केले नाही. संघाची स्थापना एका खोलीत झाली आणि कार्य खुल्या मैदानात सुरू झाले. राष्ट्रउभारणीच्या कार्यासाठी विजयादशमीच्या शुभदिनी त्यांनी संघाची सुरुवात केली. एक मोठे आणि ठोस पाऊल उचलून त्यांनी ब्रिटिश साम्राज्यवादाला आव्हान दिले. हिंदू समाजाच्या एकत्रिकरणासाठी डॉक्टरांना विरोधाभास, स्वार्थीपणा, सुस्तपणा, तिरस्करणीय वर्तणूक आणि अंधश्रद्धा यांच्या जंजाळातून मार्ग काढावा लागला. हिंदू समाजाला त्यांनी उत्क्रांतीच्या संपन्न मार्गावर नेले आणि त्यानेच पुढे परकीय शासकांना, क्रूर प्रशासकांना आणि आपल्यातील गद्दारांना विरोध केला.

विजयादशमीच्या शुभदिनी शक्तिशाली वटवृक्षाचे बीजरोपण करण्यामागेही काही कारण आणि अर्थ होता. स्वयंसेवकांना सुरुवातीला वेगवेगळ्या आखाड्यांत जाऊन व्यायाम करण्यास सांगण्यात आले. नंतर दर रविवारी स्वयंसेवक मैदानावर जमू लागले. निवृत्त लष्करी अधिकारी मार्तंडराव जोग हे त्यांना लष्करी प्रशिक्षण देऊ लागले. कालांतराने आठवड्यातून दोन वेळा प्रशिक्षण आणि कार्यशाळा असे स्वरुप देण्यात आले. डॉ. हेडगेवार आणि अन्य मान्यवर या कार्यशाळांमध्ये व्याख्याने देऊ लागले. हे प्रशिक्षण आणि कार्यशाळा नंतर शिक्षा वर्ग आणि बौद्धिक वर्गांमध्ये विकसीत झाल्या.

१७ एप्रिल १९२६ रोजी डॉ. हेडगेवार यांच्या घरी एक बैठक झाली ज्यात २६ जण सहभागी झाले होते. त्या बैठकीत संघटनेचे नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे निश्चित करण्यात आले. संपूर्ण स्वातंत्र्य आणि  राष्ट्राचा सर्वांगीण विकास साध्य करण्याची गुरुकिल्ली शक्तिशाली सुसंघटित हिंदू समाजामध्येच आहे, असे प्रतिपादन डॉक्टरांनी या बैठकीत केले. वेगवेगळ्या परस्परविरोधी वाटणाऱ्या परंपरा, संस्कृती आणि आस्था यांवरून परस्परांना सतत विरोध करत राहणारे लोक राष्ट्रउभारणी करू शकणार नाहीत, असेही ते म्हणाले.

आस्था, संस्कृती, देश, भाषा आणि इतिहास याबाबत आपण कायमच एक होतो हे ओळखणे आणि एकच राहायला हवे याचा दृढ निर्धार व सखोल आंतरिक विवेकातून उमलणारा एकात्मबोध हा आपल्या राष्ट्राचा पाया आहे.
डॉक्टरजी आपल्या व्याख्यानांत नेहमी सांगत असत की, संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या कार्यकर्त्यांच्या समुहाने राष्ट्रवादी भावना निर्माण करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतूनच समाजाला भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांची उत्तरे मिळतील. भारतभर संघाचा प्रसार करण्यासाठी असे स्वयंसेवक तयार करायचे होते. त्यासाठी डॉ. हेडगेवारांनी देशभक्ती आणि राष्ट्रवादाच्या उच्च परंपरांचे वहन करतानाच त्यांचे संतुलितपणे शारिरीक आणि मानसिक बलवर्धन होऊ शकेल, अशी यंत्रणा उभी केली. १९२८च्या मार्च महिन्यात ते स्वयंसेवकांना घेऊन जवळच्या एका टेकडीवर गेले आणि तिथे भगव्या ध्वजासमोर प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यक्रमातील डॉक्टरांचे छोटेखानी भाषण स्वातंत्र्य चळवळीतील डॉ. हेडगेवारांच्या भूमिकेबद्दल नंतर सातत्याने प्रश्न विचारत राहणाऱ्यांना गप्प बसविणारे ठरेल.

या भाषणात ते म्हणाले – आपला उद्देश आहे संपूर्ण स्वातंत्र्य. संघाची निर्मितीच या पवित्र ध्येयसाधनाच्या हेतूने झाली आहे. 


ताठ उभे राहून प्रतिज्ञा घेताना स्वयंसेवक म्हणत होते –  देशाच्या स्वातंत्र्यासाठी तन, मन, धनपूर्वक शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहण्याची प्रतिज्ञा मी घेतो. हे काम अविरतपणे मनापासून करीत राहण्याची प्रतिज्ञा मी घेतो.

संघाचे जाळे विस्तारण्यासाठी आणि एकत्रिकरणासाठी युवा प्रचारक  
संघाचे जाळे विविध राज्यांमध्ये विस्तारण्याकरिता डॉक्टरांनी युवा स्वयंसेवकांना विविध राज्यांमधील विद्यापीठांत शिक्षण घेण्यास सांगितले. अनेक स्वयंसेवक उत्तर प्रदेश, बंगाल, पंजाब आणि दिल्लीत विद्यार्थी प्रचारक म्हणून गेले. भाषा, पैशाची चणचण, रात्रीचा निवारा आणि अन्न अशा अनेरक आव्हानांना या विद्यार्थी प्रचारकांनी तोंड दिले. हसतमुखाने या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाताना त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्राच्या वेदीवर समर्पित केले. डॉ. हेडगेवारांच्या अनुभवी नजरेने ज्यांची निवड केली होती अशा या अत्यंत कुशाग्रबुद्धीच्या तरुणांनी सर्व प्रकारच्या विपरीत परिस्थितीला तोंड देत, साऱ्या सांसारिक सुखांकडे पाठ फिरवीत त्यांच्यावर सोपविलेली कामे यशस्वीपणे पार पाडण्याचा चमत्कार कसा करून दाखविला.

काँग्रेस, सशस्त्र क्रांतिकारक, हिंदू समाज, हिंदू महासभा आणि अन्य जवळपास ५० वेगवेगळ्या संघटनांत काम करता करता डॉक्टरांनी भारतभरात स्रोत आणि व्यक्तींची एक साखळी तयार केली हे आवर्जून नमूद करायला हवे. देशाच्या वेगवेगळ्या भागातील आपल्या सहकाऱ्यांकडे या तरुण उपदेशकांना त्यांनी ओळखपत्रासह पाठवले. हे प्रचारक भगवी वस्त्रे धारण करणाऱ्या संतांपेक्षा कमी नव्हते. जाळे विस्तारण्याची ही पद्धत अत्यंत वेगळी आणि अभूतपूर्व अशीच होती. स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ आणि महर्षि अरविंद घोष यांच्या तरुण तपस्वीवृंद तयार करण्याच्या स्वप्नाला प्रत्यक्ष रूप दिले ते डॉ. हेडगेवार यांनी.

आपले कुटुंब, घर सोडून आलेल्या, अविवाहित राहिलेल्या युवा प्रचारकांचे मनोबल वाढविण्यासाठी पत्र लिहित असत. विविध राज्यांमध्ये राहणाऱ्या प्रचारकांसाठी या पत्रांमधील संदेश हा कृष्णाने कर्मविन्मुख झालेल्या अर्जुनाला त्याच्या कर्तव्याचे स्मरण करून देण्यासाठी केलेल्या उपदेशासमानच होता. डॉ. हेडगेवार यांनी प्रचारकांना राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी असलेल्या कर्तव्यासाठी प्रेरित केले.

आपल्या पत्रांतून ते लिहीत – संयम बाळगा, समस्यांचा आशीर्वादाप्रमाणे स्वीकार करा, देशाला हिंदू संघटनेची मोठी आवश्यकता आहे. आपण पुढाकार घेतला नाही तर कोण घेईल, आपले काम ईश्वरप्रेरित आहे, मनोबल खचू देऊ नका, संयम ठेवा, सगळ्यांशी प्रेमाने आणि करुणेने वागा. या पत्रांनी प्रचारकांना मार्गदर्शन केले आणि स्थानिक त्रास तसेच अन्य समस्यांच्या विरूद्ध ठामपणे उभे केले. त्यांनी संघाचे कार्य दृढ केले, त्याचप्रमाणे सांस्कृतिक व देशभक्तीच्या मूल्यांची तरुणांमध्ये रुजवण केली जेणेकरुन त्यांना संघाचे कार्य विविध जिल्ह्यांत व तालुका स्तरावर नेता येईल. संघाचे कार्य देशभरात पसरविण्यासाठी कोणतीही जादुई छडी नव्हती. डॉ. हेडगेवार यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आणि वत्सल प्रेम यामुळे प्रचारकांचे रुपांतर साध्या कपड्यांतील साधूंमध्ये झाले, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले.

देशासाठी सर्वस्व समर्पित करण्याची प्रेरणा
एकीकडे संघाचा व्याप वाढत असतानाही डॉ. हेडगेवार यांनी काँग्रेसमधील आंदोलनांचा त्याग नाही केला. उलट स्वयंसेवकांना त्या आंदोलनांत सहभागी होण्यास सुचवले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी उचललेले कोणतेही पाऊल हे त्याच्या अस्तित्व आणि प्रतिष्ठेच्या लढ्यासाठी उचललेले पाऊल आहे, असे त्यांचे मत होते. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी कार्यरत सर्व संघटना आणि पक्षांनी आपले भेदाभेद विसरून एकत्र आले पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते. वस्तुतः स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या साथीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. डॉ. हेडगेवार यांचा हेतू राजकीय व्याप्तीपलिकडे, एका बलशाली आणि समृद्ध राष्ट्राच्या स्थापनेचा होता. हा हेतू संपूर्ण स्वातंत्र्याशिवाय साध्य होणार नव्हता.  

१९२९साली वर्धा येथे झालेल्या संघाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाच्या वेळी डॉ हेडगेवार म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळेल असे आश्वासन ब्रिटिश सरकारने अनेकदा दिले. पण ते खोटे आश्वासनच असल्याचे सिद्ध झाले. आता भारत स्वतःच्या ताकदीवर स्वातंत्र्य मिळवेल हे स्पष्ट आहे.

स्वयंसेवकांनी आपले अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी ठेवावी अशी घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली.

पुढे चालू.

Back to top button