CultureEnvironment

कौतुकास्पद! दोन वर्षांत वाचवले २९ कोटी लीटर पाणी

‘माझ्या शेतातील ऊस कधीही कमरेपेक्षा जास्त उंचीचा झाला नव्हता, पण या वर्षी तो माझ्या डोक्याच्याही वर गेला आहे. जमीन खोदणं आणि त्याच्यावर बंधारे बांधणं याने काही उपयोग होणार नाही असं येथील अनेकांना वाटत होतं. पण यामागे शास्त्रीय आधार आहे हे त्यांच्या लक्षात येत नव्हतं’, सुनंदा चव्हाण सांगत होत्या.

आपले गाव जलसमृद्ध झालेलं पाहून आता त्या गावकऱ्यांना पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देण्याची विनंती करतात. पाणी उपलब्ध असले तरी ते मूल्यवान आहे. त्याचा उपयोग हा लक्षपूर्वकच व्हायला हवा, असेही त्या सांगतात.  

२००८ ते २०१४ या काळात दत्तात्रेय खराडे यांनी आपल्या अडीच एकराच्या जागेत आठ ठिकाणी बोअरवेल खणले. त्यातील सात आटल्या. पण गेल्या दोन वर्षांत त्या बोअरवेलना अपेक्षेपेक्षा जास्त पाणी लागले आहे. ५० वर्षांचे सातारा जिल्ह्यात राहणारे खराडे सांगतात की आपल्या संपूर्ण आयुष्यात बोअरवेलना एवढे पाणी लागलेले त्यांनी पाहिले नव्हते. ही साताऱ्यातील त्या गावांमधील दोन प्रातिनिधिक उदाहरणे झाली. गेल्या काही वर्षांत इतकी सुधारणा होण्याइतके गावांत असे काय घडले असेल?

तब्बल ३५०० गावकऱ्यांनी एकत्र येऊन कष्टपूर्वक पाणी अडवा, पाणी जिरवाचा प्रकल्प राबवला आणि भूजलस्तरही कमालीचा वाढला.

साताऱ्यातील दहीगाव आणि त्याच्या १०० किमी परिघातील अन्य गावे प्रखर दुष्काळाला तोंड देत होती. त्यामुळे उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीतील प्रयोग दूरच राहिले, पारंपरिक पीकांसाठीही त्यांना वरूणराजाची प्रार्थना करावी लागत होती.  पण त्याच गावातले मनुष्यबळ अर्थात एचआर व्यायसायिक योगेश चव्हाण यांनी ही परिस्थिती बदलण्याचा निश्चय केला.

पुण्यात एचआर म्हणून काम करत असल्याने माझ्याकडे गावातल्या तरुणांचे अनेक नोकरीचे अर्ज येत असतात. पण स्पर्धा आणि मर्यादित जागा यामुळे अनेकदा मला त्यांना मदत करता येत नाही, योगेश सांगतात.

पण स्थानिक तरुणांसाठी काहीतरी करायचेच ज्याने त्यांच्यासाठी गावातच रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा निर्णय २०१६ साली गावात येत असतानाच त्यांनी केला होता. योगेश यांनी दत्तात्रेय आणि अन्य काही मित्रांना सोबत घेऊन स्मशानाच्या जागेत पाणी अडवा, पाणी जिरवा प्रकल्प सुरू केला. स्मशानासारख्या छत नसलेल्या, उजाड जागेत प्रकल्प सुरू करण्याची कल्पना अशीच होती की तिथे अंत्यविधीकरिता येणाऱ्या माणसाने स्वतःच्याही घरी तसा प्रकल्प सुरू करावा.

या प्रकल्पाकरिता प्रथम एक शेड बांधण्यात आली. एनएनएसच्या विद्यार्थ्यांनी गावात येऊन शेडचे महत्त्वपूर्ण काम करून दिले. पावसाचे पाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आला. नैसर्गिक पद्धतीने पाणी गाळलेले आणि छोट्या छोट्या टाक्यांमध्ये साठवलेले पाणी बोअरवेलमध्ये सोडण्यात आले.

त्यानंतरच्या मान्सूनमध्ये स्मशानात उभ्या राहिलेल्या या प्रकल्पामुळे एका विहिरीच्या जलपातळीत वाढ झालेली दिसून आली. छोट्याशा प्रयत्नात मिळालेले हे यश पाहून हा प्रकल्प अन्य चार घरांमध्ये राबविण्यात आला.

२०१७ योगेश यांच्या ग्रूपने आणि जलसंधारणाची जाणीव झालेल्या काही गावकऱ्यांनी मिळून हा प्रकल्प मोठ्या मोहिमेच्या रुपात सुरू करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी मिळून तब्बल १८ लाख रुपये गोळा केले. त्याचप्रमाणे स्थानिक संस्थांकडून देणग्यांची मदतही मिळविण्यात आली.

काही मंडळींनी स्वयंसेवक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नदीच्या ८०० मीटरच्या पट्ट्यात पाणी साठवणीची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने पात्र रुंदीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.

योगेश यांनी सीएसआरअंतर्गत २५ लाख रुपयांची देणगी कॉर्पोरेट कंपन्यांकडून मिळवली. जलसंधारणाच्या प्रकल्पनाचे परिणाम तात्काळ दिसून येतील असे नाही त्यामुळे कंपन्यांनी यावर विश्वास ठेवला नाही. हा विश्वास मिळवणे आणि सरकारी प्रक्रिया या दोन्ही मोठ्या अडचणी होत्या.

२०१९च्या उन्हाळ्यात आम्ही पात्र रुंदीकरणाचे काम हाती घेतले. नदीला येऊन मिळणाऱ्या ३ कनालांवरील १७ बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे आणि कलसाठवण क्षमता वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले. या सर्व कामामुळे जलपातळी ५० टक्क्यांनी वाढली. जलसंधारणाचे काम गावात नदी प्रवेश करते तिथपासून जिथे गावातला प्रवाह संपतो तिथपर्यंत करण्यात आले असे योगेश सांगतात.

सीएसआर निधी, इंजिनिअर्स, तज्ज्ञ आणि स्वयंसेवक असे सगळे जोडले गेले होते. तज्ज्ञांनी शास्त्रीय दृष्टीकोनातून मापे, गणितीय मोजमाप याची जबाबदारी घेतली. इंजीनिअर्सनी ७५,५५३ चौरस मीटरवर काम करून २९ कोटी लीटर पाणी वाचवले. जलाशय आणि बांधकामाची एकूण खोली ३.८५ मीटर होती, असे योगेश म्हणाले.

दत्तात्रेय म्हणाले, सुदैवाने यंदा भरपूर पाऊस भरपूर झाला. पावसाच्या पाण्याने विहिरी भरी लागल्या. पूर्वी जिथे ६०-७० फुटावर पाणी असे ते ३० फुटांपर्यंत आले. बोअरवेलमधील पाणी १५० फुटांवरून वाढून ७० फुटांवर आले.

विशेष म्हणजे ग्रामस्थांनी केवळ आपल्या दहिगावसाठी कष्ट केले नाहीत. आसपासच्या देऊर, अंपटवाडी आणि घिगेवाडीमधील पाण्याची पातळी वाढण्यासाठीही मनःपूर्वक प्रयत्न केले.

या प्रकल्पामुळे येत्या काळात शेतकऱ्यांना जास्तीतजास्त जमिनीवर पिके घेणे, सिंचन करणे आणि जलपंपाचा वापर करून शुष्क जमीन ओलिताखाली आणणे शक्य होणार आहे. माझ्या वंशपरंपरागत शेतीत २०१३पासून जलपंप शुष्क झाले होते कारण जमिनीत पाणीच शिल्लक नव्हते. पण गेल्या दोन वर्षांत आम्हाला २४ तास पाणी उपलब्ध होत आहे, योगेश सांगत होते.

यंदा गावातील मुले प्रथमच सेंद्रिय शेतीचा प्रयोग करूत आहेत. आम्ही उत्पादक आणि ग्राहक अशी साखळी तयार करण्याचाही प्रयत्न करीत आहोत. पाण्याच्या उपलब्धतेने तरुणांचे शहराकडील स्थलांतर कमी होईल आणि गावातच त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

सौजन्य – द बेटर इंडिया

Back to top button