NewsPolitics

कोरोनासंबंधित नियमावलीला हरताळ फासत वनमंत्री संजय राठोड यांचे शक्तिप्रदर्शन

वाशिम, दि. २३ फेब्रुवारी – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड मंगळवारी प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर आले. अज्ञातवासातून बाहेर येऊन पोहरादेवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. कोरोना नियमावलीचे नियम धाब्यावर बसवून वनमंत्री संजय राठोड यांनी शक्तिप्रदर्शन केले. राज्यात पुन्हा एकदा कोरोना गंभीर रूप धारण करीत असताना यावेळी मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचे पुरते बारा वाजलेले दिसून आले.

पूजा चव्हाण प्रकरणी अनेक आरोप होत असूनही वनमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. त्यामुळे विरोधी पक्षानेही आक्रमक होत त्यांच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. पत्रकार परिषदेत राठोड म्हणाले की, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी राजकारण केले जात आहे. गोर बंजारा समाजातील पूजाचा मृत्यू झाला याचे आम्हालाही दुःख आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले असून त्यातून सत्य बाहेर येईल यावर आपण विश्वास ठेवावा. या मृत्युवरून सुरू असलेले राजकारण निंदनीय असल्याचे ते म्हणाले. मी ओबीसींचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझे राजकीय जीवन उध्वस्त करण्याचा हा घाणेरडा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. राठोड यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले तेव्हा त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाच्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता तरीही राठोड यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते.

भाजपा नेते अतुल भातखळकर या बाबत म्हणाले की, बरेच दिवस गायब असणाऱ्या वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर जगासमोर येण्यास ‘गजा मारणे’ मार्ग अनुसरावा लागला.

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत राठोड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केलेल्या पापाची कबुली द्यायला अखेर १५ दिवसानंतर बंजारा समाजाची काशी असणाऱ्या पवित्र “पोहरादेवी”मंदिरात पूजा चव्हाणचा हत्यारा संजय राठोड यांची हजेरी, अशा शब्दात त्यांनी आपला रोष ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

**

Back to top button