NewsRSS

संघ समाजजागृतीसाठी सामाजिक-धार्मिक संघटनांना सोबत घेणार – अरुण कुमार

बंगळुरू, दि. १७ मार्च – समाजात कार्यरत धार्मिक तसेच सामाजिक संघटनांना सोबत घेऊन समाजव्यापी, राष्ट्रव्यापी सामाजिक शक्ती उभी करणे हे संघाचे लक्ष्य आहे. समाजाच्या सामूहिक शक्तीच्या जागृतीचे कार्य संघ करत आहे. देशासाठी, समाजासाठी समविचारी व्यक्ती, संघटना यांना सोबत घेण्यासाठी संघ प्रयत्नशील असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरूण कुमार यांनी येथे केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभा येत्या १९ व २० मार्च रोजी येथील जनसेवा विद्या केंद्र येथे संपन्न होत आहे. याबाबत पत्रकारांना माहिती देताना ते बोलत होते.

ते म्हणाले की, कोरोनाच्या कालंखंडात संघाचे दैनंदिन उपक्रम जरी कमी असते तरी स्वयंसेवक, कार्यकर्ते यांचा समाजाशी मोठ्या प्रमाणात संपर्क होता. या काळात अनेक सामाजिक-धार्मिक संघटना, समाजासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्ती आमच्या संपर्कात आल्या, आमच्याशी जोडल्या गेल्या. आम्ही या काळात अनेक नव्या ठिकाणी पोहोचलो. हे सर्व लक्षात घेऊन या सर्वांना सोबत घेऊन समाजाच्या जागृतीसाठी काय काय करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा होईल.

दर तीन वर्षांनी आम्ही आपल्या कार्याची समीक्षा करतो. मागील तीन वर्षांत संघकार्याचा विस्तार, ग्रामविकास, पर्यावरण संरक्षण(विशेषतः जलसंरक्षण, वृक्षारोपण, प्लास्टिकचा कमीत कमी वापर), सामाजिक परिवर्तनाचा विचार करून योजना आखली होती. प्रतिनिधी सभेत गेल्या तीन वर्षांत झालेल्या आपण किती प्रगती केली, सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात किती प्रगती केली याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होईल. त्याचप्रमाणे येत्या तीन वर्षांच्या योजनेबाबत, आपली दिशा कशी असावी याबाबतही चर्चा होईल.

ते म्हणाले की, संघाने आपल्या दृष्टीने ६० हजार मंडल, ६० हजार वस्त्या तयार केल्या आहेत. यांपैकी ६५ हजार स्थानांवर संघ पोहोचला आहे. या स्थानांवरील प्रत्येक कुटुंबांपर्यंत संघकार्य पोहोचावे असाच संघाचा प्रयत्न आहे.

बंगळुरूमध्ये १९ आणि २० या काळात प्रतिनिधी सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज, १७ मार्च संध्याकाळपासून उद्या संध्याकाळपर्यंत कार्यकारी मंडळाची बैठक असेल. अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ही संघाची निर्णय घेणारी सर्वात महत्त्वाची बैठक आहे. महत्त्वाचे सर्व निर्णय प्रतिनिधी सभेतच घेतले जातात.  

मागील वर्षी प्रतिनिधी सभा बंगळुरू येथे होणार होती. मात्र बदललेल्या परिस्थितीमुळे ती स्थगित करण्यात आली. त्यामुळे या वर्षी बंगळुरूमध्येच सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनामुळे संघाच्या नियमित कार्यावर परिणाम झाला. मात्र संघ सरकारी नियमांचे पालन करत आला आहे. त्यामुळे संघाने आपली प्रांत प्रचारक बैठकही रद्द केली व कार्यकारी मंडळाची बैठकदेखील एका ठिकाणी घेण्याऐवजी ११ वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आली.

प्रतिनिधी सभेत १५०० व्यक्ती अपेक्षित असतात. परंतु कोरोनाचे सावट अद्याप दूर झालेले नाही. हे लक्षात घेऊन केवळ ४५० व्यक्तींनाच या बैठकीत सहभागी होता येणार आहे. त्याचप्रमाणे तीन दिवसांऐवजी दोन दिवसांचीच बैठक आयोजित करण्यात आली आहे. संघाने कार्याच्या दृष्टीने ४४ प्रांत तयार केले आहेत. या प्रांताचे निवडून आलेले प्रतिनिधी आणि अन्य सुमारे एक हजार व्यक्ती ४४ स्थानांहून ऑनलाईन माध्यमातून बैठकीत सहभागी होणार आहेत, असेही अरुणकुमार म्हणाले.

ते म्हणाले की, दर तीन वर्षांनी सरकार्यवाहांची निवड केली केली जाते. १९ मार्च रोजी सकाळी प्रतिनिधी सभेस सुरुवात होईल. पहिल्या सत्रास साडेआठ वाजता सुरुवात होईल. नऊ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य या पत्रकार परिषदेस संबोधित करतील. वार्षिक प्रतिवेदनासह प्रस्तावांचीही माहिती ते यावेळी देतील. दुसऱ्या सत्रास सरकार्यवाहांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल.

**

Back to top button