CultureHinduism

भारतातील शिवालयांमागील वैज्ञानिक सत्य

भारतात अनेक शिवमंदिरे आहेत. उत्तरेतील केदारनाथापासून दक्षिणेतील रामेश्वरमपर्यंत आणि पूर्वेकडील आसामपासून पश्चिमेकडील गुजरातपर्यंत सर्वत्र अत्यंत पवित्र मानली जाणारी शिवमंदिरे आहेत. दर महिन्यात शिवरात्रीला तेथे उत्सव होत असतात. माघ वद्य त्रयोदशी किंवा चतुर्दशीला महाशिवरात्री निमित्त सर्वत्र मोठमोठ्या जत्रा भरत असतात. त्यातील एक आहे महाकालेश्वर मंदीर.

मध्यप्रदेशातील उज्जयनी नगरीतील महाकालेश्वर मंदीर हे एक पवित्र धार्मिक स्थान असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी महत्वाचे ज्योतिर्लिंग आहे हे आपल्याला माहित आहे. पण हे मंदिर एके काळी खगोलशास्त्राच्या दृष्टीने संपूर्ण जगात महत्वाचे मानले जात होते, हे फारच कमी लोकांना माहित आहे. हे ज्योतिर्लिंग एकेकाळी पृथ्वीवरील कालगणनेचा, म्हणजे ज्याला आज standard time म्हणतात त्याचा आरंभ बिंदू होता, ह्याला आता जगात मान्यता मिळत आहे.

आजच्या आधुनिक काळात आपण रेखांशाच्या माध्यमातून पृथ्वीवरील विविध समय क्षेत्रांचा विचार करतो.आज या रेखांशाचा प्रारम्भबिंदू लंडनमधून जातो असे मानले जाते.त्याला ग्रीनिच मीन टाईम किंवा GMT असे म्हणतात.

ग्रीनिच रेखांश वेळ

लंडनच्या अगदी जवळ एका टेकडीवर एक वेधशाळा आहे.त्या वेधशाळेत एक छोटीशी रेघ आखलेली आहे. ती रेघ शून्य अंश रेखांश दर्शवते. त्या रेषेला आधार मानून आजची कालगणना केली जाते.

काही शतकांपूर्वी लंडन किंवा इंग्लंड जगातील सर्वात प्रबळ शक्ती केंद्र मानले जात होते.काही शतकांपूर्वी जसे इंग्लंड हे जगाचे शक्तीकेंद्र होते तसेच काही हजार वर्षांपूर्वी भारत हे जगाचे शक्तीकेंद्र होते. इ.स.१६०० च्या अनेक शतके आधी संपूर्ण जग भारतावर ज्ञान,धन,वस्त्रे,धातुशास्त्र,मसाले, नीळ, संस्कृती, समुद्री मार्ग, व्यापार या सारख्या अनेक गोष्टींसाठी अवलंबून होते.भारताच्या अशा सर्वच क्षेत्रातील वर्चस्वामुळे इ.स. १८८४ पर्यंत मुख्य रेखांश म्हणजे शून्य रेखांश भारतातूनच जातो असे मानले जात होते. त्या काळातील शून्य रेखांश अवंतिका नगरीतून -जिला आज उज्जैन नावाने ओळखतात- जातो असे मानले जात असे.

उत्तर ध्रुवापासून सुरू होउन उज्जैन नगरीतून दक्षिण धृवापर्यंत जाणाऱ्या या रेखांशाची चर्चा आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कराचार्य यां सारख्या अनेक शास्त्रज्ञांनी केलेली आढळते. इ. स. ८७ ते १५० मध्ये होउन गेलेला टोलेमी नामक ग्रीक शास्त्रज्ञसुद्धा असाच विचार मांडताना आढळतो.टोलेमीने आपल्या नकाशात उज्जैनचा उल्लेख ozene असा करून ती तो पर्यंत ज्ञात असलेल्या जगातली सर्वात मोठी दिशादर्शक नगरी आहे असे म्हटले आहे.

मध्ययुगीन भारतात भास्कराचार्य आपल्या ‘लघु भास्करीयं’ या ग्रंथातल्या पहिल्या अध्यायातील २३व्या श्लोकात लिहितात,

लङ्कावत्स्यपुरावन्तीस्थानेश्वरसुरालयान

अवगाह्य स्थिता रेखा देशान्तरविधायिनी

जी रेषा लंका, वात्सपूर, अवंती मधून निघून हिमालय, सुरालयापर्यंतजाते, ती अंतरराष्ट्रीय याम्योत्तर आहे.

इ.स. ५३० मध्ये वराहमिहिर यांनी आपल्या ‘पंच सिद्धान्तिका’ या ग्रंथातील श्लोक ९-१० मध्ये कालगणनेबद्दल लिहिले आहे :-

पञ्चाशता त्रिभिस्त्रयंशसंयुतैर्योजनैश्च नान्येका

समपूर्व पश्चिमस्थैर्नित्यं शोध्या च देया च

म्हणजे उज्जैनी नगरीच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडे रहाणाऱ्या लोकांनी प्रत्येक ५३ पूर्णांक एक तृतीयांश योजन अंतरासाठी १ नाडी कमी किंवा जास्त करावी.

या सर्वांतून हेच स्पष्ट होते की उत्तर व दक्षिण ध्रुवाला जोडणारे व उज्जैन मधून जाणारे रेखा-वृत्त हे त्या काळातले मुख्य रेखा-वृत्त होते.ज्या प्रमाणे आज ग्रीनिच येथील वेधशाळा हे आजचे मुख्य रेखावृत्त आहे,त्याचप्रमाणे उज्जैन येथील महाकाळेश्वर मंदीर हे भारतातील मुख्य रेखावृत्त होते. हे मंदिर व तेथे स्थापित देवतेचे महाकालेश्वर हे नाव अगदी यथार्थ आहे.

महा म्हणजे मोठा, काळ म्हणजे समय आणि ईश्वर म्हणजे नियंत्रण करणारा.याचाच अर्थ उज्जैन येथील महाकाळेश्वर मंदिर हे संपूर्ण पृथ्वीवरील समय गणनेचे नियंत्रण केंद्र होते.

या नंतरची महत्वपूर्ण बाब म्हणजे या रेखांशावरील अन्य गावे सोडून उज्जैन या शहराचीच निवड का केली असेल? भारतातून जाणारे कर्क-वृत्त याच ठिकाणी रेखावृत्ताला छेदते हे या मागील कारण आहे.सूर्याच्या दक्षिणायन व उत्तरायण यांची मर्यादा दक्षिणेत मकर वृत्ताने तर उत्तरेत कर्क वृत्ताने निश्चित होते. हे कर्क वृत्त उज्जैनमधून जाते.

त्यामुळे या नगरीत भारतातील वेधशाळा होती आणि येथील खगोल शास्त्रातील प्रगत सिद्धांतांमुळेच दिशांचे व अंतरांचे योग्य ज्ञान मिळवून येथील व्यापारी संपूर्ण जगात आपली गलबते घेऊन संचार करत होते.

हे जे त्या काळातील शून्य रेखांश होते त्यावरच आपल्याकडील अनेक शिवालये आहेत हे ही तितकेच महत्वाचे. आपली मंदिरे कोणाच्यातरी मनात आले म्हणून बांधल्या गेली असे नाही तर त्या मागे एक फार मोठे शास्त्रीय गणित होते हे या महाशिवरात्रीच्या दिवशी लक्षात घेऊया. आपण ज्यांना प्रसिद्ध शिवालये म्हणून ओळखतो त्यापैकी अनेक शिवालये याच रेखांशावर आहेत हाही केवळ योगायोग नाही. येथील अनेक साधकांच्या शास्त्रीय संशोधनाचा हा परिपाक आहे.म्हणून तरी आपण त्यांची आठवण म्हणून महाशिवरात्रीच्या उत्सवाला महोत्सवाचे रूप देऊन तो साजरा करुया आणि आपल्या पूर्वजांच्या असाधारण तपस्येचे स्मरण करूया.

डॉ. छाया नाईक नागपूर ९८९०००२२८२

Back to top button