EnvironmentNews

एकट्या रामय्याने लावली तब्बल एक कोटी देशी झाडे !

हैदराबाद, दि. २२ मार्च : निसर्गाची आवड आणि त्याचे महत्त्व कळलेल्या येथील दरीपल्ली रामय्या यांनी एकट्याने एक कोटींपेक्षा जास्त झाडे लावण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे ही सगळी झाडे देशी असून यामध्ये प्रामुख्याने बेल, पिंपळ, कदंब, कडुनिंब, चंदन, रक्तचंदन या उपयुक्त झाडांचा समावेश आहे.

तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यात राहणाऱ्या रामय्यांचे वृक्षलागवडीचे हे कार्य केवळ बिया पेरण्यापुरता मर्यादित नाही. तर ते त्या बियांची रोपेही तयार करतात. त्यांनी खम्मम जिल्ह्यातील एक कॅनॉल निवडून चार किलोमीटरच्या परिसरात त्याच्या दोन्ही बाजूने अनेक वृक्षांची उभारणी केली. रामय्या फक्त झाडे लावून थांबत नाहीत तर त्या झाडांची वाढ होईपर्यंत त्यांची काळजीही घेतात.   

एक कोटीहून अधिक झाडे लावणारे रामय्या म्हणतात, ‘वृक्ष लागवडीतून मला शांती आणि समाधान मिळते.’ ‘वृक्षो रक्षती रक्षित:’ म्हणजे वृक्ष त्याचे रक्षण करणाऱ्याचे रक्षण करतात, असे त्यांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी वाचनालयातून अनेक वृक्ष लागवडीची माहिती देणारी पुस्तके मिळवून  शास्त्रीय पद्धतीने वृक्ष लागवड कशी करायची याचीही माहिती मिळवली. आता त्यापद्धतीने रोपे तयार करुन त्यांचे वाटपही ते करीत आहेत. ‘झाडे लावा झाडे जगवा, निसर्गाशी नाते जोडा’ हे घोषवाक्य लोकांमध्ये बिंबवून ते जनजागृतीही करीत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन काही राज्यस्तरीय सरकारी पुरस्कारांसोबत त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button