OpinionSeva

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी राष्ट्र सेविका समितीची हेल्पलाईन

स्वयंस्फूर्तीने समाजासाठी योगदान देणारी भारतीय महिलांची जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना म्हणजे राष्ट्र सेविका समिती.  भारतीय मूल्ये केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रहितासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करण्यासाठी अविरत झटणाऱ्या या  समितीत एकमेकांबद्दल असणारे प्रेम, आदर, जिव्हाळा  सहानुभूती, आत्मबळ आणि कुठल्याही पेचप्रसंगांना न डगमगता धैर्यशील होण्याचे बळ दिले जाते. एका मातृशक्तीला सर्वगुणसंपन्न बनवून  तिच्यातील हेच  संस्कार  पुढच्या पिढीलाही  मिळावेत या सर्वंकष विचाराने राष्ट्र सेविका समितीमध्ये कार्य केली  जातात. व्यक्ती निर्माणापासून  राष्ट्र निर्माण या  पद्धतीचे बीज राष्ट्र सेविका समितीमध्ये  पिढ्यान्पिढ्यामध्ये रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न  केला जातो.

स्त्री आणि पुरुष म्हणजे एका पक्ष्याचे  दोन पंख, असे  स्वामी विवेकानंद म्हणत. यातील एक पंख जरी निखळला  तरी पक्षी आकाशी झेप घेऊ शकत नाही. हिंदुत्वाचे समग्र आणि सार्वत्रिक तत्वज्ञान खोलवर रुजविणाऱ्या  वं.  लक्ष्मीबाई (मावशी)  केळकर यांनी अशाच हिंदुत्ववादी विचारांना अनुसरून राष्ट्र सेविका समितीची स्थापना केली. शाखेच्या माध्यमातून महिलांमध्ये विवेकबुद्धी,  सामर्थ्य,  त्यांना संघटित करून गौरवशाली हिंदू राष्ट्राची स्थापना करणे, हा त्यामागचा दूरदृष्टीपणा होता.   एक व्यक्तिमत्व घडले तर त्याचा फायदा समाज घडवण्यात  होतो, असा दृढ विश्वास  वं.  मावशी जी  यांना  होता.  देशातील अर्धी लोकसंख्या हे महिलांची आहे.   त्या जोपर्यंत  राष्ट्र,  सामाजिक  जबाबदारी घेत नाहीत तोपर्यंत आपले  राष्ट्र परम वैभव मिळवू शकत नाही. याच अनुषंगाने सुरु करण्यात आलेल्या  राष्ट्र सेविका समितीची  मावशींनी रुजलेली पाळेमुळे इतकी खोलवर रुजली आहेत की त्यांचे कार्य आज संपूर्ण समाजाला, राष्ट्राला उपयोगी पडत आहे. महिला म्हणून मागे न राहता जे पडेल ते काम जिद्दीने करण्याची ताकद त्या समाजासाठी वापरत आहेत.

सध्या संपूर्ण देशभरातील  लोक कोरोना आपत्तीशी झुंजत आहेत.  आपल्या समाजबांधवांच्या वेदना, दुःख आपणच दूर केले पाहिजे असा मनाशी निर्धार करून ठिकठिकाणी राष्ट्र सेविका समितीच्यावतीने वेगवेगळ्या स्वरूपांतली कामे सुरु आहेत. देशात आणि विश्वात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट आली आहे  एकूणच या आपत्तीमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला आहे.  आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्र सेविका समितीच्या सेविका  विविध प्रकारची कामे करताना दिसत आहेत.  गेल्या वर्षीपेक्षा आताची परिस्थिती गंभीर आहे.  परिस्थिती गंभीर असली, तरी आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर करत आलेल्या संकटाला तोंड देत समाजात काम करण्याचा सेविकांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. देशभरात समितीच्या माध्यमातून जी सेवा कार्ये चालू आहेत, ती स्थानिक गरज लक्षात घेऊन सुरू झाली आहेत. कुठे विलगीकरण कक्ष तर कुठे अन्नदान, कुठे रक्तदान तर कुठे मानसिक आधार अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर सेविका  काम करताना दिसत आहेत. यामागे एकच उद्देश आहे, तो म्हणजे आपला देश, आपला समाजबांधव या व्याधीतून बाहेर आला पाहिजे. 

राष्ट्र सेविका समितीच्या प्रांत बैठकीत २५ जणांनी कोविड १९ हेल्पलाईन सुरु करायचे ठरविले.  त्यानुसार झालेल्या एका कार्यशाळेत  या सेवाकार्यात सहभागी होणाऱ्या  १०० जणांची  ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत समितीच्या विद्यमान अखिल भारतीय प्रमुख वं. शांताक्का  जी देखील उपस्थित होत्या. कोरोनाच्या या  कठीण प्रसंगी सर्व लोकांपर्यत आपण पोहोचलो पाहिजे. त्यांचे मनोबल वाढवले पाहिजे. त्यांना शक्य तेवढी मदत केली पाहिजे. असे आशीर्वादरूपी शुभेच्छा घेत या कार्यास प्रारंभ झाला.   २९ एप्रिल २०२१ पासून या कार्यास सुरुवात झाली. एकूण २२  जणांची  एक तुकडी असून त्यात आयुर्वेदिक, होमिओपॅथी  डॉक्टर्स, काऊन्सलर्सचा समावेश असून भारतभर ही सेवा दिली जाते.   राष्ट्र सेविका समितीशी जोडलेल्या सेविका  हे   कार्य सुरळीत पार पाडत असून. केवळ देशभरातूनच नाहीत तर परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर मदतीसाठी त्यांना  कॉल्स येत आहेत. व गरजूंच्या गरजा  निष्ठेने, प्रेमाने, आपुलकीने पूर्णही केल्या जात आहेत.  मदतीसाठी ९८६०४६३२३९, ८१०४९९५९६४, ९८२०८३४३३५, ९७६५२३५६५५, ९६१९२८८५७९ हे  हेल्पलाईन नंबर आहेत.  कोरोना  प्रभावित कुटुंबासाठी समुपदेशन, कोरोनातून बरे झाल्यानंतरचे   पुनवर्सन समुपदेशन,  वैद्यकीय सल्ला,  होम कॉरंटाईन,   होम आयसोलेटेड कोरोना रुग्णांच्या देखरेखीसाठी दिशा दर्शन आदी करिता हेल्पलाईन सुविधा   दिल्या जात आहेत.  कोरोनाशी लढणाऱ्या रुग्णाचे मनोबल खच्ची होण्याची शक्यता असते.  ते  मानसिक तणावाखाली असतात. त्यांचा मानसिक ताण कमी व्हावा म्हणून त्यांच्यासाठी समुपदेशनाची व्यवस्थाही केली जात आहे. याचबरोबर होमिओपॅथी, ऍलोपथी आणि आयुर्वेदिक औषधांसंबंधी मार्गदर्शन सुविधाही  तज्ज्ञांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या जात आहेत.  

परिस्थिती बिकट असली तरीही  संकटांशी झगडण्याची आपली क्षमता, धैर्य आणि मनोबल कायम ठेवून संयमाने, शिस्तीने आणि परस्पर सहयोगाने  सेविका या भीषण परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या कार्यास मनापासून शुभेच्छा !!

– तृप्ती पवार, विश्व संवाद केंद्र, मुंबई

**  

Back to top button