NewsSeva

अभाविपची राज्यभरात रक्तदान शिबीरे संपन्न; १४६० रक्तदात्यांनी केले रक्तदान

मुंबई, दि. ३ मे :  राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच रक्ताचा तुटवडाही  वाढू लागला आहे. ही तूट भरून काढण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने  राज्यभरात अभाविप व स्व. अनिकेत ओव्हाळ स्मृती समितीच्या वतीने रक्तदान शिबिरे घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील कोंकण प्रांतामध्ये ७०९, महाराष्ट्र प्रांतामध्ये ५६३ आणि विदर्भ प्रांतामध्ये १८८ असे एकूण राज्यभरात १४६० रक्तदात्यांनी  रक्तदान केले.

कोंकण प्रांतातील मुंबईतील एकूण ८ भागांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आले त्यात उत्तर मुंबई भागातील दहिसर येथील नवागाव समाजकल्याण मंदिर, पूर्व मुंबईतील चेंबूर येथील बाल विकास संघ , दादर येथील महारष्ट्र हायस्कूल, विद्यानगरी भागामध्ये विले पार्ले रेल्वे स्टेशन व प्रतीक्षानगर भागातील चुनाभट्टी येथे प्रामुख्याने शिबिरांचे आयोजन झाले. दक्षिण मुंबई भागातील गिरगाव मध्ये देखील एकूण १२३ रक्तदात्यांनी अभाविपच्या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान केले. तसेच नवी मुंबई वाशी  येथे एकूण १९३ रक्तदात्यांनी रक्तदान व ९ जणांनी प्लाझ्मा दान केले .  कोकणातील उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये विवेकानंद हॉल येथे व दक्षिण रत्नागिरी  जिल्यातील जिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले यात एकूण ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले .

महाराष्ट्र प्रांतात देखील मोठ्याप्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील कोथरूड भागातील पांडव नगर पोलीस स्टेशन व गोखले नगर येथे एकाच वेळी रक्तदान शिबीर पार पडले यामध्ये एकूण ७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर पिंपरी चिंचवड मध्ये एकूण २५ जणांनी रक्तदान केले. संभाजीनगरमध्ये अभाविप व दत्ताजी भाले रक्तपेढीच्या वतीने शहरातील १० ठिकाणी एकाच दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात एकूण ९६ रक्तदात्यांनी रक्तदान केले, लातूर मध्ये देखील एकाच दिवसात २ शिबिरे घेण्यात आले त्यात एकूण ४५ रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवत रक्तदान केले . 

विदर्भ प्रांतातील अकोला मध्ये हेडगेवार रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये २३ तर वाशीम मध्ये शासकीय रक्तपेढी येथे घेण्यात आलेल्या रक्दन शिबिराला १९ रक्तदात्यांनी रक्तदान  केले. यवतमाळ शहरामध्ये वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात घेण्यात आलेल्या  रक्तदान शिबिरात ३७ तर जिल्ह्यातील उमरखेड येथे गोळवलकर गुरुजी रक्तपेढी सोबत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला एकूण ५१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. अमरावती महानगरामध्ये अभाविप व बालाजी रक्तपेढी यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला  एकूण २८ जणांनी रक्तदान केले सोबत पूर्व नागपूर  येथे १३  भंडारा येथी पवनी शहरात १७ जणांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले .

अशा  प्रकारे तिन्ही प्रांताचे मिळून  एकूण ४१ शाखांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते.  यात एकूण  १४६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिरासोबतच विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते अनेक सेवा कार्य आप आपल्या शाखेमध्ये राबवत आहेत . यामध्ये रुग्णांना औषधे व बेड उपलब्ध करून देणे असेल, रुग्णालयांमध्ये स्वयंसेवक म्हणून कोविड सेंटर मध्ये मदत करणे , स्मशानभूमी मध्ये मृत कोरोना रुग्णांचा अंतिम संस्कार करणे,  कोविड रुग्णांना रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून देणे,  दुचाकीवर रुग्णालयात सोडणे अशी विविध  प्रकारची सेवा कार्य विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते करत आहेत.

**   

Back to top button