Opinion

आणीबाणी- गजाआडचे दिवस

आणीबाणीच्या दिवसांची आठवण म्हणजे आम्हा सर्व राजबंद्यांच्या आयुष्यातील एक झळझळीत किरण शलाका ठरली असे मानायला हरकत नाही. दापोली पोलिस स्टेशनमधून इस्पेक्टर खांडेकर घरी आले.मी अरविंद स. बेडेकर राहणार करजगाव, दापोली. आमच्या सुपारीच्या बागेत कामं करत होतो. माझीपत्नी सौ.अरुणाही घरी कामात मग्न होती. किरकोळ गप्पा झाल्या.ते तिच्या माहेरचे होते. त्यांनी येण्याचे कारण स्पष्टपणे सांगितले. सौ.अरुणा, माझे आई-वडील मनाने अस्वस्थ झाले. बाजूची मित्रमंडळी जमायला लागली. गेले काही दिवस मिसा, राज्य बंदी, आणीबाणी च्या गप्पा चालु होत्याच. आपल्याला सुद्धा जावं लागेल असा अंदाज होता. इन्स्पेक्टर मला घेऊन निघाले. घरातील कर्ता पुरुष घरच्यांना सोडून कारागृहात जाणे ही गोष्ट रुचणारी,पटणारी नक्कीच नव्हती. दोन-तीन दिवस आधी कोळथरच्या ‘आगोम’ या आयुर्वेदिक औषध कंपनी चे संस्थापक आणि दापोली मधले संघ कार्यकर्ते मामा महाजन येऊन गेले होते. त्यांनी काय होऊ शकते याची नीट कल्पनाही दिली होती. करजगाव- दापोली- मुंबई- नाशिक मध्यवर्ती कारागृह असा दाखल झालो. रवाना झालो त्या दिवशी मी ज्या शाळेवर कार्यरत होतो तिथे म्हणजे व्ही. के.जोशी हायस्कूल ला अतिरिक्त बारा कुलूपे लागली असे दापोलीचे श्री वसंत परांजपे नाशिकला रवाना झाले म्हणजेच केले गेले त्यांनी हसत हसत ही गोष्ट मला सांगितली.

कारागृहात प्रवेश झाला. झोपण्याची बाज, अंथरूण-पांघरूण, मग,जग,कारागृह नंबर इत्यादी सर्व जामानिमा पूर्ण करून बराक नंबर पाच मध्ये स्थानापन्न झालो. वाटेतच “या….अरविंद राव…” ” इतके दिवस कुठे होतात “?अशी विचारपूस सांगली बीड मधल्या ओळखीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत करताना केली. बराक नंबर पाच मध्ये फलटणचे डॉक्टर कर्वे, सिंधुदुर्ग चे डॉक्टर कुलकर्णी,राजापूरचे खंडालेकर, भलूभाऊ रानडे, बोरवणकर, गुहागर वरून केशवराव भावे,आंजर्ला येथून केशवराव परांजपे, चिपळूण हुन विनय केतकर असे हजर होते. जमलेले सगळे राजबंदी कार्यकर्ते. खा.. प्या..पण आतच राहा. या सगळ्या राजबंद्यांनी करायचं काय हा प्रश्न सोडवायला बरेच अनुभवी नेते आत आमच्यासोबत होते. मा. भिडे प्रांत संघचालक म्हणायचे की संघ म्हणजे शाखा. शाखा म्हणजे कार्यक्रम. सर्वांना कार्यक्रमात मग्न करणे महत्त्वाचे. त्या दृष्टीने विचार सुरू झाले. पहाटे प्रातःस्मरण मग व्यायाम, सायं शाखा… हळूहळू विविध उपक्रम सुरू झाले. सूर्य नमस्कार संमेलन योजना आखली गेली माननीय प्रमोद महाजन यांचे पंधरा दिवसांचे सर्व पक्ष लक्षात घेऊन बौद्धिक वर्ग झाले. “तरुणांची झोपमोड बैठक” दुपारी दोन वाजता पाच दिवस योजली गेली. प्रा. यशवंतराव केळकर याचे मुख्य होते. सर्व पक्ष राजबंदी बैठकीचे आयोजन केले गेले. व्यायामाकरिता रिंग हॉलीबॉल सुरू झाला. आवडीनुसार ज्योतिष वर्ग, हस्तसामुद्रिक शास्त्र, बाराक्षार, यांच्या ज्ञानदानाचे वर्ग सुरू होत गेले. याशिवाय कीर्तन, गायन,पत्ते,बुद्धिबळ, गीता वर्ग असे अन्य उपक्रम सुरू झाले. माननीय परळकर यांनी योगासन वर्गाचे नेतृत्व केले. आरोग्य विभाग डॉक्टर कुकडे व त्यांचे सहकारी यांनी सांभाळला. बौद्धिक विभागासाठी माननीय हेबाळकर होते.

राजबंदी कारागृहात येऊन काही दिवस झाल्यानंतर असे लक्षात आले की काही कार्यकर्त्यांची मनस्थिती ठीक नसावी. आवश्यकतेनुसार अशा कार्यकर्त्यांच्या घरी संपर्क साधला. कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारचा आधार देण्याची व्यवस्था केली गेली होती. करजगावला म्हणजे माझ्या घरी सुद्धा विचारपूस केली गेली होती असे माझ्या पत्नी कडून सौ.अरुणा कडून कळले. अशा प्रकारच्या समस्या, विवंचना, अस्वस्थता यांचा विचार माननीय प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या मनात कायम असे. प्रल्हादजी हे राजबंदी कार्यकर्त्यांचे सर्वाधिकारी होते तसेच ते सर्वांचे आधारवड होते असे म्हणायला हरकत नाही.

नाशिक कारागृहात असताना माननीय हेब्बाळकर यांनी मला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सहा सोनेरी पाने यातील एका प्रकरणातील विषयावर बोलण्याची संधी दिली. योगा संमेलनात वीस ते पंचवीस विशेष नैपूण्य असलेल्या समूहामध्ये मला भाग घ्यायला मिळाला. खेळगडी म्हणून मी “ब्रिज” या पत्त्याच्या खेळ स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीपर्यंत पल्ला गाठू शकलो. कॅरम स्पर्धेतही अंतिम फेरी गाठली. नाशिक मध्यवर्ती कारागृहातील उत्तम वाचनालयाचा मी पुरेपूर उपयोग करून घेतला. त्यावेळी मला महाभारतातील नीती हा भाग वाचता आला. नाशिक मध्यवर्ती कार्यक्रमात कार्यमग्न राहिलो. हा आयुष्यातला एक चांगला कालावधी म्हणून कायम माझ्या लक्षात राहील.

नाशिक मध्यवर्ती कारागृहात ज्यांना जवळून पाहता आले अनुभवता आले, त्यांच्याकडून बरंच काही शिकता आले अशा गुण संपन्न व्यक्ती म्हणजे श्री.बाबा भिडे, प्रल्हादजी अभ्यंकर,दादा रत्नपारखी, यशवंतराव केळकर अशोकराव कुकडे,वकील परुळेकर, शरदराव हेबाळकर, प्रमोदजी महाजन होत्या…
नाशिक मध्यवर्ती कारागृह हा कोकणातल्या लोकांसाठी दूरचा पल्ला होता. दळणवळणाची साधने कमी होती.भेटीसाठी येणे ही त्रासदायक गोष्ट होती असे लक्षात आले म्हणून स्थान बदल हवा असेल तर तो मिळण्याची शक्यता निर्माण झाली. कागदपत्रांची पूर्तता करून आम्ही काही राजबंदी ठाणे कारागृहात दाखल झालो.

ठाणे येथे रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातले संघांचे बरेच कार्यकर्ते होते. बरेचसे खेळ पटू होते. माखजनचे प्रभाकर भागवत,भास्कर जोशी,वामनराव साठे, आंबेडकर सर, गुहागरचे मधुकाका परचुरे अशी सर्व अनुभवी कार्यकर्त्यांची सोबत मिळाली. या कारागृहात माननीय बाबा घटाटे, पांडुरंग पंत क्षीरसागर,रवींद्र वर्मा, माननीय गोयल जी, मजदूर संघाचे श्रीकांत धारप, नाबर सर, माननीय गांगल, प्रा.जोगळेकर,भावे ही रायगड मधली मंडळी होती. ठाण्यातून दत्ताजी ताम्हाणे, जगन्नाथ कोळी अशी अनेक मातब्बर मंडळी असल्याने मनाला उभारी होती. काही दिवसांनी ठाणे कारागृहात योगासन वर्ग घेण्याचा विचार झाला. पंधरा दिवस योगासने झाली. मला शिकवण्याची संधी मिळाली.शवासन आसनामध्ये जमिनीपासून डोळे मिटून आधांतरी होण्याचा अनुभव सुखद होता असे शिष्य मंडळी बोलत होती. या बद्दल माननीय गांगल यांनी विशेष समाधान व्यक्त केले. मलाही समाधान वाटले. वर्ग यशस्वी झाला. दर रविवारी असे माझे संपूर्ण गीता वाचन एकूण सात वेळा झाले.ठाणे मध्यवर्ती कारागृह मध्ये भोजन व्यवस्था राजबंदीनी हाती घेतली त्यामुळे भोजन बरे होऊ लागले.अंतर जवळ असल्याने भेटीही सुकर झाल्या.

सौ. अरुणा व तिची मोठी बहीण सौ अल्का व तिचे मिस्टर श्री. मोने ठाण्यातच रहात असल्यामुळे त्यांच्या वारंवार भेटी होऊ लागल्या. अल्का व तिचे मिस्टर श्री. मोने अनेकदा येऊन जात असत. ठाण्यातल्या कार्यकर्त्यांना ठाणे जवळ असल्यामुळे अनेक जण भेटून जात सौ अरुणाच्या लहान बहिणी उल्का व सुलु घेऊन जात असत. दिवाळीला माधुरी वसंत परांजपे वहिनी माझ्यासाठी भाऊबिजेला ओवाळणीला मुद्दाम आल्या होत्या.

ठाण्यात आमचा दहा-बारा जणांचा समूह झाला होता. गुहागरचे मधुकाका परचुरे आमचे प्रमुख होते. ते म्हणजे गोरे-घारे असे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. कोणत्याही मदतीसाठी तयार. तयारीचे खेळाडू पण एक दबदबा असलेली व्यक्ती होती. दिवाळीच्या दिवशी एकेकाला तेलाचे मालिश करायला तेलाची बाटली हाती घेऊन तयार झाले होते व सगळ्यांना मालीश करून दिले हा असा कौटुंबिक जिव्हाळा होता.

संगमेश्वर तालुक्यातले कमलाकर राव नामजोशी हे कुशल कार्यकर्ते होते. ते मा. पांडुरंग क्षीरसागर यांच्या अखेरच्या क्षणाचे एकमेव साक्षीदार झाले होते. दोघे चहा पीत होते, अर्धा चहा पिऊन झाला आणि क्षणात सगळं संपलं. पांडुरंग क्षीरसागर अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख होते. अबोल पण समर्थ नजरेचे व्यक्तिमत्व होते. ठाण्याचे दत्ता ताम्हाणे वयाने खूपच मोठे आणि चतुरस्त्र कार्यकर्ते होते. ठाण्यात त्यांचे उत्तम वजन होते.
दिवस पुढे सरकत होते.जनता पार्टी तयार झाली.

इंदिरा गांधीनी निवडणूक जाहीर केली…वातावरण बदलत गेले…बाबू जगजीवनराम व इंदिराजी यांच्यात शब्दाशब्दाशी सुरू झाली. वर्तमानपत्रातून आम्हाला सर्व हकीकती समजत होत्या.अनेकांना अंदाज येत नव्हता. इंदिरा ची विजयी झाल्या तर?जनता पार्टीची तयारी होईल का? अशी सर्वांना चिंता लागून राहिली होती. मोठे प्रश्नचिन्ह सर्वांपुढे आ वासून उभे होते. माननीय बाबर सरांना मी रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही सिट येणार का असे विचारले. निश्चित उत्तर देणे कठीण वाटत असावे. बराक मध्ये सहा ते सात वर्तमानपत्रे येत. आतमधले सगळे राजबंदी कार्यकर्ते अभ्यासक होते,चिंतन करणारे होते. मी सुमारे चाळीस जणांची मुलाखत घेतली. श्रीकांत धारप वकिलांना प्रश्न विचारला, काय अंदाज येतो आहे. त्यांच्याकडे उत्तर नव्हते. नियतीच्या मनात काय आहे याचा अंदाज नव्हता. माझ्या त्या वेळेच्या अभ्यासानुसार उत्तर होकारा कडेच वळत होते. चौदा वर्षांचा रामाचा वनवास,तेरा वर्षांचा पांडवांचा वनवास, आग्र्याच्या किल्ल्यात अडकलेले छत्रपती शिवाजी महाराज, त्या त्या वेळी असेच उद्विग्न असावेत असे वाटून गेले. ‘निवडणुका झाल्या’. भारतीय जनता पार्टी विजयी झाली.


हर्ष-आनंद-उल्हास…. पसरला. दुसरा दिवस उजाडला. कोणाचाही विश्वास बसत नव्हता. आणीबाणी उठली. राजबंदी सुटले. सायंकाळी आम्हा सर्व राजबंदी ना सोडण्यात आले. ठाण्यात मोठी मिरवणूक काढण्यात आली. हार-सत्कार,जयजयकार झाला. अवघा आनंदीआनंद झाला. परिसर दुमदुमत होता. त्याचे वर्णन शब्दात करणे अवघड आहे. मी सुटलो. मला न्यायला अरुणाची बहीण व तिचे मिस्टर असे मोने दाम्पत्य उपस्थित होते. सर्वांना समाधान आणि सार्वत्रिक आनंद उल्हास होता. ठाणे – बोरिवली – दापोली – करजगाव असा प्रवास झाला. बुरोंडी – लाडघर – करजगाव असे पंचक्रोशीतील सर्व लोकांनी वाजत-गाजत मिरवणुकीतून मला घरी आणले. सर्वांना कृतकृत्य झाल्याचे समाधान होते. मी सुखरूप घरी परतलो होतो.

राजबंदी अरविंद सखाराम बेडेकर
मु. पो. करजगाव, तालुका -दापोली
जिल्हा – रत्नागिरी.

शब्दांकन -हर्षदा अमृते बेडेकर

Back to top button