Opinion

कर्तृत्व आणि समर्पण – सीमेवरही, खेळाच्या मैदानातही

सैनिक म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती लष्करी वेश धारण केलेली, डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करणारी, प्रसंगी हौतात्म्य पत्करून देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणारी व्यक्ती. अर्थात ते तसे आहेदेखील. समर्पित वृत्तीने सैनिक देशाच्या रक्षणात मोलाची भूमिका बजावतात. आपण घरात निश्चिंतपणे झोपू शकतो कारण ते सीमेवरती, उणे तापमानातही दक्ष असतात, जागत असतात. या राष्ट्र कर्तव्याच्या जोडीने अनेक लष्करी अधिकारी, विविध पदांवर कार्यरत सैनिक भारताचे, आपल्या देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडाक्षेत्रातही उंचावत राहिले आहेत. खरे म्हणजे ही दोनही क्षेत्रे समान गुणांची अपेक्षा करतात. दोन्हींमध्ये खिलाडूवृत्ती हवी, समर्पण हवे, देशगौरवाची आस हवी आणि कमालीची जिद्द हवी. हे सगळे गुण त्यांच्या कर्तृत्वात मोलाची भूमिका बजावतात. लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये क्रीडाविषयक शिक्षणाच्या अनेक सोयी केलेल्या असतात. त्यामुळे जे ऍथलिट सैन्यात दाखल होतात त्यांना क्रीडाक्षेत्रही आवडत असेल तर त्यांच्यासाठी सर्व सोयी आधीच उपलब्ध असतात.

ऑलिम्पिकसारख्या नामांकित स्पर्धेमध्ये पूर्वीही लष्करी पार्श्वभूमी असणाऱ्या अनेक क्रीडापटूंनी आपला ठसा उमटविला आहे. नायब सुभेदार फ्लाईंग सीख अर्थात कै. मिल्खा सिंह, धावपटू असणारे नायब सुभेदार शिवनाथ सिंह, स्टीपलचेस धावपटू सुभेदार पान सिंग तोमर, बॉक्सर कॅ. गोपाल नारायण देवांग, सर्वात लहान वयाचे बॉक्सर शिपाई शिव थापा, २० किमी रेस वॉकर शिपाई इरफान कोलथम थोडी, नेमबाज कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड, हॉकिपटू कर्नल बलबीर सिंह कूलर अशा अनेकांनी ऑलिम्पिकमध्ये, तसेच आशियाई क्रीडास्पर्धांमध्येही देशाचा गौरव वाढविला आहे. यंदाही अनेक जण या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

कोण आहेत हे स्पर्धक?

बॉक्सर – अमित पांघल

१६ ऑक्टोबर१९९५ रोजी जन्मलेले अमित पांघल हे लष्कराच्या महार रेजिमेंटमध्ये सुभेदार पदावर कार्यरत आहेत. या २५ वर्षीय बॉक्सरने २०१९ जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये रौप्य तर २०२० मध्ये वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण पदकावर आपली मोहर उमटवली होती. टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये ५२ किलो वजनी गटात अमित भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

बॉक्सर मनीष कौशिक

भारतीय लष्करात साहायक अधिकारी म्हणून कार्यरत असलेले मनीष कौशिक हे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ६३ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मूळ हरयाणाचे असणारे मनीष कौशिक २०१८मध्ये कॉमनवेल्थ क्रीडास्पर्धेत रौप्य आणि २०१९मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक प्राप्त केले होते.

बॉक्सर सतीश कुमार

१९८९मध्ये जन्मलेल्या सतीश कुमार यांनी २००८साली लष्करात प्रवेश केला. तोपर्यंत ते अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. २०१४ साली त्यांना आशियाई खेळांमध्ये कांस्य पदक प्राप्त झाले होते. तर २०१८च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य पदक प्राप्त झाले होते. सतीश कुमार यांनी ऑटगॉनबायर डेईव्हीचा आशियाई बॉक्सिंग क्वालिफायरमध्ये पराभव करून आपले ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले. ९१ किलो वजनी गटात ते भारताचे प्रतिनिधित्व करतील.

अविनाश साबळे

१९९४साली जन्मलेले अविनाश साबळे बारावीनंतर लष्कराच्या महार रेजिमेंटमध्ये कार्यरत झाले. २०१३-१४ ला त्यांची पहिली पोस्टिंग ही सियाचीन ग्लेशियर येथे होती. त्यांनी २०१५ मध्ये आर्मीअंतर्गत क्रॉसकंट्री स्पर्धेत पहिल्यांदा सहभाग घेतला. २०१८ मध्ये राष्ट्रीय कॅम्प जॉईन केला. सध्या भारतीय लष्करात हवालदार पदावर काम करणाऱ्या, अविनाश साबळे यांनी दोहा येथील जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ३००० मी. स्टीपलचेस शर्यतीत सर्वोत्तम वेळ नोंदवत टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. ३००० मी. स्टीपलचेसमध्ये ते भारताचे प्रतिनिधित्व करतील.

नीरज चोप्रा

२०१६ साली लष्करात साहाय्यक अधिकारी म्हणून रुजू झालेले नीरज चोप्रा भालेफेक या खेळात भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यांनी इंडियन ग्रांड प्रिक्स मार्च २०२१मध्ये ८८.०७ मीटर अंतरावरून भालाफेक करत राष्ट्रीय रेकॉर्ड केला होता. २३ वर्षीय नीरज यांनी २०१८च्या आशाई खेळात व कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक प्राप्त करून देशाचा लौकिक वाढवला.

अर्जुन लाल जाट – अरविंद सिंह

अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंह हे २०१७ साली भारतीय सैन्यात रुजू झाले. पुण्यातील सैन्याच्या क्रीडा प्रशिक्षण संस्थेत नौकानयन या क्रीडाप्रकाराचे प्रशिक्षण घेतले. पुरुष दुहेरी नौकानयनात ऑलिम्पिकच्या आशिया खंडाच्या क्वालिफायर स्पर्धांमध्ये यश प्राप्त केल्यावर त्यांचा टोक्योचा मार्ग प्रशस्त झाला. हे दोघेही आता दुहेरी नौकानयनात भारताचे प्रतिनिधित्व करतील.

विष्णू सरवानन

लेसर स्टँडर्ड क्लास क्रीडा प्रकारात मुंबईचे सेलर(नाविक) विष्णू सरवानन भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. त्याचे वडील रामचंद्रन सरवानन हे सुभेदार मेजर पदावरुन निवृत्त झाले आहेत. विष्णू सरवानन हे देखील २०१७ साली भारतीय सैन्यात नायब सुभेदार म्हणून रुजू झाले आहेत. वडीलांच्या प्रोत्साहनामुळे ते २०१४ साली या सेलिंग करू लागले. मागील दोन वर्षांपासून माल्टा येथे ते प्रशिक्षण घेत असून मुस्सानाह सेलिंग चॅम्पियनशीपमधील सहभागाने त्यांच्यासाठी ऑलिम्पिकचे दरवाजे खुले झाले.

प्रवीण जाधव

१९९६ साली जन्मलेले प्रवीण जाधव भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत आहेत. पुण्यातील क्रीडा प्रशिक्षण संस्थेत त्यांनी तीरंदाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. प्रवीण जाधव तीरंदाजीमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. २०१९ सालच्या जागतिक तीरंदाजी स्पर्धेत भारताच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या तीरंदाज समुहाचा ते एक भाग होते. या टीमने स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती.

तरुणदीप राय

तीरंदाज तरुणदीप राय यांचा जन्म झाला ईशान्य भारताच्या सिक्किममध्ये. सैन्यात साहायक अधिकारी पदावर कार्यरत असणाऱ्या राय यांनी तीरंदाजीत स्वतःचे कौशल्य दाखवून दिले आहे. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय तीरंदाजी स्पर्धांमध्ये त्यांनी देशाचे नाव उंचावायला सुरुवात केली. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये त्यांना दोनदा रौप्यपदक प्राप्त झाले आहे. २०१० सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने तिरंदाजीत व्यक्तिगत पदक मिळवणारे ते पहिले भारतीय तीरंदाज ठरले.

संदीप कुमार पुनिया

संदीप कुमार पुनिया हे ऍथलिट आहेत. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये २० किमी रेसवॉकिगमध्ये ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. सैन्यात नायब सुभेदार पदावर कार्यरत संदीप कुमार यांनी २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ५० किमी रेसवॉकिंग चार तास सात मिनिटांत पूर्ण केले होते. २० किमीचे अंतर एक तास २० मिनिटांत पूर्ण करण्याचा राष्ट्रीय विक्रम रेसवॉकर संदीप कुमार यांच्या नावावर आहे.

गुरप्रीत सिंह

सैन्यात हवालदार असणाऱ्या गुरप्रीत सिंह यांनी पुण्याच्या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतले असून टोक्योत भारताचे नाव उंचावण्याचा निश्चय केला आहे. गुरप्रीत यांनी फेब्रुवारी २०२१मध्ये ५० किमी रेसवॉकिंग ३ तास ५९ मिनिटे ४२ सेकंदात पूर्ण करून राष्ट्रीय रेसवॉकर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. चार तासांचा टप्पा ओलांडणारे ते पाचवे भारतीय खेळाडू आहे. सैन्यात त्यांनी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश प्राप्त केले ते वसंत बहादूर राणा हे स्वतः २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते.

**

Back to top button