Opinion

ड्रोन तंत्रज्ञानाची विविधांगी उपयुक्तता !

मे २०२१ मध्ये गोव्यातील एका युवकाने तंत्रज्ञान क्षेत्रात एक नवीन उपाधी प्राप्त केली. यु.ए.वि.(अनमॅनड एरिअल व्हेईकल) म्हणजेच साध्या शब्दात ड्रोन ह्या विषयात पीएचडी मिळविणारे ते भारतातील पहिले व्यक्ती ठरले.. गोव्यात जुने गोवे येथे राहतात पण केपे तालुक्यातील कुडचडे गावात त्यांचा जन्म. वडील स्वयंसेवक असल्यामुळे अगदी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. रॉबर्ट फ्रॉस्ट च्या प्रख्यात ‘अ रोड नॉट टेकन’ कवितेत म्हटल्याप्रमाणे त्यांनी इतरांपेक्षा एक वेगळाच मार्ग पत्करून हजारों युवकांना त्यांनी नवीन दिशा दाखविण्याचे काम केले आहे. ह्या युवकाचे नाव आहे वरद मारुती करमली

प्राथमिक शिक्षण कुडचडे आणि नववी, दहावी चे शिक्षण त्यांनी विद्याप्रबोधिनी माध्यमिक शाळा पर्वरी येथून पूर्ण केल्यानंतर इंस्टिट्यूट ऑफ शिपबिल्डींग वास्को येथून डिप्लोमा चे शिक्षण व नंतर इव्हेंट मॅनेजमेंट विषयात फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून त्यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले. इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात असताना त्यांना ड्रोन चा प्रभावी उपयोग कसा होऊ शकतो व भविष्यात ह्याची व्याप्ती काय असेल ह्याचा अंदाज आला. मुळात तंत्रज्ञान क्षेत्राशी जवळिकी असल्याने ड्रोन बद्दल थोडी फार माहिती होती पण ह्या विषयात अजून शिकण्याची त्यांची भूक शमविण्यासाठी त्यांनी ह्या विषयात पीएचडी करण्याचे ठरविले. पण दुर्दैवाने ह्याच काळात त्यांचा अपघात झाला त्यामुळे त्यामुळे पीएचडी चे शिक्षण लांबणीवर पडले. अपघातामुळे आजही त्यांना टाईप करणें सारखे छोटी छोटी कामे करायला सुद्धा त्रास होतो, पण निव्वळ जिद्द आणि ध्येयप्राप्तीच्या निर्धारावर त्यांनी ह्या कठीण प्रसंगातून सुद्धा वाट काढत विजय मिळवला. 

हि वाट चालताना त्यांना भरपूर अडथळ्यांचा सामना करावा लागला. मुळात ह्या विषयात देशभरात कुणाचाच सखोल अभ्यास नसल्यामुळे पीएचडी साठी गाईड मिळणे त्यांच्यासाठी कठीण झाले. नंतर ड्रोन बनविण्यासाठी लागणारे विविध सुटे भाग देशात उपलब्ध नसल्याने ते विदेशातून मागवावे लागत. त्यात ते भाग विविध ठिकाणावरून यायला आणि नंतर कस्टम मधून त्यांच्या पर्यंत पोचायला वेळ लागायचा. त्यात मुळात भारतात ड्रोन संबंधी कायदे स्पष्ट नसल्याने त्याची बांधणी आणि वापर ह्या बाबती माहिती सुद्धा अपुरी होती.

प्रामुख्याने ड्रोन चा वापर हा फक्त फोटो, विडिओ काढण्यातच होतो असा गैरसमज दूर करण्यासाठीच त्यांनी हा मार्ग पत्करला. सुरक्षा, आरोग्य, कृषी सारख्या कित्येक क्षेत्रात ड्रोन चा उपयोग प्रभावी ठरू शकतो हे त्यांना जनमानसात पटवून द्यायचे होते. एकदा असेच आसाम मध्ये एका मोठ्या कार्यक्रमाचे ड्रोन द्वारे शूटिंग करताना त्यांच्या लक्षात आले कि ३ किलोमीटर परिसरात हजारो स्टॉल्स होते व सूचना देणे आयोजकांना कठीण होत होते. एवढ्या विस्तीर्ण जागेत साऊंड सिस्टिम सुद्धा बसवणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांच्या डोक्यातील कल्पना सत्यात उतरविण्याची संधी त्यांना मिळाली व त्यांनी ती केली. त्यांनी त्यांच्या एका ड्रोन ला एक स्पीकर जोडला व तो ड्रोन ते त्या परिसरात फिरवायचे. ज्या जाग्यावर सूचना द्यायच्या होत्या त्या जागी ड्रोन द्वारे सूचना आयोजकांद्वारे पोचवल्या जायच्या. महाग साऊंड सिस्टिम बसविण्याची गरज नव्हती व पद्धत सुद्धा प्रभावी ठरली.

ट्राफिक जाम मध्ये अशाप्रकारे ड्रोन द्वारे सूचना पोचविण्याचा यशस्वी प्रयोग पण त्यांनी केला. गोव्यात किव्वा इतर किनारपट्टी भागात मोठे मोठे विजेचे खांब उभारणे काही ठिकाणी शक्य नसते अथवा पर्यावरण आणि किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य जोपासण्याच्या दृष्टीने असे केले जात नाही. ह्याचा फायदा समाजातील वाईट घटक घेतात व किनारपट्टी भागात विशेषतः रात्रीच्या वेळी बेकायदेशीर व अवैध कामे चालतात. ड्रोन मध्ये थर्मल सेन्सिंग म्हणजेच तापमान संवेदक तंत्रज्ञान वापरून रात्रीच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर पाळत ठेवली जाऊ शकते. गोव्यात कित्येक देशी आणि विदेशी पर्यटक येतात. समुद्रकिनाऱ्यावर लाईफ गार्ड असून सुद्धा हजारोंच्या गर्दीत गजबजलेल्या किनाऱ्यावर सर्वांवर लक्ष ठेवणे मुळीच शक्य नसते. त्यात काही पर्यटक बुडतात आणि लाईफ गार्ड वेळेवर पोचू शकला नाही तर ती व्यक्ती दगावते त्याच बरोबर लाइफ गार्ड सुद्धा आपला जीव धोक्यात घालून दुसर्यांचा जीव वाचवायला जात असल्याने एकाच वेळी २ किव्वा अधिक जीव त्या क्षणात धोक्यात असतात. ड्रोन तंत्रज्ञान वापरून संबंध किनाऱ्यावर नजर ठेवणे तसेच समजा कुणी दुर्भाग्यवंश बुडाला तर लाईफ गार्ड पोचेपर्यंत ड्रोन द्वारे लाईफ जॅकेट त्या व्यक्ती पर्यंत जलद गतीने पोचवून बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवू शकतो तसेच लाईफ गार्डच्या जीवाला असलेला धोका सुद्धा कमी होतो. वरील दोन्ही प्रयोग पूर्णत्वाच्या सीमेवर आहे आणि लवकरच त्याचा वापर सर्वत्र होणार असे त्यांना वाटते. 

कृषी क्षेत्रात ड्रोन चा वापर क्रांतिकारी ठरू शकतो असे ते म्हणाले. मुळात कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्यामुळे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे त्याला अजून मजबुती येईल आणि ड्रोनचा वापर हा त्यात मैलाचा दगड ठरू शकतो. खतांची, कीटकनाशकांची फवारणी, शेतावर नजर ठेवणे सारखी कामे शेतकरी ड्रोनच्या माध्यमाने घरी बसून करू शकतो त्यामुळे या कामासाठी लागणाऱ्या शारीरिक श्रमात मोठ्या प्रमाणात कपात होऊ शकते. ड्रोनच्या माध्यमातून नारळ व आंबे काढण्याच्या तंत्रावर त्यांचा अभ्यास चालू आहे आणि लवकरच ते ह्या क्षेत्रात सुद्धा काम सुरु करतील.

सुरक्षा क्षेत्रात आणि विशेषतः राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेता ड्रोन तंत्रज्ञान खूप मोठे योगदान करू शकते आणि करत पण आहे. जम्मू आणि काश्मीर मध्ये जवानांच्या सुरक्षेचे ड्रोन हे कवच बनू शकते. जवानांना रसद किव्वा इतर सामान पोचवणे,आईडी चा शोध घेण्यात, बॉम्ब सुरक्षित ठिकाणी नेवून निकामी करण्यात, जागेची पहाणी व मॅपिंग करण्यात, जवानांचा ताफा जाताना आजूबाजूच्या हालचालीवर नजर ठेवण्या सारख्या अनेक कामात ड्रोन वापरून भूतकाळातील घटना परत घडणार नाही ह्याची काळजी घेऊ शकतो. सणासुदीनाला किव्वा मोठ्या कार्यक्रमात सुरक्षा यंत्रणेला ड्रोन खूप मदत करू शकते. आग लागलेल्या जागी जिथे मनुष्य जाऊ शकत नाही तिथे ड्रोन खूप मदत करू शकतो. फक्त ह्या विषयात जास्त अभ्यास करून तंत्रज्ञान विकसित करत राहणे गरजेचे आहे असं त्यांचं मत आहे.

ईकॉमर्स क्षेत्रात ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या कंपन्या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून घरपोच सेवा देण्याची चाचणी  करत आहे, तर ह्यामुळे डिलिव्हरी करणारे हजारो लोक बेरोजगार तर होणार नाही ना? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले हो, काही लोकांना कदाचित नोकरी गमवावी लागेल पण ड्रोन चालवायला सुद्धा लोक लागतील म्हणून जास्त कामगारांना त्रास होणार नाही. त्याशिवाय ड्रोन मेकॅनिक, ड्रोन चालवायला शिकविणाऱ्या संस्था, तिथे शिकवणारी लोकं अश्या अजून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्यामुळे तंत्रज्ञानाला घाबरण्याची मुळीच गरज नाही फक्त बदलत्या काळानुसार ऍडॉप्ट व्हायची तयारी ठेवली पाहिजे हे त्यांचं स्पष्ट मत होतं. 

उद्योग आणि वित्त क्षेत्रातील जगातील एका प्रख्यात संस्थेच्या अहवालानुसार २०२५ पर्यंत जगभरात ड्रोनचा उद्योग जवळपास ६५ अब्ज अमेरिकी डॉलर म्हणजेच जवळपास ५ लाख कोटी रुपये होणार आहे, भारताने ह्या क्षेत्रात आघाडी घेऊन एक प्रबळ स्थितीत येण्यासाठी काय केले पाहिजे ह्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी काही उपाय सुचवले. सुरुवातीला देशात आयात होणाऱ्या प्रत्येक ड्रोन नोंदणी झाली पाहिजे. ज्याप्रमाणे प्रत्येक गाडीची आणि दुचाकीची वाहतूक खात्याकडे नोंदणी असते त्याच प्रमाणे डीजीसीए जी ड्रोन संदर्भातील अधिकारिक संस्था आहे तिने हे काम लवकरात लवकर केले पाहिजे. ड्रोन आयात करणे महाग असते म्हणून काही लोक सुटे भाग वेगवेगळे मागवून त्यापासून ड्रोन बनवतात, ह्यावर सुद्धा कडक नजर ठेवून अश्या प्रकारच्या ड्रोन ची नोंदणी ठेवली पाहिजे.ड्रोन वापरासाठी परवाने दिले पाहिजे. मुळात लवकरात लवकर ड्रोन आणि त्याच्या वापरला कायद्याच्या चौकटीत व्यवस्थित आणि स्पष्टपणे बसवले पाहिजे. 

सध्या तंत्रज्ञान निगडित शिक्षण क्षेत्रात आपण खूप मागे आहोत. तंत्रज्ञानाचे जे शिक्षण अभ्यासक्रमात शिकवले जात आहे ते अतिशय जुनाट असून जोपर्यंत व्यक्ती ते शिकून पदवी हातात घेतो तोपर्यंत तंत्रज्ञान कित्येक पटीने विकसित झालेले असते आणि त्याची कल्पना नवीन पदवीधारकांना नसल्याने ते मागे राहतात. ह्यावर एकाच उपाय म्हणजे शिक्षण क्षेत्रात आणि अभ्यासक्रमात लवकरात लवकर बदल करून नवीन तंत्रज्ञान मुलांना शिकाविले पाहिजे. ड्रोन आणि ड्रोनचे  सुटे भाग भारतात बनवणार तर त्यासाठी लागणारे कुशल कार्यबळ तयार केले पाहिजे तरच जागतिक पातळीवर ह्या क्षेत्रात भारताचा दबदबा राहील. 

तंत्रज्ञान हे विकसित होत राहील. आपण ते लवकर आत्मसात करून घेतलं पाहिजे. जर कुणाला ड्रोन बनविणे शिकायचे आहे तर ते मोफत शिकवायला तयार आहे, पण कायद्याची अस्पष्टता असल्याने ती विद्या शिकून तिचा वापर जबाबदारीने करणार असाल तरच असे त्यांनी सांगितले. शिक्षणासाठी वेगवेगळ्या शहरात असताना संघाच्या शाखेवर आणि इतर कार्यक्रमात जायचे असे त्यांनी सांगितले. ते संघदृष्ट्या प्रथम वर्ष शिक्षित आहेत. स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंट चा व्यवसायात ते ड्रोनचा वापर करतातच त्याच बरोबर बागी-२ आणि अनेक चित्रपटासाठी सुद्धा त्यांनी ड्रोन शूटिंग केले आहे. गोव्यातील एका छोट्याश्या गावातून सुरु केलेला त्यांचा प्रवास ड्रोन विषयात पीएचडी घेऊन थांबला नाही तर तो अजून चालू आहे. त्यांची जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती पाहता ह्या क्षेत्रातील उन्नतीची अनेक शिखरे ते गाठतील ह्यात काहीच शंका नाही. 

Back to top button