OpinionSeva

होत्याचं नव्हतं करणारा ‘तो’ काळा दिवस….

 दि. २२ जुलै, ला दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. पण वाटलं नव्हतं की, हा पाऊस अनेकांचे संसार उध्वस्त करेल. त्यांनी तर अनेक कुटुंब गिळंकृत  केली.  दि. २३ ला सकाळी बातमी पाहिली की, तळीए ता. महाड या गावात दरड कोसळली आणि ४० घरे दरडी खाली गाडली गेली. ही बातमी पाहताच क्षणी माळीण दुर्घटनेचे चित्र डोळ्यासमोर आलं आणि मन चलबिचल झालं. आणि देवाकडे प्रार्थना करू लागलो की, सगळी माणस सुखरूप असुदे...!

 २२ तारखेपासून जवळ जवळ महाड ला पुराचा फटका बसेल (खुप मोठे नुकसान होईल ) असे चित्र डोळ्यासमोर होते. २२ च्या रात्री आपल्या कार्यकर्त्यांचे फोन येऊ लागले, तयारी ला लागा! कोणत्याही क्षणी आपल्याला निघावे लागेल, सामानाची तयारी करा आणि लगेचच आमचे रायगड विभाग प्रचारक श्री. निलेशजी मुळीक यांनी फोन केला, तर ते म्हणाले मी पनवेल हुन निघालो आहे. हेय कळताच मी पण माझ्या घरून निघालो. आम्ही सोबत लोणेरेला जिल्हा सहकार्यवाह यांच्या घरी गेलो आणि हळूहळू तिथेच कार्यकर्ते एकत्र यायला सुरुवात झाली. अनिकेत कोंडाजी, आणि चेतन भोजकर हे कार्यकर्ते पोहोचले. दरड ग्रस्त तळीए आणि किती गावांना पुराच्या पाण्याने नुकसान झाले आहे ते सर्व्हे करण्याचे आम्हाला काम देण्यात आले.  दुपारी आम्ही महाडला निघालो. मुंबई गोवा महामार्गाने महाड ला जाता जाता लक्षात आले की सावित्री नदीने पुन्हा एकदा रुद्र अवतार घेतला आहे. रस्त्यावरील झाडांवर अडकलेल्या कचऱ्यामुळे लक्षात येत होते की किती फूट पुराचे पाणी आले होते. मोठे ट्रक, गाड्या उलट सुलट पडलेल्या पाहून एकंदरीत परिस्थिती लक्षात आली.  रस्त्यांनी  येतानाच या पुरामुळे किती नुकसान तर सोडाच पण कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले असतील याची कल्पना आली. 

    लोणेऱ्याहून निघाल्यावरच आम्हा तिघांना ( मी, अनिकेत कोंडाजी आणि चेतन भोजकर ) तळीए गावात जाऊन तेथील परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढे पोलादपूर हुन रात्री महाड येथे बुटाला हॉल येथे येण्यास सांगितले होते. रेंज नाहीं, लाइट नाहीं. पुन्हा पाणी भरले तर पुढे काय करायचे, भेट झाली नाहीं तर काय करायचं याचे पक्के नियोजन ठरलं. ठरल्याप्रमाणे आम्ही तिघे तळीए गावात पोहचलो आणि पाहतो तर काय फक्त आक्रोश...  इथे तर गाव दिसतच नव्हते फक्त दिसत होते ते मृत्यूचे तांडव. या दरडीत कोणाचे आई- बाबा गेले होते तर कोणाची पत्नी-चिमणी-पाखरं गेली होती तर काही जणांचा पूर्ण संसार गेला होता.  

     तिथे गेल्यावर आम्हा तिघांनाही काय करायचे ते सुचत नव्हते.  काही स्थानिक मंडळींशी संवाद सधण्याचा प्रयत्न करत होतो परंतु अशा कठीण काळात काय बोलायचं हेही सुचत नव्हते.  काय मदत करता येईल का ? हा विचार आम्ही करत होतो.परंतु  तिथे फक्त माणसेच नाहीत  तर गावही शिल्लक राहिले नाही.   काय करायचे हा प्रश्न सतावत होता. शेवटी  एनडीआरएफच्या जवानांसोबत बॉडी काढायला गेलो. पूर्ण बॉडी तर नव्हत्याच काही बॉडीचे तुकडे - तुकडे झाले होते. अशी स्थिती आम्ही पहिल्यांदा पहिली होती. 

   नंतर आम्ही तेथून पुन्हा महाडला येण्यासाठी निघालो.  तर रस्त्यात दोन्ही पुलांवर पाणी होतं.  जवळपास २ तास आम्ही पाणी ओसरण्याची वाट पाहत होतो. परंतु पूर्ण पाणी ओसरले नव्हते. पाऊस देखील पडत होता. आणि नंतर अनेक जणांनी त्या पाण्यातूनच आपली वाहने काढायला  सुरुवात केली.  १ किलोमीटर पुढे आल्यावर पुन्हा एका पुलावर पाणी होतं. तिथे जवळपास अर्धा तास थांबावं लागलं तरी पाणी कमी होत नव्हतं आणि पाऊस देखील वाढला होता. पुन्हा चिंता वाटायला लागली की, जर पाणी वाढलं तर इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती निर्माण होईल. म्हणून आम्ही तिघांनी ठरवलं की आपण ज्या पुलावर पाणी आहे त्या पुलाच्या दोन्ही बाजूंना उभे रहायचे आणि मधून वाहने जाऊ द्यायची. आम्ही तिघे त्या पुलावर उभे राहिलो. तर त्या पुलावर  जवळपास २- ३ फूट पाणी होतं.  अशा कठीण  परिस्थितीत त्या पुलावरून आम्ही सर्व सुखरूप बाहेर पडलो आणि सुटकेचा निश्वास टाकला.

 रात्री आम्ही ठरल्याप्रमाणे महाड येथे आलो आणि रात्री भोजन झालं.  रात्री बैठक घेऊन दुसऱ्या दिवशी काय- काय करायचे यावर चिंतन झालं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा  मला आणि अनिकेत कोंडाजी ला पोलादपूर तालुक्याचा सर्व्हे करायला सांगितले. आणि दि. २४ ला पुन्हा आम्ही दोघे पोलादपूर ला गेलो. तिकडेही तिच स्थिती. पोलादपूर तालुक्यात देखील २ गावात दरड कोसळली होती. साखर सुतारवाडी, व केवणाळे, आम्ही पोलादपूर तालुक्याचे कार्यवाह आणि सहकार्यवाह यांना घेऊन या दोन्ही गावात गेलो तर पहिले गाव होते केवनाळे.  या गावात ६ जण मृत्युमुखी होते तर दुसरे गाव- साखर सुतारवाडी याही गावात ७ जण मृत्युमुखी पडले होते. या गावांत काय करता येईल याची माहिती घेऊन आम्ही रात्री पुन्हा महाडला आलो आणि पुढचे नियोजन करू लागलो.

 दि. २३ जुलै पासून  महाड येथे सुरू झालेले मदत केंद्र दि.१ ऑगस्ट पर्यंत सुरू होते. १० दिवस चाललेल्या या केंद्रात अनेक अनुभव आले.  या अनुभवांचे एक पुस्तक लिहिले जाईल परंतु हे अनुभव अत्यंत वेदनादायक आहेत. या पुरात आणि ज्या गावात दरड कोसळली त्यांचे दुःख आणि अश्रू आपण नाही विसरू शकत!.   परमेश्वर, या सर्व कुटुंबियांना हे दुःख पचविण्याची शक्ती देवो तसेच त्यांना  पुन्हा एकदा नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी बळ देवो.  
  • रमेश ढेबे, रायगड( माणगाव)
Back to top button