NaxalismNews

लेडी सिंघम – संजुक्ता पराशर; आतापर्यंत १६ दहशतवाद्यांना केले ठार

बोडो दहशतवाद्यांनी प्रभावित असलेल्या आसामच्या सोनितपूर जिल्ह्यात २०१४ साली आयपीएस संजुक्ता पराशर यांची पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. आसामच्या घनदाट जंगलांमध्ये या दहशतवाद्यांशी दोन हात करायला जाणे म्हणजे, मृत्यूला आमंत्रण आहे, याची या निर्भीड महिला पोलीस अधिकाऱ्यास कल्पना होती. तरीही, दहशतवाद संपवायचाच हे उद्दिष्ट बाळगणाऱ्या आयपीएस संजुक्ता यांनी हा धोका पत्करला आणि आपल्या ३० महिन्यांच्या कारकिर्दीत १६ अतिरेक्यांना चकमकीमध्ये ठार मारले, तर ६४ दहशतवाद्यांना अटक केली.

 २००६ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या संजुक्ता यांचा जन्म आसाममध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण आसाममध्येच झाले. नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्रातील पदवी घेतली, तर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी एमफिल आणि डॉक्टरेटसुद्धा केले.

संजुक्ता २००६ साली संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये ८५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी झाल्या.

संजुक्ता यांची पहिली नियुक्ती २००८ मध्ये आसाममधील माकुम येथे असिस्टंट कमांडंट म्हणून झाली. बोडो आणि बांगलादेशी यांच्यातील चकमकी नियंत्रित करण्यासाठी त्यांना उडलगिरी येथे पाठवण्यात आले. तिथेही त्यांनी त्यांच्या कामाची छाप पाडली. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी शस्त्र आणि दारुगोळ्याचे मोठे साठेदेखील जप्त केले आहेत.

 संजुक्ता पराशर यांना अनेक वेळेस ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. पण, त्या अशा धमक्यांना भीत नाहीत. त्यांचे नाव ऐकताच दहशतवाद्यांच्या काळजात धडकी भरते.

 आपल्या कामातून वेळ काढून संजुक्ता मदत शिबिरांतील लोकांबरोबर वेळ व्यतीत करतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button