Opinion

स्मार्टफोनद्वारे चित्रपट निर्मिती: भविष्याची नांदी

“स्मार्टफोन हा आमच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. पण या घटकाचा संपूर्ण वापर अव्यक्तच राहतो. आजकाल कुणीही स्मार्टफोन वापरून उत्कृष्ट दर्जाची चित्रपट निर्मिती करून, उपलब्ध प्रसार माध्यमातून प्रसिद्ध करू शकतो. स्मार्टफोन वर चित्रपट निर्मिती द्वारे सुरुवात करून अथांग अश्या सिनेविश्वात आपण पाऊल टाकू शकतो” असे प्रेरणादायी उद्गार सुप्रसिद्ध मालिका आणि चित्रपट दिग्दर्शक शिवाजी कचरे यांनी पर्वरी गोवा येथील असलेल्या स्मार्टफोन चित्रपट निर्मिती कार्यशाळे दरम्यान काढले. 

“स्मार्ट पर्वरी इनिशिएटिव्ह” या संस्थेमार्फत स्मार्टफोन द्वारे चित्रपट निर्मिती या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. स्मार्ट पर्वरी इनिशिएटिव्ह या संस्थेचे कार्यकर्ते शंकर फडते तसेच इन गोवा या वृत्तसंस्थेचे संस्थापक अनिल लाड यांच्या कल्पनेतून या कार्यशाळेचे बीज रोवले गेले. अनिल लाड स्वतः शिवाजी कचरे यांच्याकडून प्रशिक्षित असल्याने त्यांनी शिवाजी कचरे यांनाच या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी बोलावून घेतले. एकूण ४ दिवस चाललेल्या या कार्यशाळेत एकूण १८ सहभाग्यांनी सहभाग घेतला. यात विद्यार्थी, छायाचित्रकार, पत्रकार, नृत्यप्रशिक्षक, डॉक्टर तसेच चित्रपट आणि व्हिडिओग्राफी विषयात काम करणारे व उत्साही असे विविध व्यावसायिक आणि वयोगटातील व्यक्तींनी सहभाग घेतला. पर्वरी येथील राम वाडेश्वर देवस्थानाच्या वास्तूत हि कार्यशाळा संपन्न झाली.

कार्यशाळेत पूर्ण वेळ मार्गदर्शक म्हणून श्री शिवाजी कचरे यांचे मार्गदर्शन सगळ्यांना लाभले. मालिका आणि चित्रपट क्षेत्रात २२ वर्षांचा अनुभव असलेले शिवाजी कचरे यांना २०१४ साली महाराष्ट टाइम्स चा “लक्ष्य” ह्या प्रचंड लोकप्रिय मराठी मालिकेसाठी उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आहे. लक्ष्य, क्राईम डायरी, कादंबरी, मंडळ भारी आहे, मेजवानी परिपूर्ण किचन, नवरा असावा तर असा, सारेगमप सारख्या मालिकांचे दिग्दर्शन करणाऱ्या, अनेक चॅनेल्स बरोबर काम केलेल्या व टीव्ही मालीका क्षेत्रात जवळपास ४००० एपिसोड चित्रीकरण करण्याचा अनुभव असलेले दिग्दर्शक मार्गदर्शक म्हणून लाभणे म्हणजे आयोजक आणि सहभाग्यांसाठी भाग्याची बाब होती व त्यांच्या अथांग अनुभवाचा आणि ज्ञानाचा प्रभाव सगळ्यांवर पडला. 

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी चित्रपट निर्मिती या विषयातील विविध आयमावर संबोधन करण्यात आले. सुरुवातीला असलेली फक्त एक संकल्पना कशी एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे कथेच्या रूपात परिवर्तित केली जाते व नंतर त्या कथेवर तथ्यांच्या आधारे पटकथा कशी लिहिली जाते याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. चित्रपटासाठी लागणारे सर्व प्रकारचे पूर्वनियोजन, नंतर प्रत्यक्ष चित्रपटाचे चित्रीकरण कसे असते, व सगळ्यात शेवटी एडिटिंग या विषयावरील सिद्धांतिक माहिती देऊन जिज्ञासा समाधान करण्यात आले. 

दुसऱ्या दिवशी सहभाग्यांनी एकत्रित येऊन एका संकल्पनेवर कश्या प्रकारे कथा तयार केली जाते याचे प्रात्यक्षिक करून एक कथा बनवली. नंतर या कथेची पटकथा कशी लिहायची असते यावर शिवाजी कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पटकथेची निर्मिती करण्यात आली. पुढील टप्प्यात चित्रीकरणासाठी लागणारे पूर्वनियोजन यावर विस्तृत मार्गदर्शन सहभाग्यांना झाले. कथेसाठी लागणाऱ्या कलाकारांचे ऑडिशन व त्यामागे असलेली चयन प्रक्रिया, चित्रीकरण करण्यासाठी लागणारी स्थळे व त्याची पाहणी, त्या स्थळी प्रत्यक्ष जाऊन पटकथेच्या मागणीनुसार प्रसंग कसे शूट करणार याचे पुर्वनियोजन कसे करणे, व प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी लागणारे इतर साहित्य सामुग्री जसे विजेचे दिवे, व इतर रसद यांचे चयन व पूर्ण नियोजन याचे प्रात्यक्षिक करवून घेतले. नंतर शिवाजी कचरे यांनी सहभाग्यांना चित्रपट चित्रीकरणाच्या वेळी लागणाऱ्या सहाय्यक दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रोडक्शन, डिजाईन, लाईट, साउंड रेकॉर्डर सारख्या विविध जबाबदाऱ्यांचे वाटप केले. 

तिसऱ्या दिवशी शिवाजी कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष एका शॉर्ट फिल्मचे चित्रीकरण करण्यात आले. या वेळी सगळ्या सहभाग्यांनी योग्यतोपरी त्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांचे यथाशक्ती पेलण्याचे प्रयत्न केले. चित्रीकरणाच्या वेळी येणाऱ्या तांत्रिक तसेच अनपेक्षित अडचणी व त्याचे समाधान कसे करणे याचे प्रशिक्षण व अनुभव सगळ्यांना जवळून पाहायला मिळाले. चित्रीकरणाच्या वेळी कार्यशाळेच्या सहभाग्यांसमवेत, कार्यशाळेचे आयोजक, कलाकार म्हणून चयन केलेली लहान मुले व त्यांचे पालक तसेच गावातील मंडळी सुद्धा उपस्थित होते. एखाद्या चित्रपटाचे चित्रीकरण कसे असते याचा आस्वाद सर्वांना घ्यायला मिळाला. दिग्दर्शक म्हणुन चित्रीकरणाच्यावेळी भूमिका आणि जबाबदारी कशी पार पडायची असते व कशी पार पाडावी लागते याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण शिवाची कचरे यांनी सर्वांना दाखवले. एका लहानश्या प्रसंगाचे चित्रीकरण करण्यासाठी सुद्धा कश्याप्रकारे चित्रीकरणाशी निगडित सर्व विभाग एकत्र काम करतात आणि एकत्र काम करणे गरजेचे आहे याचा अनुभव सर्वांना मिळाला. चित्रपट चित्रीकरणासाठी आवश्यक असलेले गुण जसे एकाग्रता, संयम, कल्पकता, सर्जनशीलता, प्रकाश व ध्वनी संदर्भात लागणारे तांत्रिक ज्ञान, आणि सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची वृत्ती याचा “याची देही, याची डोळा” अनुभव शिवाजी कचरे यांनी सर्वांना दिला. दिवसभर चित्रीकरण करून जेव्हा रात्री चित्रीकरणाची सर्व प्रक्रिया संपली तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे, आनंदाचे आणि अनुभवाच्या घामाचे मोती चंद्र चांदण्यांच्या मंद प्रकाशात सुद्धा लख्ख चमकत होते.

चौथ्या व शेवटच्या दिवशी चित्रित शॉर्ट फिल्मचे एडिटिंग कसे करायचे या विषयावर मार्गदर्शन झाले. वेगवेगळ्या क्रमाने चित्रित प्रसंगांचे जेव्हा योग्य क्रमवारीत काटछाट करून बांधणी बघायला मिळाली तेव्हा प्रत्येकाचा आनंद द्विगुणित झाला. एडिटिंग करताना लागणार संयम आणि तांत्रिक माहितीचे दर्शन सर्वांना झाले. जशी जशी कार्यशाळा शेवटच्या टप्प्याकडे वळू लागली तशी तशी विविध वयोगटातील आणि समाजाच्या विविध व्यावसायिक क्षेत्रातून आलेल्या प्रत्येकाच्या हृदयात चित्रपट आणि त्या संदर्भात सहभागी आणि समावेश असलेले सर्व व्यक्तींसाठी आदर वाढला. जेव्हा पूर्ण झालेली शॉर्ट फिल्म मोठ्या प्रोजेक्टर वर बघायला मिळाली तेव्हा सगळ्यांचे मन भरून आले. 

समारोपाच्या कार्यक्रमावेळी आयोजक तसेच शिवाजी कचरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हि कार्यशाळा फक्त सुरुवात असून अजून खूप वाट चालायची आहे ह्या आशयावर सर्वानीच भर दिला. गोव्यात दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतो पण या कार्यक्रमात गोव्याचे प्रतिनिधित्व अल्प ते नाममात्र असते याची खंत सर्वांनीच प्रकट केली. गोव्यात बऱ्या पैकी चित्रपट निर्मिती होऊ शकते तसेच गोवा एक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट चित्रीकरण व निर्मितीसाठी केंद्र होऊ शकते अशी आर्त इच्छा सर्व मान्यवरांनी व्यक्त केली. चित्रपट क्षेत्राद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते व मेहनती, परिश्रमी, व सर्जनशील व्यक्तींना चित्रपट क्षेत्रात विविध आयामांमध्ये शिकण्यासाठी तसेच उपजीविकेचे साधन निवडण्यासाठी असंख्य पर्याय आहेत हे सर्वांना समजावून सांगितले. 

समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना शिवाजी कचरे यांनी समाधान व्यक्त केले. “गोव्यात कलाकारांची काहीच कमी नाही फक्त योग्य संधी येणार व तेव्हा आपण ती दोन्ही हातांनी पकडू अशी मानसिकता न ठेवता संधी निर्माण करून पुढे जाण्याची तयारी ठेवावी. स्मार्टफोनचा वापर करून छोट्या छोट्या शॉर्ट फिल्म करणे, विडिओ शूट करणे चालू ठेवून आपला दर्जा सुधारत, चालत राहणे चालू ठेवा. आज ओटीटी व्यासपीठांमुळे कन्टेन्ट किंग झाला आहे, तेव्हा चांगले कन्टेन्ट तयार करणे चालू ठेवावे. आज मोठे मोठे दिग्दर्शक स्मार्टफोन वर चित्रीकरण करण्यास पुढे सरसावतात व मोठं मोठे सिनेमे सुद्धा स्मार्टफोनवर चित्रित केले जातात त्यामुळे खिशात असलेल्या ह्या छोट्याश्या उपकरणाला कमी न लेखता त्याची संभवनीयता ओळखून काम चालू ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात स्मार्टफोनद्वारे चित्रपट निर्मिती एक वेगळा आयाम म्हणून चित्रपट क्षेत्रात उभा राहील तेव्हा अनेक संधी उपलब्ध होतील, पण त्यासाठी आपल्या कौशल्याची धार कायम ठेवणे गरजेचे आहे. भविष्यात गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोव्यातून अधिकाधिक प्रतिनिधित्व पाहायला मिळेल अशी आशा आहे.” असे मनोगत शिवाजी कचरे यांनी समारोपाच्या आपल्या वक्तव्यात मांडले. 

साौजन्य : विश्व संवाद केंद्र, गाोवा

Back to top button