Opinion

गोमंतकीय साहित्याला लाभलेली प्रेरणादायी ‘श्रद्धा’

आयुष्यात बहुतांश लोकं धावत असतात, पळत असतात. स्वतःच्या अस्तित्वाचा, आवड-नावड यांचा मागोवा घेत रात्रंदिवस भटकत असतात. स्वतः साठी जगण्यासाठी अनेकांना उभं आयुष्य कमी पडतं, आणि तरीही आयुष्यभर स्वतःसाठी जागून सुद्धा “आयुष्यात मी काहीच करू शकलो नाही” ह्याची खंत घेऊन उरलेलं आयुष्य कसंबसं सारतात. पण असतात काही माणसं, जी फक्त स्वतः जगत नाही तर अनेकांना जगण्याची दिशा दाखवतात, प्रतिकूल परिस्थितीत कधीच खचून न जाता जीवनाच्या कठीण प्रसंगी सुद्धा आपली छोटीशी होडी भर वादळात उतरवून, त्यावर मात करून समाजासाठी नवप्रेरणेचे ऊर्जास्रोत बनतात. श्रद्धा गरड हे त्याच चेतनदायी, प्रभावी आणि प्रेरणेने ओतप्रोत भरलेल्या व्यक्तींच्या सूचीतील एक आगळं वेगळं नाव आहे. मनुष्य फक्त जिद्दीच्या जोरावर केवढाही मोठा पर्वत लांघु शकतो याचे एक ज्वलंत उदाहरण तसेच समाजासमोर निर्विवादपणे स्त्रीशक्तीचे एक दैदिप्यमान रूप म्हणून उभे असलेली असामान्य व्यक्ती म्हणजे श्रद्धा गरड. 

मडगाव गोवा येथील रहिवासी श्रद्धा गरड यांना २०२१ सालचा कोंकणी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या ‘काव्य परमळ’ ह्या १९ व्या गोवा युवा साहित्य संमेलनात प्रसिद्ध झालेल्या कवितासंग्रहाला हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे. त्याच बरोबर संजीव वेरेकर यांच्या ‘रक्तचंदन’ या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार तर सुमेधा नायक देसाई यांना त्यांच्या ‘सुमीचें कोटांग्री’ या लघु कादंबरी साठी बाल साहित्य पुरस्कार मिळाला आहे. श्रद्धा गरड यांचा त्यांच्या युवा साहित्य अकादमी पुरस्कार पर्यंतचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. 

श्रद्धा यांना लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती. फक्त विज्ञान आणि गणित विषय वगळता पूर्ण माध्यमिक शिक्षणाचे माध्यम त्यांचे कोकणी होते. शाळेत असताना त्यांना गणित विषय कठीण जायचा. तेव्हा तिने शिकवणीचा मार्ग पत्करला. शिकवणीला ज्या ताई त्यांना शिकवायच्या त्यांनी श्रद्धाची स्थिती समजून घेतली व तिने कोकणीतून गणित समजावून सांगायला सुरुवात केली. ह्याचा परिणाम असा झाला की अल्प कालावधीत श्रद्धा गणित विषयात अव्वल येऊ लागली. कोकणी भाषेप्रती तिची जवळीक हळू हळू वाढू लागली. सेंट जोसेफ मध्ये दहावी पर्यंतचे आणि उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी कार्मेल हायर सेकंडरी मधून विज्ञान विषयात पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी विज्ञान विषयात पदवीच्या पहिल्या वर्षात असताना, एकदा कला शाखेतील कोकणी विभागाच्या एका कार्यक्रमात गेली असता तिथे त्यांना कोकणी भाषेची त्यांच्यातली सुप्त असलेली गोडी पुन्हा गवसली आणि तेथून त्यांच्या कोकणी भाषा आणि साहित्य विश्वातील प्रवास सुरु झाला. महाविद्यालयात असताना अनेक नाट्य स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, पथनाट्या मध्ये त्यांनी भाग घेतला. बहुप्रतीष्टीठ गोवा युवा महोत्सवात त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. त्याच बरोबर अनेक कविता वाचन स्पर्धेत इनामे सुद्धा पटकावली. 

सुरुवातीला त्यांनी काही कोकणी विभागातील कार्यक्रम बघितले आणि तेथून त्या कोकणी भाषेच्या प्रेमात पडल्या. त्या एवढ्या प्रेमात पडल्या कि त्यांनी पदवीसाठी विज्ञान सोडून कला शाखा निवडून कोकणी विषय निवडला आणि ह्याच विषयात स्वतःला करियर घडवायचे आहे असा ठाम निश्चय केला. हिंदी आणि कोकणी विषयात बीए च्या पदवीनंतर कोकणी विषय घेऊन एमए करता येते हे समजताच त्यांनी गोवा विद्यापीठातून कोकणी विषयात एमए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासून त्यांना टीव्हीवर लोक येऊन बातम्या वाचतात ह्याचे खूप कुतूहल वाटायचे. मोठेपणी आपण सुद्धा टीव्हीवर येऊन बातम्या वाचू हे त्यांचे स्वप्न होते. पण कोकणी भाषेमध्ये अश्या कमी संधी उपलब्ध होत्या. पण सुदैवाने गोवा प्लस ह्या न्यूज चॅनेल वर त्यांना बातम्या वाचायची संधी मिळाली आणि त्यांना स्वप्न साकार करायला सुवर्णसंधी मिळाली. करियर मध्ये पुढे त्यांनी गोवा आकाशवाणी, गोवा ३६५ वृत्त संस्था सारख्या जागी काम केले. 

गोवा ३६५ वृत्त वाहिनी बरोबर काम करताना ‘अस्तुरेची अस्मिताय’ ह्या नावाने विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांच्या कोंकणीत मुलाखती त्यांनी घेतल्या. पणजी दूरदर्शन केंद्रावर लाईव्ह बातम्या पण सांगायचे काम त्यांनी केले. “चिऊ म्हणाली काऊला” ह्या मराठी टेलिफिल्म मध्ये अभिनय, “मोगा तुका याद आसा” ह्या कोंकणी अल्बमचे सूत्रसंचालन, विविध कार्यक्रमाचे कोंकणी आणि हिंदी भाषांतून सूत्रसंचालन, ‘सुनापरांत’ ह्या कोकणी वृत्तपत्रासाठी कॅम्पस रिपोर्टर म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. ‘आमी अक्षरांचे धनी’ ह्या मालिकेद्वारे गोव्यातील कोंकणी लेखक आणि लेखिकांच्या मुलाखती त्यांना घ्यायला मिळाल्या. त्यांनी पाहिलेली सगळी स्वप्न त्यांनी सत्यात उतरवून ती स्वप्ने त्या प्रत्यक्ष जगत होत्या. 

पण नियतीला काही तरी वेगळेच मान्य होतं. सगळं काही व्यवस्थित चालू असताना २०१४ साली त्यांना चालायला त्रास व्हायला लागला. चालण्याचा त्रास हळू हळू बसण्या उठण्याच्या त्रासात परिवर्तित झाला. अचानक एक सकाळ उजाडली जेव्हा त्यांना पलंगावरून उठताच येईना झाले. त्यांना फिरण्यासाठी त्रास होऊ लागला, नोकरी सुटली. २०१६ साली विविध वैद्यकीय चाचण्या करून डॉक्टर्सनी निष्कर्ष दिला कि त्यांना एक दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे ज्याचा वैद्यकीय विश्वात अजून उपचार नाहीये. श्रद्धा यांचे विश्व हजारों शकलांनी तुटून विखरून गेलं. काही काळ त्यांनी नैराश्याचा सामना केला. पण त्यांनी ठरवले कि ह्या स्थितीवर मात करायची. 

त्यांनी प्राईम टीव्ही गोवा ह्या वृत्तसंस्थेत सब एडिटर म्हणून नोकरी स्वीकारली. ज्या इमारतीत ऑफिस होते त्याच इमारतीत भाड्याने खोली घेऊन तिथे राहू लागली. ह्या विषयात सर्व सहकाऱ्यांनी त्यांना भरपूर सहकार्य व योगदान दिले. पण दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत होती आणि शेवटी त्या पूर्णपणे अंथरुणावर पडल्या. त्यांना हालचाल करता येणं बंद झाले. हळू हळू पायांची हाल चाल करण्याची क्षमता गेली, नंतर हातांची सुद्धा हालचाल करण्याची क्षमता जाऊ लागली. प्रचंड लिहिण्या वाचण्याची आवड असलेल्या व्यक्तीला पेन सुद्धा पकडता येणे अशक्य झाले, त्यांना काहीही लिहिणे आता कधीच शक्य होणार नाही हे सत्य सर्वांनी मान्य केले होते. 

पण श्रद्धा यांनी जिद्द सोडली नाही. त्यांनी विचार केला कि ठीक आहे, पेन घेऊन कागदावर लिहिता येणार नाही, पण आपण मोबाईल वर तर बोटांनीच टाईप करतो. त्याला पेनची गरज भासत नाही. आणि त्यांनी आपल्या जीवनाच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. पूर्णपणे अंथरुणावर खिळलेल्या असताना त्यांच्या ‘काव्य परमळ’ ह्या कविता संग्रहाच्या लेखनाची सुरुवात झाली. ‘म्हजी जन्मभूमी, म्हजी कर्मभूमी’ जी त्यांच्या कविता संग्रहातील पहिली कविता आहे, त्यातून त्यांनी गोव्याच्या भूमीला अर्घ्य देऊन लिहायला सुरुवात केली. कविता संग्रह लिहिणे असा काही त्यांचा हेतू नव्हता, पण जसा जसा वेळ गेला, कवितांची संख्या वाढू लागली. मोबाईल वर देवनागरी किपॅड वापरून स्वतःचे अनुभव, विचार शब्दरूपात संचयन करताना त्यांच्या लक्षात आले कि कवितांची संख्या खूप झाली आहे आणि आता त्या डिलीट करणे योग्य नाही.

गोवा कोकणी अकादमीतर्फे प्रतिभावान, नवोदित लेखक/लेखिकांना त्यांची पहिली साहित्यकृती प्रकाशित करण्यासाठी एका अर्थसहाय्य योजनेद्वारे मदत केली जाते. श्रद्धा यांनी त्या योजने संदर्भात माहिती गोळा केली. वेगवेगळ्या व्यक्तींना फक्त फोन वर बोलून, कारण चालणे फिरणे शक्य नव्हते, सर्व माहिती मिळविली. नंतर लेखिका नमन सावंत धावस्कर, जयंती नाईक आणि कुमुद नाईक यांच्या सहकार्याने हरमल पेडणे येथे झालेल्या १९ व्या युवा साहित्य संमेलनात त्यांच्या पहिल्या कवितासंग्रह ‘काव्य परमळ’ याचे प्रकाशन झाले, आणि त्याच कविता संग्रहाला आज २०२१ सालचा युवा साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. कष्टाची पराकाष्ठा, निश्चयाचा महामेरू, प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे या सारख्या म्हणी आपण फक्त ऐकल्या असेल पण त्याचे प्रत्यक्ष दर्शन आपल्या कृतीतून आणि आपल्या जिद्दीने श्रद्धा गरड यांनी समाजासमोर ठेवले आहे. 

साहजिकच मित्र मंडळी आणि कुटुंबियांना भरपूर आनंद झाला असे त्यांनी बोलताना सांगितले. कुटुंबियांच्या अथक, अविरत आणि सतत सहकार्याशिवाय हे शक्यच नव्हते असे त्या म्हणाल्या. कोकणी साहित्य क्षेत्रातील व्यक्तींनी, ज्यांची फक्त मी पुस्तके वाचली आहे पण प्रत्यक्षात कधीच भेटले नाही अश्या तमाम व्यक्तींनी वैयक्तिक फोन करून अभिनंदन केले आणि कौतुकाची शब्दरूपी थाप मला मिळाली हे माझे सौभाग्य आहे असे त्या म्हणाल्या. स्वप्नात सुद्धा मला साहित्य अकादमी पुरस्कार मिळेल आणि कोकणी साहित्य विश्वातील जेष्ठ व्यक्ती माझ्याशी बोलतील असे वाटले नव्हते. एके काळी मी सर्वांच्या मुलाखती घ्यायचे, पण आज वर्तमान पत्रे, न्यूज चॅनेल वाली लोकं येऊन माझी मुलाखत घेत आहे, मला तर मी स्वप्नात असल्यासारखे वाटते असे त्यांनी उदगार काढले. 

त्यांची स्थिती काळानुसार अधिक ढासळत आहे. पण जेव्हा त्यांना विचारले कि भविष्याची काय योजना आहे, तर उत्तरे देताना त्यांचा उत्साह साता समुद्रापार पोचला होता. सध्या बाल साहित्य लिहिण्यात त्या व्यस्त आहेत.  संजना पब्लिकेशन्स चे दिनेश मणेरीकर यांनी त्यांच्या एका बाल कथा संग्रहाचे प्रकाशन करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच, राजहंस पब्लिकेशन ने त्यांना संपर्क करून त्यांना २ बाल कथा संग्रह लिहिण्याचे आमंत्रण दिले आहे. ज्या राजहंस पब्लिकेशन च्या प्रीपेरेटरी शिकून मी दहावी आणि बारावी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले, तेच राजहंस पब्लिकेशन स्वतः मला कथा संग्रह लिहायला आमंत्रित करत आहे, माझा आनंद द्विगुणित झाला असे त्यांनी म्हटले. अजून खूप लिहायचे आहे, खूप वाचायचे आहे, आणि आता तर फक्त माझ्या प्रवासाची सुरुवातच झाली आहे, असे त्यांनी छातीठोक पणे सांगितले. सध्या त्यांच्या बंधूनी विविध वाचनालयात मेम्बरशिप घेतली आहे आणि तेच त्यांना वाचण्यासाठी पुस्तके आणून देत असतात. 

युवकांना काय संदेश देऊ इच्छित असे विचारताच त्यांनी म्हटले, “आयुष्यात काही दरवाजे बंद झाले म्हणून खचून जाऊ नका, सगळे काही संपले असे गृहीत धरू नका. उलट सगळे दरवाजे बंद झाले असता एक छोटीशी खिडकी शोध, ज्यातून तुम्ही सगळे काही मिळवू शकता. माझ्यासाठी तर सगळेच संपले होते, पण मी जर तसा विचार करून गप्प बसले असते तर? उलट मी ‘सगळे संपले’ पासून एक नवीन प्रवासाची सुरुवात केली. तेव्हा आयुष्यात खचून जाऊ नका. जिथून संपते तेथून नव्याने सुरुवात करा, आपल्या आयुष्याची ती छोटीशी खिडकी कुठे न कुठे तुमची वाट पाहत आहे.”

आपण आयुष्यात धडपडत असतो. परिस्थिती वर खाली होत राहणे हेच तर जीवन आहे. पण अनेकदा अश्या काही घटना घडतात ज्यामुळे सामान्य माणूस खचून जातो, हरतो, जगण्याची इच्छाच सोडून जिवंत मढे बनून जातो. त्या गोष्टीतून सावरायला अनेकांना वर्षानुवर्षे लागतात. श्रद्धा गरड यांच्या बाबती तर स्थिती एकदमच वाईट होती. लेखन, जी गोष्ट त्यांना आयुष्यभर करायची होती, ती करण्याची कुवतच त्यांच्याकडून दुर्मिळ आजाराच्या रूपाने नियतीने काढून घेतली. पण दैव सुद्धा तिच्याकडून तिची जिद्द, तिचा आत्मसम्मान आणि तिची स्वप्नं तिच्याकडून हिरावुन घेऊ शकला नाही आणि दैवी इच्छेच्या छाताडावर पाय ठेवून, स्वतःच्या छाटलेल्या पंखांना नव्याने पसरवत उत्तुंग आकाशी झेप घेऊन नवकीर्तीमान श्रद्धा गरड यांनी स्थापन करून दाखविले. स्त्रीशक्ती म्हणजे काय असते ह्याचे एक वेगळे स्वरूप त्यांनी समाजासमोर प्रस्तुत करून, समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणेचे धगधगते कुंड बनून त्या उभ्या ठाकल्या. आज त्यांच्या कृतीतून प्रेरणा घेऊन अनेक लेखक आणि लेखिका आपल्या लेखण्या उचलून लिहायला लागतील यांच्यात शंकाच नाही तसेच समाजातील इतर व्यक्तींना सुद्धा ह्यातून प्रेरणा मिळेल आणि आयुष्याचे चीज बनवायला ते झटून प्रयत्न करतील अशी आशा आहे. त्यांची जिद्दीची धगधगती मशाल , त्यांची स्वाभिमानी लेखणी आणि त्यांच्या असामान्य कर्तृत्वाची गरुडझेप आणि घोडदौड अशीच चालत राहो आणि समाजासमोर प्रेरणेचे उदाहरण बनून सदैव सूर्याप्रमाणे तळपत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

साौजन्य : वि.सं.केंद्र, गाोवा  

Back to top button