EntertainmentOpinion

गोवा ते हॉलिवूड: एक ‘नंदन’ मय प्रवास

फिल्म क्षेत्रात भारताचा दबदबा आहेच, यात काहीच शंका नाही. जवळपास दोन हजार हुन जास्त सिनेमे दरवर्षी हजारों कोटींची भारतात उलाढाल करतात. दरवर्षी आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी गेली अनेक वर्षे गोव्यात होतो. पण असे असूनही गोवा किंवा प्रादेशिक कोंकणी चित्रपट इंडस्ट्री म्हणून उदयास आलेली दृष्टीस पडत नाही. पण कदाचित ह्या क्षेत्रात सुद्धा आता गोवा आणि गोवेकर त्वेषाने पुढे सरसावताना दिसत आहे आणि नंदन प्रभू लवंदे यांच्या रूपाने एक गोड स्वप्न गोव्याला आणि गोव्यातील चित्रपट आयामाला पडले आहे. 

बाफ्ता (BAFTA) म्हणजेच द ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट, ज्याला ब्रिटिश ऑस्कर असे सुद्धा म्हणतात अश्या बहुप्रतिष्ठित संस्थेद्वारे प्रकाशित केलेल्या,  जगभरातील फिल्म आणि टीव्ही क्षेत्रातील २०२२ वर्षाच्या विविध नामांकनामध्ये गोव्याच्या भूमीतील नंदन लवंदे यांचे नाव चमकताना दिसत आहे. ‘रिट्रायवल’ ह्या चित्रपटासाठी उत्कृष्ट छायांकन म्हणजेच ‘सिनेमॅटोग्राफी’ साठी जाहीर केलेल्या नामांकनात नंदन लवंदे यांचे नाव आले असून, जून २०२२ मध्ये प्रत्यक्ष निकाल येईपर्यंत फक्त नंदन नव्हे तर प्रत्येक गोमंतकियाचे हृदय उत्सुकतेने धडधडत असेल. गोव्यापासून लॉस एंजल्स पर्यंतचा नंदनचा प्रवास प्रेरणादायी आहे. 

नंदनचा जन्म गोव्यातील पणजी येथे झाला. डॉ. केशव बळीराम हेडगेवार माध्यमिक शाळेत सहावीत असताना ‘जहर’ ह्या हिंदी चित्रपटाचे शूटिंग गोव्यात चालू होते. तेव्हा नंदनचे बाबा नारायण प्रभू लवंदे, छोट्या नंदनला घेऊन तिथे गेले होते. तिथे नंदनच्या दृष्टीस पडला कॅमेरामन. त्या कॅमेरामॅनच्या सांगण्यावरून लोकं हालचाल करत होते, त्याचे ऐकत होते, आणि त्याचे कुतूहल जागृत झाले. घरी त्यांच्या कडे ३५ एमएम चा स्टील कॅमेऱ्यावरून फोटो काढायला सुरुवात केली. कॅमेरा, फोटोग्राफी, ह्या विषयात स्वतःला निपुण बनविण्यास त्याने सुरुवात केली. नंतर त्याने स्वतः एक डिजिटल कॅमेरा विकत घेतला. लवकरच कॅमेरा लेन्स च्या त्या छोट्या छिद्रातून नंदनसाठी मोठ्या विश्वाचे दरवाजे आपोआप उघडे झाले.

धेम्पे उच्च माध्यमिक विद्यालयातून कला विषयात शिक्षण पूर्ण करून नंदनने थेट पुणे गाठले आणि टिळक महाराष्ट विद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयातून फिल्म मेकिंग चा पदवीचा कोर्स पूर्ण केला. पण नंदनला एवढ्यावर थांबायचे नव्हते. त्याने अमेरिकेत जाऊन लॉस एंजल्स मधील ‘न्यू यॉर्क फिल्म अकॅडमी’ मध्ये मास्टर्स चा कोर्स करायला गेला. त्याच्या दर्जेदार काळामुळे, तसेच चिकाटी आणि मेहनत ह्या गुणामुळे ‘न्यू यॉर्क फिल्म अकॅडमी’ द्वारे त्याला विशेष ग्रांट मिळाली आणि त्याने तेथून शिक्षण पूर्ण केले. तिथे त्याला समविचारी अनेकांची साथ लाभली आणि ऐकमेकाच्या साहाय्याने त्याला भरपूर काही शिकता मिळाले. वॉर्नर ब्रोस, मारवेल, पेरामाउंट, सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टुडिओ मधील प्रोफेसर कडून त्याला शिकायला मिळाले. ह्यात विशेष बाब हि होती कि, सगळे प्रोफेसर किंवा शिकवणारी आणि मार्गदर्शन करणारी मंडळी निवृत्त किंवा “कधी तरी” काम केलेल्या व्यक्ती नव्हत्या. त्या सर्व व्यक्ती वर्तमानात फिल्म क्षेत्रात काम करणाऱ्या आणि जवळीनेकाम करणाऱ्या होत्या. त्यामुळे चालू ट्रेंड, आधुनिक तंत्रज्ञान, सध्या चालू असलेल्या चित्रपट निर्मितीच्या पद्धती सारख्या अनेक गोष्टी नंदनला शिकायला मिळाल्या. एक सिनेमॅटोग्राफर म्हणून लागणाऱ्या मानसिकतेची घडण नंदनची तिथे झालीच पण त्या भूमिकेला लागणारी कल्पकता, सर्जनशीलता ह्या गुणांची सुद्धा जडण घडण झाली. 

तेथून नंदनच्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात झाली. छोट्या आणि मोठ्या प्रोडक्शन सोबत काम करताना त्याने सेटवर मिळणाऱ्या छोट्या छोट्या कामापासून सुरुवात केली आणि त्याच्या कामाचा दर्जा आणि चिकाटी पाहून त्याला अजून कामे येऊ लागली. चित्रपटाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे विषय प्रभावी पणे मांडू शकतात हे त्याने आपल्या कामाद्वारे दाखवून दिले आहे . जॉर्ज फ्लॉयडची हत्या आणि एगोराफोबिया विषयावर आधारित ‘फिअर ऑफ डार्कनेस’ यावर तसेच ‘बेअर’ स्तनाच्या कर्करोगावर आधारित चित्रपटांवर त्याने काम केले आहे. दिलजीत दोसांज बरोबर सुद्धा काम करण्याचा आणि त्याची म्युजिक विडिओ शूट करण्याची संधी त्याला मिळाली. जगभरातील वेगवेगळ्या स्थानातून व्यक्ती एकत्र येऊन त्याच्या ‘रिट्रायवल’ ह्या सिनेमाचे काम सुरु करणार होते पण तेव्हाच कोरोना सुरु झाला आणि त्यांना अपेक्षित प्रोड्युसर मिळणे कठीण झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ‘रिट्रायवल’ हा चित्रपट जवळजवळ न बनण्याच्या मार्गावर होता. चित्रीकरण चालू असताना कोविड ची लाट शिखरावर पोचली आणि चित्रीकरण बंद करावे लागले. पण तरीही पूर्ण टीमने ह्यातून मार्ग काढला. चार महिन्यानंतर पुन्हा क्राउड फंडिंग द्वारे परत शूटिंग सुरु केला आणि काम पूर्ण केले.  सिनेमॅटोग्राफी ची पूर्ण जबाबदारी नंदनने लीलया स्वीकारून पार पडली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज नंदनचे नाव बाफ्ता च्या उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर च्या नामांकन सूचित आपल्याला दिसत आहे. त्याच बरोबर उत्कृष्ट साउंड आणि आणि इतर आयामांमध्ये सुद्धा हा चित्रपट नामांकित झालेला असून नक्कीच ह्या चित्रपटावर सर्वानीच घेतलेली मेहनत दिसून येते. ह्या नामांकनाची माहिती जेव्हा घरी वडील आणि आई लक्ष्मी प्रभू लवंदे यांना कळली तेव्हा त्यांना बाफ्ता म्हणजे काय हे समजवायला लागले आणि नंतर बाफ्ताच्या प्रतिष्टेबाबत कळताच सर्वांना खूप आनंद झाला आणि सगळे खूपच खुश आहेत असे नंदनने सांगितले. 

गोवा आणि गोव्यातील फिल्म क्षेत्राबद्दल बोलताना नंदन म्हणाला कि अजून ह्या क्षेत्राकडे करिअर म्हणून बघण्याचा दृष्टिकोन लोकांनी विकसित केला नाहीये आणि हे बघून अतिशय वाईट वाटते. पडद्यावर काम करणारे फक्त कलाकारच नसतात पण पडद्यामागे काम करणारा अतिशय कौशल्यपूर्ण आणि मेहनती लोकांचा ताफा असतो. कधी कधी सेटवर १८-२० तास सुद्धा सलग काम करावे लागते. एखाद्या प्रोजेक्टवर काम करताना आठवड्याच्या आठवडे किंवा महिन्याच्या महिने काम करावे लागते. अखेर जिथे मेहनत आणि कामाचा दर्जा आहे तिथे यश मिळणे शक्य आहे. गोमंतकीयांनी फक्त डॉक्टर आणि इंजिनियर च्या पलीकडील विश्व बघायला सुरुवात केली पाहिजे कारण छोट्याश्या चौकटीबाहेर अनेक संधी वाट पाहत असतात. गोव्यात कलाकारांची, तांत्रिक बाजू जाणणाऱ्यांची, कल्पकतेची, सर्जनशीलतेची काहीच कमी नाहीये. फक्त गरज आहे ती अविरत मेहनत घेण्याची आणि मेहनत घेणाऱ्यानं समर्थन करण्याची. गोव्यात अनेक चांगल्या दर्जाचे म्युजिक विडिओ, शॉर्ट फिल्म नियमितपणे काढले जातात. देशातील किंवा आंतरराष्ट्रीय निर्देशकांनी आणि स्टुडिओंनी जर गोव्यातील फिल्म क्षेत्रात गुंतवणूक केलेली पाहिजे असेल तर सुरुवातीला स्थानिक निर्देशक, सरकार आणि सगळ्यात महत्वाचे रसिक प्रेक्षकांनी ह्या क्षेत्रातील कलाकारांना, काम करणाऱ्यांना, शॉर्ट फिल्म बनविणाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, सहकार्य केले पाहिजे. पुढे नंदन म्हणाला कि आज मला कुणी विचारले कि एखादा गोव्यातील किंवा कोंकणी चांगला सिनेमा सजेस्ट कर, तेव्हा गंभीर प्रश्न पडतो कि कुठला सिनेमा सजेस्ट करू?  इफ्फी मध्ये गोवा, गोव्यातील चित्रपट आयाम आणि गोव्याचे प्रतिनिधित्व योग्य प्रमाणात होताना दिसत नाही. हे बदलले पाहिजे. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म जोमाने चालू आहे. जगभरात ओटीटी प्लॅटफॉर्म वरील भारतीय कन्टेन्टला प्राधान्य दिले जाते आणि लोकं आवर्जून बघतात. तेव्हा ह्या दिशेने सुद्धा कन्टेन्ट तयार करण्यासाठी प्रयत्न आलेले पाहिजे. 

स्वतःबद्दल सांगताना नंदन म्हणाला कि त्याला जुने सिनेमे बघायला खूप आवडतात. जुने हॉलिवूड आणि फ्रेंच चित्रपट तो आवर्जून बघतो. मार्टिन स्कोर्सेजी हा त्याचा आवडता फिल्ममेकर असून जेव्हा यंदा त्याला गोव्यात  इफ्फीत जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले तेव्हा खूप आनंद झाला असे त्याने नमूद केले. भविष्यात वेगवेगळ्या सर्जनशील लोकांसोबत, स्टुडिओसोबत काम करून चांगले सिनेमे बनवायचे आहे असे त्याने सांगितले. स्वतःची अशी एखादी फिल्म बनवायला आवडेल का असे विचारल्यावर त्याने सांगितले कि, “भारतावर इंग्रजांचे अत्याचार ह्यावर खूप फिल्म केलेल्या आहेत. पण गोवा, गोव्याच्या इतिहास आणि विशेषतः गोव्यावरील पोर्तुगीज आक्रमण आणि त्यांनी केलेल्या अत्याचाराची, काळे कारनामे सांगणारी एखादी फिल्म झालेली नाहीये, तेव्हा भविष्यात ह्या विषयावर फिल्म बनवायला आवडेल.”

२५ वर्षीय नंदनने युवकांसाठी संदेश देताना म्हटले कि “कुठलेही क्षेत्र निवडू शकता, पण त्या क्षेत्रात काम करण्यासाठी लागणारी दृष्टी तसेच दूरदृष्टी असणे गरजेचे आहे. नवीन गोष्टी शिकण्याची तसेच शिकत राहण्याची वृत्ती आणि गुण जर जोपासला आणि त्याला मेहनतीची साथ दिली तर तुम्ही जीवनात कुठेही यश मिळवू शकता.” सध्या नंदनला एचबीओ मॅक्स ह्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म द्वारे एक फिचर वेब सिरीज वर काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे आणि लवकरच तो ह्या कामासाठी अमेरीकेसाठी प्रस्थान करणार आहे. 

आपण सगळेच जण स्वप्नं पाहतो. पण स्वप्नं पाहून मेहनतीच्या जोरावर ती कशी पूर्ण करायची असतात ह्याचे एक उत्तम उदाहरण नंदन प्रभू लवंदे यांनी समाजासमोर दिले आहे. सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर फक्त अटकेपार नाही तर सातासमुद्रापार झेंडे लावू शकतो ह्याचे उदाहरण बनून नंदनने अनेकांना स्वप्ने सत्यात उतरवायला प्रेरित केले असेल ह्याच मुळीच शंका नाही. आतापर्यंत मिळालेल्या यशाचे सर्व श्रेय नंदनने आपले आईवडील, मार्गदर्शक, शिक्षक आणि स्वतःच्या मेहनतीला देऊन उत्तम संस्कार कसे असतात हे सुद्धा दाखवून दिले आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय फिल्म क्षेत्रात फक्त गोवा आणि गोवेकरांचे प्रतिनिधित्व करणारा नव्हे तर एक गोमंतकीय आणि भारतीय म्हणून नेतृत्व करणारा चेहरा म्हणून नंदन कडे पाहिले जाईल अशीच सर्वांची इच्छा आहे. मुळात बाफ्ता नामांकन मिळणे हीच मोठी बाब आहे, पण येत्या जूनमध्ये जेव्हा बाफ्ताचे पुरस्कार वितरण होईल तेव्हा व्यासपीठावर पुरस्कार स्वीकारणारा एक भारतीय आणि एक गोमंतकीय, नंदन प्रभू लवंदेच्या रूपाने पाहायला सगळ्यांना आवडेल. नंदनला बाफ्तासाठी आणि भविष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 

सौजन्य : विश्व संवाद केंद्र, गोवा

Back to top button