EntertainmentOpinion

‘कावी’ कलेला संजीवनी रुपी गवसलेला सागर

ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर बसलेले असताना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी जगप्रसिद्ध “ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला” हे अजरामर गीत लिहिले. आंग्ल भूमीवर असताना भारताच्या मातीचे माहात्म्य, आणि लागलेली ओढ सावरकरांनी व्यक्त केलेली ह्या गीताद्वारे आम्हाला अनुभवायला मिळते. सागर नाईक मुळे, काही आंग्ल भूमिवर नव्हते, ते तर हैदराबाद मध्येच होते. पण कदाचित, मायभूमी गोव्याच्या मातीने मारलेली “सागरा, प्राण तळमळला” हि हाक त्याच्या काळजात रुतली आणि गोव्याच्या मातीला एका संजीवनीच्या रूपाने सागर गवसला. 

‘कावी’ हा गोव्यातील एक चित्रकला प्रकार आहे. त्याला शेकडो वर्षांची परंपरा आणि इतिहास सुद्धा आहे. माती आणि शेणाचा वापर करून सुंदर कलाकृती प्रामुख्याने देवळांच्या भिंतीवर रेखाटल्या जायच्या. पोर्तुगीज गुलामगिरीमुळे हि कला गोव्यातून बाहेर पडून महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या राज्यात अजून जिवंत आहे. पण. गोव्यातील जुनी, पारंपरिक देवळे पाडून आता त्याच जागी नवीन काँक्रीट ची देवळे बांधणे सुरु झाल्याने त्या देवळांच्या भिंतीवर चित्राच्या रूपाने असलेली हि मूळ गोव्यातील कला, गोव्यातच लुप्त होण्याच्या काठावर आहे. अश्या प्रसंगी सागर नाईक मुळे, या युवकाने हि अभिजात कला वाचविण्याचे, जोपासण्याचे आणि पुढील पिढीपर्यंत पोचविण्याचा अविरत प्रवास त्याने सुरु केला आहे. 

फोंडा तालुक्यातील आडपई हे सागरचे जन्मगाव. मुळात फोंडा तालुका म्हणजे गोव्यातील कला आणि संस्कृतीचे केंद्र आणि तालुक्यातील प्रत्येक गावाप्रमाणे आडपई ची आपली एक वेगळी विविधता आणि महत्व सुद्धा आहे. गोवा स्वातंत्र्य लढ्यात आडपई एक बिंदू होताच त्याच बरोबर पूर्वी जहाज बांधणी केंद्र होते. ‘मोचवे’ म्हणजेच मोठे जहाज जे साधारण एका बार्ज एवढे मोठे असायचे त्याची बांधणी पूर्वी इथे होत असे. कालांतराने जहाज बांधणीचे आकार कमी होत गेले आणि होडी बांधण्यापर्यंत येऊन ठेपले. त्या होड्यांमधून, मातीतून, खेळून वाढलेला सागर. आडपई येथे सरकारी प्राथमिक शाळेनंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सागरने कवळे येथील सरस्वती विद्यालयातून पूर्ण केले. संपूर्ण कुटुंब कुठल्या न कुठल्या मार्गाने कला आणि संस्कृतीशी, कला विषयात कुठलेच लौकिक शिक्षण नसताना सुद्धा निगडित असल्याने सागरने फाईन आर्ट्स विषयात गोवा कॉलेज वर आर्टस् मधून पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी हैदराबाद गाठले. 

सरोजिनी नायडू विद्यापीठातून सागरने मास्टर्स पदवी साठी प्रवेश घेतला. वडील मजुरी करत होते, घरची आर्थिक स्थिती म्हणजे तारेवरची कसरत होती. तेव्हा काम करता करता सागरने आपले शिक्षण पूर्ण करत होता. हैदराबाद मध्ये असताना सागरला गोव्याची आठवण सतावत होती. कला विषयात शिक्षण घेताना त्याला गोव्यातील, आडपई गावातील कला यांचे ध्यास सतावत होते. तेव्हा त्याने ह्या विषयात माहिती मिळवायला सुरुवात केली आणि त्याचा लुप्त होत असलेल्या कावी कलेशी संपर्क आला. ज्या मातीत आपण खेळलो, लहाना पासून मोठा झालो त्या मातीशी निगडित असलेला कला प्रकार त्याला खूप भावला आणि ह्याच विषयात त्याने प्रवास करायचा असे निश्चित करून पूर्ण एक वर्ष संशोधन आणि अन्वेषण करण्यास समर्पित केले. 

पुढे मुंबईत असताना त्याला कावी कलाकृती साकारण्यासाठी शेणाची आवश्यकता होती. पण त्याला शेणच सापडेना. वरळी नेहरू सेंटर पासून ठाणे पर्यंत तो शेणाच्या शोधात चालत आला आणि अखेर त्याला शेण सापडले, ते पण कुजलेले. ह्या घटनेनंतर लगेचच मुंबईतील गणेशोत्सव त्याला पाहायला मिळाला. पण जसे टीव्ही आणि इतर माध्यमातून दाखवतात तसा गणेशोत्सव तिथे प्रत्यक्षात नव्हताच. गोव्यातील गणेशोत्सव यासारखा निसर्गाशी जवळिकी असलेला, आपलेपणाने भरलेला, आनंदाने नटलेला गणेशोत्सव तिथे नव्हताच. उलट फक्त पैसे ओतून पंडाल उभारलेला आणि गणेशोत्सव सोडून सगळे काही असलेला गणेशोत्सव पाहून त्याला प्रश्न पडला, कि आधुनिकतेच्या नावाने हे जर असे चित्र आज पाहायला मिळत असेल तर भविष्य खूप भयावह असेल आणि आपली संस्कृती आणि परंपरा आधुनिकतेच्या नावाने ऱ्हास होऊन लुप्त होतील. आपला गाव, आपले गावपण, आणि प्रत्येक गावाचा आपला असा असलेला अस्सलपणा म्हणजे ओरिजिनॅलिटी आधुनिकतेचा म्हणजेच मॉडर्नायझेशन चा राक्षस गिळून टाकणार असे त्याचे मत झाले आणि म्हणून “ग्रामीण जीवन, त्याची संस्कृती आणि त्याचे राजकारण” (Rural Life, Its Culture and Its Politics) हा विषय निवडून मास्टर्स पदवी पूर्ण केली. 

पुढे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून कला क्षेत्रच निवडायचे हे सुद्धा त्याने ठामपणे ठरवले. इतिहासातील प्रसिद्ध कलाकारांनी ज्याप्रमाणे आपले संपूर्ण आयुष्य वाहून कलेची सेवा केली त्याच प्रमाणे काम करायचे व सरकारी किंवा खाजगी नोकरी करायची नाही असे ठरवून फ्रीलान्सिंग सुरु केले. पण अचानक कोरोना महामारी सुरु झाली. कामं येणं खूप काळापर्यंत बंद झाले. गणेश चतुर्थी होऊन नवरात्री जवळ आली. तेव्हा देवीची सेवा म्हणून काही तरी करायचे असा विचार सागरच्या मनात चालू होता. ज्या प्रमाणे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी लोकं विविध रंगांचे कपडे घालून सोशल मीडियावर शेअर करतात त्याचप्रमाणे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी देवीची विविध रूपे कावी कलाकृतीने साकारून पोस्ट करायचे ठरविले. पण ह्या छोट्याश्या गोष्टीचा ‘डॉमिनो इफेक्ट’ कुठपर्यंत जाणार याची कल्पना कुणालाच नव्हती. अल्पकालावधीत सोशल मीडियावर टाकलेली कावी कलाकृतींचे फोटो जबरदस्त वायरल झाले. पुढे मित्रांच्या सहयोगाने गोव्यातील प्रसार माध्यमातून सुद्धा घराघरात कावी कलेचे नमुने आणि उदाहरणे सागर नाईक मुळे यांच्या चित्रांमुळे पोचले. सागर माहितीत असलेले कावी कलेचे नमुने फक्त नक्कल न करता त्यात आपल्या अनुभवाचे आणि सर्जनशीलतेची छटा जोडतो. आणि हीच कल्पकतेची छटा सर्वांना भावली आणि अल्प कालावधीत त्याची चित्रे विविध माध्यमातून सर्वदूर पोचली. 

अचानक एक दिवशी डीडी १ मधून काही मंडळी त्याची मुलाखत घ्यायला आली. एके दिवशी फोन आला आणि आपण “पुणे आकाशवाणीतून बोलतोय” असे समोरची व्यक्ती म्हणाली. स्पॅम कॉल असेल असे त्याला सुरुवातीला वाटले पण काही वेळानंतर समजले कि खरोखरच फोन पुणे आकाशवाणी केंद्र वरून आला होता. आयुष्यात कधी कल्पना केली नव्हती अशी प्रसिद्धी अचानक पणे त्याला मिळाली. भारतभरातून पेंटिंगची कामे पण येऊ लागली. पण ह्या पेक्षा मोठा सुखद धक्का येणे बाकी होता. 

रात्रभर काम करून अजून सागर झोपेतच होता तेव्हा त्याचा फोन वाजला. फोनवरील व्यक्ती मुलाखतीसाठी वेळ आहे का असे विचारात होती. सागरने सांगितले कि मला फ्रेश व्हायला थोडा वेळ द्या . लगेचच मुंबईहून अजून एक फोन आला, त्याने पण मुलाखतीसाठी विचारपूस केली. सागरला काहीच समजेना. मोबाईलवर अभिनंदनपर मेसेजेस येत होत्या. परत अजून एक फोन आला, मुलाखतीसाठी विचारपूस करू लागले. न राहून सागरने विचारले काय झाले, अचानक मुलाखत का घेऊ इच्छिताहेत? आणि समोरच्या व्यक्तीचे उत्तर ऐकून सागरला आनंदाचा सुखद धक्काच बसला. ‘मन कि बात’ ह्या बहुप्रतिष्ठित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात, पंतप्रधानांनी सागर नाईक मुळे ह्यांच्या कामाचे उल्लेख करून, लुप्त होत असलेल्या कावी कलेच्या संवर्धनासाठी, तिच्या जोपासनेसाठी आणि तिला पुनर्जीवन देण्याच्या कार्यात मोलाचे योगदान केल्याबद्दल सागरचे कौतुक केले. सागरला हि गोष्ट कळण्यापूर्वीच संबंध देशभरात हि बातमी पोचली होती. घरच्यांना तर आनंद होताच पण संबंध गाव ह्या आनंदात सहभागी झाला होता. “तू गावाचे नाव खूप मोठे केले” ह्या स्तुतिसुमनांनी प्रत्येक गावकऱ्याने त्याचे अभिनंदन केले. त्याच्या पेक्षा जास्त आनंद त्याच्या देशभरातील मित्रांनी साजरा केला असे सागरने सांगितले. लगेचच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुद्धा प्रत्यक्ष वैयक्तिक फोन करून सागरच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.  हेराल्ड या गोव्यातील प्रमुख इंग्रजी वृत्तसंस्थेने त्याच्या कामाची नोंद घेऊन “प्राईड ऑफ गोवा” हा दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार सागरला जाहीर केला. 

ज्या मातीत आपण खेळलो, वाढलो, त्याच मातीच्या हाकेला धावून पोचलो आणि त्याच मातीने आज नाव मिळवून दिले आहे त्यामुळे आपल्या यशाचे सगळे श्रेय सागर गोव्याच्या मातीलाच तसेच आई वडील सुरेश नाईक मुळे आणि रती नाईक मुळे ह्यांना देतो. कावी कलेसारख्या अजून खूप गोष्टी आहेत ज्या आता समजा योग्य पावले उचलली नाहीत तर नामशेष होऊन जातील अशी भीती सागरने व्यक्त केली. गावाचे गावपण, विविध नृत्य प्रकार, परंपरा, सण साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धती, विविध कला प्रकार, संस्काराचे माध्यमे उदा. आजीच्या गोष्टी, या सारख्या अनमोल रत्नांची जोपासना करणे गरजेचे आहे. ह्यासाठी समाजातील सामान्य व्यक्तीपासून उच्च स्तरावरील कला संस्कृती खात्यात काम करणारे अधिकारी आणि सरकार यांची सुद्धा जबाबदारी आहे असे त्याने म्हटले. जर देशाचे पंतप्रधान गोव्याच्या कोपऱ्याला वसलेल्या गावातील, एका सामान्य व्यक्तीच्या कार्याची माहिती मिळवून संबंध देशासमोर प्रस्तुत करू शकता, तर छोट्याश्या गोव्यात कला आणि सांस्कृतिक खात्यातील मंत्री, अधिकारी, किंवा कर्मचारी सुद्धा, हे काम का करू शकत नाही असा सवाल त्याने उठविला. प्रश्न उपलब्ध संसाधनांचा नाहीये, प्रश्न काम करायच्या इच्छेचा आहे आणि तीच कुठेतरी कला क्षेत्राबरोबरच विविध क्षेत्रात सुद्धा कमी पडत आहे, पण यश मिळाले कि श्रेय घेण्यासाठी सगळेच पुढे सरसावतात असे सागर म्हणाला. 

युवकांना संदेश देताना सागर म्हणाला कि, यश लवकर मिळत नाही. त्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी आणि सातत्याची गरज लागते. “आपला ओळखीचा अमुक जण आहे, तमुक जण आहे” तेव्हा आपले काम होऊन जाईल, किंवा आपले काम करून घेऊ अशी सवय सोडा. तुम्ही मेहनत करून जेव्हा “ओळखीच्या” आधारावर दुसऱ्याला संधी मिळतात तेव्हा वाईट वाटते ना? तेव्हा तुम्ही स्वतः ओळखीच्या आधारावर वशिले लावणे सोडून कामगिरीवर आधारित स्वतःचे आणि दुसऱ्यांचे सुद्धा मूल्यांकन करायला सुरु करा. बदलाची  सुरुवात स्वतःपासून करा, समाजात बदल तेव्हाच तर होईल. सध्या सागर आपल्या कलासाधनेत व्यस्त असतो. फ्रिलांसींग तो करतोच पण त्याच बरोबर अनेक आर्किटेक्चर च्या तो संपर्कात असून विविध प्रोजेक्ट्स वर तो काम सुरु करणार आहे. त्याच बरोबर स्वतःच्या चित्रांचे सोलो प्रदर्शनी सुद्धा तो लवकरच सुरु करणार आहे. 

मूळ गोव्यातील असलेल्या पण गोव्यातच नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या ‘कावी’ कलेला सागर च्या रूपाने नवसंजीवनी मिळाली. आईसारख्या मातीची हाक केवढी वात्सल्यपूर्ण असते आणि जगाच्या पाठीवर कुठेही माणूस असला तरी मायेच्या हाकेला तो सर्वस्व सोडून येतो अशी अनेक उदाहरणे आहेत आणि त्याच सूचित अजून एक नाव, सागर नाईक मुळे हे जोडले गेले आहे. सागरच्या ह्या कृतीतून समाजातून अजून व्यक्ती समोर येऊन आपला इतिहास, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले संस्कार यांचे जतन आणि संवर्धन करण्यास पुढे सरसावतील, आणि इतरांनाही प्रेरित करतील अशी चित्रे समाजात दिसत आहे. सागर आणि त्याचे कार्य एक नांदी ठरो आणि त्यातून प्रेरित होऊन समाजातून अनेको व्यक्ती जाग्या होवोत अशी प्रार्थना. सागर आणि त्याच्या भावी प्रवासासाठी अनेक शुभेच्छा आणि त्याच्या हातून अशीच मातीची सेवा घडो हीच मनोकामना. 

Back to top button