LiteratureOpinion

एकनाथजींच्या दूरदृष्टीचे विवेकांनद केंद्र!

जीवने यावददानं स्यात् प्रदानं ततोऽधिकम्।’ समाजाकडून मला जे मिळाले आहे, त्यापेक्षा अधिक मी या समाजाला परत देईन, या विचाराने विवेकानंद केंद्राचे कार्य सातत्याने चालू आहे. दि. ७ जानेवारी, १९७२ रोजी स्वामी विवेकानंदांची जयंती होती. याच दिवशी एकनाथजी रानडे यांनी ‘ओंकार’चित्रित केलेला भगवाध्वज शीलास्मारकावर फडकवून विवेकानंद केंद्राची स्थापना केली. आज ५० वर्षे सातत्याने विवेकानंद केंद्र अंदमान, अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम, काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात अशा देशातील विविध ठिकाणी मनुष्यनिर्माण आणि राष्ट्रपुनरुत्थानाचे काम करीत आहे. प्रत्येक माणसामध्ये देव आहे आणि त्याला जागृत करून राष्ट्रउभारणीत वापरता येईल, असा केंद्राचा विश्वास आहे. आज 26 राज्ये, चार केंद्रशासित प्रदेश आणि १,१०५ ठिकाणी केंद्राच्या कार्यपद्धतीतून समाजातील विविध स्तरांतील लोकांपर्यंत पोहोचत आहे. योगवर्ग, स्वाध्याय वर्ग, संस्कार वर्ग आणि केंद्र वर्ग अशा या चार कार्यपद्धती आहेत. ग्रामीण विकास, शिक्षण, नैसर्गिक संसाधनांच्या विकासासाठी त्यांच्या योगदानासाठी विवेकानंद केंद्राला २०१५ चा ‘गांधी शांतता पुरस्कार’ भारत सरकारकडून मिळाला आहे आणि यावर्षी कन्याकुमारी येथील नारडेप प्रकल्पालाही भारत सरकारचे ‘नॅशनल वॉटर अवॉर्ड २०२०’चे दुसर्‍या क्रमांकाचे परितोषिक मिळाले.
 
 स्वातंत्र्योत्तर काळापासून दुर्लक्षिलेला भारताचे अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे पूर्वांचल. पूर्वोत्तरमध्ये एकनाथजींच्या दूरदृष्टीतून १९७६ साली कामाला सुरुवात झाली. ‘जीवनव्रती कार्यकर्त्यां’ची पहिली फळी अरुणाचल प्रदेशात पोहोचली. १९७६ साली एकनाथजींच्या दूरदृष्टीतून येथे शाळा सुरू झाल्या. आज ६८ शाळा अरुणाचल प्रदेशात जवळ जवळ २५ हजार मुलांना शिक्षण देत आहेत.अरुणाचलच्या या शाळांमधून अनेक डॉक्टर्स, इंजिनिअर्स, आयएएस, ऑफिसर्स आणि सरकारी अधिकारी घडले. हे विद्यार्थी आज केंद्राच्या आचार, विचार आणि संस्कारांनी समृद्ध होऊन त्यांच्या प्रदेशाची प्रगती, उन्नती करत आहेत. आता देशाच्या हितासाठी कार्य करत आहेत. आपले कॅबिनेट लॉ मिनिस्टर किरण रिजूजी हेच त्याचे उत्तम उदाहरण आहेत.

निरजुली अरुणाचल प्रदेशात चहाचे खूप मोठ्या प्रमाणावर मळे आहेत. या मळ्यात काम करणार्‍या कामगारांच्या मुलांसाठी ‘आनंदालये’ हा शिक्षणासाठीचा उपक्रम गेली तीन दशके चालविला जात आहे. आत्ता त्यांची सुशिक्षित तरुण मंडळी स्वत:च्या पायावर स्वाभिमानाने कार्यरत आहेत.नैसर्गिक साधनसंपत्ती विकास, ग्रामीण विकास, ’विवेकानंद केंद्र संस्कृती संस्था’, ‘वैदिक दर्शन प्रतिष्ठान’, ‘विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन’, अरुणाचल बंधू परिवार असे विविध उपक्रम देशभरात सुरू आहेत. संस्थेने ‘महाबली घनकचरा व्यवस्थापन आणि बायोगॅस प्रकल्प’ बांधला आहे. महाराष्ट्रातही विविध प्रकल्प राबविले जात आहेत. यासाठी नुकतेच महाराष्ट्रात सोलापूर येथे ‘विवेकानंद केंद्र वेदांतिक अ‍ॅप्लिकेशन ऑफ योग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट’ हा उपक्रम सुरू झाला आहे. गेल्याच महिन्यात दि. ४ मार्चला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन झाले. येथे शास्त्रानुसार अद्ययावत व्यवस्थापन तंत्र आणि भारतीय संस्कृतीत त्याचे एकीकरण याचा अभ्यास करणे तसेच वेदान्त, भगवद्गीता आणि अर्थशास्त्र इत्यादी भारतीय शास्त्राच्या संबंधित सारांवर आधारित समग्र व्यवस्थापनातील प्रशासक, व्यावसायिक आणि तरुणांसाठी अभ्यासक्रमांचे पुनर्गठन केले जाते. तसेच नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथील पिंपळद गावामध्ये विवेकानंद केंद्र प्रशिक्षण व सेवा प्रकल्प हा उपक्रम गेली २५ वर्षे सातत्याने कार्यरत आहे.
 
 
 एक प्रशिक्षण केंद्र कन्याकुमारी येथे आहे आणि दुसरे महाराष्ट्रामध्ये पिंपळदमध्ये आहे. त्र्यंबकेश्वर हा 200 ग्रामपंचायती असलेला वनवासी तालुका. २५ वर्षांपूर्वी केंद्राने तेथे ग्रामीण विकासाचा उपक्रम हाती घेतला. येथे जवळपासच्या ३० गावांमध्ये आणि पाड्यांमध्ये शैक्षणिक सेवा, आरोग्य सेवा केली जाते. कोरोनाच्या काळात तेथील वनवासी आणि खेड्यातील लोकांसाठी दोन वर्षे सतत वैद्यकीय सेवा, औषधे आणि धान्याचे वाटप केले. जवळजवळ ५०० हून अधिक परिवारांसाठी वाटप करण्यात आले. तसेच बालवाडी, आनंदालय, विवेकाश्रम, ५० मुलांसाठी वसतिगृह आहे. गावातील मुलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. उदा. शिवणकाम, शेती, गोसेवा, पाणी व्यवस्थापन संगणक केंद्र, मोटर मेकॅनिक, प्लम्बिंग तसेच अपारंपरिक ऊर्जा प्रशिक्षणही दिले जाते. तसेच यावर्षी विवेकाश्रमातील सात विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय ज्यूडो स्पर्धेसाठी निवड झाली. त्यातील कुमारी वैभवी आहेर हिला चंदिगढ येथे झालेल्या राष्ट्रीय ज्यूडो स्पर्धेतरौप्यपदक मिळाले. युवकांसाठी मोटर मेकॅनिक कोर्स सुरू आहे. ‘टाटा मोटर्स’च्या सहयोगाने हा कोर्स सुरू आहे. आत्तापर्यंत ५० मुलांना त्यामधून नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. त्याचबरोबर विवेकानंद केंद्राची मराठी इंग्रजी, आसामी, तामिळ, हिंदी अशा भाषेतील प्रकाशने आहेत आणि सर्वांसाठी अतिशय अल्पदरात पुस्तके, ऑडिओ सीडी आणि मासिके प्रकाशित होतात. एकूण १७ भाषांमध्ये हे कार्य चालते. तशीच आता ‘ऑडिओ बुक्स’ही आहेत. पुणे यथे मराठी प्रकाशन विभागाचे कार्यालय आहे. तेथून प्रकाशनाची पुस्तके हवी असल्यास घरपोच पोहोचवली जातात. संपर्क क्र. ९८८१०६१६८६. विवेकानंद केंद्राच्या या सर्व कार्यासाठी देशभरात २०० पूर्णवेळ उच्चशिक्षित कार्यकर्ते कार्यरत आहेत. त्यांना ‘जीवनव्रती कार्यकर्ता’ असे संबोधिले जाते. हे कार्यकर्ते आपले सर्वस्व, संपूर्ण जीवन केंद्रासाठी देऊन केंद्राच्या माध्यमातून देशासाठी कार्य करत आहेत.

विवेकानंद केंद्राच्या भारतभर ८५ शाळा आहेत. या शाळांमधील अनेक मुलांना आर्थिक मदतीची – त्यांचे शुल्क, वह्या-पुस्तकांची गरज आपण पूर्ण करू शकता. तसेच केंद्राचे जे ‘जीवनव्रती कार्यकर्ते’ आहेत, त्यांच्यासाठी आपण परिपोषक योजनेत सहकार्य करू शकता आणि केंद्राच्या समाजपयोगी विविध प्रकल्पात आपले ‘कॉन्ट्रिब्युशन’ देऊन देशकार्याला हातभार लावू शकता. आवडेल त्या, भावेल त्या व शक्य असलेल्या कोणत्याही प्रकारे यात सहभागी होऊ शकता. मुंबईत दादर,विलेपार्ले, अंधेरी, बोरिवली, गिरगाव, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ या ठिकाणी शाखा काम करीत आहेत. चला आपणही या देशकार्यात आपला खारीचा वाटा उचलूया आणि विश्वबंधुत्वाचा संदेश सर्व जगाला देऊया.

स्मिता पुराणिक (9820002416)

सौजन्य : मुंबई तरुण भारत  

Back to top button