EducationLiterature

अपयशाने खचून गेलात? मग सफाई कामगार ते SBI अधिकारी बनलेल्या या महिलेची प्रेरणादायी कहाणी 

अनेक प्रयत्न करुन झाले पण कशातही यश नाही. मी अशा काय चुका केल्या आहेत की, मला कोणत्याही कामात यश मिळत नाही? एखाद्या नव्या गोष्टीत कुठे यश मिळणार असं वाटतं तितक्यात इतकी नकारात्मक उर्जा ग्रासते की, काय करावं कळत नाही. अनेकांना आयुष्यात पटकन यश मिळत नाही. स्ट्रगल हा त्यांच्या आयुष्याचा भाग असतो. तर अनेकांना यश अगदी सहज मिळतं आणि टिकतं सुद्धा. दुसऱ्यांचे असे यश पाहिले की, आपण यशस्वी का नाही याचा विचार आपण करु लागतो. सतत येणाऱ्या अपयशाने खचून गेलाय? मग ही कहाणी तुम्हाला पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यास भाग पाडेल हे मात्र नक्की.

ही कहाणी एका सफाई कामगार महिलेपासून सुरू होते. प्रतीक्षा टोंडवलकर असं या महिलेचं नाव आहे. अवघ्या वयाच्या २० व्या वर्षी प्रतीक्षा यांच्या पतीचं निधन झालं. ज्या वयात पतीसोबत संसाराची स्वप्न रंगवणार होते त्या वयात नशीबाने विधवा आयुष्य त्यांच्या पदरात पडलं. पतीचा आधार गेल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. जगायचं कसं इथून त्यांची सुरूवात होती. पतीच्या निधनानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) मुंबई शाखेत छोटासा व्यवसाय सुरू केला. पण पुढे जाऊन आपण याच बॅंकेच अधिकारी होऊ याचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. सफाई कामगार ते एसबीआय बॅंक अधिकारी असा हा प्रतीक्षाचा हा प्रवास तुम्हाला सुद्धा जगण्याची नवी प्रेरणा देऊन जाईल.

प्रतीक्षा तोंडवळकर यांनी सफाई कर्मचारी म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. प्रतीक्षाने कामाला सुरुवात केली तेव्हा तिचे शालेय शिक्षणही पूर्ण नव्हते. पण पतीच्या निधनानंतर तिने स्वत:ला आणि आपल्या मुलाला चांगले जीवन मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आणि यशाच्या उंच शिखरांना स्पर्श केला. प्रतीक्षाची जिद्द, काटेकोर अभ्यास आणि मेहनत यामुळे प्रतीक्षाला एक दोन नव्हे तर तब्बल ३७ वर्षे वाट पाहावी लागली. ३७ वर्षाचा हा संघर्ष…नुसती कल्पना जरी केली तरी इतके वर्ष कोण मेहनत घेणार? असं आपण सहज बोलून जातो. पण प्रतीक्षाने आपला हा ३७ वर्षाचा संघर्ष मोठ्या जिद्दीने पार केला आणि त्या बँकेत असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर काम करत आहेत.

प्रतीक्षा यांची ही यशोगाथा भारतातील पुरुष प्रधान बँकिंग क्षेत्रात खूप महत्त्वाची आहे. कारण अनेकदा सामाजिकदृष्ट्या दडपल्या गेलेल्या महिलांना त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे आणि सामाजिक नियमांच्या विरोधात जाऊन त्यांचे करिअर घडवण्यासाठी पुरुषांपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागत लागतात. प्रतीक्षा यांनी आई म्हणून आपल्या मुलांचं संगोपनात कमी न पडता कौटुंबिक जबाबदारी पार पाडत हे यश प्राप्त केलं.

प्रतीक्षा तोंडवळकर या मुळच्या पुण्याच्या असून त्यांचा १९६४ साली झाला. त्यांचे आई-वडील गरीबच होते. १० वी चं शिक्षण पूर्ण करण्याआधीच आई-वडिलांनी त्यांचे हात पिवळे केले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचा विवाह सदाशिव कडू यांच्याशी झाला. ज्या वयात शिक्षणाची बाराखडी शिकायची होती, त्या वयात संसाराचा गाडा हाकत होत्या. त्यांचे पती मुंबईत राहत होते. एसबीआयमध्ये बुक बाईंडर पदावर ते काम करत होते. लग्नाच्या वर्षभरानंतरच त्यांना पहिला मुलगा झाला. तेव्हा देवाचे आभार मानण्यासाठी मुलाचं नाव विनायक ठेवून नवजात मुलाला घेऊन गावी जाण्याचा निर्णय घेतला. पण पुढे जाऊन आपल्या आयुष्यात काटे रचलेले असणार, याची प्रतीक्षा यांनी साधी कल्पना सुद्धा केली नसेल.

आपल्या बाळाला घेऊन गावी परतत असताना प्रवासात त्यांच्या पतीचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या २० व्या वर्षी विधवा झालेल्या प्रतीक्षा आतून पूर्णपणे तुटून गेल्या. त्याला आता स्वतःसाठी आणि मुलासाठी जगायचं आणि आपल्या मुलाला चांगलं आयुष्य द्यायचं असं त्यावेळी त्यांनी ठरवलं. आज त्यांनी ते प्रत्यक्षातही करून दाखवलं. एसबीआय बॅंकेत दोन तासांची सफाई कामगार म्हणून नोकरी करून त्यांना महिन्याला ६० ते ६५ रूपये मिळत होते. तिथे काम करत असताना बॅंकेत अधिकारी पदाच्या खुर्चीवर बसलेल्या कामगारांना पाहून त्यांनी सुद्धा बॅंक अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलं.

आपण आपली १० वी चं शिक्षण कसं पूर्ण करू शकतं, याची त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांकडे चौकशी सुरू केली. तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना यासाठी भरपूर मदत केली. इतकंच काय तर त्यांना शिकता यावं म्हणून तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना एक महिन्याची सुट्टी देखील दिली. प्रतीक्षा यांनी त्यांच्या नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडून १० वी च्या शिक्षणासाठीची पुस्तके मिळवून अभ्यासाला सुरूवात केली. दिवस रात्र एक करून त्यांनी १० वीत तब्बल ६० टक्के गुण मिळवले. १० वी ची परिक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मात्र त्यांनी काही मागे वळून पाहिलं नाही.

मग प्रतीक्षा यांनी शिक्षणाचा पुढचा प्रवास सुरूच ठेवून मुंबईमधल्या विक्रोळी इथल्या नाईट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी १२ वीचं शिक्षण सुद्धा पूर्ण केलं आणि १९९५ मध्ये मानसशास्त्रात त्यांनी पदवी मिळवली. त्यावेळी त्या काम करत असलेल्या बॅंकेत क्लर्कपदाची भरती सुरू होती. त्या आधारे त्यांना या पदावर प्रमोशन मिळालं. त्यानंतर पुढे फक्त प्रगतीची पावले उचलत आज त्या बॅंकेत असिस्टंट जनरल मॅनेजर पदाच्या खुर्चीवर बसून कारभार पाहत आहेत.

प्रतीक्षा तोंडवळकर यांना आता निवृत्त होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी आहे. एसबीआयमध्ये ३७ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी धैर्य आणि दृढनिश्चय दाखवला, परंतु त्यांच्यासाठी हा शेवट नाही. तोंडवळकर यांनी २०२१ मध्ये निसर्गोपचाराचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांना ते ज्ञान लोकांच्या सेवेसाठी आणि वापरण्यासाठी वापरायचे आहे.

तोंडवळकर म्हणतात, “मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा मला हे सर्व अशक्य वाटते, पण मी ते साध्य केले याचा मला आनंद आहे. जर कोणी निराश किंवा नैराश्यग्रस्त असेल तर माझी कथा त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून त्यांना प्रेरणा मिळेल.”

Related Articles

Back to top button