News

#NoBindiNoBusiness ची वर्षपूर्ती

गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या आधी आपण सगळे टीव्हीवर अनेक जाहिराती बघत होतो दिवाळी सणाच्या खरेदीसाठी फॅब इंडिया असो किंवा तनिष्क, आपल्या जाहिरातीतील मॉडेल्स बिंदी (टिकली) शिवाय दाखवत होते. शिवाय इतरही सौभाग्य लक्षणे त्या मॉडेल्सच्या अंगावर दिसत नव्हती. मॉडेल्सचे चेहरे देखील सुतक लागल्यासारखे मख्ख. त्यांचे कपडे हे एखाद्या शोकसभेला जात असल्यासारखे काळया रंगाचे. एकूणच दिवाळी म्हणजे भकास सण असावा तशा जाहिराती.
म्हणजेच सण हिंदूंचा, जाहिरात हिंदूंसाठी, खरेदी करणार हिंदू; मात्र जाहिरातीत हिंदूंच्या कोणत्याही प्रतिकांचा वापर केलेला नव्हता. नाही रांगोळी, नाही दिवे, नाही जाहिरातीत तो हिंदू सण म्हणून उत्साह… निर्विकार जाहिराती.
ही अवहेलना कमी म्हणून की काय दिवाळीला जशन ए रीवाज म्हणून जाहिरातीत संबोधले जाऊ लागले. दिवाली की सौगात तोफा ए खास ही जाहिरातीची पंचलाईन झाली. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली आमच्या हिंदू सणांचे इस्लामीकरण करण्याचा पद्धतशीर डाव असावा अशी शंका हिंदू जनमानसाला येऊ लागली.
या सगळ्या षडयंत्राला भेदायचे असेल तर ज्या हिंदू समाजाच्या खरेदीवर या कॉर्पोरेट्सना भरोसा होता, आपण वाट्टेल ती जाहिरात दाखवली तरी आपल्या विक्रीवर सुतराम परिणाम होणार नाही अशी ज्यांना मनोमन खात्री होती; त्या गृहीतकालाच उध्वस्त करणे आवश्यक होते.


या जाहिराती करताना हिंदू मानसाची दखलही न घेणाऱ्या या सगळ्या कॉर्पोरेट्सना सोशल मीडिया नावाच्या ब्रहस्त्राचा विसर पडला होता. किंबहुना त्यांनी ते खिजगणतीतही देखील धरले नव्हते. आणि इथेच त्यांच्यावर प्रहार करण्याची सुसंधी होती.
शेफालीताई वैद्य या राष्ट्रीय विचारांचा हिरीरीने पुरस्कार करणाऱ्या सोशल मीडियावरील एक धडाडीच्या कार्यकर्त्या #NoBindiNoBusiness हा हॅशटॅग घेऊन मैदानात उतरल्या.
या सगळ्या जाहिरातीतील हिंदू जनमानसाच्या अपमानाचा लेखाजोखा त्यांनी आपल्या सोशल मीडियावरील हँडल्स मधून मांडायला सुरुवात केली. या कंपन्यांनी हिंदू समाजाला ग्राहक म्हणून कसे गृहीत धरले आहे याची जाणीव हिंदू जनमानसाला करून दिली. या सगळ्या कॉर्पोरेट्स ना वठणीवर आणायचे असेल तर यांच्याकडून खरेदी न करणे हा एकमेव प्रभावी उपाय आहे हे त्यांनी आपल्या परखड आणि मुद्देसूद विवेचनातून हिंदू ग्राहकांना पटवून दिले. हिंदू समाजात आतल्या आत धुमसणारी आग आता वणव्यासारखी पेटून धडाडून उठली.
बघता बघता #NoBindiNoBusiness ही सोशल मीडियावर सर्वसामान्य जनमानसाची चळवळ झाली. हा हॅशटॅग सोशल मीडियावर सर्वव्यापी झाला. कॉर्पोरेट्सच्या मानसिक महारोगावर वैद्यांची मात्रा अचूक लागू पडली.
सोशल मीडियावरील या चळवळीचा सगळ्यात मोठा फटका बसला तो फॅब इंडियाला. त्याच्या मागोमाग तनिष्क, अमेझॉन अशी रांगच लागली. दिवाळी जवळ आली तरी आपल्या दुकानात म्हणावं तसं गिऱ्हाईक फिरकत नाही या जाणिवेने या कॉर्पोरेटचे व्यवस्थापन हादरले. काहींनी जाहिराती मागे घेतल्या तर काहींनी फोटोशॉप करून जाहिरातीतील मॉडेल्सच्या कपाळावर दिसेल न दिसेल अशी छोटी टिकली लावली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मिळायचा तो व्यावसायिक दणका या धेंडांना मिळालाच होता.
गेल्या वर्षीच्या दणक्याने यावर्षी सगळ्या कंपन्या सावध झालेल्या दिसताहेत. रंगीबेरंगी साड्या, कपाळावर ठसठशीत कुंकू, हातात बांगड्या, चेहऱ्यावर हास्य, दिव्यांची आरास… खरी खुरी दिवाळी असल्याचे चित्र यावर्षीच्या जाहिरातीमधून दिसत आहे. हा बदल स्वागतार्ह असला तरी तो व्यावसायिक नुकसानाच्या भीतीपोटी घेतलेला आहे, स्वखुशीने नाही; त्यामुळे हिंदू समाजाला अत्यंत सावध राहून ही कॉर्पोरेट्स पुन्हा आपल्या मूळ औकातीवर येणार नाहीत यासाठी नित्य सिद्ध राहायला हवे.
कारण लातो के भूत बातों से नही मानते…


एकूणच कॉर्पोरेट्सच्या नाईलाजास्तव बदललेल्या मानसिकतेपेक्षा हिंदू समाजाची आपल्या अस्मितेबद्दलची जागृतता आणि एकजूट मनाला निश्चितपणे सुखावणारी आहे.

Back to top button